Advertisements

मतदार यादीचा घोळ कायम:भाजपचा परंपरागत मध्यमवर्गीय मतदार घरातच!
‘NOTA’ नव्हे तर ‘नोटांचा’बोलबाला
भाजपच्या बूथवर सफरचंदांची चव!
व्हेटनिरी कॉलेज बूथ क्र.५१ वर पोलिसांची तरुणाला मारहाण
भाजपने केला सत्तेचा दुरुपयोग:काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवांचा आरोप
नागपूर,ता.१५ जानेवारी २०२६: महापालिकेच्या ३८ ही प्रभागांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या रणधुमाळीचा महत्वाचा दिवस म्हणजे मतदानाचा दिवस आज सरला.अंदाजे पन्नास टक्के मतदान झाल्याचे रात्री १०.३० वाजता महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडून आकडेवारी आली असून इतर सर्व मतदान केंद्रावरुन आकडेवारी यायची असल्याचे या विभागाने स्पष्ट केले मात्र,असे असले तरी तब्बल ९ वर्षांनंतर पार पडलेल्या या निवडणूकीत मतदारांमध्ये उत्साह दिसून पडला नाही,विशेष म्हणजे भाजपचा परंपरागत मध्यमवर्गीय मतदार हा मतदानासाठी बाहेर पडलाच नसल्याचे वास्तव समोर आले.
नागपूरातील २४ लाख ८३ हजार,११२ मतदारांची संख्या ही जाहीर करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी ही अनेक कारणांमुळे घसरली असल्याचे निर्दशनास आले.सर्वात महत्वाचे म्हणजे मतदार यादीतील घोळ.लोकसभा,विधानसभेप्रमाणे मनपा निवडणूकीत देखील हा घोळ सर्वच प्रभागांचे ठलक वैशिष्ठ ठरले.एकाच घरातील एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागात,वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर होती.अनेक मतदारांनी त्यामुळे थोडा वेळ शोधाशोध घेतल्यावर घराचा रस्ता धरला व मतदानाकडे पाठ फिरवली.या मतदार याद्या तयार करण्याचे काम स्वच्छता कर्मचा-यांकडे सोपवून अधिका-यांनी फक्त खूर्च्या उबल्याचे वृत्त नुकतेच एका दैनिकात प्रसिद्ध झाले होते.याची सत्यता आज अनेक मतदान केंद्रावर दिसली.लोकशाही देशात कोणतीही निवडणूक ही ज्या मतदारांच्या मतदानावर अवलंबून असते,त्याच पवित्र प्रक्रियेला खिळ बसवून, लोकशाही व्यवस्था खिळखिळी करण्याचे काम या ही निवडणूकीत शासकीय यंत्रणांकडून चोख बजावण्यात आले.
वार्ड क्र.३६ मधील एका मतदाराला तर कॅम्पस विद्यापीठापासून तर एलआयटीपर्यंत अनेक वेळा चढ उतार करावे लागले.या दोन्ही ठिकाणच्या मतदान केंद्रावर नाव नसल्याने अभ्यंकर नगरपर्यंत या जागरुक मतदाराने शोध घेतला.या मतदाराचे राहणे मिहान येथे असून फक्त मतदानासाठी इतक्या दूर या मतदाराने धाव घेतली होती.हिंदूस्थान कॉलनी वर्धा रोड येथे या मतदाराचा नोंदणीकृत बूथ दाखविण्यात आला,शेवटी अडीच तासांच्या धावपळीनंतर एका संगणक डेटा हाताळणा-या मुलीने या मतदाराचे मतदान कॅम्पसमध्ये करुन दिले.
