पूर्व व उत्तर नागपुरातील उमेदवारांसाठी प्रचार सभा
नागपूर,दि. ९ जानेवारी; जगात चांगले आहे, ते नागपुरात आले पाहिजे, यासाठी प्रयत्न आहे. विकास करताना आम्ही कधीही भेदभाव करत नाही. नागपूरच्या जनतेचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आतापर्यंत विकासाचा पार्ट-वन झाला, आता पार्ट-टू अनुभवण्यासाठी नागपूरकरांनी सज्ज व्हावे. त्यासाठी जनतेने मतांच्या रुपात महायुतीच्या उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
शुक्रवार, दि. ९ जानेवारीला पूर्व नागपुरातील वाठोडा व शांतीनगर तसेच उत्तर नागपुरातील कळमना भागात प्रभाग ५, २१, २६, १ व २ येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ना. श्री. गडकरी यांच्या जाहीर सभा झाल्या. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, संजय भेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. धर्मपाल मेश्राम, बंटी कुकडे, शारदा बारई, सीमा ढोमणे, चेतना निमजे, संतोष आंबुलकर, निशा भोयर, संजय अवचट, लक्ष्मी हत्तीठेले, अभिरुची राजगिरे, संजय चावरे, महेंद्र धनविजय, सुषमा चौधरी, प्रमिला मथरानी, विक्की कुकरेजा, डॉ. सरिता मिलींद माने, अनिकेत येरखेडे, नेहा निकोसे, पंकज यादव या उमेदवारांच्या प्रचारार्थ या सभा घेण्यात आल्या.

पारडी येथे लवकरच मोठे मार्केट होणार आहे. त्यासाठी एनएचएआयकडून ५० कोटी रुपये दिले आहेत. मटण, मासोळी मार्केट उभारले जाणार आहे. भाजी मार्केट वेगळे होणार आहे. पूर्व नागपुरात विशेषतः वाठोडा आणि परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. भविष्यात आणखी सोयीसुविधा याठिकाणी येतील. शिक्षणाच्या सुविधा निर्माण होऊन तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी अधिक मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, असे गडकरी म्हणाले.
रिंग रोड आता सिमेंटचा झाला. भांडेवाडीत गरिबांसाठी चारशे खाटांचे रुग्णालय झाले. शांतीनगरच्या मैदानावर लाईट्स लावून दिले. रस्ते, वीज, पाणीच नाही तर सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य साऱ्याच क्षेत्रात मोठी कामे झाली, असे गडकरी म्हणाले. शांतीनगरमध्ये पाण्याची समस्या आता राहिलेली नाही. भांडेवाडीमध्ये आता कचऱ्यापासून सीएनजी तयार होणार आहे. डम्पिंग यार्डच्या जागेवर मोठ्या शिक्षण संस्था आल्या. पूर्व नागपुरात मोठा दिव्यांग पार्क उभारण्यात आला, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
उत्तर नागपुरातील प्रत्येक भागात चांगले रस्त झाले आहेत. पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या भागात एकेकाळी दुषित पाणी होते. टंचाई होती. आता तशी परिस्थिती नाही. आज स्थिती बदलली आहे. गरिबांना निवारा मिळाला. कळमनाचा रेल्वेचा उड्डाणपूल तयार झाला आहे. या भागातील लोकांनी प्रत्येक निवडणुकीत आम्हाला साथ दिली आहे, याबद्दल गडकरी यांनी आभार देखील मानले.
……………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
