
पुढील पाच दिवसात आणखी चित्र पालटेल:विरोधकांचा दावा
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१३ एप्रिल २०२४: लोकसभा निवडणूकीची घोषणा १६ मार्च रोजी झाली.यानंतर देशभरात निवडणूकीचे रणशिंग फूंकले गेले.राष्ट्रीय पक्ष लोकसभेच्या ५४३ जागांसाठी युद्धसज्ज झाले.जिंकून येऊ शकणा-यांची चाचपणी घेऊन,निवडणूकीचा आर्थिक भार पेलवू शकणा-यांची क्षमता लक्षात घेऊन उमेदवारांच्या नावाच्या घोषणा ही होऊ लागल्या.देशाचे ह्दयस्थळ असणारे नागपूर लोकसभा मतदारसंघात पहील्या यादीत नव्हे तर दुस-या यादीत विद्यमान खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.त्यावेळी विमानतळावरच भाजपच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी गडकरी यांचे जोरदार स्वागत ही केले.नागपूरातील संघ विचाराचे एका सर्वाधिक ज्येष्ठ संपादकाने तर त्यांच्या फेसबुक पोस्टवर लिहून टाकले,’गडकरी यांची निवड बिनविरोध व्हावी’अर्थात लोकशाही संवैधानिक राज्य व्यवस्थेत अशा प्रकारे आमदार,खासदारांना बिनविरोध निवडून लोकसभेत तसेच विधान सभेत पाठवता येत नाही,निवडणूकीत लोकांचे मत हेच लोकशाहीचा आत्मा असतात व भारत देशात स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात या आणि अशाच लोकशाहीने हा देश जिवंत ठेवला आहे.
मुद्दा होता तो गडकरी यांच्या विजयाचा ते ही पाच लाख मतांच्या मताधिक्याने.गडकरी यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २८ मार्च रोजी संविधान चौकातून काढलेल्या भव्य रॅलीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज भरला तर त्या आधी २७ मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आ.विकास ठाकरे यांनी देखील संविधान चौकातून भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज भरला.त्या वेळी नागपूरातील बहूतांश नागपूरकरांना,राजकीय विश्लेषकांना आणि धुरीणांना ही लढत ‘एकतर्फी ’वाटत होती.
आता प्रचाराचे १६ दिवस संपले असून शेवटचे ५ दिवस हे प्रचारासाठी उरले आहेत.या दोन्ही उमेदवारांचा प्रचार बघता व विविध संस्था,संघटना व राजकीय पक्षांचे समर्थन बघता ही लढत आता ’एकतर्फी’राहीली नसून ‘तुल्यबळ’झाली असल्याचा दावा शहरातीलच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील राजकीय विश्लेषक देखील करीत आहेत.आज महाकाळकर सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रीय ओबीसी संघाने विकास ठाकरे यांच्या मागे उभे केलेले पाठबळ,प्रा.ज्ञानेश वाकूडकर यांचे मनावरची पकड घेणारे प्रभावी भाषण,गट तट विसरुन विकास ठाकरे यांना पाठींब्यासाठी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहीलेले सुनील केदार, या निवडणूकीचे संपूर्ण चित्रच पालटणारे ठरतील,असा कयास लावला जात आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आपली हीच ताकत पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी दाखवली होती व सर्वस्वी भाजपचे परंपरागत असणारे हे दोन्ही मतदारसंघ मोठ्या मताधिक्याने हिसकावून घेतले.आज पुन्हा एकदा तीच ताकद ही विकास ठाकरेंच्या मागे उभी करण्याची घोषणा झाली आहे.विकास ठाकरे ‘कुणबी’समाजातून येत असून त्यांच्या विरोधात ‘तीन टक्केवाला उमेदवार’अशी सामाजिकस्तरावरील लढाई सुरु झाली आहे.ही दिशा कोणत्या उमेदवाराला जय-पराजयाच्या खिंडीत पकडते,याची स्पष्टता मतदार राजाला ४ जून रोजी मतमोजणीच्या दिवशी येईलच.