मतदार यादी तयार करणा-यांची कल्पकता येथेच थांबली नसून नितेश किसनराव कांबळे,रा.प्लॉट,क्र.४२ जोगी नगर,प्रभाग क्र. ३५. याच्या घरातील सर्व सदस्यांची नावे पत्नी,आई व वडील या सर्वांचे बूथ वेगवेगळे देण्यात आले,वडीलांचा प्रभागच बदलण्यात आला तर आईचे तर शहरच बदलण्याची किमया शासकीय यंत्रणेने साधली. वडील प्रभाग क्र.३५ चे रहीवाशी असताना त्यांना प्रभाग क्र.३४ साठी मतदान करावे लागले तर आई रत्नमाला किसनराव कांबळे Epic No BK2321321यांचा जिल्ह्याच बदलून ‘औरंगाबाद’येथील पोलिंग बूथ मतदान केंद्र देण्यात आले….!नितेश कांबळ यांच्या पत्नीला मनीष नगर न्यू अंडर ब्रिज जवळ तब्बल चार किलोमीटरवर.अंतरावर जाऊन मतदान करावे लागले.परिणामी,निवडणूक राबविणा-या शासकीय यंत्रणांवर आता तरी जवाबदारी निश्चित झाली पाहिजे अस संताप सोशल मिडीयावर चांगलाच व्यक्त झाला.अनेकांनी या सर्व घोळांचे आपापल्या मोबाईलवर ‘स्टेट्स’ ठेवले.
एक मतदान केंद्र तर चक्क मेयो रुग्णालयात खूप आतमधील भागात देण्यात आल्याने अनेक मतदारांनी रुग्णालयाच्या प्रवेशदारातूनच परतीचा मार्ग धरला.हे रुग्णालय मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असल्याने सतत येथे अपघातग्रस्तांसह इतर गंभीर आजारांच्या रुग्णांची वर्दळ असते.परिणामी,या रुग्णालयात रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईकांशिवाय कोणीही येण्यास धजत नाहीत.अशा वेळी चक्क मेयो रुग्णालयाच्या खूप आतमधील भागात मतदान केंद्र देण्या मागे आमचे मतदान होऊ नये व एकाच पक्षाला त्याचा फायदा पोहोचावा,हा कुटील हेतू असल्याचा आरोप येथील काही मतदारांनी केला.
प्रभाग क्र.२३ गरोबा मैदानात नालंदा चौकात भाजप व राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्या पँडोलमध्ये ईव्हीएम मशीनचे डेमो लपविण्यात आल्याची तक्रार अपक्ष मधुकर मेश्राम प्रभाग क्र.२३(ड)या उमेदवाराने केली.जरी शासकीय कर्मचा-यांनी त्या मशीन जप्त करुन घेतल्या तरी आचारसंहितेचे उल्लंघन करणा-या या पक्षाच्या उमेदवारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.राज्यातील सत्ताधारी पक्षाला मोठा लाभ मिळावा यासाठी वारंवार सूचना देऊनसुद्धा दोषपूर्ण मतदार याद्या कायम ठेवल्याचा आरोप कॉ.राजेंद्र साठे यांनी केला.नागरिकांनी मतदार यादीच्या संदर्भात ऑन लाईन व ऑफ लाईन दोन्ही प्रकारचे अर्ज केल्यानंतर देखील महानगरपालिकेतर्फे यात सुधारणा करण्यात आली नाही.परिणामी,संपूर्ण नागपूरातील दलित बहूल क्षेत्रातील नागरिकांची नोव मतदार यादीत नसणे किंवा दुस-या प्रभागात असल्यामुळे याच समाजाला मोठ्या प्रमाणात मतदानापासून वंचित राहावे लागल्याचा आरोप त्यांनी केला.एका मतदाराचे नाव तर प्रभागातील तीन मतदान केंद्रांवर होते.अभिषेक अतुल जोशी या मतदाराचे नाव सिंधी कॉलनी खामला,ज्यूपिटर हायस्कूल,खामला रोड तसेच सिंधी हिंदी हायस्कुल,खामलामध्ये आढळूलन आले.यावर नेटक-यांनी अभिषेकला तीन वेशभूषेत मतदान करण्याचा सल्ला गंमतीने दिला.टक्कल,दाढी व मिशी असे तीन ऑप्शन त्याला सूचवण्यात आले.
