

राजेश पणूरकर
(वरिष्ठ पत्रकार)
ज्येष्ठ अभिनेता दिलिपकुमार म्हणजे रसिकांच्या गळ्यातील ताईतच. प्रेम, विरह, दुःख आणि वेदनांची अभिव्यक्ती समर्थपणे करू शकणारा हा चित्रपटसृष्टीतील कदाचित एकमेवाद्वितयच अभिनेता होता. दिलिपकुमार यांचे आज निधन झाले पण ते देहाचेच. दिलिपकुमार त्यांच्या चाहत्यांच्या मनात नेहमीच जिवंत राहतील कारण त्यांनी अभिव्यक्त केलेल्या भावना कायमच अमर आहेत. दिलिपकुमार यांचे नागपूरकरांवर विशेष प्रेम होते. नागपूरकरांचेही त्यांच्यावर प्रगाढ प्रेम होते. त्यामुळेच दिलिपकुमार यांच्या निधनाची बातमी कळताच नागपूरकरांच्या डोळ्याच्या कडा सकाळपासूनच पाणावलेल्या होत्या.
ऐन भरात असताना आणि चांगलाच स्टारडम असताना दिलिपकुमार तब्बल तीन वेळा नागपुरात येऊन गेले. तीनही वेळा त्यांनी नागपूरकरांशी मनमोकळा संवाद साधला. त्यामुळेच एका पिढीच्या मनात दिलिपकुमार यांच्याविषयीची ओढ आणि प्रेम नागपुरात कायम राहिले. सर्वप्रथम 1974 साली दिलिपकुमार नागपुरात आले ते वर्धा मार्गावरील साई मंदिराच्या जमीनीच्या खरेदीसाठी निधी जमा करायला. एका चांगल्या कामासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले आणि त्यांनी या कामासाठी तत्काळ होकार दर्शविला. त्यावेळी धंतोली येथे झालेल्या कार्यक्रमात एन. के. पी. साळवे, बाबासाहेब उत्तरवार आणि विजयबाबा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. निवेदक म्हणून आकाशवाणीचे उद्घोषक किशन शर्मा होते. मुळात मंदिरासाठी जागा खरेदी करण्यासाठी निधी जमविण्याचा हा कार्यक्रम होता. त्यासाठी पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम आणि अभिनेता दिलिपकुमार यांची उपस्थिती होती. पण दिलिपकुमार आले आहेत हे कळल्यावर प्रचंड गर्दी झाली आणि रसिकांनी दिलिपकुमार यांची एक झलक पाहण्यासाठी गर्दी आणि गोंधळ सुरु केला.
दिलिपकुमार यांच्या चाणाक्ष नजरेतून ही बाब सुटली नाही. त्यांनी किशन शर्मा यांना बोलावून पं. भीमसेन जोशी यांचे गायन झाल्यावर आपण सर्वांशी संवाद साधू, असे निवेदन त्यांना करायला लावले. पण लोक ऐकायलाच तयार नव्हते. अखेर दिलिपकुमार यांनी हातात ध्वनीक्षेपक घेत मी पं. भीमसेन यांना ऐकायला आलो आहे. त्यांचे गायन झाल्यावरच मी आपणाशी संवाद साधेन, असे जाहीर केले. त्यामुळे लोक अखेरपर्यंत थांबले. दिलिपकुमार यांनी प्रथम संवाद साधला असता तर लोक भामसेनजींचे गाणे ऐकायला कदाचित थांबले नसते, अशी भिती आयोजकांच्या मनात होती. पण अभिनयाच्या क्षेत्रातल्या या बादशहाने पं. भीमसेन जोशी यांचे गाणे ऐकायलाच आपण आलो आहोत, हे सांगून रसिकांना शांत केले. सगळ्या जगाचे बादशहा साईबाबा आणि संगीताचे बादशहा पं. भीमसेन जोशी यांच्यासमोर मी काहीही नाही, असे रसिकांना सांगताच सारे रसिक शांत झाले. त्यानंतर तब्बल दोन तास रसिकांमध्ये बसून दिलिपकुमार यांनी गायनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर मात्र त्यांनी पाऊण तास रसिकांशी संवाद साधला. एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याने स्टारडम असताना इतका वेळ रसिकांना दिल्याचे ऐकिवात नाही, अशी आठवण किशन शर्मा यांनीच सांगितली.
