फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजननागपूरातील शंभरावे मराठी नाट्य संमेलन देखील येणार वादाच्या भोव-यात!

नागपूरातील शंभरावे मराठी नाट्य संमेलन देखील येणार वादाच्या भोव-यात!

Advertisements
९९ व्या नाट्य संमेलनाची देयके अद्याप आहेत थकीत: नाट्यकर्मीला विकावी लागली दूकान

सभासद नोंदणीचे गौडबंगाल: दामले यांचे कानावर हात

झाडीपट्टी रंगभूमी महोत्सवात ’महारथीच्या’नाटकाची वर्णी:१५ लाख रुपये वैयक्तिक खात्यात!
संस्था धर्मादाय आयुक्ताच्या अधीन: माहितीचा अधिकारच लागू होत नाही
नागपूरातील नाट्यकर्मी आंदोलनाच्या तयारीत: दामलेंचे चर्चेचे आवाहन
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१५ एप्रिल २०२५: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे विभागीय नाट्य संमेलन येत्या २४ एप्रिल पासून नागपूरातील सुरेश भट सभागृहात पार पडणार आहे.या उपक्रमाची माहिती अ.भ.मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन दिली मात्र,या संमेलनाच्या तोंडावर पुन्हा एकदा जुन्या वादाला तोंड फूटले आहे.९९ वे मराठी नाट्य संमेलनाचा थाट याच नागपूर नगरीत पार पडला होता.त्यावेळी नागपूरातील अनेक नाट्यकर्मींनी त्यात मोलाचा वाटा उचलला होता.प्रसंगी पदरातले पैसे ही खर्च केले,परंतू नंतर हेच पैसे नागपूर शाखेकडून परत मिळवताना अनेकांना ३३ कोटी देव आठवावे लागले.अनेकांना अद्याप ते पैसे मिळालेच नाही,एका नाट्यकर्मीला चिटणीस पार्क येथील दूकान विकून देणगीदारांचे पैसे चुकवावे लागले.याशिवाय नागपूर शाखेत सदस्यता नोंदणी,आर्थिक अनियमितता,मध्यवर्ती शाखेची परवानगी न घेताच बँक खाते बदलणे,झाडीपट्टी रंगभूमी महोत्सवात नागपूर शाखेच्या एका पदाधिका-याद्वारे किमान साठ झाडीपट्टी संस्थांचे नाटक डावलून स्वत:चे नाटक सादर करने,त्याचे १५ प्रयोग सादर करने,मध्यवर्तीकडून त्यासाठी १५ लाख रुपये प्राप्त करने,महत्वाचे म्हणजे मध्यवर्तीने संस्थेच्या नावे धनादेश न देता ‘व्यक्ति‘च्या नावे धनादेश देणे इत्यादी अनेक मुद्दांवर शंभराव्या संमेलनाच्या उद् घाटनाच्या दिवशीच नागपूरातील काही नाट्यकर्मींनी आंदोलनाचा शंखनाद फूंकण्याचा निर्धार केला आहे.
अनेक नाट्यकर्मींनी नागपूर शाखेत वारंवार होणा-या गैरव्यवहाराबाबत अ.भा.मराठी नाट्य परिषदचे अध्यक्ष(प्रमुख कार्यवाह)यांना पत्र लिहून या मुद्दांकडे लक्ष वेधले आहे.९९ व्या नाट्य संमेलनाचा हिशेबा संदर्भात वारंवार माहिती मागवून,पत्रव्यवहार तसेच माहिती अधिकारात माहिती मागून सुद्धा देण्यात आली नसल्याचे त्यांनी नमूद केले.या हिशोबाबाबत नागपूर शाखा व मध्यवर्ती शाखा मौन आहे.महत्वाचे म्हणजे नागपूर शाखेचे बँक खाते, हे बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेत असताना अचानक नागपूर शाखेचे खाते. सहकारी पत संस्थेत उघडण्यात आले, जे संस्था नोंदणी अधिनियम तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त निधी कायद्याच्या अनुषंगाने बेकायदेशीर कृती असल्याचा अरोप नाराज नाट्यकर्मींनी पत्राद्वारे केला.