महत्वाची बाब म्हणजे विकासाचे कितीही दावे केले जात असले तरी जमीनीस्तरावर अनेक घटकांमध्ये प्रचंड रोष दिसून पडत आहे.जरीपटका भागात इटारसी पूलाचे प्रदीर्घ काळ चाललेले बांधकाम,यामुळे दूकानदारांची उधवस्तता,त्यांच्यावर निर्भर असलेल्या कर्मचा-यांनी न्यायालयात जाऊन वसूल केलेले वेतनमान,जीएसटीचा बोझा,महाल येथील ६० फूटांचा रस्ता खास गडकरी वाड्यासाठी ८० फूटांचा करण्याचा अट्टहास,त्यासाठी चार-चार पिढ्यांच्या दूकानदारांचे झालेले उच्चाटन,पर्यावरणवाद्यांचा आभासी विकासाला असणारा प्रचंड विरोध,२३ सप्टेंबर रोजी अंबाझरी ओव्हर फ्लोमुळे हजारो नागरिकांच्या व हजारो वस्त्यांमध्ये शिरलेले पाणी,यानंतर ही पिडीतांसाठी तातडीने कोणतेही न करण्यात आलेली उपाययोजना,महागाईमुळे गृहीणींचे बिघडलेले बजेट,आयएएस,आयपीएस अधिका-यांना घेऊन घरीच भरवण्यात आलेल्या शेकडो बैठका,कोणीही मागितले नसताना मंजूर करण्यात आलेले शेकडो प्रकल्प, धोरणे इत्यादी अनेक ,लोकल मुद्दे हे प्रभू श्रीरामाची अयोध्येत झालेली प्राणप्रतिष्ठेपेक्षा भारी पडतील,असा अंदाज राजकीय विश्लेषक मांडत आहेत.
यावेळी वंचितने आपला उमेदवार उभा केला नाही व विकास ठाकरेंना पाठींबा घोषित केला.यामुळे आंबेडकरी मतांचे विभाजन टळले.मायावती यांची सभा बेझनबाग मैदानात झाली मात्र २०१९ सारखी भट्टी जमलीच नाही,हे अनेक आंबेडकरी समर्थकच सांगतात.मायावतींच्या भाषणात तेच तेच मुद्दे होते.काँग्रेस व भाजपवर प्रहार होता मात्र, आंबेडकरी समाजाच्या उत्थानासाठी बहूजन समाजवादी पक्ष नेमके काय करणार? पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी कोणतीही दिशा नव्हती.उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याची एकहाती सत्ता आंबेडकरी समाजाने मायावती यांच्या हातात दिली होती तेव्हाच, लाखो कोटी खर्च करुन राज्यभर हत्ती,मायावती व काशीराम यांचे प्रंचड प्रमाणात पुतळे उभारण्याशिवाय, दलितांच्या उत्थानासाठी कोणतीही धोरणे मुख्यमंत्री मायावती यांनी राबविली नाही,अशी टिका आज देखील केली जाते.इतकंच की त्यांच्या सत्ताकाळात उत्तर प्रदेशमधील दलित वर्गाला सुरक्षीत वाटत होते.नागपूरात अशी अराजक स्थिती नाही.त्यामुळे बसपा संधीसाधू उमेदवारांचा पक्ष असून,त्यांना मत म्हणजे भाजपचा विजय सुकर करने,अशी धारणा खासगीत बोलून दाखवली जात आहे.
नागपूरात ‘आप’चा प्रभाव हा मर्यादित असला तरी आपने देखील पत्रकार परिषद घेऊन ’जेल का जवाब वोट से’या उपक्रमातून विकास ठाकरेंना पाठींबा जाहीर केला आहे.यासाठी मिसकॉलच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात किमान दहा हजार घरांपर्यंत पोहोचण्याची रणनीती त्यांनी आखली आहे.याशिवाय ‘भारत जोडो अभियानाशी’जुळलेल्या विविध संघटनांनी इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठींबा जाहीर केला आहे.
नागपूरात दोन लाखांच्या जवळपास मुस्लिम मतदार आहेत.ही कधीही भाजपची मतपेढी राहीली नाही.पहील्यांदा भाजप ऐवजी गडकरी यांना उमेदवार म्हणून मत देण्याचे आव्हान करणारा सारंग गडकरी यांचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला.भाजप व काँग्रेसने ईद निमित्त मुस्लिम धार्मिक स्थळ तसेच मुस्लिम बहूल भागात दिलेली भेट,पिंजून काढणा-या प्रभागातील यात्रा,मिळणारा प्रतिसाद, मतदानामध्ये किती परिवर्तित करण्यात हे दोन्ही उमेदवार यशस्वी होतात,याचेही आकलन नागपूरकरांना ४ जून रोजी होईल.ताजाबादचे ट्रस्टी प्यारे खान यांनी शहरातील २०१ टक्के मुस्लिम हे गडकरी यांच्या पाठीशी उभे असल्याचा दावा केला आहे,हे विशेष.यंदा काही प्रमाणात मुस्लिम मते हे भाजपच्या पारड्यात जाण्याची शक्यता असली तरी बहूतांश मुस्लिम मते ही काँग्रेस पक्षाचीच जहागिरी समजली जात असते.
