
श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टतर्फे २२ ते २७ नोव्हेंबरदरम्यान आयोजन
उद्घाटनाला ‘द फोक आख्यान’ची मेजवानी
नागपूर दि.९ सप्टेंबर २०२५: श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने विधान परिषद सदस्य आमदार संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आमदार महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ’ २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ ते २७ नोव्हेंबरदरम्यान नागपुरातील सायंटिफिक सभागृह, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर येथे पार पडणार असून उद्घाटन आणि समारोपीय कार्यक्रम लक्ष्मीनगर येथील व्हॉलीबॉल ग्राऊंड येथे होणार आहेत.
राज्यभरातील हौशी कलावंतांना नाट्यकलेचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष असून राज्यभरातील विविध नाट्यसंघांना एकत्र आणणारा हा उपक्रम राज्यातील नाट्यसंस्कृतीला नवे बळ देणारा ठरेल, असा विश्वास आमदार संदीप जोशी यांनी व्यक्त केला आहे.
आकर्षक बक्षिसांची मेजवानी-
स्पर्धेत विजेत्यांसाठी तब्बल लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सर्वोत्कृष्ट निर्मितीसाठी प्रथम पारितोषिक १,५१०००, द्वितीय १,००,००० व तृतीय ५०,००० रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असेल. याशिवाय उत्तेजनार्थ, लक्षवेधी एकांकिका, तसेच दिग्दर्शन, लेखन, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत, अभिनय अशा विविध तांत्रिक व कलात्मक गटांमध्ये स्वतंत्र पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. महिला दिग्दर्शक, विनोदी अभिनय आणि बालकलावंतासाठीही विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.
स्पर्धेचे नियम-
ही स्पर्धा केवळ मराठी भाषेतील एकांकिकांसाठी खुली असून, १ ऑगस्ट २०२३ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील कोणत्याही स्पर्धेत प्रथम किंवा द्वितीय पारितोषिक मिळवलेल्या एकांकिकेलाच प्रवेश दिला जाणार आहे. प्रत्येक एकांकिकेचा कालावधी किमान ३० तर कमाल ४५ मिनिटांचा राहील. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून अंतिम तारीख १० नोव्हेंबर २०२५ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेची संपूर्ण माहिती आणि प्रवेश अर्ज sjaamdarmahakarandak.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. स्पर्धेसाठी Aamdar Karandak या नावाने स्वतंत्र फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाऊंट असून त्यावर स्पर्धेचे अपडेट वेळोवळी बघायला मिळणार आहेत.
उद्घाटनाला ‘द फोक आख्यान’; सेलिब्रेटी परिक्षक
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन आणि समारोप लक्ष्मीनगर मैदानावर होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेली आणि रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली कलाकृती ‘द फोक आख्यान’-‘थाट ह्यो जुना खेळ हा नवा’.. ह्या कलाकृतीच्या शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता व्हॉलीबॉल मैदान, लक्ष्मीनगर येथे होणाऱ्या सादरीकरणानं ह्या भव्य आमदार महाकरंडकाचे उद्घाटन होणार आहे. समारोपही दमदार होणार असून लवकरच त्याचीही घोषणा आयोजकांतर्फे करण्यात येईल. एकांकिका स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलावंत व तंत्रज्ञ राहणार असून पाचही दिवसात काही सेलिब्रेटी सहभागी होतील.
राज्यभरातून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना मानधन, भोजन व निवास व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे. यासोबतच विदर्भातील संघांना २५०० तर विदर्भाबाहेरील संघांना ५००० इतके प्रवास व सादरीकरण मानधन देण्यात येणार आहे.
आयोजन समिती-
या स्पर्धेसाठी आमदार संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात नरेश गडेकर, रमेश लखमापुरे, प्रफुल्ल फरकासे, प्रफुल्ल माटेगावकर, सुशील सहारे, वैदेही चवरे आणि स्नेहांजली तुंबडे अशी आयोजन समिती कार्यरत आहे. सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट व आमदार संदीप जोशी यांच्या प्रयत्नांतून होणारी ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा कलावंतांसाठी नवे व्यासपीठ ठरणार असून नाट्यरसिकांसाठीही अविस्मरणीय मेजवानी ठरणार आहे.
………




आमचे चॅनल subscribe करा