याशिवाय १०० व्या नाट्य संमेलना अंतर्गत झाडीपट्टी रंगभूमीचे संवर्धन व्हावे व त्याचा प्रचार प्रसार व्हावा या अनुषंगाने प्रयोग घेण्यात आले व या प्रयोगाचे मानधन देखील देण्यात आले.परंतू,झाडीपट्टी रंगभूमीची एक संघटना असताना सुद्धा त्या संघटनेस या प्रयोगाची माहिती देण्यात आली नाही!झाडीपट्टी रंगभूमीमध्ये किमान ६० संघटना अस्तित्वात असताना केवळ विशेष एकास प्राधान्य देण्यात आले.त्या नाट्यकर्मीच्या १५ प्रयोगांसाठी १५ लाख रुपये संस्थे ऐवजी व्यक्तिगत खात्यात जमा करण्यात आले.या आर्थिक गैरव्यवहाराबाबत झाडीपट्टी संघटनाने अनेकवेळा मध्यवर्तीकडे पत्रव्यवहार केला मात्र,त्याचे कोणतेही उत्तर त्यांना प्राप्त झालेले नाही!
सभासद नोंदणीमध्ये हेतुपुरस्सर नव्या सभासदांची नोंदणी गेल्या अनेक वर्षांपासून नागपूर शाखेत थांबविण्यात आली आहे जेणेकरुन निवडणूकीत फक्त एकाच पॅनलला फायदा पोहोचावा.अ.भा.मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेत दिनांक ३० मे २०१९ रोजी २०० सभासद,१२ फेब्रुवरी २०२० रोजी ३४ सभासद व १८ नोव्हेंबर २०२० रोजी १०२ सभासद असे एकूण ३३६ सभासद बनविण्यात आले.२०२३ च्या निवडणूकीचे मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांना या संपूर्ण सभासदांवर आक्षेप घेण्यासाठी पत्र लिहण्यात आले होते,नवीन कार्यकारिणी घोषित झाल्यावर सगळे आक्षेप त्यांच्याकडे सुर्पूर्द करु व नवीन कार्यकारिणी त्यावर निर्णय घेईल असे आश्‍वासन दळवी यांनी दिले होते मात्र,दळवी यांच्या पत्राचे पुढे काय झाले?त्यांनी सदर पत्राची प्रत नवीन अध्यक्षांना सुपुर्द केली का?केली असल्यास अध्यक्षस्तरावरुन प्रशांत दामले यांनी त्यावर काय कारवाई केली?याची कोणतीही माहिती नागपूरातील नारज नाट्यकर्मींना मिळाली नाही.

अ.भा.मराठी नाट्य परिषदेच्या घटनेच्या कलम २२ (इ)प्रमाणे किरकोळ खर्च व दैनदिन खर्चासाठी एका वेळी फक्त दहा हजार रुपये नागपूर शाखेचे पदाधिकारी स्वत:जवळ ठेऊ शकतात पण दिनांक ३० मे २०१९ रोजी २०० सभासदांचे ५५० रुपये शुल्क घेण्यात आले परिणामी,एक लाख दहा हजार रुपये प्रत्यक्षात मुंबई कार्यालयात रोख जमा करण्यात आली,ही नियमबाह्य व बेकायदेशीर कृती होती.नियमाप्रमाणे प्रत्येक सभासदाचे सभासद शुल्क हे त्या शाखेच्या बँक खात्यात  जमा करणे बंधनकारक असून तेथून त्याचे ५० टक्के शुल्क मध्यवर्ती शाखेच्या बँक खात्यात वळते करने गरजेचे आहे मात्र,शाखेच्या खाता उता-यात ही रक्कम आढळलीच नाही!
