फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमनागपूरात महापौर शयर्तीत असलेल्या ‘या ’महिलेच्या मुलांविरुद्ध तक्रार दाखल

नागपूरात महापौर शयर्तीत असलेल्या ‘या ’महिलेच्या मुलांविरुद्ध तक्रार दाखल

Advertisements
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना करावा लागला पोलिस आयुक्तांना फोन

गृहमंत्र्यांच्याच शहरात महिला उमेदवार असुरक्षित:कायदा,सुव्यवस्था टांगणीवर
नागपूर,ता.२३ जानेवरी २०२६: छत्रपती नगर,नरेंद्र नगर पुलाजवळ राहणारे पूर्वीचे भाजप पदाधिकारी व सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तुषार गि-हे यांच्या घरावर मनपा निवडणूकीचा निकाल १६ जानेवरी रोजी जाहीर झाल्यावर व प्रभाग क्र.१६ मधून भाजपचे ’कुख्यात’पदाधिकारी मुन्ना यादवच्या पत्नी लक्ष्मी उर्फ तारा यादव विजयी झाल्यावर,या निवडणूकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी राहीलेल्या सरिता गि-हे पराभूत झाल्यावर १६ तारखेच्या मध्यरात्री ३.३० वाजता मुन्ना यादव यांच्या मुलांनी गि-हे यांच्या घरावर दगडफेक केली,अश्‍लील शिवीगाळ करुन बाहेर उभी असलेली चारचाकी फोडली.या विरोधात तुषार गि-हे,त्यांचे वडील मधुकर गि-हे तसेच पत्नी सरिता गि-हे यांनी धंतोली पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
मात्र,त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आज गि-हे यांनी पत्रकार भवनात पत्रकार परिषदेत केला.इतकंच नव्हे तर पोलिस विभागाचे जनसंपर्क अधिकारी झोल यांनी गि-हे कुटूंबियांना पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांना भेटण्यापासून रोखले असल्याचा आरोप त्यांनी केला.यामुळे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना गि-हे यांनी या अन्यायाबाबत वस्तुस्थिती कळवली.यानंतर राज ठाकरे यांनी पोलिस आयुक्त सिंगल यांना फोन करुन गुन्हा दाखल करण्यास सांगितले.तरी देखील गुन्हा दाखल न करता धंतोली पोलिसांनी भाजप नेत्यांच्या दबावात येऊन फक्त तक्रार दाखल केल्याचे गि-हे यांनी सांगितले.
या तक्रारीत गि-हे यांनी मुन्ना यादव यांच्या दोन्ही मुलांवर कारवाई करण्याची मागणी केली असून घटनेच्या रात्री मुन्ना यादव यांच्या पत्नीच्या विजयानंतर मध्यरात्री पर्यंत या भागात कानठाल्या बसणा-या आवाजात फटाके फूटत होते व विजयाचा जल्लोष नव्हे तर उन्माद साजरा होत होता,असे सांगितले.(नुकतेच ध्वनी प्रदुषणावर न्यायालयाची कठोर टिपण्णी आली असून विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना यासंबधी न्यायालयाने नोटीस पाठवली आहे,मध्यरात्रीपर्यंत प्रभाग क्र.१६ मध्ये विजयाचा जल्लोष साजरा होत होता व शहरातील पोलिस विभागासह शासनाची सर्व संबंधित यंत्रणा ही ‘खामोश‘होती!) मुन्ना यादव यांच्या मुलांसोबत १५ ते २० गुंड प्रवुत्तीची मुले ही विद्युत विभागाच्या कार्यालया समोरील गिट्टीवर बसून अर्वाच्य शिवीगाळ करीत होती.त्यांच्या बुलेट दूचाकी व दोन कार गि-हे यांच्या घराजवळ थांबविण्यात आल्या होत्या.यावेळी त्यांनी विजयाच्या उन्मादात गि-हे कुटूंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या,अशी तक्रार नोंदविण्यात आली.गि-हे यांच्या घरावर या गुंड टोळीने दगडफेक करुन उच्छाद मांडला.
ज्या गृहमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरातच एका महिला उमेदवारावर मध्य रात्री ही जीवघेणी आपत्ती ओढवली ते बघता, शहरातील व राज्यातील कायदा सुव्यवस्था टांगणीला असल्याचा घणाघाती आरोप गि-हे करतात.महत्वाचे म्हणजे पोलिस विभाग हा जनतेच्या संरक्षणासाठी असतो मात्र,मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतला भाजप नेता मुन्ना यादव याच्या विरोधात साधी तक्रार देखील दाखल करण्यास ते धजत नव्हते,न्यायासाठी आम्हाला राज ठाकरेंना फोन करावा लागला असल्याची खंत गि-हे यांनी व्यक्त केली.
