
गडकरींचा, मुलाखतकार डॉ.उदय निरगुडकर यांना प्रतिप्रश्न
नागपूरकरांनाच पडला गहन प्रश्न!

(भाग-१)
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२१ जून २०२५: अकरा वर्षात केंद्रीय मंत्री म्हणून देशाच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी केल्याचा दावा नितीन गडकरी यांनी आज रेशिम बाग येथील सुरेश भट सभागृहात ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांना प्रकट मुलाखत देताना केला.त्यातील एक प्रश्न रस्त्यांवरील खड्ड्यांचाही होता,यावर गडकरी यांनी मुलाखतकार निरगुडकरांनाच,नागपूरात तुम्हाला एका तरी रस्त्यावर खड्डा दिसला का?असा प्रतिप्रश्न केला आणि काही क्षण निरगुडकर अवाक् झाले व लगेच ’नाही’हे उत्तर देते झाले,परिणामी आता नागपूरकांनाच शहरातील रस्त्यांमधील खड्ड्यांबाबत गहन प्रश्न पडला आहे,संपूर्ण शहरभर,मुख्य रस्त्यांवर,प्रत्येक चौकातील,गल्ली बोळ्यातील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर पडले, ते खड्डे नाहीत तर मग काय आहे?
जगातील सर्वांना ज्याचे आकर्षण आहे त्या चंद्रावर देखील खड्डे आहेत,हे संशोधनकर्त्यांनी तंत्रज्ञानातून शोधून काढले व हे तथ्य जगाला कळले,आता नागपूरकरांना अश्या संशोधनकर्त्यांचा शोध आहे जे नागपूर शहरातील खड्ड्यांबाबत वैज्ञानिक संशोधन करुन तथ्य त्यांच्या समोर आणेल.यासाठी ते हवी ती किंमत देखील देण्यास तयार आहे.कारण नागपूर शहरात सर्वदूर पडलेले खड्डे हे फक्त खड्ड्यांच्या श्रेणीत न मोडता,जीवघेणे खड्डे या श्रेणीत मोडले जातात.इतकंच नव्हे तर नागपूरातील खड्ड्यांच्या जीवघेण्या प्रश्नावरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात देखील गांर्भीयाने सुनावणी सुरु आहे!
गेल्याच वर्षी २१ फेब्रुवरी २०२४ रोजी अमरावती रोडच्या दुरावस्थेबद्दल बांधकाम विभागावर ताशेरे ओढत,नागरिकांना सेवा देण्यापेक्षा कंत्राटदार महत्वाचे आहेत का?अशा शब्दांत नागपूर खंडपीठाने मौखिक नाराजी व्यक्त केली होती!बांधकाम विभागाच्या अधिका-याने न्यायालयात रस्त्यांसंबधी चक्क चुकीची माहिती शपथपत्रात नमूद करुन दिली होती.न्यायालयाने यावर कठोर ताशेरे ओढले,एवढे नागपूरातील खड्डे ,नागपूरातील न्यायिक जगात प्रसिद्ध झाले आहेत तरी देखील डॉ.निरगुडकरांना ‘तो खड्डा‘दिसला नाही!
शहरातून अमरावती,भंडारा आणि उमरेडकडे जाणा-या महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यांची स्थितीवर तर उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती.यावर ‘अतिरिक्त’ पावसामुळे हे रस्ते खराब झाले असल्याचे उत्तर,गडकरी यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिका-याने न्यायालयात सांगितले!मात्र,संपूर्ण राज्यात पाऊस पडत असताना नेमके नागपूरातील हे सर्व्हिस रस्ते का उखडलेत?मौखिक स्वरुपात असा सवाल न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी केला.यावर संबंधित रस्ते कंत्राटदाराने निर्माण केले असल्याचे उत्तर या अधिका-याने दिले!यावर न्यायमूर्तीद्वय यांनी चांगलीच नाराजी व्यक्त करीत,ठेकेदारांकडून काम करुन घेणे हे अधिका-यांचे व प्रशासनाचे काम आहे.तुम्ही ठेकेदारांना वाचवित आहात का?असा रोखठोक सवाल न्यायमूर्तींनी केला व दोन दिवसांमध्ये योग्य स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या वारंवार नाराजीनंतर महानगरपालिकेचे प्रशासन देखील ‘थोडे फार’जागे झाले व नागपूरच्या रस्त्यांवर अखेर इतके खड्डे पडलेच कसे?याचा शोध घेण्यास सज्ज झाले.मुख्य अभियंता लीना उपाध्याय यांच्या नेतृत्वात एक विशेष तांत्रिक चमू नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.शहरातील सिमेंट रस्त्यांची स्थिती व नियोजनशून्य कामांवर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यावर,मनपाला आढळले कुठलाही रस्ता खोदण्यापूर्वी संबंधित संस्थांना मनपाचे नाहरकत प्रमाणपत्र घेण्याची काटेकोर अंमलबजावणी होत नाही!शहरात विविध संस्था व कंपन्या विविध खोदकामे सुरु करतात मात्र,खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची तसदीच घेत नाहीत.शहरात टप्पा,एक,दोन आणि तीनअंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्यांवर त्यांचा दोषदायित्व कालावधी संपल्यानंतरही खड्डे पडले आहेत.गांधीनगर ते व्हीएनआयटी चौक या रस्त्यावर तर कंत्राटदाराने खोदलेले खड्डे पूर्ववत न केल्याने अनेक जीवघेणे अपघात घडले!
नागपूर शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे हे तर अक्षरश: वाहनचालकांसाठी साक्षात मृत्यूचा मार्ग ठरले!शहरातील वर्धा मार्गावर विमानतळ ते चिंचभवन दरम्यान सिमेंटच्या पॉश रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून,डॉ.निरगुडकर हे विमानतळावरुन भट सभागृहात येण्या ऐवजी चिंचभवनकडे भटकंती करत गेले असते तर त्यांना चंद्राच्या आकाराच्या त्या जीवघेण्या खड्ड्यांचे नक्कीच ‘दर्शन’झाले असते.महत्वाचे म्हणजे गडकरी यांनी दीर्घकालीन विचार करुनच नागपूरात सिमेंटचे रस्ते बांधले जात असल्याचा दावा केला होता,मात्र,अवघ्या काही महिन्यातच सिमेंटच्या रस्त्यांवर खड्ड्यांचे ‘दर्शन’वाहनचालकांना होत असून,ते खड्डे चुकवित प्रवास करण्यात आता ते ’निष्णात’झाले आहेत मात्र,ज्यांना ते खड्डे चुकवता आले नाही ते सरळ मल्टीस्पशेलिटी रुग्णालयात तसेच मोक्षधामला पोहोचलेत!विमानतळ ते चिंचभवन मार्गाचा रस्ता तर इतक्या निष्कृष्ट दर्जाचा आहे की जगात निष्कृष्ट रस्त्यांवर कोणते पारितोषिक असेल तर ते याच मार्गाचे बांधकाम करणारा कंत्राटदार निश्चितच पटकावेल.




आमचे चॅनल subscribe करा