महत्वाचे म्हणजे सभासदत्व घेणा-या अनेकांना तर नाट्य परिषद काय आहे याची साधी माहिती देखील नाही.पदाधिका-यांनी स्वत:च्या घरी दूध देणारे,भाजीवाले,वाहन चालक ,घरातील नोकरवर्ग,त्यांचे कुटूंबिय,शेजारी,पसिरातील परिचित यांना सभासद केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.नियमानुसार शाखेचा सदस्य होण्यासाठी नाट्य क्षेत्राशीसंबंधित असणे बंधनकारक आहे मात्र,२०२३ ची नाट्य परिषदेची निवडणूक डोळ्या समोर ठेऊन मोठ्या प्रमाणात बोगस सभासद करण्यात आल्याचा आरोप मुंबईच्या धर्मादाय आयुक्त व मुख्य निवडणूक अधिकारी दळवी यांच्याकडे नाट्य परिषदेचे सदस्य ॲड.गौरव खोंड यांनी केली होती.एका सभासदाने तर मी कुठलाही अर्ज भरलेला नसताना माझे नाव सभासद यादीत आल्याचे ‘शपथपत्रावर’लिहून दिले होते!सूचक व अनुमोदकाच्या रकान्यातही खोट्या स्वाक्ष-या असल्याचा दावा ॲड.खोंड यांनी त्यांच्या पत्रात केला होता.

हे सर्व सभासद तीन वर्षांपूर्वी झाले असून ते बनावट नाहीत,मध्यवर्ती शाखेने जी यादी दिली त्यातही ही सर्व नावे आहेत.सर्वांनी स्वेछेने अर्जावर स्वाक्षरी केली आहे.एका सभासदाला भ्रमित करुन त्याच्याकडून खोटे शपथपत्र लिहून घेतले,हे सर्व निवडणूकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक खेळले जाणारे राजकारण असल्याचे अ.भा.मराठी नाट्य परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष नरेश गडेकर म्हणाले होते.
मात्र,आज देखील नागपूर शाखेचे सभासद होणे अनेकांना दुरापस्त आहे.कागदोपत्री सभासद होण्यापासून कोणालाही रोक नाही मात्र,सभासद नोंदणीचे अर्जच त्यांना दिले जात नाहीत,यावर आज प्रशांत दामले यांना पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता,पहिल्यांदा ही बाब त्यांच्या समोर आली असून यावर कार्यकारीणीच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल,असे आश्‍वासन त्यांनी दिले.गेल्या वीस वर्षांपासून नागपूर शाखेतून नरेश गडेकर,प्रफूल्ल फरकासे हे मध्यवर्तीवर निवडून जात आहेत,हे विशेष.नागपूरातील समर्पित नाट्यकर्मींना मध्यवर्तीमध्ये जाण्याची संधी मिळत नसल्याची खंत ही नाराज नाट्यकर्मी व्यक्त करतात.नागपूर शाखेतून निवडून जाणारे तिसरे पदाधिकारी संजय राहाटे हे नाट्य परिषदेचे खाते सांभाळत असे,त्यांचा नाट्यक्षेत्राशी संबंध नसल्याचा दावा नाट्यकर्मी करतात.खरा नाट्यकर्मी हा राजकारणापासून दूरच राहतो मग ते राजकारण ,राजकारणातील असो किवा नाट्यक्षेत्रातील,असे ते सांगतात.
मूळात नरेश गडेकर हे ‘स्वयंभू’अध्यक्ष असल्याची टिका त्यावेळी चांगलीच रंगली होती.प्रसाद कांबळी यांना अध्यक्ष पदावरुन हटवण्यासाठी चांगलेच ‘राजकारण’रंगले होते.यात एका राजकीय नेत्याचा फार मोठा मोलाचा वाटा असल्याचे रंगकर्मी सांगतात.त्या नेत्याला आपल्या रंगकर्मी पत्नीला त्या पदावर बसवायचे होते,अशी चर्चा आहे.ऐन करोनाच्या काळात जेव्हा रंगभूमीवर निर्भर हजारो कमगार हे हलाकीच्या स्थितीत होते त्यावेळी प्रसाद कांबळी यांनी मध्यवर्ती शाखेच्या बँकमधून अडीच कोटी रुपये त्या वेळी या कामगारांना वितरीत करुन,ती जीवघेणी वेळ निभावून नेली होती मात्र,आर्थिक सुस्थितीत असणारे पदाधिकारी यांनी या माणूसकीच्या निर्णयावर पराकोटीचे रान उठवले व शेवटपर्यंत कांबळी यांच्या विरोधात अखेरपर्यंत ‘राजकारण’रंगले.