याच कार्यक्रमात पार्श्वगायक एम. ए. कादर आणि कंकणा बॅनर्जी यांनी गीत सादर केले होते. तर भीमसेनजींना संवादीनीवर एम. ए. कादर, तबल्यावर शंकर पोपटकर, सारंगीवर हमीद खाँ आणि व्हायोलिनवर पं. प्रभाकर धाकडे यांनी साथसंगत केली होती.
त्यानंतर एन. के. पी. साळवे यांच्या घरी एका खाजगी कार्यक्रमासाठी दिलिपकुमार आले होते. पण त्यावेळी नागपूरकरांशी फारसा संवाद होऊ शकला नाही.
त्यानंतर तिसऱ्यांदा देशपांडे सभागृहात मन्शा उर रहमान मन्शा यांनी ‘जश्ने मंन्शा’ या गझलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला दिलिपकुमार पूर्णवेळ उपस्थित होते. हा कार्यक्रम गझलचा होता पण दिलिपकुमार यांचे गीत सादर करण्याची मागणी रसिकांनी केली. त्यावेळी पार्श्वगायक एम. ए. कादर यांनी दिलिपकुमार यांच्यावर चित्रित ‘मधुबन मे राधिका नाचे रे…’ हे गीत सादर केले होते. हे गीत फार तयारीने सादर केल्याची प्रशंसा खुद्द दिलिपकुमार यांनीच केली, अशी आठवण एम. ए. कादर यांनी सांगितली.
कादरभाई म्हणाले, हा माणूस हरफनमौला होता. अभिनयाचा बादशहा असला तरी संगीताची जाण होती. कुठल्याही कलाप्रकाराच्या कलावंतांचा सन्मान करण्याची वृत्ती त्यांच्यात होती. संगीताची जाण असल्याने त्यांच्यावर अभिनीत त्यांचे प्रत्येक गीत अधिक भावपूर्ण झाले, असे कादर यांनी सांगितले. विशेष म्हणजे दिलिपकुमार यांचे हिंदी, उर्दु आणि इंग्रजीवर प्रभुत्त्व होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मुंबर्इच्या एका कार्यक्रमात त्यांना घार्इने जायचे होते. पण दिलिपकुमार यांचे भाषण होणार आहे, हे कळल्यावर त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विलासराव दोन तास थांबले होते. इतके त्यांचे भाषेवर प्रभुत्त्व होते.मुंबईच्या फुटपाथवर झोपून दिवस काढणारा गरीब युसुफखान पठाण त्यांच्या परिश्रमाच्या भरवशावरच रसिकांच्या मनात अधिराज्य गाजविणारा दिलिपकुमार झाला.
त्यानंतर दिलिपकुमार नागपुरात आले नाहीत पण नागपूरवर त्यांचे प्रेम अबाधित राहिले.
नागपूरी संत्री म्हणजे आवडता विषय
दिलिपकुमार नागपुरात आले की, आवर्जून नागपूरची संत्री घेऊन जायचे. नागपूरचे संत्रे हा त्यांच्या आवडीचा विषय होता. नागपुरात भोजानाच्या वेळीही त्यांना संत्री लागायचे. मी अनेकदा त्यांच्याकडे भेटायला जायचो तेव्हा ते संत्री आणलीत का? हा प्रश्न करायचे. नागपूरची संत्री त्यांना विशेष आवडायची, अशी आठवण किशन शर्मा यांनी सांगितली




आमचे चॅनल subscribe करा