दूसरीकडे भाजपचा परंपरागत मतदार हा ,सूर्य पूर्वे ऐवजी पश्चिमेकडून उगवला तरीही आपलं मत भाजपच्या पारड्यात टाकतात,त्यामुळेच भाजपला आपल्या परंपरागत मतदारांना आवाहन करण्या ऐवजी मुस्लिम तसेच आंबेडकरी मतांची बेगमी करण्यात वेळ खर्ची करावा लागत आहे.स्वत: प्यारे खान यांनी ईद निमित्त गडकरी यांच्या निवासस्थानासमोर काही मुस्लिम तरुणांना एकत्रित करुन गडकरी यांच्या विकासकामांमुळे मुस्लिम तरुणांना झालेला फायदा,याची वाचत्यता करणारा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला आहे.
एमआयएमने यंदा आपला उमेदवार उभा न केल्याने मुस्लिम मतांचे देखील विभाजन टळले.
कॉंग्रेसच्या पथ्यावर पडणारी आणखी एक बाब म्हणजे हलबा समाजाची भाजपवरची नाराजी.चंद्रकांत पराते यांच्यासारख्या विविध प्रतिष्ठित प्रशासकीय पदे भूषविणा-या अधिका-याला जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भात कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता, सेवेतून बडतर्फ करण्यात आले.गडकरी यांनी २०१४ साली हलबा समाजाला सहा महिन्याच्या आत ,जात वैधतेच्या संदर्भात ठोस कृती केली जाईल असे आश्वासन दिले होते.दहा वर्ष झाले यासाठी कोणतीही कृती करण्यात आली नसल्याने या वेळी हलबा समाजाची देखील नाराजी भाजपला भारी पडण्याची शक्यता आहे.
या सर्व मुद्दांमुळे सुरवातीला ‘एकतर्फी‘वाटणारी लढत ही आता ‘तुल्यबळ’झाल्याचे आढळून येते.
भाजपची देशपातळीवरची तसेच राज्यपातळीवरील काही धोरणे देखील काँग्रेसला तारक ठरली असून, यात ऐन निवडणूकीत आचार संहिता लागू असताना केंद्रिय यंत्रणांना विरोधकांवर कारवाई करण्याची मिळालेली सूट,मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक,देशावर जबरीने लादलेली अग्नीवीर योजना,बोगस औषधीच्या उत्पादक उद्योगपतींकडून तसेच ज्या उद्योगपतींवर ईडी,प्राप्तीकर किवा सीबीआयच्या धाडी पडल्या त्यांच्याचकडून प्राप्त होणारे कोट्यावधींच्या घरातील निवडणूक रोखे ,अदानी,अंबानी या गुजराती उद्योगपतींचे केलेले १५ लाख कोटींची कर्ज माफी,इतर पक्ष फोडून,विचारधारा गुंडाळून देश व राज्यपातळीवर भाजपचा केलेला विस्तार इत्यादी अनेक बाबी मतदारांच्या मनात धुमसत असून, मतदानात या ही बाबींचा प्रभाव उमटणार असल्याचा दावा राजकीय विश्लेषक करतात.निवडणूकी पूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘चार सौ पार’ची दांभिक घोषणा व त्यांचे कंटाळवाणी झालेली भाषणे,मतदारांना कितपत प्रभावी करतात,हे ४ जून रोजीच कळेल.
विदर्भात मात्र नागपूर,वर्धा,राटेक,चंद्रपूर व अमरावतीची जागा भाजपने गमावलेली असल्याचा सूर विरोधक आवळत आहेत.वर्धेत नागपूरसारखेच सत्ता विरोधी( एंटी इन्कम्बंसी)लहरचा फटका विद्यमान खासदार रामदास तडस यांना बसणार असल्याचे बोलले जात आहे.चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांच्याशिवाय भाजपकडे उमेदवारच नसल्याने त्यांना रिंगणात उतरवण्यात आले मात्र,नुकतेच ८ एप्रिल रोजी मोदींच्या चंद्रपूर येथील प्रचार सभेत आणिबाणिच्या संदर्भात बोलताना त्यांची जीभ घसरली व त्याच क्षणी त्यांनी आपली जागा गमावली,असा दावा जाणकार करीत आहेत.
