फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeblogनागपूरचे पत्रकार की अदानीचे दलाल!

नागपूरचे पत्रकार की अदानीचे दलाल!

Advertisements
ओडीसामधील धामरा पोर्टची सैर:एलएनजी प्लान्टचे स्तुतीगान

सकारात्मक बातम्यांचा नागपूरात रतीब:वाचकांचे हित किती?
पत्रकाराला डिलिट करायला लावला खरा‘माहितीपट’
नागपूर,ता.२५ सप्टेंबर २०२५: मुंबईतील जगप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानीच्या कार्यालयातून नागपूरतील ‘बिटकॉईन‘सारखे नाव-साधर्म्य असणा-या एका पीआर एंजसीला फोन आला.नागपूर येथील एकूण १७ पत्रकारांची ओरिसा सैर करण्यासाठी निवड करण्याचे त्यांना निमंत्रण देण्यात आले होते.या पीआर एजंसीने नागपूरातील सर्व इंग्रजी,हिंदी व मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांशी संपर्क साधून कोणत्याही एका पत्रकाराचे नाव या दौ-यासाठी देण्याची विनंती केली. संपादकांनी ज्या पत्रकारांना अश्‍या प्रकारच्या पेड न्यूज दौ-यात रुची आहे त्यांची नावे दिली तर काही पत्रकारांची ईच्छा नसताना संपादकांच्या मर्जी पुढे त्यांनी नमते घेत या उद्योगात सहभागी होत, उद्योगपतीच्या दलालीमध्ये सहभागी झाले.
दहा सप्टेंबर रोजी अशी नावे मागण्यात आली होती तर ११ ते १३ सप्टेंबर पर्यंत या १७ पत्रकारांचा दौरा ओडीसा येथे मुक्कामी होता.नागपूर वरुन कोलकत्तासाठी पहाटे ७ वाजता विमानाचे उड्डाण होते.परिणामी,पहाटे ५ वाजताच या सर्व पत्रकारांच्या घरां समोर प्रत्येक पत्रकारासाठी स्वतंत्र खासगी कॅब सेवेसाठी उभी झाली.सन्मानपूर्वक या पत्रकारांना विमानतळावर पोहोचविण्यात आले.स्वत:बिडकॉईन साधर्म्याच्या पीआर एजंसीचे मालक पत्रकारांच्या स्वागतासाठी भल्या पहाटे विमानतळावर हजर होते.या नंतर या १७ पत्रकारांनी कलकत्तासाठी उड्डाण भरली.
तेथून पुन्हा ते भुवनेश्‍वरसाठी विमानाने निघाले.तेथील विमानतळावर या पत्रकारांसाठी पुन्हा खासगी वाहने सेवेसाठी उभी होती.पत्रकारांना आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरविण्यात आले.अर्थात अशा पंचतारांकित हॉटेलची ‘फूकटची’(पदरातला कष्टाचा पैशाने इतका माज या जन्मात पत्रकार नावाच्या माणूस प्राण्याला परवडणारा नाहीच) मेजवाणी व आदरातिथ्याचे गोडवे पत्रकार म्हणून लेखणीतूनही उमटणे अशक्य.
या ठिकाणी जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ मंदिरांला त्यांनी दिलेली भेट,धार्मिक माहत्म्य,शहराची ऐतिहासिक ओळख इत्यादी या विषयी त्यांच्या सोबत गेलेल्या एका पत्रकाराने ऑन कॅमरा या पत्रकारांना बोलते केले.अदानीच्या आदरातिथ्याने पराकोटीचे भारावलेले हे पत्रकार तेथील हिरवाई,स्वच्छता,निसर्ग,वनराई,समुद्राच्या लाटा इत्यादी विषयी भरभरुन बोलले.यानंतर त्यांचे चरण जगतविख्यात अदानींच्या धामरा पोर्टवर पडले.भारतातील हा एकमेव असा बंदरगाह आहे ज्यात संपूर्ण जगातून माल उतरतो.एकाच वेळेत सव्वा लाख टन माल या बंदरात उतरतो.यावरुन या बंदराचं महत्व कळतं.यानंतर अदानीच्या एलएनजी प्लान्ट जिथे नैसर्गिक वायू बनते त्या ठिकाणी नागपूरच्या या पत्रकरांना नेण्यात आले.