ॲड.खोंड यांच्या नागपूर शाखेच्या एकूण कार्यपद्धतीवर विविध आक्षेप घेणा-या पत्राला मध्यवर्ती शाखेची गेल्या ३५ वर्षांपासून कायदेशीर बाजू सांभाळणारे ॲड.घनश्‍याम हुले यांनी उत्तर दिले मात्र,त्यात फक्त चौकशी करण्यात येईल असे असंबद्ध व टाळाटाळीचे उत्तर देण्यात आल्याचा आरोप ॲड.खोंड यांनी केला.
महत्वाचे म्हणजे नागपूरातील ज्येष्ठ नाट्यकर्मी सलीम शेख यांची महानगर शाखा व नागपूर शाखा मिळून ९९ वे नाट्य संमेलन पार पाडणार होते.बैठकीत हा निर्णय देखील झाला मात्र,ऐन वेळी नागपूर शाखेने सलीम शेख यांना कार्यक्रमातून वगळले.परिणामी,चिटणीस पार्कमधून निघणा-या ग्रंथ दिंडीच्या वेळी सलीम शेख व त्यांच्या शाखेचे सदस्य हे काळे वस्त्र परिधान करुन दिंडीत सहभागी झाले होते.आंदोलनाचा तो प्रकार माध्यमात देखील चांगलाच चर्चिला गेला.आज पत्रकार परिषदेत मात्र तेच सलीम शेख नागपूर शाखेच्या पदाधिका-यांसोबत मंचावर उपस्थित होते.
याविषयी शेख यांना छेडले असता ‘त्या वेळी माझी बाजू काळी होती आता पांढरी आहे’असे मिश्‍किल उत्तर त्यांनी दिले.यावेळी तुमच्याच नाट्यक्षेत्रातील काही रंगकर्मी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे,असे सांगितले असता,‘त्यांनी देखील पांढ-या बाजूला यावे’,असा अनाहूत सल्ला सलीम शेख यांनी दिला.
महत्वाचे म्हणजे नाट्य परिषदेच्या निवडणूकीत सलीम शेख यांच्या पॅनलला पराभूत करण्यासाठी सलीम शेख नावाचाच उमेदवार उभा करण्यात आला होता!या वेळी शंभराव्या संमेलनात सलीम शेख यांच्या नाटकाचा देखील आनंद नागपूरकर घेऊ शकणार आहे.
थोडक्यात,राज्याच्या उपराधनीत शंभरावे अ.भा.मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे विभागीय नाट्य संमेलन पार पडत आहे.या पार्श्वभूमीवर नाट्य कलावंतांनी हेवेदावे विसरुन एकत्र येण्याचे आवाहन प्रशांत दामले यांनी केले.याला नाराज नाट्यकर्मी कितपत प्रतिसाद देतात,हे उदघाटनाच्या दिवशीच कळेल मात्र,मध्यवर्ती शाखेला शासकीय निधी मिळतो व कोणत्याही शासकीय निधीचा वापर याची माहिती,माहिती अधिकारात मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे नाराज नाट्यकर्मी सांगतात.कोणत्याही गंभीर आरोपांचेही पत्र शाखा व्यवस्थापन समितीकडे पाठऊन देण्याचा प्रघात पडला असून, प्रश्‍नांची सोडवणूकच होत नसल्याची तक्रार नाट्यकर्मी करतात.प्रशांत दामले हे उत्कृष्ट कलावंत असून कोणत्याही प्रकारच्या राजकारणापासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवणारे असल्याचे मत नाट्यकर्मी व्यक्त करतात.त्यांच्या अध्यक्षतेखाली शंभरावे संमेलन पार पडत आहे,यातच ते आनंदी आहेत,आमच्या पत्रांची,प्रश्‍नांची प्रभावी सोडवणूक ते करतील का?की टोळवाटोळवीत वेळ घालवतील याचे उत्तर येणारा काळच देईल,असे नाराज नाट्यकर्मी म्हणतात.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official youtube चॅनलवर उपलब्ध)
…………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या