याशिवाय बोगस मतदानाच्या अनेक तक्रारी नागरिकांनी माध्यमकर्मींसमोर मांडल्या.वाठोडा प्रभाग क्र.२६ मध्ये मनपा शाळेतील मतदान केंद्रावर आकाश टूले या मतदाराला मतदानाचा हक्कच बजावता आला नाही कारण दूसराच कोणी तरी आधीच मतदान करुन गेला होता.त्याच्या नावा पुढे दुस-याची सही होती.याला जवाबदार कोण आहे?असा सवाल त्याने केला.माझ्या बोटाला शाई लागू शकली नाही,याचे शल्य त्याने व्यक्त केले.दक्षीण पश्चिम मधील नागेश माणिक मून या ४५ वर्षीय मतदाराचे नाव प्रभाग १७ मध्ये होते मात्र,आज अनेक मतदान केंद्रांवर फिरल्यानंतर त्यांचे नाव चक्क शरद पवार यांच्या बारामती शहरात नोंदवले गेले होते!मला मतदानापासून वंचित ठेवणारा नेमका कोण आहे?हे मुख्यमंत्री सांगू शकतील का?असा रोख सवाल ते करतात.
हे ही नसे थोडके,प्रभाग क्र.१८ मध्ये ज्येष्ठ रंगकर्मी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष(प्रशासन) नरेश गडेकर हे स्वत:मतदानापासून वंचित राहीले.दूख:द बाब म्हणजे त्यांच्या आईच्या मृत्यूचा आज तिसरा दिवस होता.कुटूंबातील कोणाच्याही मृत्यूनंतर तेरा दिवस सूतक पाळल्या जातं.मात्र,मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने गडेकर हे मतदानासाठी या महाल,प्रभाग क्र. १८ मधील राष्ट्रीय महाविद्यालयात आले होते मात्र,मतदार यादीतून त्यांचे नाव गहाळ होते!लोकसभा व विधानसभा २०२४ साली याच केंद्रावर त्यांनी मतदान केले होते.इतकंच नव्हे तर अनेक दशके त्यांचे मतदान केंद्र बदलले नव्हते मात्र,आज त्यांनाही अनेक केंद्रांवर भटकंती करावी लागली,शेवटी निराश होऊन बोटा वर शाई न लागताच ते घरी परतले.याच बूथवर अनेक मृतकांची नावे मात्र मतदार यादीत होती ज्यांचा मृत्यू एक दशकांपूर्वीच झाला होता.(बातमीशी संबंधित व्हिडीयो www.sattadheesh officialयुट्यूब चॅनलवर उपलब्ध)
व्हेटरनिरी येथे पोलिसांकडून तरुणाला झाली मारहाण-
राजेश शुक्ला प्रभाग १२ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट) उमेदवार असून ,व्हेटरनिरी कॉलेजच्या बूथ क्र.५१ मध्ये त्यांचा मामेभाऊ अजय दूबे हा तरुण मुलगा एका वयोवृद्ध मतदार महिलेला बूथपर्यंत आणण्यात मदत करतो.मात्र,त्या महिलेला पुन्हा घरी सोडण्यास मदत करण्याच्या उद्देशाने तो बाहेर उभा असताना अचानक पोलिसांनी त्याला चेह-यावर व पाठीवर जबर मारहाण केली.यानंतर संतप्त होऊन शुक्ला यांनी या दंडेलशाहीचा विरोध केल्यावर,ते गाडीवर बसून निघून गेले व जाताना,जे करायचे आहे ते करुन घ्या,असे धमकावून गेल्याचे शुक्ला यांनी माध्यमकर्मींना सांगितले.पोलिसच सत्ताधा-यांच्या हातचे बाहूले बनले असेल तर सामान्य जनतेचा कोणीही वाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.निवडणूका या ख-या निवडणूका नसून केवळ एक फार्स असल्याचा आरोप त्यांनी केला.