या प्लान्टमधून आतापर्यंत भिलाईपर्यंत पाईप लाईने गॅस पोहोचला आहे.येत्या काही वर्षात मुंबई,नागपूरपर्यंत पाईप लाईनचे काम पूर्ण होऊन घरोघरी पाईपने अदानीचा गॅस पोहोचणार आहे.नागपूरातील असे एक ही घर असणार नाही ज्या घरी अदानीचा गॅस पोहोचणार नाही! नागपूरकर ग्राहकांकडे स्वयंपाकासाठी अदानीच्या पाईप लाईनमधील गॅस शिवाय इतर दूसरा कोणताही पर्याय नसणार आहे.कोणत्याही बाजारपेठेचा हा अलिखित नियम आहे,‘मक्तेदारी’निर्माण झाली की भाव ग्राहकांच्या ओटाक्यात राहत नाही.नागपूरातही भावी काळत हे घडणार,यात दूमत नाही.
तीन दिवसांचा हा ‘शाही’दौरा आटोपून हे १६ वृत्तपत्रीय व एक लोकल चॅनलचा पत्रकार नागपूरात परतले.यानंतर पीआर एजंसीने त्यांना ‘सकारात्मक’बातम्यांसाठी फोन केले.वाचकांनी देखील इंग्रजी,हिंदी व मराठी वृत्तपत्रातील अदानीच्या ओरिसा येथील एलएनजीच्या प्लान्टचे गोडवे गाणारे,त्याचे महत्व विशद करणा-या बातम्या वाचल्या.ओरिसाच्या समुद्रातील एलएनजी प्लान्टचा नागपूराशी काय संबंध आहे?हे वाचकांना देखील त्यावेळी कळले नाही याचे कारण ही ‘पेड न्यूज’आहे हे कळायला वृत्तपत्राचे वाचक अद्यापही सत्तरीच्या दशकासारखेच ’भाबडे’आहेत.
कश्‍या रितीने नागपूरात लवकरच येत्या काही वर्षात अदानीचा हा गॅस पाईप लाईने घरोघरी पोहोचणार,एक ही ब्लास्ट होणार नाही,हा गॅस किती सुरक्षीत आहे,ग्राहकांना कसा परवडणारा असेल,इत्यादी माहितीचा रतीब, वृत्तपत्रीय विश्‍वासहर्त्याच्या जोरावर त्या १७ दलाल पत्रकारांनी संपादकांच्या परवागनीने भाबड्या वाचकांसमोर मांडला.सुरक्षेच्या दृष्टिने या  प्लान्टमध्ये फक्त चार माणसे नोकरीवर असून संपूर्ण काम विविध यंत्रे करतात,असे कौतूक साेहळे ही वृत्तपत्रांमध्ये उमटले.हा प्लान्ट २०१४ पर्यंत टाटा उद्योग समूह व एलएनटी यांच्या संयुक्त भागीदारीतून चालवला जात होता.देशाच्या भाग्यरेषेत २०१४ साली मोदी सरकारचा उदय झाला त्याच बरोबर हा प्लान्ट त्याच वर्षी अदानी समुहाच्या ताब्यात गेला.

यातील एका पत्रकाराने या संपूर्ण दौ-यावर जीव ओतून एक उत्कृष्ट माहितीपट बनवला व युट्यूबवर टाकला.हजारो व्यूअर्सने ते अवघ्या काही तासात तो बघितला.त्याचे कौतूक ही केले मात्र,ते बघून अदानीसाठी दलाली करण्यासाठी गेलेले नागपूर शहरातील इंग्रजी,मराठी व हिंदी वृत्तपत्रातील हे पत्रकार यांच्यातील ‘पत्रकार’अचानक जागा झाला व या पत्रकाराला तो माहितीपट तातडीने युट्यूबवरुन डिलिट करण्यास सांगण्यात आले!ताकाला जाऊन भांडे लपवणे,असे या कृतीला मराठीत म्हण आहे.
