
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशाला मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांच्या मालकांनी दाखवली केराची टोपली!
सरकारने सांगावे या मानसिकतेशी कसे लढावे?निर्माते नरेंद्र जिचकार यांचा सवाल
चित्रपट प्रदर्शितच होत नसेल तर का बनवू मराठी चित्रपट?नरेंद्र जिचकार
मनसेचा मार्ग अवलंबवायचा का?वैदर्भिय चित्रपटसृष्टितील कलावंतांचा तीव्र रोष
मराठी चित्रपट किमान एका आठवडा तरी मल्टीप्लेक्स मध्ये चालवावा:कलांवतांची मागणी
प्रश्न मराठी अस्मितेचा:दिग्दर्शक सलीम शेख
वैदर्भिय कलावंतांची गळचेपी: चित्रपट संकलनकर्ता मिलिंद कुलकर्णी
राज्य सरकारने केरळच्या धर्तीवर प्रादेशिक चित्रपटांसाठी चित्रपटगृहांची निर्मिती करावी:ज्येष्ठ दिग्दर्शक नितीन बनसोड
‘तेरवं‘चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत होता मात्र मल्टीप्लॅक्सच्या मालकांनी चित्रपटाची स्टॅण्डी देखील काढली: संगीतकार विरेंद्र लाटणकर
कलावंताच्या परिश्रमाला एक्सपोजर कसे मिळणार?अभिनेत्री पूजा पिंपळकर-भोयर
मल्टीप्लेक्सचे प्रेक्षक सिंगल चित्रपटगृहात जाण्यास इच्छित नसतात: अभिनेता प्रशांत निखार
नागपूर,ता.१५ मार्च २०२४: आजचा विषय नागपूरपुरती किवा चित्रपटापुरती संबंधित नसून ,वैदर्भिय मराठी चित्रपटसृष्टिशी संबंधित हजारो माणसांच्या परिश्रमाशी संबंधितआहे. एकीकडे नागपूर तसेच विदर्भात चित्रपटसृष्टि निर्माण झाली पाहिजे,या दृष्टिने पाऊल पडत आहे.स्वत: नागराज मंजुळे रामटेक तसेच विदर्भातील इतर पर्याय बघून गेलेत असे असताना दूसरीकडे विदर्भात निर्माण झालेल्या मराठी चित्रपटांना मात्र शहरातील मल्टीप्लेक्स चित्रपटगृहाचे मालक हे प्रदर्शनासाठी स्लॉटच देत नाही,‘तेरवं‘या चित्रपटाचे शो व्हेरायटी चौकातील इर्टनिटी मल्टीप्लेक्सच्या मालकांनी चक्क निर्मात्याला न कळवता,बुकींग नाही अश्या खोट्या सबबीखाली रद्द केले,असा संताप चित्रपट निर्माते नरेंद्र जिचकार यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदे व्यक्त केला.
याप्रसंगी दिग्दर्शक व ज्येष्ठ नाट्यकर्मी सलीम शेख,ज्येष्ठ दिग्दर्शक नितीन बनसोड,मराठी चित्रपट महामंडळाचे नागपूरातील समन्वयक व संकलनकर्ते मिलिंद कुलकर्णी,सुप्रसिद्ध संगीतकार वीरेंद्र लाटणकार,अभिनेत्री पूजा पिंपळकर-भोयर व अभिनेते प्रशांत निखार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नरेंद्र जिचकार म्हणाले,की मी सामाजिक बांधिलकीतून मराठी चित्रपट निर्मित करतो.मात्र,मराठी चित्रपट हे रिलीजच होत नाही किंबहूना ते रिलीज करु दिल्या जात नाही,असा मला अनुभव आला आहे.जेवढा खर्च हा एखाद्या चित्रपट निर्मितीसाठी लागतो त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने खर्च त्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी लागत असतो.नागपूरात मल्टीप्लेक्स चित्रपटगृह मालकांची जी ‘दादागिरी‘सुरु आहे त्यातून माझे दोन्ही चित्रपट ‘कौमार्य’व याच ८ मार्च रोजी प्रदर्शित झालेला ‘तेरवं’चित्रपटांना मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांच्या मालकांनी प्राईम टाईम तर सोडा,जो ऑड स्लॉट दिला होता तो देखील निर्मात्याला न विचारता रद्द केल्याचे त्यांनी सांगितले.मल्टीप्लेक्सचा वेगळा प्रेक्षकवर्ग असतो.हिंदी चित्रपट बघण्यासाठी आलेले प्रेक्षक हे मराठी चित्रपटाकडे देखील वळत असतात.मल्टीप्लेक्स हा ‘शेअरिंग’वर चालणारा व्यवसाय असून हिंदी कमर्शियल चित्रपटांसाठी त्यांना बुकींग मिळतं मात्र,मराठी राज्यात मराठी चित्रपटांप्रतीच त्यांची कोणतीही बांधिलकी नसते,असा आरोप त्यांनी केला.
