
नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये
नागपूर,२० मार्च: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी देशात व राज्यात अनेक पावले उचलली जात आहेत.हा आजार संसर्गजन्य असल्याने अनेक खबरदारीच्या उपाययोजना शासनामार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबवल्या जात आहेत. कोरोनाचा प्रसार स्वस्थ समाजामध्ये होऊ नये यासाठी आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक कठोर निर्णय घेतले असून नागपूर शहरात देखील त्या निर्णयांच्या अंमलबजावणीचे संपूर्ण अधिकार महापालिका आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत.या निर्णयात सर्वात महत्वाचा निर्णय हा शहराला जवळपास ‘लॉक डाऊन‘करण्याचा असल्याची माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी दि. २० मार्च रोजी रात्री ९ वा.घेतलेल्या तातडीच्या पत्र परिषदेत दिली.
साथीच्या आजारांविषयी १३ मार्च १८९७ रोजी जो कायद्या करण्यात आला त्या कायद्यातील कलम १० नुसार नागपूर शहरात आतापासूनच लॉक डाऊनची घोषणा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या कलमाचा अर्थ म्हणजे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. गाड्यांच्या आवाजावीला देखील बंदी घालण्यात आली आहे. शहरातील सर्व खाजगी संस्था या देखील पूर्णपणे बंद असतील. या पूर्वीच घोषित केल्याप्रमाणे सर्व रेस्टॉरेंट,बार, हॉटेल्स, पानठेले,जिम,पब,डिस्कोटेथ,तरणताळ,पब्स,स्पा केंद्रे,सिनेमागृहे,बगिचे इ.सर्व सार्वजनिक ठिकाणे ही पूर्णपणे बंद असेल.
अत्यावश्यक सेवांना मात्र यातून वगळण्यात आले आहे.यात पिण्याच्या पाण्याची सेवा,सिवरेज,वेस्ट मॅनेजमेंट,बँका,औषधी दूकाने,भाजीची दूकाने, दूध,किराणा दूकाने,वीयर हॉऊस,रुग्णालये,टेलिफोन सेवा,रेल्वे,इंटरनेट सेवा,ई-कॉमर्स, होम डिलीवरी,फूड ऐसेस्टस्,मिडीया,फॉर्मेसी,इ.सेवा यांनाच सूट असून याशिवाय इतर कोणत्याही सेवेला वा व्यवसायाला सूट नाही.
याशिवाय रस्त्यावर थूंकणे यावर १,००० रुपयांचा दंड नागरिकांवर ठोठावला जाईल यासाठी मनपाचे भरारी पथक तसेच पोलिसांमार्फत कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
या आदेशांचे उल्लंघन करणारे यांच्यावर आयपीसी धारा १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल.याशिवाय एमआयडीसी बाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना जाहीर केली असल्याची माहिती मुंढे यांनी दिली.
हे सर्व नागपूरच्या नागरिकांचे आरोग्य लक्ष्ात घेऊनच पावले उचलण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सखोल चर्चा झाली व खबरदारीचा उपाय म्हणून ‘लॉक डाऊन’चा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी या शहर बंदीबाबत घाबरुन जाण्याचे कारण नाही.कोणत्याही प्रकारची चौकशी ते मनपाच्या कंट्रोल रुमवर करु शकतात व आपल्या शंकांचे निरसन करु शकतात. कंट्रोल रुम व टेलिफोन सुविधा याचा नागरिकांनी लाभ घ्यावा.ही सर्व घबरदारी नागपूर शहरात करोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठीच घेण्यात आली आहे,नागरिकांनी हे लक्ष्ात घेऊन सहकार्य करावे.
रस्त्यावर फिरताना आढळले असल्यास पोलीस चौकशी करतील मात्र त्यांना घाबरु नये. योग्य उत्तर द्यावे व घर गाठावे,पोलिस तुमची फक्त चौकशी करतील.शक्यतो अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडूच नये असे आव्हान तुकाराम मुंढे यांनी केले. सकाळी मॉर्निंग वॉकला देखील जाण्यास बंदी असल्याचे त्यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