संपाकदाच्या परवानगीने किंवा आदेशाने देशातील कोणत्याही उद्योगपतीच्या कोणत्याही प्रकल्पाच्या माहितीसाठी पत्रकारांनी जाणे यावर आक्षेप असण्याचे कारण नाही,आक्षेप हा आहे, हे नग्न सत्य बाहेर पडू नये यासाठी पत्रकारितेच्या मूल्याचाच गळा घोटण्याचे जे कृत्य या पत्रकारांनी केले त्या कृतीचा आक्षेप आहे!अतिशय परिश्रमाने तयार करण्यात आलेला माहितीपट डिलिट करण्याची कृती ही पत्रकारितेत नव्हे तर ‘दलालीतच’मोडते.
कशाप्रकारे अदानीच्या पदाधिका-यांकडून नागपूरच्या १७ पत्रकारांची अगदी विमानात बसण्यापूर्वी घरापासूनच बडदास्त राखण्यात आली,लाखो रुपयांची विमानाची तिकीटे काढण्यात आली,पंचतारांकित हॉटेलमध्ये या पत्रकारांनी जो नाच गाणे,खाणे-पिणे ते स्विमिंग पूलात डूंबण्याचा आनंद लृटला ती कृती कोणत्या पत्रकारितेत मोडते?हा प्रश्‍न वाचकांना विचारण्याचा अधिकार नाही का?लोकशाहीचा चौथा स्तंभच जर असा विकाऊ झाला व अदानीच्या पाहूणचारातून वृत्तपत्रात पेड न्यूज छापता झाला तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून घेण्याचा या वृत्तपत्रांना अधिकार आहे का?हा गंभीर सवाल निर्माण होतो.जे आहे,जसे आहे,ते वाचकांसमोर आणने किवा माहितीपटातून व्यूहर्स समोर येणे ही आजच्या जगातील पत्रकारिता झाली आहे,हे वृत्तपत्र माध्यमांनी विसरु नये.
आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे.आपल्या मोबाईलच्या कॅमरातून ते अशी गोष्ट टिपतात जी वृत्तपत्रांची बातमी किवा इलेक्ट्रॉनिक वृत्त माध्यमांचा आवाज बनू शकत नाही.अदानीसारख्या उद्योगपती तसेच राजकीय नेते,मंत्री,मुख्यमंत्र्यांकडून वर्षभर कोट्यावधींच्या जाहीराती वृत्तपत्रांना मिळतात यावर आक्षेप नाही मात्र,‘सत्य ’देखील सांगणे हे वृत्तपत्राचे काम नाही का?
महाराष्ट्रात नंबर वन चा दावा करणारे एका इंग्रजी वृत्तपत्राचा डिजिटल मिडीया सांभाळणा-या सळसळत्या रक्ताच्या तरुणी पत्रकाराने अदानीची नागपूर नजीकच्या वलनी,गोंडखेरी सारख्या गावांमध्ये कोळसा खाणींसाठी केलेली व चालवलेली नियमबाह्य लयलृट,गावक-यांचा आक्रोश यावर अप्रतिम माहितीपट बनवले व या वृत्तपत्राच्या अधिकृत डिजिटल माध्यमांवर व्हायरल केले.असाच एक व्हिडीयो या तरुणी पत्रकाराने नवे नागपूर येथील भूसंपादनासाठी काही नेत्यांची जबरीची भाषा,दिलेला इशारा व या भू संपादनामुळे उधवस्त होणा-या नागरिक,शेतक-यांची व्यथा युट्यूबवर व्हायरल केली.नागपूरात जनतेच्या सेवेसाठी अनेक विकासक संस्था आहे त्या पैकी एका संस्थेच्या सभापतीने वृत्तपत्राच्या मालकाच्या भावाच्या मुलाला फोन करुन,ते व्हिडीयोज जनतेला भडकवत असल्याचा आरोप करीत डिलिट करण्याचे फर्मान सोडले.मुख्यमंत्र्यांकडून मिळणा-या कोट्यावधींच्या जाहीराती,सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व विकासक संस्थेच्या सर्वोच्च पदांवर बसवलेले ’होयबा’सभापती व आयुक्त नावाची नोकरशाही,यांच्या दबावातून एका तरुण महिला पत्रकाराचे ख-या पत्रकारितेचे मूल्य जपणारे ते तिन्ही व्हिडीयोज युट्यूबवरुन काढण्याचे वृत्तपत्र मालकाचे ते फर्मान ,तिची पत्रकारितेवरील निष्ठाच डळमळीत करणारी कृती ठरली व दोन दिवसांनंतर त्या तरुणी पत्रकाराने अदानीवर एक ‘सकारात्मक ’बातमी युट्यूबवर प्रसिद्ध केली आणि गावक-यांना मानसिक धक्का बसला…….!
