

नागपूरकर कलावंतांचाही हक्काचा मंच मात्र नवी निर्मिती द्यावी
खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांचे मत
नागपूर,ता.२९ डिसेंबर २०२१: गेल्या चार वर्षांपासून क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या भव्य क्रिडांगणावर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार होणा-या खासदार सांस्कृतिक महोत्सवाची नुकतीच सांगता झाली.१७ डिसेंबर ते २६ डिसेंबरपर्यंत साजरा होणारा हा महोत्सव मात्र नियोजित वेळेच्या दोन दिवसांपूर्वीच स्थगित करण्यात आला.शनिवार २५ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध पार्श्वगायक शंकर महादेवन यांच्या गायनाचा तसेच २६ डिसेंबर रोजी सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम, वाढत्या ओमेक्रॉनचा प्रादुर्भाव बघता रद्द करण्यात आला.परिणामी शहरातील अनेकांनी आयोजन समितीच्या एकंदरित कारभारावर टिकेची झोड उठवली होती.
‘सत्ताधीश’ने यावर २५ डिसेंबर रोजी ‘फलित:खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं’हा विशेष लेख प्रसिद्ध केला होता.यातील अनेक मुद्दे आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी खाेडून काढत, या महोत्सवामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जे रोजगार निर्माण होतात तसेच नागपूरकर जनतेला नि:शुल्क दर्जेदार मनोरंजनाची जी संधी प्राप्त होते,याकडे लक्ष वेधले.
सर्वात महत्वाचे म्हणजे,टिकेचा सूर आवळणा-यांची संख्या ही एक टक्का ही नसून समाजात काही बुद्धिवंत,प्रज्ञावंत असतातच असे ज्यांना कोणत्याही विधायक कार्यात सकारात्मक असे काही दिसतच नाही,असे समिती कार्यकर्त्यांचे म्हणने आहे.
टिका करणा-यांनी आम्ही बाहरेच्या कलावंतांनाच संधी प्रदान करतो असा आक्षेप नोंदवला आहे मात्र यात कोणतंही तथ्य नाही.नागपूरकर कलावंतांना देखील संधी दिली जात असते.मात्र जे लेखक,दिग्दर्शक,कलावंत हे वर्षभर एकाच नाटकाचे शंभर प्रयोग सादर करतात व खासदार सांस्कृतिकच्या भव्य मंचावर देखील त्यांना तेच ‘संत साईबाबा’किवा ‘संत गजानन बाबा’हेच प्रयोग सादर करायचे आहेत तर अशी अपेक्षा ठेवणे रास्त नाही कारण त्या नाटकांचे अनेक प्रयोग आधीच बघून झालेले असतात.
खासदार सांस्कृतिकचा मंच नागपूरकर कलावंतांचा देखील आहे मात्र त्यांनी वेगळे प्रयोग सादर करायला हवेत.वर्षभर त्यांच्याकडे वेळ असतो,का नाही ज्ञानेश्वर माऊली,संत गाडगे महाराज किवा संत तुकडोजी महाराजांवरचे महानाट्य ते घेऊन येत?ज्याचे आधीच शंभर प्रयोग झाले तेच पुन्हा खासदार सांस्कृतिकच्या मंचावर देखील सादर झाले पाहिजे,हा अट्टहास चुकीचा आहे.
का नाही नागपूरचे सातत्याने ‘नाराजी’ व्यक्त करणारे कलावंत ती हिंमत दाखवत आणि नव्या महानाट्यांची निर्मित करीत नाही?वरुन नागपूरच्या खासदारांनी चित्रनगरी किवा नाट्यनगरी समृद्ध केली नाही,असा कांगावा करायचा?
नागपूरची रंगभूमी किवा चित्रनगरी समृद्ध करण्याची जवाबदारी फक्त एकमेव किंबहूना एकाच खासदारांवर आहे का?त्यांनीच पैसा उभा करण्याचा ठेका घेतला आहे का?एवढ्या भव्य मंचासाठी पैसा उभारणे खेळ-गंमत नाही,टिकाकारांनी एक रुपया फक्त अश्या महोत्सवासाठी उभारुन दाखवावा.
वरुन अमूक कलाकार आणले,तमूक कलाकार आणले असा टिपेचा, तक्रारीचा सूर आवळायचा?तुम्हाला मंच हवा आहे तर तुम्ही तुमची क्रियाशीलता दाखवा ना?किती काळ रफी आणि किशाेर कुमार यांचे गाणे गात राहून मंच गाजवत राहणार आहात?ते तर रिएलिटी शो मध्ये लहान लहान बालके ही रफी,किशोर गाऊनच गाजवतही आहेत.