अगदी दोन किवा तीनच दिवसात ते इतक्या परिश्रमातून साकारलेल्या मराठी चित्रपटाला चित्रपटगृहातून काढून फेकतात.दूसरीकडे दक्ष्ीणेत मात्र त्यांच्या मातृभाषेतील चित्रपटांविषयी असं घडत नाही.दक्षीणेकडील राज्यात मल्टीप्लेक्सचे मालक असं दुस्साहस करीत नाही.एक तर प्राईम टाईमशिवाय फार कमी प्रेक्षक हे चित्रपटगृहात जातात.सायंकाळी ६ ते ९ तसेच रात्री ९ ते १२ या स्लॉटमध्ये चांगला प्रेक्षक वर्ग सिनेमाला मिळत असतो. सकाळी १०.३० किवा ११ वा.चा स्लॉट मराठी चित्रपटासाठी दिला जातो.मी स्वत: अथक प्रयत्नातून सायंकाळी ४.४५ ची वेळ निर्धारित करुन घेतली होती मात्र,सकाळी दहा वाजताच त्यांच्या व्यवस्थापकाचा फोन आला,‘तेरवं’ला फक्त ६-७ बुकींग असल्याने शो रद्द करतोय!मराठी माणसांची मानसिकता ही वेळेवर तिकीट काढून चित्रपट बघण्याची असते.मात्र,सकाळी दहा पर्यंत पर्याप्त बुकींग न झाल्याने मल्टीप्लेक्स चित्रपटगृहाचे मालक हे मराठी शो रद्द करतात,हे बघून माझ्यासारख्या निर्मात्याची खूप निराशा झाली असल्याची खंत याप्रसंगी जिचकार यांनी व्यक्त केली.
विदर्भात मराठी चित्रपटसृष्टिवर जवळपास १५ ते १६ हजार कलावंत निर्भर आहेत.द ग्रेट शो मॅन सुभाष घई,राजकुमार हिरानंदानी,शंतनु रोडे,संजय सोलकर यासारखे हिरे याच नागपूर भूमीतून मुंबईच्या चित्रपटसृष्टित स्थिरावली आहे.नागपूरात सिनेमाची संस्कृती खोलवर रुजली असताना,असा दूजाभाव योग्य नसल्याचे सांगून, मल्टीप्लेक्स चित्रपटगृह मालकांच्या या दादागिरी विरोधात नागपूरचेच असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विदर्भाचे असणारे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आम्ही तक्रार पाठवली आहे.संवैधानिक तोडगा यावर काढावा,एवढीच आमची मायबाप सरकारकडून अपेक्षा आहे.आम्ही मनसेचा मार्ग अवलंबवायचा का?असा प्रश्न ही या प्रसंगी नरेंद्र जिचकार यांनी केला.
‘बाईपण भारी देवा’हा देखील मराठी चित्रपट होता मात्र,तो सर्वच मल्टीप्लेक्समध्ये हाऊसफूल चालला,याकडे लक्ष वेधले असता,, तो कमर्शियल चित्रपट होता असे जिचकार म्हणाले.माझा विषय हा सामाजिक होता.महाराष्ट्रात वर्षाला ५० मराठी चित्रपट निर्मित होत असेल तर एका चित्रपटाला चित्रपटगृह मिळत असेलही मात्र याचा अर्थ उर्वरित ४९ मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळू नये,असा होत नाही.आमची मागणी इतकीच आहे मराठी चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये किमान एक आठवडा तरी चालू द्यावा.यामुळे चित्रपटाची तोंडी जाहीरात होत असते.‘बाईपण भारी देवा’हा चित्रपट देखील सुरवातीच्या काही आठवडे चालला नव्हता मात्र, प्रत्येकाने तो चित्रपट एकदा तरी बघावा अशी त्याची तोंडी जाहीरात इतकी झाली की पुढे तो हाऊसफूल चालला.सिंगल स्क्रीनवर ‘तेरवं’हा चित्रपट फक्त नागपूरच नव्हे तर चंद्रपूर,वर्धा,हिंगणघाट इत्यादी शहरात खूप चांगला चालतोय,सिंगल स्क्रीनवर चित्रपट दाखविण्यासाठी निर्मात्याला भाडे द्यावे लागते,सिंगल स्क्रीन हा आमचा विषय नाही,नागपूरात मल्टीप्लेक्समध्ये जर आमचा सिनेमा प्रदर्शित होत नसेल,किमान एक आठवडाही ते दाखविणार नसतील तर मी तिसरा मराठी सिनेमा का काढावा?असा सवाल जिचकार यांनी केला.