महत्वाचे म्हणजे या बूथवर ईव्हिएम मशीन्सची क्रमवारीच चुकविण्यात आली.अ,ब.क.ड अशी न ठेवता ब.क.अ.ड अश्या क्रमात ठेवले.ही क्रमवारी त्यांनी दूपारी १२ वाजता व्यवस्थित केली.या मतदान केंद्रातील एक बूथ अधिकारी हात धरुन मतदारांकडून ईव्हीएमचे बटण दाबून घेत असल्याची तक्रार माझ्याकडे आल्यावर त्या बूथ अधिका-याने यावर मुजोरी केली.यानंतर गिट्टीखदान पोलिस अधिकारी देशमाने यांनी स्टाफ पाठवला.एसीपीने त्या प्रोसेडिंग अधिका-याशी काय बोलले माहिती नाही पण,एसीपी त्याला क्लिनचिट देऊन निघून गेल्याचा आरोप त्यांनी केला.(बातमीशी संबंधित व्हिडीयो www.sattadheesh officialयुट्यूब चॅनलवर उपलब्ध)
मतदारांनी घेतला तीन कमळाच्या सुगंधासोबत एका सफरचंदाही आस्वाद-
संपूर्ण नागपूरात सर्वाधिक उत्कंठावर्धक ठरला तो मध्य नागपूरचा प्रभाग क्र.१८. हा प्रभाग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विशेष प्रिय असून याच प्रभागातून भाजपचा भावी महापौर त्यांनी निश्चित केला आहे.इतकंच नव्हे तर अनेकांचा विरोध ठावलून गेल्या निवडणूकीत काँग्रेसचे बंटी शेळके यांच्याकडून पराभूत झालेले सुधीर(बंडू)राऊत यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली.यामुळे अनेक निष्ठावंतांच्या भावना दुखावल्या.धीरज चव्हाण यांनी बंडखोरी करुन अपक्ष उमेदवार म्हणून आव्हान उभे केले.अर्ज मागे घेण्यासाठीचे भाजप श्रेष्ठींचे प्रयत्न फोल ठरले.मध्य नागपूरचे भाजपचे आमदार प्रवीण दटके यांच्यावर ठिकरा फोडण्यात आला.मात्र, दटके यांनी स्वत: मध्य नागपूरातून भाजपची उमेदवारी न मिळाल्यास अपक्षची तयारी करुन ठेवली होती.असा युक्तिवाद अपक्ष उमेदवारांकडून झाला.परिणामी या प्रभागात ’तीन कमळ व एक सेब’अशीच चर्चा दिवसभर रंगली होती.भाजपच्या परंपरागत मतदारांपर्यंतही हा संदेश पोहोचविण्यात आला असल्याची चर्चा होती.

(छायाचित्र :गडकरी यांचे पत्र)
गडकरी स्वत:या प्रभागाचे मतदार असून त्यांनी या प्रभागात अनेक प्रचार सभा घेतल्या.मतदारांपर्यंत घरोघरी त्यांचे, आवाहन करणारे पत्र ही पोहोचले.शेवटच्या क्षणी कोणीही घात करु नये म्हणून बैठकांचा जोर ही गडकरींनी लावला.स्वत:चा मतदार संघ सोडून राज्याचे मुख्यमंत्री यांचा रोड-शो देखील याच मतदारसंघात झाला.यावरुन निदान भाजपसाठी तरी हा प्रभाग किती ‘संवेदनशील’आहे हे निर्दशनास येतं.परिणामी,सर्वात जास्त कोंडी झाली ती या प्रभागातील भाजपनिष्ठ कार्यकर्त्यांची.‘कोणता झेंडा घेऊ हाती’या गीताप्रमाणे अवस्था होऊन ’कोणते बटन दाबू हाताने’या अवस्थेपर्यंत मनोवस्था पोहोचली.उद्याच्या मतमोजणीत निकाल कळेलच मात्र,या प्रभागात ‘तीन कमळ एक सेब’(सेब हे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार धीरज चव्हाण यांचे निवडणूक चिन्ह आहे)याचीच चर्चा आज दिवसभर रंगली होती.मतदान केंद्रांवर आपल्या नावाचा शोध घेणा-या भाजपनिष्ठ मतदारांपर्यंत ’तीन-एक चालवा’हा संदेश योग्यरित्या पोहोचविल्या जात होता.परिणामी,महालच्या या किल्ला प्रभागात महापौर पदाचे प्रबळ दावेदार यांचा शोध भाजपचेच पदाधिकारी व श्रेष्ठी थांबविण्यात यशस्वी होतात का?याकडे संपूर्ण महालकरांचे लक्ष लागले आहे.प्रभाग क्र १८ मधून भाजपने बंडू राऊतसह सारिका नांदूरकर,वैशाली उदापूरकर तसेच सचिन नाईक यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने नयन तरवटकर,शारदा लृटे,कृतल आकरे व प्रकाश बांते यांना मैदानात उतरवले आहे.