आयोजन समितीने जे कलावंत या मंचावर आणले त्यांनी चित्रपट नगरीमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे.सुखविंदर सिंग असो किवा कैलास खेर यांची एक वेगळी ओळख आहे,त्यांनी त्या भव्यदिव्य मंचावर स्वत:ची गाणी गायली,रफी,किशाेर यांची नाही!
आयोजन समिती नागपूरच्या कलावंतांचा नक्कीच विचार करते,मागच्या सांस्कृतिक महोत्सवात नागपूरच्या शैलेश दाणी या प्रायोगिक कलावंताला याच निकषावर संधी मिळाली होती आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले होते.एकाच वेळी नागपूरच्या ८०० स्थानिक कलावंतांनी वेगवेगळे तालवादन व गायन एकाच मंचावर एकाच वेळी सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.असे काही प्रपोजल नागपूरकर कलावंतांकडे असतील तर आयोजन समिती नक्कीच त्याचा विचार करीत असते मात्र रफी,लता,किशोर यांची आयुष्यभर गाणी सादर करणा-यांसाठी हा मंच नाही.
नाट्यभूमी समृद्ध करण्याची बाता करणारे आणि अपेक्षा ठेवणारे,विदर्भाचा,अगदी नागपूरचा एक कलावंत अखिल भारतीय मराठी नाट्य महामंडळाचा अध्यक्ष होतो तर त्याचेच पाय खाली ओढताना दिसतात.नागपूरातील नाट्य क्षेत्रातीलच ’वेगवेगळे’गट ’कामाला’लागतात आणि रंगभूमी समृद्ध करण्याची आशा एखाद्या खासदारांकडून करतात?एकट्या खासदारांनी रंगभूमी समृद्ध करण्याचा ठेका घेतला आहे का?
आयोजन समिती ही सदैव नि:पक्षच असते.सांस्कृतिक क्षेत्रातील कोणत्याही कलावंतांवर अन्याय होऊ नये हा निकष अवार्जून जपला जातो मात्र नागपूरचे कलावंत काहीच नवीन देत नाहीत वरुन अपेक्षा करतात त्यांना महोत्सवाचाही मंच मिळावा म्हणून!मागच्या महोत्सवात ‘झांशी ची राणी’हे महानाट्य सादर झाले होते,या महानाट्याचा दिग्दर्शक नागपूरचा एक तरुण मूलगा होता.त्याचा दिग्दर्शनाखाली असंख्य हिंदी भाषिक कलावंत कला सादर करीत होते,ही नागपूरसाठी भूषणावह बाब नव्हती का?
का नाही नागपूरच्या नाट्य क्षेत्रातील विभूती नेताची सुभाषचंद्र बोस,देवी अहिल्याबाई होळकर यांच्यावरील नाटक आयोजन समितीकडे घेऊन येत?‘आम्रपाली’हे महानाट्य या भव्य मंचावर सादर करण्यामागे त्या नाटकातील संदेश महत्वाचा वाटला म्हणून सादर झाले.एक अनोळखी तरुण या नाटकाचा दिग्दर्शक होता त्यातही आयुष्यातील अनेक संघर्षानंतर शाश्वत असा संदेश नाटकातील नायिका देते,हा संदेश महत्वाचा होता त्यामुळे हे नाटक खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या मंचावर सादर करण्यात आले होते.नाटकातील सारगर्भित आशय न बघता फक्त गर्दी किती होती हे बघणा-यांसाठी जगातील कोणत्याही नाटकाचे कसलेच औचित्य नसतातच मुळी!
शंकर महादेवन किवा हेमा मालिनी यांचे सादरीकरण शेवटच्या दोन दिवसात ठेवले कारण त्यांच्या तारखा त्याच दिवसांचा शनिवार आणि रविवारच्या मिळाल्या होत्या.यासोबतच त्यांच्या विमानाची,राहण्याची व्यवस्था या देखील बाबी जुळवाव्या लागतात.याशिवाय एकमेव हास्य जत्रा सोडली तर सर्वच कलावंतांना ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ही थीम देण्यात आली होती,यानुसारच सर्वांचे सादरीकरण झाले आणि होणार होते.
‘अरिजित सिंग’किवा अजय-अतुल यांना आणावे हा देखील ठेका एकमेव खासदार यांनीच घेतला नाही.नागपूरकरांची सांस्कृतिक व अभिजात संगीताची भूक भागवण्यासाठी इतरांनी देखील पुढे यायला हवे.