मल्टीप्लेक्समध्ये तीन स्क्रीन असतात त्यापैकी किमान एक स्क्रीन मराठी राज्यात मराठी चित्रपटांसाठी राखीव ठेवली जावी.निदान फक्त एक आठवडा तरी मराठी चित्रपट चालू द्यावा.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीत निर्णय झाला होता की मराठी चित्रपटांसाठी राज्यातील मल्टीप्लेक्स चित्रपटगृहात ५२ आठवड्यांपैकी किमान ४ आठवडे आरक्षीत राहतील आणि जे या नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर दहा लाखांचा दंड ठोठावला जाईल.याशिवाय मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांना प्राईम टाईमचा स्लॉट देणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंधनकारक केले आहे.असे असताना नागपूरात मुख्यमंत्र्यांच्या आदेशला मल्टीप्लेक्सवाल्यांनी केराची टोपली दाखवली,अशी टिका यावेळी नरेंद्र जिचकार यांनी केली.
याप्रसंगी बोलताना सलीम शेख म्हणाले,की दहा वर्षांपूर्वी नागपूरात २६ सिंगल स्क्रीन चित्रपटगृह होेते.आता फक्त मोजके उरले आहेत.येत्या काही वर्षात ते ही नामशेष होतील,मग अशी परिस्थिती येईल की मल्टीप्लेक्सच्या दादागिरीमुळे मराठी चित्रपटांची निर्मितीच बंद होईल,इतर कोणत्याही राज्यात अशी परिस्थिती नाही जी मराठी राज्यात मराठी चित्रपटांच्या बाबतीत घडतेय.प्रश्न मराठी अस्मितेचा असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र सरकारचा उद्देश्य आहे की मराठी चित्रपटांना देखील मराठी राज्यात सन्मानाची जागा मिळावी.नियमाप्रमाणे ‘तेरवं’ हा चित्रपट मल्टीप्लेक्सवाल्यांनी एक आठवडा जरी ठेवला असता तर ‘बाईपण भारी देवा’सारखा प्रतिसाद मराठी चित्रपट रसिकांनी नक्कीच ‘तेरवं’ला देखील दिला असता.केरळसारख्या राज्यात तेथील सरकारने त्यांच्या मातृभाषेतील चित्रपटांसाठी स्वत:मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांची निर्मिती केली आहे.त्या राज्यात महाराष्ट्रातील चित्रनगरीतील समस्या कधीच उद् भवत नाहीत.विदर्भात तर कोणीही अश्याप्रकारचा पुढाकार घेतला नसल्याची खंत नितीन बनसोड यांनी व्यक्त केली.एखादा चित्रपट निर्माण करण्यास कोट्यावधीचा खर्च निर्माता करीत असतो.हजारे माणसांचे पडद्यावर व पडद्या मागे परिश्रम असतात,त्याला अश्या प्रकारे धुळीला मिळवता कामा नये.
चित्रपट महामंडळातील नागपूरातील नोंदणीकृत कलावंतांसाठी मी नेहमीच धावपळ करीत असतो.अनुभवातून हेच सांगतो दोन कोटींचा सिनेमा मुंबईत निर्मित होत असेल आणि विदर्भात ३० लाखांमध्ये चित्रपट बनत असेल तरी गुणवत्तेच्या बाबतीत विदर्भाचा सिनेमा तसूभरही कुठेही कमी पडत नाही.असे असतानाही,मल्टीप्लेक्समध्ये विदर्भाच्या चित्रपटाला जर जागा मिळत नसेल तर हा विदर्भाच्या हजारो कलावंतांचे नुकसान करणारे धोरण आहे.असे मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले.आजच नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी कीर्तनातील कलावंतांना तबला-पेटी भेट दिली,असे सांगितले असता,आम्ही गडकरी यांना देखील भेटणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’यासारखे विभाग दूर्देवाने विदर्भात नाही.यासाठी कोणी प्रयत्न देखील केला नाही.विदर्भातील ज्या चित्रपटसृष्टिवर १५ ते २० हजार कुटूंबिय निर्भर आहे,ते चित्रपट जिवंत राहीले पाहीजे यासाठी प्रयत्नच झाले नाही.मराठी चित्रपट चांगला की वाईट,हे कळण्यासाठी किमान एक आठवडा तरी चित्रपट चालू द्या!असे अावाहन जिचकार यांनी केले.
