फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमनागपूरात पोलिस अधिका-यावर मध्यरात्री हल्ला!ज्वाला धोटे यांची तात्काळ खात्री करण्याची मागणी

नागपूरात पोलिस अधिका-यावर मध्यरात्री हल्ला!ज्वाला धोटे यांची तात्काळ खात्री करण्याची मागणी

Advertisements

मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे निवेदन

अति गंभीर घटनेची अतितात्काळ खात्री व कारवाई करण्याची केली मागणी

निवेदनामागे पोलिस विभागाच्या बदनामीचा हेतू नाही:ज्वाला धोटे यांचे विधान

नागपूर,ता. ३० डिसेंबर: शनिवार दि.२५ डिसेंबरच्या मध्यरात्री दीड ते अडीच वाजताच्या सुमारास नागपूर पोलिस दलातील एका वरीष्ठ पोलिस अधिका-याला सदर येथील माऊंट रोडवर चार गुंड प्रवृत्तीच्या तरुणांकडून जबर मारहाण झाल्याची घटना सध्या सर्वदूर चर्चिली जात आहे,हे पोलिस अधिकारी त्या वेळी सिविल कपड्यांमध्ये व खासगी कारने घरी जात असल्याची माहिती आहे.एवढ्या रात्री चार तरुण हे अंधारलेल्या जागी उभे असल्याचे बघून सदर पोलिस अधिकारी यांनी आपली कार थांबवून त्यांना जाब विचारला असता त्या तरुणांनी, सदर पोलिस अधिका-याला जबर मारहाण करुन त्यांचे ४ ते ५ दात पाडले व पळ काढला,सर्वदूर चर्चिली जाणारी ही घटना सत्य असल्यास, राज्यातील संपूर्ण पोलिस विभागाला काळीमा फासणारी घटना असल्याचे सांगून, या घटनेची सत्यता तात्काळ तपासून आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी, राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे यांनी मेल द्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्याच्या उपराजधानीत एखाद्या आयपीएस पोलिस अधिका-याला गुंडांच्या टोळीने मारहाण करून त्यांचे ओठ – दात जखमी करने, त्यांना चेहऱ्यावर व शरीरावर गंभीर जखमी करने ही अति गंभीर बाब असून, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनेबाबत शासनास कळविले नसल्याची साशंकता बघता , या घटनेच्या खात्रीकरीता पोलीस स्टेशन सदर , सीताबर्डी नागपूर यांचा अभिलेख,त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासणे व त्या हद्दीत त्या रात्रीत जमलेले सर्व पोलीस अधिकारी यांच्या कडून घटनेची खात्री करुन घेण्यासोबतच जखमी पोलिस अधिकारी यांची तात्काळ वैदकीय तपासणी करुन घेण्याची मागणी धोटे यांनी निवेदानात नमूद केली.

अशी घटना घडल्याचे पुरावे मिटवण्या पूर्वी व जखमी पोलिस अधिका-याच्या जखमा भरून निघण्यापूर्वी अतितात्काळ योग्य ती खात्री शासनाने करावी अशी मागणी करीत,पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था ढासळल्यामुळे त्यांना निलंबित करणे किवा त्यांची बदली करण्याची मागणी ही त्यांनी निवेदनात केली.

या निवेदनामागे माझा कोणाच्याही किवा पोलिस विभागाची बदनामी करण्याचा उद्देश नाही असे सांगून फक्त नागपूर शहर व राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या हितार्थ हे निवेदन करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या घटनेबाबत धोटे यांनी नागपूरातील सबंधित पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन सदर नागपूरचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्याकडे देखील उपरोक्त माहिती विचारली असता त्यांनी अशी घटना घडल्याचे साफ नाकारले, परंतु पायाला दुखापत झाल्या मुळे घटनेतील पोलिस अधिकारी सुट्टी वर असल्याचे सांगितले.घटनेच्या मध्यरात्रीपासून संबंधित पोलिस अधिकारी हे सुटीवर असणे संशयाला वाव देणारे असल्याचे धोटे यांनी सांगितले.