हास्य जत्रेचे प्रसासर लाईव्ह होऊ शकले नाही कारण वाहीनीचा प्रोटोकॉल असतात ते जपावे लागतात.मागील महोत्सवात मनोज जोशी यांचे ‘चाणक्य’नाटक सादर झाले होते ते देखील लाईव्ह नव्हते कारण कॅमरा ऑन दिसताच ते आपला प्रयोग थांबवतात.
आयोजन समितीने नुकतेच जी एकांकिका करंडक स्पर्धा आयोजित केली होती त्यातील २४ पैकी २१ एकांकिकाच आजही सोशल मिडीयावर दिसते कारण २४ पैकी २ नाटकांच्या लेखकांनी स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी त्यांचे नाटक लाईव्ह दिसणार नाहीत,अशी अट घातली होती आणि हा कोणत्याही लेखक,निर्माता,दिग्दर्शक,कलाकरांचा वैयक्तीक अधिकारच असतो.
याशिवाय खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या नावाने कडाकडा बोटे मोडणा-यांना या महोत्सवामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मिळणा-या रोजगाराविषयी काहीच कसे दिसत नाही?महोत्सवाच्या दिवसांमध्ये चारही बाजूने फाटकांबाहेर चहा टपरीवाले,शेंगदाणे विकणारे,चाटवाले,फळ विक्रेते आदी अनेकांची कमाई होते.महोत्सवाच्या दहा दिवसात पाहूणे कलावंतांच्या सोयींसाठी असणारे हॉटेल्स,त्यांना आणण्यानेण्यासाठी लागणारे वाहन,त्यांच्या ट्रूपच्या कलावंतांचे ट्रांसपोर्टटेशन,निवासाची व्यवस्था,ट्रॅवल्स,रेल्वे बुकींग यामुळे देशाचा रेव्हेन्यू नाही वाढत का?आयोजन समिती आपलेच खिसे भरत असते,हा आरोप करने सोपे आहे यात सत्य,तथ्य आणि सिद्धता मात्र नाही.
भव्य मंचावरील साजसज्जता(डेकोरेशन)हे शंभर ते दीडशे मुले मिळून करीत असतात,भव्य अश्या मैदानाची दररोज साफसफाई १५ ते २० स्वच्छता कामगार करीत असतात,याशिवाय ध्वनि,नेपथ्य आणि प्रकाश योजना सांभाळणा-यांच्या हाताखाली २० ते २५ लोकांची चमू असते,या सर्वांना कुटुंब नसतं का?त्यांच्या रोजीरोटीची सोय होत नाही का?
तब्बल दोन वर्षांनंतर खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या घरी दिवाळी नंतर दिवाळी साजरी झाली,हे टिकाकारांना का नाही दिसले?
संजय दत्त हा या देशात राहणारा एक नागरिक नाही का?त्याच्या चूकांवर नेमके बोट ठेवणारे मग अभिनेता म्हणून या ’मुन्नाभाई एमबीबीएस’ला डोक्यावर घेणा-या त्याच्या फॅन्सला का दोषी धरत नाहीत?का एक चांगला कलावंत म्हणून त्याला दाद मिळते?तो जर अपराधी आहे, गुन्हेगार आहे तर संविधानात बदल करुन अश्या गुन्हेगाराला देशातच राहण्याचा अधिकार नाही हे जाहीर करुन टाका ना!
कैलास खेर ही नागपूरात इतर कोणत्या कार्यक्रमात आले असतील मात्र खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या मंचावर त्यांनी पहील्यांदाच सादरीकरण केले आहे,त्यामुळे टिकाकारांचा खेर यांच्याविषयीचा देखील आक्षेप चुकीचा आहे.
नागपूरचा एक रंगभूमीकार सलीम शेख यांनी एकांकिका करंडक स्पर्धेत एक अतिशय सुंदर एकांकिका सादर केली होती,यात त्यांनी नागपूरचा संपूर्ण इतिहासच अप्रतिमरित्या अधोरेखित केला होता.त्यांची संहिता आणखी भव्यदिव्य व्हावी आणि ती खासदारच्या सांस्कृतिक मंचावर सादर व्हावी,अशी आयोजन समितीने ईच्छा देखील जाहीर केली आहे.
नागपूरच्या कलावंतांना देखील हक्काचे स्थान खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या मंचावर आहे,अट मात्र एकच आहे प्रयोगशील व नवीन निर्मितीचा ध्यास धरावा, वर्षभर वेळ मिळतो त्या वेळेचे सोने करावे आणि मग आयोजन समितीला दोष द्यावा.




आमचे चॅनल subscribe करा