याच मतदार संघात काँग्रेसच्या महिला राष्ट्रीय सचिव नॅश नुसरत अली यांनी सत्तेचा दुरुपयोग झाला असल्याचा आरोप खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना केला.मनपा २०२६ च्या या निवडणूकीत नागपूरात सर्वदूरच सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप त्यांनी केला.हा प्रभाग क्र.१८ मध्ये ज्याला किल्ला संबोधतात या भागातील नागरिकांनी तब्बल चार निवडणूकीत याच प्रभागात व याच मतदान केंद्रातून मतदान केले.२०१७ ची मनपाची निवडणूक असो किंवा लोकसभा,विधानसभेची निवडणूक असो.आज अनेकांचे मतदान प्रभाग क्र.२२ तर काहींचे प्रभाग क्र.२३ मध्ये गेलेले आढळले.अशा अनेक महिला आज मतदान न करताच घरी परतल्या.एकाच कुटूंबातील सहा पैकी दोघांचे एका तर चारचे वेगवेगळ्या मतदान केंद्रात मतदान गेले आहे आणि हे हेतुपुरस्सर करण्यात आले आहे.किल्ल्यामधील जो भाग अल्पसंख्याक भाग आहे त्या भागातच खूप मोठ्या प्रमाणात हे घडले आहे,असा आरोप त्या करतात.
दक्षिण पश्चिम प्रभाग क्र.१६ मध्ये तर जी तकीया वस्ती आहे त्या भागात देखील मतदार यादीमध्ये फार मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला आहे.या वस्तीत मोठ्या प्रमाणात आदिवासी,दलित व अल्पसंख्याक मतदार आहेत जे काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत.त्यांची तर यंदा मतदार यादीत नावेच नव्हती.ही नावे मी स्वत:दिवसभर शोधली असल्याचे त्या सांगतात.या ठिकाणी आमच्या संजना देशमुखसह आमचे पॅनल उभे आहे.
सदर मधील प्रभाग क्र.१४ मध्ये देखील हेच घडले.ज्या-ज्या ठिकाणी अल्पसंख्याकांची मते सर्वाधिक होती त्या त्या मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात ती गहाळ झाली आहेत.या ठिकाणी आडनावे बघून-बघून नावे गाळण्यात आली आहे कारण आडनावावरुन शासकीय यंत्रणांना कळतं की हे कोणत्या विचारधारेचे मतदान आहे.गांधी विचारधारेचे मत आहे की त्या विधारधारेचे जे देशाला बर्बाद करीत आहेत.माझा सरळ आरोप निवडणूक आयोगावर असून निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या पायातले ’पादत्राण’झाले आहे.
निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे तर ‘कठपुतली’ आहेत.देशाने निवडणूक आयुक्तांच्या रुपात टी.एन.शेषण यांचाही काळ अनुभवला आहे.त्या काळी पण या देशात निवडणूका होत होत्या व निष्पक्ष निवडणूका होत होत्या.मात्र,आज देशात सत्तेचा दुरुपयोग होत असून खूप निंदनीय असल्याचे त्या म्हणाल्या.
काँग्रेसचे जिल्हा निवडणूक प्रमुख प्रा.दिनेश बानाबाकोडे यांनी देखील आपली प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्र्यांना या छोट्याशा भागात बाईक रॅली केली ही खरं तर सर्वात मोठी शोकांतिका असल्याची टिका केली.का करावी लागली हा यक्ष प्रश्न आहे.याचा अर्थ ते घाबरले आहेत हे सिद्ध होतं.याचा निकाल उद्याच्या मतमोजणीत दिसेल व गुलाल आम्हीच उधळू,असा दावा त्यांनी केला.