पत्रकारितेवरील हे संकट येथेच थांबत नाही तर नुकतेच सिमेंट रस्त्यांविरोधातील एका याचिकेवर सुनावणी घेताना एका महनीय न्यायमूर्तींनी सिमेंट रस्त्यांचा यात काय दोष आहे?लोकांची घरेच जुनी असून त्यांनी आता ती नव्याने व उंचावर घरे बांधावी,असा अनाहूत सल्ला दिला!मूळात सिमेंट रस्त्यांचा मुद्दा सरकारचा नसून संबंधित बांधकाम विभागाचा असल्याचे सांगून ,याचिकाकर्त्यांनी त्या विभागांकडेच मागणी करण्यास सांगितले.गोष्ट गंभीर तिथे झाली जेव्हा न्यायमूर्तींच्या तोंडी सरकारची उगाच बदनामी करणा-या डिजिटल माध्यमांविरोधात देखील पीआयएल दाखल करण्याचा सल्ला त्यांनी दिला.माध्यमांनी एक पान असं ठेवायला हवं ज्यात सरकार किती छान काम करतेय,हे प्रसिद्ध केले पाहिजे असे ते म्हणाले!….!लोकशाहीच्या चार स्तंभापैकी एका स्तंभाचा हा ‘सरकार धर्जिणा’ दृष्टिकोण संविधान निर्मात्यांना अभिप्रेत होता का?हा देशाला कुठे घेऊन जात आहे?अशा वेळी दीन दुबळ्या,गरीब,गरजू माणसे,शेतकरी,ग्राहक,नागरिक यांची न्यायाची बाजू मांडणे वृत्तपत्रांची जबाबदारी असताना, ते देखील आपल्या विश्‍वासहर्तेचा अदानी बाजार भरवितात  तेव्हा ती परिस्थिती अराजकतेचा ‘नेपाळ’घडविण्यास पोषक ठरत नाही का….!
जेव्हा केनिया सरकार व अदानी उद्योग समुहामध्ये करार होऊन नैरोबी येथील अांतरराष्ट्रीय विमानतळावरील शेकडो कामगार संपावर जातात त्यामुळे त्या देशातील विमाने ही जमीनीवरच राहीली होती,हे विसरता येत नाही.अदानी समुहाबरोबरच्या बांधा आणि हस्तांतरित करा या करारामुळे जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नुतनीकरण केले जाणार होते.पुढील तीस वर्षे विमानतळ चालविणा-या समुहाच्या बदल्यात अतिरिक्त धावपट्टी व टर्मिनल बांधले जाणार असल्याचे केनिया सरकारने सांगितले.या विरोधात तेथील कर्मचा-यांनी संप पुकारला.अदानी समुहाबरोबरच्या करारामुळे नोकरी गमवावी लागेल आणि जे राहतील त्यांच्यासाठी निकृष्ट अटी व शर्थी असतील,असा कामगार संघटनेचा आरोप होता.
अदानी विरोधातील हिंडेनबर्ग अहवाल हे हिमनगाचे फक्त एक टोक असून   अदानी यांचे असे अनेक उद्योग आहेत ज्याची माहिती देशातील नागरिकांना नाही,असा आरोप करीत,ज्या मोठमोठ्या उद्योगांवर ईडी व सीबीआयने धाडी घातल्या ते सर्व उद्योग अदानींच्या घश्‍यात गेले याची चौकशी मोदी सरकार करेल का?असा सवाल छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नागपूरात केला होता.देशातील विमानतळे,बंदरे,सिमेंट उद्योग तसेच वीजनिर्मितीमध्ये अदानी यांनी देशात एकाधिकारशाही निर्माण केली आहे,ज्याचा सरळ भुर्दंड ग्राहकांना बसत आहे.एनडीटीव्हीच्या संस्थापकांच्या घरी व कार्यालयात ईडीची धाड पडल्यानंतर अदानी समुह एनडीटीव्हीमध्ये ६५ टक्क्यांचा भागीदार बनला.अंबुजा सिमेंट,मुंबई विमानतळाचे संचालन करणारी जीव्हीके कंपनी,नोएडा येथील क्विंट,नेल्लोर,अल्ट्राटेक सिमेंट,हिंडाल्को, या सर्व कंपन्यांवर सीबीआयच्या धाडी पडल्या या सर्व कंपन्या आता अदानीच्या मालकीच्या आहेत…!
