

नागपूर ता. २४ : नागपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे सुरू असलेल्या उपाययोजना व सामंजस्यपणा दाखवून नागरिकांद्वारे करण्यात येत असेलेले नियमांचे पालन याचे फलित दिसून येत आहे. नागपूर शहरात शुक्रवारी २३ जुलै २०२१ रोजी फक्त दोन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय शुक्रवारची मृत्यू संख्या शून्य असून ऍक्टिव्ह रुग्ण १७५ आहेत.
६ जून २०२० नंतर पहिल्यांदाच नागपूर शहरात दोन पॉसिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. २३ जुलै रोजी ५६४७ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. नागपूरमधे ११ मार्च २०२० ला पहिला कोरोनाबधित रूग्ण मिळाला होता. या घटनेला ५०० दिवस पूर्ण झाले आहेत. शुक्रवारपर्यंत शहरात एकूण २२,५४,२१६ कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या एकूण ३,३५,२८७ आहे. यामधून ३,२९,८२० रुग्ण बरे झाले आहेत. रिकव्हरी रेट ९८.३७ टक्के एवढा आहे.
लसीकरणाला सुद्धा उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत शहरात एकूण १२.२५ लक्ष नागरिकांचे लसीकरण झाले आहे ८.७५ लक्ष नागरिकांनी पहिला डोज घेतला असून दुसरा डोज ३.४९ लक्ष लोकांनी घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. मनपा आरोग्य यंत्रणाच्या मेहनती व नागरिकांच्या सहकार्यमुळेच हे शक्य झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले की, कोरोना रुग्ण कमी झाले तरी मनपातर्फे चाचणी कमी करण्यात आली नाही. दररोज ५००० पेक्षा जास्त नागरिकांची चाचणी करण्यात येत आहे. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व हात धुणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये दररोजच्या रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक रुग्णाला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मनपा प्रशासनाद्वारे आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात आले. ही स्थिती पुन्हा संभाव्य तिस-या लाटेमध्ये येउ नये याची काळजी घेणे हे प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून नियमांचे योग्य पालन केल्यास गर्दी टाळल्यास आणि कुठल्याही सौम्य लक्षणाला कोरोना चाचणी करून खात्री करून योग्य उपचार करून घेतल्यास येणारा धोका आपण आत्ताच टाळू शकतो. प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे. रुग्णसंख्या कमी झाली म्हणून कुणीही बेजबाबदारपणे वागू नये.
कोव्हिड विरुद्धच्या लढ्यात लस हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. ज्या देशामध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे त्या देशामध्ये कोव्हिड रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. कोव्हिडचा सामना करताना आपण रुग्णालयात भरती होणा-या रुग्णांची संख्या टाळू शकतो, मात्र त्यासाठी आपल्याला लसीकरणासाठी पुढे येण्याची गरज आहे. कोरोनाचा सामना करण्यात लस ही प्रभावी आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मनात कुठलेही गैरसमज न ठेवता लवकरात लवकर प्रत्येकाने आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी यांनी केले आहे.




आमचे चॅनल subscribe करा
