फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूरात सर्वच राजकीय पक्षांचा विजयाचा दावा

नागपूरात सर्वच राजकीय पक्षांचा विजयाचा दावा

Advertisements

वेध महापालिकेचे (भाग-१)

अखेर तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीवर शिक्कामोर्तब

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. २२ सप्टेंबर २०२१: गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नागपूरसह,ठाणे,पुणे,पिंपरी-चिंचवड इ.अश्‍या १८ महापालिकांच्या निवडणूकीचा बिगूल वाजला व येत्या फेब्रुवारी महिन्यात पार पडणा-या महापालिकेच्या निवडणूकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कच्या प्रभाग रचनेचा आराखडा तयार करुन निवडणूकीची प्रक्रिया सुरु करण्याचा आदेश संबंधित महापालिका प्रशासनाला दिले.या निवडणूकांच्या प्रभागासाठी २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग ठरविण्यात यावे तसेच महापालिकांच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या,वगळलेल्या क्षेत्रांचा विचार करुन प्रभाग आखण्याची सूचनाही महापालिका आयुक्तांना राज्य निवडणूक आयोगाने केली.

राज्यातील बहूतांश महापालिकांच्या निवडणूका २०१७ मध्ये ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच पार पडल्या होत्या,याचा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला प्रचंड फायदा झाला होता,यंदा मात्र सत्तेच्या सारिपाटावरील गडी बदलले असून ‘न भूतो ना भविष्यती’अशी तिन पक्षांच्या आघाडी सरकारची स्थापना नोव्हेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्रात सत्तारुढ झाल्यावर यंदा प्रभाग पद्धतीत बदल केल्या जाणार असल्याचा सूतोवा पहील्याच अधिवशेनात करण्यात आला व सर्व प्रकारच्या वावड्यांना पूर्णविराम देत आज मंत्रीमंडळ बैठकीत मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांच्या निवडणूका या तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार पार पडतील यावर शिक्कामोर्तब झाले.

अर्थात यात ही शिवसेनेला पूर्वीचीच ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीच सोयीची वाटत असल्याने मात्र राष्ट्रवादी व काँग्रेस व काँग्रेसचा याला प्रखर विरोध असल्याने शेवटी ३ सदस्यीय प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाले.

नागपूरात या ३ सदस्यीय प्रभाग पद्धतीचा विविध राजकीय पक्ष्ांवर कोणता परिणाम होईल यावर आता चांगलीच चर्चा झडतेय.गेल्या काही महिन्यात नागपूरातील विविध राजकीय पक्ष्ात बरेच बदल आणि सत्तांतर घडून आले आहेत.केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर आता राज्याच्या उपराजधानीतही भाजपची गेल्या तीन टर्मपासूनची सत्ता उलथवून टाकण्याचा मानस सर्वच विरोधी पक्ष् वेळोवेळी व्यक्त करीत आले आहेत तर अनेक पक्षातील सत्ताधुरीण यांनी सत्तांतरण करुन पक्ष् ही बदलला असल्याने याचेही निवडणूकीतील वजा-बेरीजेमध्ये कोणते तोटे-फायदे होणार,याचा ही ‘हिशेब’लावला जात आहे.

सत्ताधीश‘ने याचा घेतलेला आढावा-

१) राष्ट्रवादी
याच वर्षी जून महिन्यात शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरु करणारे माजी केंद्रिय मंत्री सुबोध मोहिते यांनी पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘घड्याळ ’ हातावर बांधले.यामुळे विदर्भात राष्ट्रवादीचे बळ वाढले असल्याचे बोलले जात आहे.शहरात प्रशांत पवार,आभा पांडे,रविनीश पांडेय यांच्यासह अनेक कद्दावर नेत्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने पक्ष्ाला सुयोग्य नेते व नेतृत्व मिळाले असल्याचे बोलले जात असून शहर व ग्रामीण भागात पक्ष्ाला याचा फायदा होणार असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे.