झारखंड येथील अदानी पॉवर प्लॅन्टमधील वीज बांग्लादेशला दिली जाते.या देशात राजकीय अस्थिरता निर्माण होताच अदानीचे नुकसान होऊ नये म्हणून मोदी सरकारने ही वीज भारतात विकण्यास अनुमती दिली.मोदी सरकारने श्रीलंकेतील कोलंबो वेस्ट कंटेनर टर्मिनलसाठी ३५ वर्षांसाठी पट्टा घेतला होता,तो अदानीला देण्यात आला.एवढेच नव्हे तर श्रीलंकेतील ४८४ मेगावॉट पवन उर्जा निर्मितीचे कंत्राटही अदानीला देण्यात आले.नागपूरात बघेल यांनी २१ ऑगस्ट २०२४ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हे गंभीर आरोप केले होते.यावेळी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे,विशाल मुत्तेमवार,अतुल कोटेचा,प्रशांत धवड आदी उपस्थित होते.एवढ्या गंभीर आरोपानंतर देखील नागपूरातील पत्रकारांना अदानीचे ‘दलाल’होण्यास काहीच वावगे वाटले नाही?
८ जुलै २०२५ रोजीच अदानी पॉवरकडून बुटीबोरी येथील विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड(व्हीआयपीएल) या अवसायनात निघालेल्या औष्णिक वीज प्रकल्पाला अदानी पॉवरने चार हजार कोटी देऊन खरेदी केली.अदानी पॉवरने २०२९-३० पर्यंत ३० हजार ६७० मेगावॉट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे,वीज निर्मितीत एकाधिकारशाही प्रस्थापित होण्याच्या वाटचालीत देशातील या एकमेव वीज निर्मिती कंपनीच्या हिता अदानीचे दलाल पत्रकार कसे बघतात?
ज्या ओरिसाच्या समुद्र किना-यातील थंड हवा,स्वच्छता,निसर्ग याचे गोडवे या पत्रकारांनी ऑन कॅमरा गायले त्यात ते विसरले  की त्याच राज्यातील माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नुकतेच ओरिसात भाजपची सत्ता आल्यानंतर अदानींच्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निसर्ग ओरबडल्या जात असून, वने नष्ट होत आहेत,पर्यावरणाची अपरिमित हानी केली जात असल्याचा गंभीर आरोप केला होता. नागपूरातील दलाल पत्रकारांनी ओरिसात गेले असता,पटनायक यांचाही विचार जाणून घ्यायला काय हरकत होती?
नागपूरपासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर वलनी गावासह इतर दहा गावांवर अदानीच्या कोळसा खाण प्रकल्पामुळे गंडांतर आले आहे.गावक-यांचा आक्रोश बघता जनसुनावणी उपजिल्हाधिकारी यांना गुंडाळावी लागली मात्र,त्या खाणीचे प्रदुषण लवकरच नागपूर या उपराजधानीला देखील सहज येत्या काळात कवेत घेणार आहे.आधीच कोराडीच्या औष्णिक वीज प्रकल्पामुळे दर वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर,जानेवरी पर्यंत प्रदुषणामुळे नागपूरकरांचा श्‍वास कोंडतो,अस्थमा,दमाच्या सर्वच वयोगटाच्या रुग्णांमध्ये बेशुमार वाढ होते,अश्‍यावेळी वलनी-दहेगांवचा अदानी यांचा कोळसा खाण प्रकल्प आल्यास त्या विनाशातून पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांचीही सुटका होणार नाही,अश्‍यावेळी येत्या काळात नागपूरात पाईप लाईने घरोघरी गॅस पुरवठा करण्याची मक्तेदारी प्रस्थापिक करु पहाणा-या अदानी कंपनीचे दलाल बनून नागपूरातील सतरा पत्रकार जातात जेव्हा येत्या काळात वृत्तपत्रांचे दिवस खरंच भरले,असे म्हणायचा तो काळ असेल,हे मालक व सपांदकांनी विसरु नये…!
………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या