

नागपूर,१४ जून २०२२ : सिव्हिल लाइन्समधील जनरल पोस्ट ऑफिसच्या (जीपीओ) पार्सल विभागात मंगळवारी सायंकाळी स्फोट झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. पोलिसांनी पार्सल जप्त करून तपास सुरू केला आहे. माकडांना पळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आवाजाचे फटाके असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
नाशिक येथून मंगळवारी दुपारी पार्सल विभागात पार्सल आले. ते वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे पाठविण्यात येत होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कर्मचारी पार्सल ठेवत होते. याचदरम्यान अचानक एका पार्सलमधून स्फोट झाला. धूर निघून मोठा आवाज झाल्याने विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
जनरल पोस्ट ऑफिसच्या पार्सल विभागात स्फोट झाल्याची माहिती तातडीने सीताबर्डी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ.संदीप पखाले, सीताबर्डी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस, निरीक्षक (गुन्हे) अमोल काचोरे , बॉम्बशोधन नाशक पथक आदींसह प्रचंड पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पार्सल जप्त केले. उशिरारात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नागपूरचे जनरल पोस्ट ऑफिस हे सिव्हिल लाईन्स परिसरात आहे. जवळच विभागीय आयुक्त कार्यालय असून मंत्र्यांचे बंगले असलेले रविभवन हे सर्किट हाऊस देखील आहे. या बरोबरच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बंगला देखील जनरल पोस्ट ऑफिसपासून जवळच आहे. हे पाहता या स्फोटामागील कारणांचा पोलिस विभाग गांर्भीयाने शोध घेत आहे..




आमचे चॅनल subscribe करा