मतदारांचा निरुत्साह-
लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणूकीतील उत्साह हा कुठेही दिसून पडला नाही.एक तर या निवडणूकीत राजकीय पक्षांकडे ’चेहरेच’नव्हते.मतदारांसाठी देखील उमेदवारांची अनोळखी नावे असल्याने केवळ राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह हेच बघून मतदान करण्यात आले.अनेक मतदारांनी तर कुण्या एकाच पक्षाला मतदान करण्या ऐवजी चार वेगवेगळी बटणे दाबली!उमेदवारांची नावे वाचण्याची तसदी देखील त्यांनी घेतली नाही.अनेक मतदार विशेष करुन महिला मतदार या गोंधळलेल्या होत्या.एक साथ ‘चार’वेळा बटण दाबण्याचे त्यांना ‘टेंशन’आल्याचे त्या सांगतात.अनेकांनी एक कमळ,एक पंजा,एक झाडू एक हत्ती इत्यादी समोरचे बटण दाबल्याचे सांगितले.
भाजपचा परंपरागत मध्यमवर्गीय मतदार हा आज बाहेर पडलाच नाही.२०१७ च्या मनपा निवडणूकीत भाजपचे व काँग्रेसचे अनेक ओळखीचे चेहरे मतदारांपुढे होते.यात संदीप जोशी,प्रवीण दटके,दया शंकर तिवारी,अविनाश ठाकरे इत्यादी यांच्यासह प्रत्येक प्रभागात एक तरी दमदार चेहरा भाजपकडे होता,यामुळेच अनेक प्रभागात भाजपचे संपूर्ण पॅनलच निवडून आले.काँग्रेसकडे माजी महापौर विकास ठाकरे हे एकटेच खिंड लढवित होते.मात्र,त्यांचा धक्कादायक पराभव झाला.पुढे त्यांच्याकडे पश्चिम नागपूरातून आमदारकीची संधी चालून आली.यंदा मात्र,अनेक मतदारांना त्यांच्या प्रभागातील उमेदवारांची नावे ही नीट सांगता आली नाही,हे भयाण वास्तव होते.
प्रभाग क्र.१५ मधील अनेक झोपडपट्टी वस्त्यांमध्ये आज फक्त ‘पंजा’चालला.या प्रभागात धरमपेठ,रामदासपेठ,शंकरनगर,शिवाजीनगर व सीताबर्डी या पॉश भागांचा समावेश होत असला तरी मध्यमवर्गीय मतदारांनी मतदानाकडे पाठ दाखवल्याने, मतदानाचा टक्का हा ५० च्या जवळच घुटमळला.मात्र,या भागात येणा-या अनेक झोपडपट्या व वसत्यांमध्ये ‘पंजा’ची हवा होती.परिणामी,घसरलेल्या टक्केवारीमुळे प्रभाग क्र. १५ हा ’भाजपमुक्त’होणार असल्याची चर्चा रंगली होती.या प्रभागातून भाजपने पूजा पाठक,सुनील हिरणवार,धनश्री देशपांडे व विनय दाणी यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसने संध्या बिसेन,संदेश सिंगलकर,विशाखा शर्मा व प्रदीप अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. उद्या मतमोजणीत या प्रभागाच्या पिटा-यातून काय निघेल याकडे सर्वाधिक याच वस्त्यांमधील मतदारांचे लक्ष लागले आहे.
याशिवाय प्रभाग क्र.१ मधील भाजपचे उमेदवार विकी कुकरेजा यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करणारे व्हिडीयोज चांगलेच व्हायरल झाले तर प्रभाग क्र. १८ मध्ये देखील मतदारांना प्रत्येकी ३-३ हजार रुपये घरपोच मिळाले असल्याचा आरोप विरोधकांनी केला.महानगरपालिकेसारख्या निवडणूकीत देखील पैशांचा पाऊस नव्हे तर पैशांची त्सुनामी कोसळल्याचा कंठशोष सर्वदूर ऐकू येत होता मात्र,निष्पक्ष निवडणूक यंत्रणेला तो कुठेही ऐकू आला नाही व त्यांच्याकडून एक ही कारवाई झाल्याची ऐकीवात नाही.