पुरोगामी महाराष्ट्रात २०१९ पासून राजकारणाचा स्तर हा इतका खालावला आहे, की सर्वसामान्य जनतेला त्याचा उबग आला आहे मात्र,सतत हस्तीदंती मनो-यात वावरणारे काही राजकारणी यांना जनतेच्या मनातील धग याची जाणीव नसल्यानेच इतक्या खालच्या स्तरावर जाऊन एकमेकांचे वस्त्रहरण केले जात आहे.मुनगंटीवार यांनी हजारो महिलांच्या उपस्थितीत ‘अरे सख्या भावाला सख्या बहिणीसोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपविणारे हे काँग्रेसवाले देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करतात’त्यांचा हा व्हिडीयो क्षणार्धात संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला व एकच टिकेची झोड उठली. किमान पुरोगामी विचारधारेचा महाराष्ट्र प्रतिस्पर्धकांविषयी देशात आणि राज्यात १० वर्ष तुमचीच सत्ता असताना मुद्दांचे राजकारण न करता, गलिच्छ शब्दरुपी गुद्दांचे राजकारण कदापि स्वीकारणार नाही,याचेही भान राज्यातील एखादा मंत्रीच ठेवत नसेल तर निवडणूकीत त्याचेही परिणाम उमटत असतात,यात दुमत नाही.हीच बाब अर्थातच आघाडीच्या नेत्यांवर देखील तंतोतंत लागू होते.
अमरावतीची जागा भाजपच्या उमेदवारांना डावलून नवनीत राणांना सुवर्णताटात वाढून देणे,हे देखील भाजपसाठी घातक ठरणार असल्याचे जाणकार सांगतात.राणा यांच्या विषयी मतदारांच्या मनात सुप्त संताप असल्याचे सांगून, भाजप अमरावतीत तिस-या स्थानी येणार असल्याचा दावा केला जात आहे.
रामटेकमध्ये ज्या पद्धतीने सुनील केदारांच्या वर्मावर घाव करण्याची खेळी करण्यात आली त्यामुळे कधी नव्हे ते काँग्रेसचे सर्व गटतट हे एकत्रित आलेत.जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी गेल्या पाच वर्षांपासूनच भाजपच्या धर्तीवर उमरेड,रामटेक,पारशिवनी हे मतदारसंघ बांधले ते शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांना भारी पडणार असल्याचे बोलले जात आहे.काटोल,नरखेड मतदारसंघ हे अनिल देशमुख व सलील देशमुख यांचा बालेकिल्ला समजला जातो.एकमेव हिंगणा हे आ.समीर मेघे यांनी उत्तमरित्या बांधून ठेवला असल्याने फक्त हिंगणामधूनच पारवे यांना मताधिक्य राहील,असे जाणकार सांगतात.
रामटेकमधून बर्वे यांची जीत निश्चित मानली जातेय.रामटेकमधील भाजपचा कार्यकर्ता हा देखील आतून नाराज असून,पक्ष बदलणारे राजू पारवे हे वर्षा बंगल्यावर एकटेच गेले होते हे विशेष.एक ही कार्यकर्ता किवा नेता त्यांच्यासोबत नव्हता.पारवे यांना मतदारांनी काँग्रेसचा उमेदवार म्हणून निवडून दिले होते.त्यांनी पक्षांतर करताच मतदार राजा हा फसवल्या गेल्याचा संताप व्यक्त होत असून ,उमरेड मधूनच मतदारांची नाराजी व्यक्त करणारे अनेक व्हिडीयो हे विविध समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
रामटेक मधून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज हा ज्या पद्धतीने रद्द करण्यात आला,त्यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील ताशेरे ओढले व इतकी तत्परता शासकीय यंत्रणांमध्ये कुठून आली की रात्रीच्या रात्री बर्वे यांच्या नातेवाईकांकडील जातीचे प्रमाण शोधण्यात आले,असे विधान केले.मात्र,निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.रश्मी बर्वे या रिंगणात असत्या तर राजू पारवेंना धूळ चारली असती,असे खासगीत भाजपचेच कार्यकर्ते मान्य करतात.त्यामुळे रामटेकमध्ये रश्मी बर्वे यांच्या विषयी उदभवलेली सहानुभूती,उमरेडमधून लादण्यात आलेले बाहेरचे उमेदवार ही भावना व भाजप कार्यकर्त्यांची अंतर्गत नाराजी इत्यादी बाबी रामटेकमध्ये भाजपचा घात करु शकते,असे जाणकार सांगतात.
थोडक्यात,पुण्यातील कसबा मतदारसंघात संपूर्ण काँग्रेस, गट-तट विसरुन ‘एकास एक’ लढत जेव्हा जेव्हा देते तेव्हा विजय खेचून आणत असते हे सिद्ध झाले आहे.नागपूर,रामटेक इत्यादी मतदारसंघात हीच काँग्रेस एकवटून आता ‘एकास एक’अशी लढत देत असल्याने भाजपसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.निवडणूक घोषित होताच जे राजकीय जाणकार हे महाराष्ट्रात ४८ मधून ३६ जागा हे महायुतीला देत होते तेच आता २६-२२ वर आले आहेत.पुढल्या पाच दिवसात टिपेला पोहोचणारा प्रचार हे चित्र आणखी स्पष्ट करेल,असा दावा केला जात आहे.
……………………..




आमचे चॅनल subscribe करा