आमचा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला त्या दिवशी तो हाऊसफूल होता.शनिवारी देखील ९० टक्के चित्रपटगृह भरले होते.रविवारी ६० टक्के तिकीट बुकींग झाली होती.मात्र,तीनच दिवसात आमचा सिनेमा मल्टीप्लेक्सवाल्यांनी रद्द केला.जे प्रेक्षक दिलेल्या वेळेवर चित्रपटगृहात पोहोचले त्यांना त्या स्लॉटवर वेगळाच सिनेमा सुरु असल्याचे कळले.आमच्या सिनेमाचा प्रेक्षक हा आमचा सिनेमा बघायला आला होता.मात्र,त्यांच्यासाठी गेट देखील उघडले गेले नाही.‘तेरवं’ची जाहीरात करणारे स्टॅण्डी देखील उचलून टाकून देण्यात आली होती!आमच्या विरोधामुळे पुन्हा स्टॅण्डी त्यांनी आणून ठेवली,ही मानकिसता चुकीची असल्याचे विरेंद्र लाटणकर म्हणाले.चित्रपट काढणे ही सोपी बाब नाही.जिचकार यांनी दीड कोटी रुपये खर्च करुन चित्रपटांची निर्मिती केली होती.मात्र,बुक माय शो वर आमच्या चित्रपटाचे बुकींग दिसलेच नाही.मग तिकीट विक्री कशी होणार?हा फक्त मराठी भाषेचा,मराठी कलावंतांचा अपमान नाही तर महाराष्ट्रात मनोरंजन कर भरणा-या लाखो मराठी मायबाप रसिक प्रेक्षकांचा अपमान असल्याचे लाटणकर यांनी सांगितले.
मी लहान-मोठ्या अश्या अनेक प्रोडक्शनमध्ये काम केलं आहे.मोठे म्हणजे जास्त बजेट असणारे चित्रपटांमध्ये मी काम केलं.त्यामुळे चित्रपटांची प्रक्रिया मला माहिती आहे.बुक माय शो मध्ये तिकीट बुकींग केल्यास प्रत्येक तिकीटा मागे २० ते ३० रुपये अतिरिक्त द्यावे लागतात.त्यामुळे बहूतांश मराठी प्रेक्षक हा चित्रपटगृहात जाऊन वेळेवर तिकीट विकत घेऊन चित्रपट बघत असतो.मल्टीप्लेक्सवाल्यांना मराठी चित्रपट ठेवायचाच नसल्याने त्यांनी बुकींग कमी झाल्याचा बहाणा सांगितला.एक तर त्यांनी आमच्या चित्रपटाची सारखी वेळ बदलली.यामुळे प्रेक्षकांचाही वेळेचा सेटअप बिघडला.चित्रपट चालावा ही जवाबदारी फक्त निर्मात्याची किवा दिग्दर्शकाची नाही,आम्हा कलावंतांची देखील आहे.त्यामुळेच आम्ही या पत्रकार परिषदेत आलो.कलावंत काम करतोय मात्र त्याला एक्सपोझर कसे मिळणार?मराठी भाषा ही संपूर्ण देशात गाजावी अशी गर्जना वारंवार होते मात्र,त्याच मराठीला मराठी राज्यातच अशी कुचंबना वाट्याला यावी,या सारखी दूसरी शोकांतिका नाही,असे पूजा भोयर म्हणाली.
मुद्दा हा मराठी प्रेक्षकांना मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट बघायला मिळावा,हा आहे.अलीकडे मराठी प्रेक्षक हा सहसा सिंगल स्क्रीनवर चित्रपट बघायला जात नाही.आम्हाला सायंकाळी ४.४५ चा वेळ दिला असतानाही वेळेवर सिनेमॅक्सच्या व्यवस्थपकाने आमचा शो रद्द केला त्यामुळे ‘तेरवं’बघायला आलेल्या प्रेक्षकांची घोर निराशा झाली.वेळेवर त्यांना कॉटन मार्केट येथील जयश्री टॉकीजमध्ये चित्रपट बघण्याची विनंती करावी लागली.आम्हाला सिनेमॅक्समध्येच चित्रपटाचा शो दिला असता तर ते बघून पुढे आणखी १०० प्रेक्षक मिळाले असते,असा संताप प्रशांत निखार याने व्यक्त केला.
मल्टीप्लेक्समध्ये भागीदारी असते.चित्रपट प्रदर्शित करताना ६० टक्के चित्रपटगृहाच्या मालकाचा वाटा असतो तर ४० टक्के निर्मात्याचा असतो.त्यांच्यात करार होतो मात्र, पाळल्या जात नसल्याचे नरेंद्र जिचकार यांनी सांगितले.माझ्या चित्रपटांना मल्टीप्लेक्सची गरज नाही मात्र,भावी पिढी जी या क्षेत्रात येणार असेल त्यांच्या समोर आपण कोणती आव्हाने ठेवीत आहोत?असा प्रश्न जिचकार यांनी केला.
……………………………




आमचे चॅनल subscribe करा