प्रभाग क्र.३४ मध्ये देखील भाजपच्या मतदारांमध्ये निरुत्साह आढळून आला.जे मतदार बाहेर पडले होते त्यांनी मोठ्या प्रमाणात ‘पंजा’ व वंचितला मत दिले असल्याचे आढळले.या भागाचे प्रतिनिधित्व भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे करतात.विशेष म्हणजे त्यांची चुलत बहीण अनुष्का कोहळे यांनी गेल्याच निवडणूकीत त्यांना नगरसेविकेसाठी तिकीट मागितली होती मात्र,‘घराणेशाही’चा आरोप लागेल या कारणाने सुधाकर कोहळे यांनी अनुष्काचे नाव पुढे रेटले नाही.यानंतर अनुष्का यांनी काँग्रेसची वाट धरली.गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी या प्रभागात काँग्रेसचा चांगला जनाधार निर्माण केला.परिणामी,यंदा त्यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी देखील मिळाली.यानंतर भाजपच्या गोटात हलचल माजली.कोहळे यांचा छूपा पाठींबा असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात झाला.यामुळे सुधाकर कोहळे यांना व्हीडीयोच्या माध्यमातून स्पष्टीकरण द्यावे लागले.त्यांनी या प्रभागातील भाजपचे उमेदवार नागेश मानकर,मनीषा नगरधनकर,मंगला खेकरे व बाबाराव तायडे यांना मोठ्या प्रमाणात विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले मात्र,या ही प्रभागात भाजपचे पॅनल धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.यातील एक उमेदवार तर मनपातील कंत्राटदाराचे पिताश्री आहेत.काँग्रेसने सुशांत लोखंडे,स्वाती सांदेकर,अनुष्का कोहळे-वानखेडे व कंठीराम शेंडे यांना मैदानात उतरवले आहे.
थोडक्यात.आज अनेकांचे भाग्य हे ईव्हिीएममध्ये बंदिस्त झाले असून निवडणूक आयोगाच्या या सनसनाटी पिटा-यातून उद्या मतमोजणीत काय निघेल याकडे अवघ्या नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.या पिटा-यात पहिल्यांदा प्रभाग क्र.३६ (क)मधून मैदानात उतरलेल्या भाजपच्या तडफदार नेत्या शिवाणी दाणी,प्रभाग क्र.३८ मधून काँग्रेसचे ज्येष्ठ व संयमी नेते प्रफूल्ल गुडधे पाटील यांच्या पत्नी कुमुदिनी प्रफूल्ल गुडधे,आमदार कृष्णा खोपडे यांचे जवळचे नातेवाईक संजय अवचट,काँग्रेसचा हात निवडणूकीच्या तोंडावर सोडून प्रभाग क्र.१२ मधून भाजपच्या कमळावर उमेदवारी मिळवलेल्या दर्शनी धवड,प्रभाग क्र.३७ मधून काँग्रेसमधून भाजपवासी झालेले मनोज साबळे ,प्रभाग क्र. ८ मधून माजी आमदार विकास कुंभारे यांचे सुपुत्र श्रेयस कुंभारे इत्यादी यांच्यासह जुने व अनुभवी चेहरे बंटी कुकडे,ॲड.धर्मपाल मेश्राम,पिंटू झलके,बाल्या बोरकर,संदीप गवई,दिलीप दिवे,विकी कुकरेजा आदी पुन्हा एकदा मनपात जाण्यासाठी रिंगणात उतरले आहेत.विकी.कुकरेजा यांच्या प्रभाग क्र.१ मध्ये देखील ’तीन-एक’चा खेळ रंगलेला असल्याची चर्चा आहे.या प्रभागात कुकरेजा आपली जागा काढतील मात्र,पॅनल येणार नसल्याचे बोलले जात आहे.या प्रभागात भाजपने मनोज धनविजय,सुषमा चौधरी व प्रमिला मसरानी यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसने राजरत्न बनसोड,सुनीता माहले व निर्मला बोरकर यांना उमेदवारी दिली आहे.
उद्या १६ जानेवरी रोजी मतमोजणीनंतरच सर्व ३८ प्रभागांचे चित्र स्पष्ट होईल.
…………………………………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