सध्या राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक आहे.याच वर्षी मे महिन्यात मनपा निवडणूकीचा बिगूल फूंकताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काटोल रोड येथे पक्ष्ाच्या पदाधिका-यांची प्रदीर्घ बैठक घेऊन शहरात दीड डझन राष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधी असल्याचे सांगितले.नेत्यांनी बौद्धिक देणे व इतर पदाधिका-यांवर टिका करण्या ऐवजी आपल्या क्ष्ेत्रातील चांगल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन तयार करावे,यातून संघटन बळकट होईल व निवडणूकीत पक्ष्ाला चांगले कार्यकर्ते मिळतील असे मार्गदर्शन केले होते मात्र विद्यमान परिस्थितीत अनिल देशमुख यांच्या मागे इडीचा ससेमिरा लागला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक त्यांच्या प्रबळ नेतृत्वा अभावीच पक्ष्ाला लढावी लागणार असल्याचे खासगीत बोलले जात आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील गेल्या महिन्यात नागपूर दौ-यात देशमुखांच्या मागे केंद्र सरकारने इडीचा ससेमिरा लावला असला तरी नागपूरला वा-यावर सोडणार नसल्याचे आश्‍वासन दिले .अनिल देशमुख नसले तरी दर महिन्याला राष्ट्रवादीमार्फत एक प्रतिनिधी नागपूरमध्ये पाठविला जाईल असा दिलासा कार्यकर्त्यांना दिला.

काँग्रेसच्या आग्रहामुळे आजवर राष्ट्रवादीने नागपूर व विदर्भात दुय्यम भूमिका घेतली मात्र या पुढे हे खपवून घेतले जाणार नसल्याचा सज्जड दम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफूल्ल पटेल यांनी काँग्रेसला दिला, सोबतच चार पूल व दोन रस्ते बांधून शहराचा विकास होत नसतो असे सांगून भाजपवरही शरसंधान साधले होते,त्यामुळे मनपा निवडणूकीत या पक्ष्ाच्या वा-याची दिशा कोणती असणार याचा अंदाज बांधल्या जात आहे.

स्वबळावर निवडणूक लढण्यास पक्ष् सक्षम आहे,कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याची गरज नाही अश्‍या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक राजेंद्र जैन यांनी निर्धार व्यक्त केला आहे.

याच वर्षी जुलै महिन्यात आघाडी सरकारमध्ये ‘भागधारक’ असणा-या राष्ट्रवादीने नागपूरात शिवसेनेला धक्का देत माजी उपमहापौर व माजी जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांना ‘जय महाराष्ट्र‘करण्यास यश मिळवले.सावरबांधेंचे हे पक्षांतर सेनेला जोरदार धक्का मानला जात आहे.शिवसेनेत बाहेरुन आलेल्यांना संधी दिली जाते पण शिवसैनिकांना डावलले जाते,असा आरोप करीत विदर्भाचे सहसंपर्कप्रमुख सावरबांधे यांनी शिवसेना सोडली.येत्या निवडणूकीत त्यांची ही भूमिका महत्वाची ठरणार आहे.

याच वर्षी जूनमध्ये राष्ट्रवादी शहराध्यक्ष् पदी पक्ष्ाचे एकमेव नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांची नियुक्ती करण्यात आली व अगामी महानगरपालिका निवडणूका त्यांच्याच अनुभवी नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष् लढणार असल्याचे निश्‍चित झाले.त्यांनी २८ महासचिव,१६ सचिव तसेच १४ संघटन सचिवांची जम्बो कार्यकारिणी घोषित करुन मनपा निवडणूकीसाठी आपले ‘सैन्य’सज्ज केले.अाता याचा अगामी मनपा निवडणूकीत कितपत फायदा पक्षाला होतो याकडे मतदारांचे लक्ष् लागले आहे.

२) काँग्रेस-
राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणूकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश देताच शहर काँग्रेसचे अध्यक्ष् विकास ठाकरे यांनी तातडीने १८ ब्लॉकवर समन्वयकांची नियुक्ती करुन समन्वयकाने प्रत्येक ब्लॉक अध्यक्षांच्या संपर्कात राहून त्यांच्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले यावरुन विकास ठाकरे हे आतपासूनच निवडणूक ‘मोड’वर आल्याचे दिसून पडतंय.

मागील महापालिकेच्या निवडणूकीत उमेदवारी वाटपावरुन काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती.असंतुष्टांनी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या जाहीर सभेत ‘शाई कांड’घडवून आणले व अंडी ही फेकली होती.त्याची फार मोठी किंमत काँग्रेसला निवडणूकीत चुकवावी लागली आणि एकेकाळचा सत्ताधारी पक्ष २९ जागांवर सिमीत झाला.

