१० माजी नगरसेवकांसह १५० जणांनी माघार घेतली; काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण

नागपूर,२ जानेवरी २०२६: नागपूरकरांच्या पाठिंब्याने ‘मिशन शंभर’नगरसेवक हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काँग्रेसचे सर्व नेते व कार्यकर्ते एकसंध झाले असून नागपूर महानगरपालिका निवडणूक–२०२६ मध्ये आता कोणतीही बंडखोरी उरलेली नाही.नागपूरात बंडखोरी शमविण्यास काँग्रेसला शंभर टक्के यश मिळाले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत आज काँग्रेसच्या १० माजी नगरसेवकांसह सुमारे १५० काँग्रेस नेत्यांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले असून, गेल्या १९ वर्षांनंतर भाजपला महानगरपालिकेतून सत्तेबाहेर काढून काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
नामनिर्देशन मागे घेणाऱ्या माजी नगरसेवकांमध्ये प्रभाग-२५चे पुरुषोत्तम हजारे, प्रभाग-१०च्या रश्मी उईके, प्रभाग-१२चे अरुण ढवरे, प्रभाग-१३चे अमर बागडे, प्रभाग-८च्या आशा उईके, प्रभाग-८चे जिशान मुमताज मोहम्मद इरफान अन्सारी तसेच प्रभाग-१९चे फरहान खान कुर्बान खान यांचा समावेश आहे.पदापेक्षा लोकसेवा व पक्षसेवा महत्त्वाची या भूमिकेतून ओवैस कादरी, पूजा मानमोडे, राजेश तिवारी, मुन्ना वर्मा, सुधाकर तोडसे, माया वानखेडे, फर्दिन गन्नी खान आदी लोकप्रिय काँग्रेस नेत्यांनीही आपले अर्ज मागे घेतले.तिकीट वाटपाच्या प्रक्रियेदरम्यानही काँग्रेसमध्ये पूर्ण एकता दिसून आली असून कोणताही वाद निर्माण झाला नाही.
नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे, यांच्यासह उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत, आमदार अभिजीत वंजारी, गिरीश पांडव, अतुल कोटेचा, प्रफुल्ल गुडधे पाटिल, बंटी शेलके तसेच इतर ज्येष्ठ व युवा काँग्रेस नेत्यांनी पक्षहितासाठी नामनिर्देशन अर्ज मागे घेतलेल्या सर्व नेते व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले.
यावेळी सर्व नेत्यांनी एकमुखाने स्पष्ट केले की, वैयक्तिक पद, प्रतिष्ठा किंवा महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून पक्ष आणि नागपूरकरांचे हित सर्वोच्च मानणारी हीच खरी काँग्रेसची ताकद आहे. हीच एकजूट ‘मिशन शंभर’नगरसेवक या संकल्पाला यशस्वी करून भाजपचे गेल्या १९ वर्षांच्या अपयशी कारभाराला पूर्णविराम देईल.
काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करताना नेत्यांनी सांगितले की, प्रत्येक प्रभागात संघटितपणे, तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून, काँग्रेसचा विकासाचा अजेंडा आणि नागपूरच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा दृष्टिकोन प्रभावीपणे मांडावा.स्वच्छ, सुरक्षित, स्मार्ट आणि जनहितकारी नागपूर घडवण्यासाठी ‘मिशन शंभर’नगरसेवक हे केवळ निवडणूक लक्ष्य नसून, नागपूरच्या सर्वांगीण विकासाचा लोकआंदोलनात्मक संकल्प असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या झोपडपट्टी सेलचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी प्रभाग-३८ मधून उमेदवारी अर्ज मागे घेऊन पक्षाच्या ‘मिशन शंभर’नगरसेवक मोहिमेला आपला पाठिंबा दर्शविला आहे.पारडी, भांडेवाडी येथून काँग्रेस नेते पुरुषोत्तम हजारे यांनी घेतली माघार घेतली असून प्रभाग २५ च्या सर्व काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली असून काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कमलेश चौधरी हा काँग्रेसचा बंडखोर नाही-
कमलेश चौधरी हा काँग्रेसचा बंडखोर नसून, लोकसभा निवडणूक-२०२५ पासून त्याचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्याने भाजपसाठी सक्रियपणे काम केले, तर विधानसभा निवडणूक-२०२५ मध्ये अपक्ष उमेदवाराच्या बाजूने प्रचार करत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उघड भूमिका घेतली.महत्त्वाचे म्हणजे, त्याने काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज सादर केलेलाच नाही. उलट, तो भाजपकडून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक होता, मात्र भाजपनेही त्याला उमेदवारी नाकारली.
Advertisements

Advertisements

Advertisements