या घटनेनंतर संबंधित पोलिस अधिका-यांना एका नामांकित खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यात आले मात्र तेथील डॉक्टर्सनी याची रितसर तक्रार करण्याची बाब करताच त्यांना देखील दमदाटी करण्यात आल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली असल्याचे धोटे यांनी नमूद केले.संबंधित पोलिस अधिकारी यांना मग मेयो किवा मेडीकलमध्ये घेऊन जाण्यासंबधी देखील खासगी रुग्णालयाच्या डॉक्टर्सने सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर त्याच रात्री पोलीस स्टेशन सदरच्या हद्दीत पोलीस स्टेशन सदर , सीताबर्डी नागपूरचे अधिकारी व शहरातील अनेक पोलीस उपायुक्त यांनी एकत्रितरित्या येऊन या मारहाण करणाऱ्यांचा शोध घेतला अशी माहिती समोर आली परंतु ते आरोपी पकडल्या गेले का , ही माहिती नसल्याचे त्या म्हणाल्या.

ही दूर्देवी घटना घडली त्याच दरम्यान महाराष्ट्र विधीमंडळाचे सत्रही सुरु होते , परिणामी ही घटना वर्तमानपत्रात किंवा जनतेसमोर न येता हेतूपुरस्सर दडवून ठेवण्यात आली , यावरून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत शासनास कळविले नसावे आणि या घटनेची माहिती बाहेर जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली असावी,असा देखील आरोप धोटे यांनी निवेदनात केला आहे .

एक सामान्य नागरिक म्हणून माझी आपणास ही बाब कळविणे हे माझे कर्तव्य असल्याने मी आपणास हे कळवीत आहे, मात्र अमितेश कुमार यांच्या वरील कारवाईपूर्वी या घडलेल्या घटनेची सत्यता शासनाने पडताळून पहावी ,असे देखील त्यांनी नमूद केले.

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार व त्यांचे निकटवर्तीय नातेवाईक हे भाजपाचे समर्थक आहेत. महाराष्ट्रात लवकरच भविष्यात लागणाऱ्या आणिबाणी योजनेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या मदतीकरिता तयारीची काही कामे गुप्तपणे करण्याबाबत त्यांच्यावर आरोप झाले आहेत .

अमितेश कुमार यांच्या कालावधीत भाजपा च्या नेते मंडळी यांना फायद्या पोहोचविण्याकरिता केलेली कामे , उदा.गंगा जमुना हटाव मोहीम , गुंड रणजीत सफेलकर याच्या विरुद्ध कारवाई , फडणवीसचा निकटवर्तीय मुन्ना यादव याचा केलेला बचाव इ. यामागील हेतू व उद्देश याची उच्च स्तरीय चौकशीची मागणी मी यापूर्वी देखील आपणाकडे केली असल्याचे धोटे यांनी निवेदनात नमूद केले.

याच पार्श्वभूमीवर, भविष्यात महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन राष्ट्रपती राजवट लावण्याच्या प्रयत्नातून नागपुरात, अमितेश कुमार यांनी जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्था याचे नियंत्रण सोडून दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे का ? याची सुद्धा खात्री करून घेण्याची विनंती धोटे यांनी केली.

जे पोलिस आयुक्त स्वतःच्या वरिष्ठ अधिका-यांची सुरक्षा करू शकत नाही ते जनतेचे काय संरक्षण करतील ,याचा देखिल गंभीरपणे विचार झाला पाहिजे,असे त्यांनी नमूद केले.

आपल्या निवेदनाची प्रत धोटे यांनी गृहमंत्री , महाराष्ट्र राज्य , मुंबई अति. मुख्य सचिव (गृह खाते ) , मंत्रालय , मुंबई ,
पोलीस महासंचालक , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना देखील मेलद्वारे पाठवली असल्याचे त्यांनी पत्रकाद्वारे सांगितले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या