हाच अनुभव बघता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महापालिका निवडणूकीसाठी उमेदवार तुम्हीच ठरवा,निवडणूकीची संपूर्ण

प्रक्रिया उपराजधानीतच होईल त्यामुळे उमेदवारीसाठी ‘बायोडेटा’घेऊन फिरण्याची गरज नसल्याचा सल्लावजा दिलासा इच्छूकांना दिला.
कार्यकर्त्यांच्या भरवश्‍यावर ही निवडणूक जिंकायची आहे.बुथ पातळीवर संपर्क,नियोजन करा,महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे,लोकांचे प्रश्‍न,समस्या समजून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा.तुमच्यातून तुम्हीच उमेदवार ठरवा आणि त्यांना विजयी करा,असे आवाहन त्यांनी केले आहे.एकप्रकारे पाडापाडीचे राजकारण यावेळी खपवून घेणार नसल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे.

मात्र त्यांच्याच पक्षाचे मंत्री नितीन राऊत यांनी त्यांच्या विरोधात दिल्ली दरबारी नाराजी व्यक्त केल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती.खनिकर्म महामंडळाच्या निविदेतील घोळ यावर नानांच्या भूमिकेला त्यांचा विरोध असला तरी निवडणूकीच्या पातळीवर कितपत या दोन दिग्गज नेत्यांची ‘दिलजमाई‘होेते याकडे ही काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

नुकतेच चतुर्वेदी व गिरीश गांधी यांनी काँग्रेस ऐक्याची हाक देत नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस हे दोन ध्रुव निवडणूकीसाठी तरी एकत्रित येत असतील तर आता काँग्रेस नेत्यांनीही एकजुटीने लढा उभारला पाहिजे,असे आव्हान गिरीश गांधी यांनी काँग्रेसच्या नूतन पदाधिका-यांच्या सत्कार सोहळ्यात केले.याच कार्यक्रमात पक्षाने बरेच काही दिले आहे,त्यामुळे आता अपेक्षा नाही,निवडणूक लढायची नाही,पक्षाचे कर्ज फेडण्याची हीच वेळ आहे,या कार्यक्रमातील चतुर्वेदी यांची ही कृतज्ञता समाज माध्यमांमध्येही चांगलीच व्हायरल झाली.

गटबाजी बाजूला ठेऊन यावेळी महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकवा,असे आव्हान अनंतराव घारड यांनी केले आहे.कुणासमोर नतमस्तक व्हावे,हे आधीच स्पष्ट झाले तर त्यासाठी देखील कार्यकर्त्यांची तयारी आहे,अशी आक्रमक भावना रामकिशन ओझा यांनी मांडून योग्य तो इशारा ही दिला मात्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या कार्यकारिणीत ज्येष्ठ नगरसेवक प्रफूल्ल गुडधे पाटील,गिरीश पांडव,प्रा.बबनराव तायवाडे,अतुल कोटेचा,सुरेश भोयर यांच्यासारख्या सक्रिय नेत्यांना वगळल्याने या असंतोषाचा फटका अगामी निवडणूकीत काँग्रेसला बसणार का?याची देखील चर्चा ऐकू येत आहे.

दुसरीकडे अभिजित वंजारी,अतुल लोंढे,आशीष देशमुख,संदेश सिंगलकर,विजय बारसे,संजय महाकाळकर, किशाेर गजभिये,उमाकांत अग्निहोत्री आदी यांना पटोले यांनी कार्यकारिणीत स्थान दिल्याने केदार,चतुर्वेदी,राऊत गटाला योग्य तो इशारा मिळाला असल्याचे ही बोलले जात आहे.

स्थानिक गटबाजीतून काँग्रेसला सत्ता गमवावी लागली असून दीड दशकानंतर प्राप्त झालेल्या या सुवर्ण संधीचा पुरेपूर उपयोग जुन्या सर्व चूका टाळून करण्याचा मानस आता काँग्रेस नेते खासगीत देखील बोलू लागले आहेत.

