

नागपूर,१४ मार्च: नागपूरात करोना बाधितांची संख्या ही दरराेज वाढत असल्याने प्रशासनावरचा ताण ही अत्यधिक वाढला आहे. मार्चच्या मध्यापर्यंत फक्त ४ करोना पाॅझिटिव्ह असणारी रुग्णांची संख्या मार्चच्या अंतिम आठवड्यात व एप्रिलच्या पहील्या आठवड्यापासून उत्तरोत्तर वाढत जाऊन आज मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी आता नागपूरात करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ५६ वर पाहोचली आहे. आज मंगळवारी आणखी ९ रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आल्याचे प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.
आज ज्या ९ रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला ते सर्व सतरंजीपुरा येथील मृत करोना बाधिताच्या संपर्कात आले होते. यांना प्रशासनातर्फे आधीच आमदार निवासात सक्तीच्या विलगीकरणात ठेवले होते. यांचे अहवाल एम्स तसेच मेडीकलच्या प्रयोगशाळेमधून पाॅझिटिव्ह येताच सांयकाळी ७.३० वाजता त्यातील ४ बाधितांना मेयो तर ५ बाधितांना मेडीकलमध्ये भरती करण्यात आल्याची माहिती मेयोचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ.केवलिया यांनी दिली.यात एक महिला तर ३ पुरुषांचा समावेश आहे.
मेडीकलमध्ये भरती करण्यात आलेल्या ५ रुग्णांमध्ये २ महिला व १ पुरुष असून यांचे वय ८,१८ व ५८ असल्याची माहीती मेडीकलचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ.अविनाश गावंडे यांनी दिली. इतर दोघांचे वय व लिंगाबाबतचा तपशील अद्याप कळला नाही.
आता ख-या अर्थाने प्रशासनासमोर ही सहवास साखळी भेदण्याचे आव्हान कायम ठाकले असून मोमिनपुरा,सतरंजीपुरा,बैरागीपुरा,आशिनगर मधील प्रभाग क्र ३ इ. आधीच प्रशासनाने तगडा बंदोबस्त लावून सील केला आहे. सतरंजीपुरा येथील करोना बाधित मृत व्यक्तिच्या सहवासात आल्याने आज ८ वर्षीय लहानग्याला देखील करोनाची बाधा झाली असून या भागात करोना पॉझिटिव्ह आढळून येणा-या बाधितांमध्ये लहान मुलांचा समावेश हे खरंच क्लेशकारक ठरत आहे.
दिल्लीतील ‘मरकज’प्रकरण टाळता आले असते तर संपूर्ण देशभरातच करोना बाधितांचा आकडा हा आटोक्यात राखता आला असता आता असे तज्ज्ञच सांगत आहेत. ‘अज्ञानातून’ याच समुदायातील पुरुष,महिला,लहान मुले ही सर्वाधिक भरडल्या जात असल्याचे दिसून पडतंय. मार्चमध्येच जेव्हा प्रशासनातर्फे मरकजशी संबधितांनी सामोरे येऊन प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले तेव्हाच ही मंडळी समोर आली असती व स्वत:ला विलगीकरणात ठेवले असते तर करोनासारख्या विषाणूचे बळीही ठरले नसते,अशी आता शहरात चर्चा आहे. केंद्राने मरकजमध्ये नागपूरातून सहभागी झालेल्यांची जी यादी प्रशासनानेकडे पाठवली,त्याच आधारावर या भागातील लोकांना सक्तीच्या विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र आता त्यांच्या संपर्कात येणा-यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याने नागपूरकर नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
एप्रिलच्या दुस-या आठवड्यापर्यंतही याच समुदायातील सर्वाधिक व्यक्ति ही करोना संसर्गाला बळी पडत असल्याने दिल्लीतील ‘मरकज’प्रकरण हे सर्वसामान्य नागरिकांना किती क्लेशकारक ठरले याचा अनुभव देशभरासोबतच नागपूरकर देखील घेत आहे. करोना बाधितांच्या संपर्कात आलेल्यांना आमदार निवास, वनामती,रवि भवन तसेच लोणार येथे विलगीकरणात ठेवण्यात आले असून,या सर्वांचे घश्यातील स्त्रावाचे अहवाल मेयाे एम्स व मेडीकलमध्ये तपासले जात आहे. यातील अनेक अहवाल दररोज पॉझिटिव्ह येत असल्यामुळेच करोना बाधितांचा आकडा नागपूरात आता अर्धशतका पलीकडे पोहोचला आहे.




आमचे चॅनल subscribe करा
