

[प्राध्यापक डॉ. मेधा कानेटकर]
विद्यार्थ्यांमधील उद्योजक घडवण्यासाठी सी. पी. अँड बेरार महाविद्यालयाचा नाविन्यपूर्ण प्रयोग
नागपूर, 3 सप्टेंबर: सी. पी. अॅड. बेरार महाविद्यालयाने नवप्रवर्तक उद्योजकांच्या यशोगाथांचे ‘ऑडिओ बुक’ तयार करून विद्यार्थ्यामधील उद्योजकता विकासासाठी मोठे पाऊल उचलले असून महाविद्यालयीन स्तरावर झालेला हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग ठरला आहे.
कोरोना काळात शिक्षणाचे डिजिटायझेशन झाल्यानंतर ऑनलाईन वर्ग, यूट्यूबवर अभ्यासाचे व्हिडीओ अपलोड करणे, शैक्षणिक अॅप, ऑनलाईन परीक्षा असे अनेक पर्याय समोर आले. शाळा आणि महाविद्यालयांनी या सर्व पद्धती आत्मसात करून त्यांची अंमलबजावणीही केली. पण ऑडिओ बुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आतापर्यंत झाला नव्हता. सी. पी. अॅड बेरार महाविद्यालयाने या ‘ऑडिओ बुक’ तयार करून त्यात आघाडी घेतली आहे. महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. मेधा कानेटकर लिखित ‘नवप्रवर्तक उद्योजकांची यशोगाथा’ या पुस्तकाचे प्राचार्य डॉ. मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनात ऑडिओ बुक तयार करून ते विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले आहे.
नागपूर व आसपासच्या परिसरातील वेगळी वाट जोखणा-या 15 उद्योजकांचा शोध घेऊन त्यांच्या डॉ. कानेटकर यांनी मुलाखती घेतल्या आणि ‘नवप्रवर्तक उद्योजकांची यशोगाधा’ हे पुस्तक लिहिले आहे. याआधी त्याची 100 पुस्तके व अनेक शोधनिबंध विविध ठिकाणी प्रकाशित झाले आहेत. सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या डॉ. कानेटकर यांनी या पुस्तकातून सर्वसामान्य कुटुंबातील युवकांनी विविध क्षेत्रात आपले उद्योग स्थापन करून मेहनत, चिकाटी, नाविन्याच्या जोरावर त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कसे पोहचवले, हे लिहिले आहे.
त्यांचा हा प्रवास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा आणि नोकरीच्या मागे न धावता त्यांनी उद्योग सुरू करून आत्मनिर्भर व्हावे, यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी असून सी. पी. अँड बेरार महाविद्यालयाद्वारे ते प्रकाशित केले आहे. त्याचे आता ऑडिओ बुक तयार करण्यात आले आहे. यात हेमंत काळीकर, लोमान गंगोत्री, संतोष प्रधान, मंदार तुळणकर, गिरीश काठीकर, विवेक रानडे, संदीप बारस्कर, नरेंद्र जोग, गौरव सव्वालाखे, ललित पुराणिक, श्रीनिवास वर्णेकर, विवेक देशपांडे, जयसिंग चव्हाण, अभिजीत गान व किशोर डागा या उद्योजकांचा समावेश करण्यात आला आहे.
…………

[डॉ. मिलिंद बारहाते, प्राचार्य, सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, महाल]
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकास घडवून आणण्याच्या दृष्टीने हे ऑडिओ बुक तयार करण्यात आले आहे. नोकरीच्या मागे न धावता विद्यार्थ्यानी नवकल्पनांना साकार रूप देत उद्योग सुरू करावे आणि सरकारच्या ‘व्होकल फॉर लोकल, टू गो ग्लोबल’ या धोरणाला पाठिंबा देत स्थानिक स्तरावर उद्योजक तयार व्हावे, या द्ष्टीने हा प्रयत्न आहे.
………….
‘आत्मनिर्भर भारत’ योजनेतून प्रेरणा घेत मुलांसमोर उद्योग क्षेत्रातील आदर्श ठेवण्याचा या ऑडिओ बुक तयार करण्याचा मागचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारची त्यातून प्रेरणा मिळावी व त्यांनी स्वत:चे उद्योग उभे करावा.
– डॉ. मेधा कानेटकर, सहयोगी प्राध्यापक व लेखिका, सी. पी. अँड बेरार महाविद्यालय, महाल




आमचे चॅनल subscribe करा