३)भाजप-
नागपूर शहर हे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होमटाऊन असल्याने मनपाच्या निवडणूकीतील पराभव हा त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिमेला छेद देणारा ठरु शकतो,याची पुरेपूर जाणीव असल्यानेच महापालिकेचे काम उत्तम आहे,आता नागपूरकरांनी येत्या निवडणूकीत बक्षीस ही द्या म्हणून मनपा निवडणूकीचा बिगूल गडकरी यांनी ६ महिन्याअाधीच फूंकला.गेल्या ५ वर्षात महापालिकेने केलेली कामे म्हणजे ‘ट्रेलर’असून असली सिनेमा पुढे आहे असेही त्यांनी सांगितले.मनपाने पाणी,सांडपाणी पुर्नवापर,रस्ते,शिक्षण आरोग्य क्षेत्रात उत्तम कार्य केले आता नागपूरकरांनी चांगल्या कामांचे बक्षीस ही द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

यावर बरीच बोचरी टिका देखील समाज माध्यमात उमटली होती तर काँग्रेस शहराध्यक्ष व आ.विकास ठाकरे यांनी पत्र परिषद घेऊन पदवीधर मतदार निवडणूकीत जे बक्षीस भाजपला मिळाले तेच बक्षीस मनपा निवडणूकीत नागपूरकर जनता भाजपला देणार असल्याची खरमरीत टिका गडकरींवर केली.

मनपा निवडणूक भाजपला जिंकणे अवघड असल्याचे संकेत मिळाल्याने सेंटर पॉईंटमध्ये भाजपची चिंतन बैठक ही तातडीने पार पडली. महापालिकेत पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मागील निवडणूकीत तब्बल १०८ नगरसेवक भाजपचे निवडून आले होते.त्यामुळे सगळेच निश्‍चिंत झाले.४ च्या प्रभागामुळे आरामात निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांनी निवडणूकीनंतर प्रभागात फिरुन देखील पाहिले नाही.४ नगरसेवकांमध्ये समन्वयच नसल्याने अनेक प्रभागातील जनता प्रचंड नाराज असून त्याचाच फटका इतरांनाही बसू शकतो याशिवाय भाजपचे जमीनीवर काम करणारे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात नाराज असल्याची जाणीव या नेत्यांना झाली.

आपल्यापेक्षा दूसरा नगरसेवक मोठा होऊ नये याचीच काळजी अनेकांनी घेतली,विकासकामांवरुन श्रेयवादाची चढाओढसुद्धा भाजपमध्ये दिसून पडली,ही आपली वस्ती,आपला बालेकिल्ला,असा समज काही नगरसेवकांनी करुन घेतल्याने त्यांच्या भागात संघटनेचा पदाधिकारी गेला तरी त्यांना खटकतं,तो त्याला लगेच प्रतिस्पर्धी समजतो मात्र कोणाला तिकीट द्यायची याचा निर्णय पक्ष घेतो,कोणीही आपली तिकीट कापू शकत नाही या भ्रमात राहू नये,असा कडू उपदेशाचा डोज फडणवीस यांना या चिंतन बैठकीत द्यावा लागला.स्पर्धा करताना पक्षालाच खड्ड्यात घालू नका,अशी कानटोचणी ही त्यांनी केली.

वार्ड झाला किवा कशीही रचना झाली तरी माझी उमेदवारी निश्‍चित,या भ्रमात राहू नका,कुणीही फायनल नाही अश्‍या कानपिचक्या ही त्यांनी दिल्या.वॉर्डाला मालमत्ता समजू नका,जनसंपर्क वाढवा,मतभेद घरी ठेवा,प्रत्यक्ष कामाला लागा,महापालिकेच्या येत्या निवडणूकीसाठी सज्ज व्हा,असे आवाहन करीत निवडणूकीचा बिगूल त्यांनी ही फूंकला.

याच पार्श्वभूमीवर २० फेब्रुवरी २०२१ रोजी भाजपने संदीप जाधव यांच्या जागी पक्षाचे अनुभवी नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती अविनाश ठाकरे यांची सत्ता पक्ष नेते पदी निवड केली तर पिंंटू झलके यांचा कार्यकाळ संपल्याने प्रकाश भाेयर यांची स्थायी समिती अध्यक्ष पदी निवड केली.याशिवाय झोन सभापती यांची देखील नव्याने निवड करीत ‘भाकरी फिरवली’ मात्र येत्या निवडणूकीत याचा पक्षाला कितपत फायदा होणार हे मजमोजणीच्या दिवशीच कळू शकेल.

(क्रमश:)

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या