महत्वाचे म्हणजे या ‘अ’मराठी गुंडांनी मराठी भाषिकांना अक्षरश: आई-बहीणीच्या शिव्या दिल्या,असा आरोप गि-हे यांनी केला. निवडणूकीच्या वेळीच मुन्ना यादव व त्यांच्या समर्थकांनी ‘ मार डालेंगे,काट डालेंगे ’अश्‍या धमक्या सहकार नगरमध्ये जाऊन दिल्या असल्याचा अारोप गि-हे यांनी केला.आम्हाला मते  न दिल्यास बुलडोजर लावून झोपड्या पाडून टाकू अश्‍या धमक्या देण्यात आल्या.भाजप हा सन्मानीय व माणूसकीचा पक्ष होता.लोकांच्या सुख-दु:खात सहभागी होणार पक्ष होता,त्या पक्षाची बदनामी व नाव खराब करण्याचा प्रकार त्यांचा पदाधिकारी मुन्ना यादव व त्याची मुले करीत आहेत.त्यांना योग्य समज देणे हे पक्षश्रेष्ठींचे काम आहे मात्र,तेच मुन्ना यादव यांना आपल्या प्रत्येक कार्यक्रमातील मंचावर हिंदी भाषिक मतपेढीसाठी बरोबरीचे स्थान देताना दिसून पडतात,ही दूर्देवाची बाब असल्याचे गि-हे सांगतात.
मी स्वत:भाजपचा जुना कार्यकर्ता असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला नावानिशी ओळखत असल्याचे गि-हे यांनी सांगितले.अनेक वर्षे आपुलकीतून फडणवीस यांनी माझ्या घरी भेट दिली आहे,आज माझ्या ८० वर्षीय आईवर मध्यरात्री जे संकट ओढवले,ते शब्दात सांगू शकत नाही.माझे व फडणवीसांचे जुने ऋणानुबंध मुन्ना यादव यांना देखील माहिती आहे मात्र,तरी देखील विजयाच्या उन्मादातून त्याने माझ्या घरी मध्यरात्री गुंड पाठवले.फडणवीस त्यांच्या पक्षातील या गुंडांना योग्य समज देतीत व गृहमंत्री म्हणून आपले संवैधानिक कर्तव्य निभवतील,अशी अपेक्षा याप्रसंगी गि-हे यांनी व्यक्त केली.
थोडक्यात,मनपा निवडणूक आटोपली असून महापौर पदासाठी सोडत देखील काल निघाली.या सोडतीत नागपूरसाठी खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी महापौर पद राखीव झाले असून, भाजपच्या अनेक जुन्या,अनुभवी नगरसेविकांसोबतच नव्याने विजयी झालेल्या महिला उमेदवारांविषयी देखील महापौर पदासाठी चर्चा सुरु आहे.त्यात मुन्ना यादव यांच्या पत्नी तारा यादव यांचे देखील नाव समोर आले आहे.ज्या महिलेच्या मुलांच्या नावे व स्वत: तारा यादव यांच्याही विरोधात धंतोली पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे,त्या नागपूर शहराच्या महापौर घोषित झाल्यास फक्त सहकार नगर किवा प्रभाग क्र. १६ नव्हे तर संपूर्ण नागपूर शहरातील महिलांच गंभीर संकटात येतील,असा इशारा याप्रसंगी गि-हे यांनी दिला.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
………………………………………
तळटीप-
राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेंच्या मुलाचे प्रकरण देखील महाराष्ट्रात सध्या गाजत आहेत.नगर परिषद निवडणूकीवेळी रायगडमधील महाड परिसरात शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिस्पर्धी पक्षातील कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. या गुंडगिरीच्या प्रकरणात मंत्री गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले व पुतण्या महेश गोगावले या दोघांचाही सहभाग आढळला मात्र,गृहमंत्र्यांचा पोलिस विभाग सत्ताधारी मंत्र्याचे दिवटे पुत्र व पुतण्याला अटक करण्यास धजावत नव्हती!परिणामी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरले व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हतबल आहे का?अश्‍या
 शब्दात मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या दिल्या.मंत्र्यांची मुले गुन्हा करुन मोकाट फिरतात,दुसरीकडे राज्याचा मंत्री त्यांच्या संपर्कात असतात मात्र,पोलिसांना ते सापडत नाहीत,या राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही?मुख्यमंत्रीही याप्रश्‍नी गप्प का?मंत्र्यांच्या मुलाच्या प्रश्‍नी मुख्यमंत्री हतबल आहेत का?न्यायमूर्ती माधव जामदार यांनी अश्‍या शब्दात कानउघाडणी केल्यावर आज दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर शरण यावे लागले.महत्वाचे म्हणजे त्यांचा जामीन देखील नाकारण्यात आला.सत्ताधारी भाजप असो किंवा शिंदे,अजित पवार गट,त्यांचे शिलेदार (माजी मंत्री धनंजय मुंडेंसह)ज्या जनतेचे प्रश्‍न सोडविण्याच्या,त्यांचे जीवन सुखमय करण्याचा व राज्याचा,प्रभागाचा विकास साधण्याच्या पोकळ घोषणा ठोकून सत्तेवर येतात,त्यांची कृती ही प्रत्यक्षात नक्षलवादांनाही लाजविणारी असते,अशी परखड टिका समाज माध्यमात उमटलेली दिसून पडते.
………………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या