फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजधक्कादायक! नागपूरात ‘मॉक पोल’ मत क्लिअर न करताच घेतले मतदान!

धक्कादायक! नागपूरात ‘मॉक पोल’ मत क्लिअर न करताच घेतले मतदान!

Advertisements

आता निवडणूक अधिकारी म्हणतात ‘त्या’ केंद्रावरील मते गृहीतच धरणार नाही: मतदारांच्या मताचा घोर अवमान

त्या केंद्रावर फेरमतदान घ्या: इंडिया आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंची मागणी

नागपूर, ता. २५ मे २०२४ : लोकसभा निवडणूकीतील मतमोजणीला अवघे नऊ दिवस शिल्लक आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून एका पोलिंग बुथवरील मतदान मोजण्यातच येणार नसल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. या केंद्रावर ‘मॉक पोल’ मते क्लिअर न करताच मतदान घेतले गेल्याची माहिती तब्बल ३५ दिवसानंतर समोर आली आहे. या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. तसेच लोकशाहीने दिलेल्या मतदानाच्या अधिकारापासून नागरिकांना वंचित ठेवणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यावर कठोर कारवाईची मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली आहे.

मतदानाच्या दिवशी नियमानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर सकाळी साडेपाच वाजता मॉक पोलिंग (प्रारुप मतदान) घेण्यात येते. त्यानंतर कंट्रोल युनिटवरील क्लोज रिजल्ट क्लिअर (CRC) करुन प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत असते. मात्र प्राप्त माहितीनुसार मतदान केंद्र क्र. २३३, दादाजी धुनिवाले महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा, रविनगर या केंद्रावर मॉक पोलिंग क्लिअर न करताच मतदान घेण्यात आले. या मतदान केंद्रावर एकूण ८६५ मतदान होते. त्यापैकी ३१५ जणांनी मतदान केल्याचे १७-सी फॉर्मनुसार दिसून येत आहे. यातही मॉक पोल किती आणि किती जणांनी मतदान केले हे समजून येत नाही!

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नागपूर पश्चिम विधानसभा क्षेत्र यांनी ३० एप्रिल २०२४ रोजी नागपूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याबद्दल कळविले. मात्र याबाबतची माहिती मतदानाच्या दिवशीच ( १९ एप्रिल) रोजीच समोर येणे गरजेचे होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी १५ मे रोजी सर्व उमेदवारांना एका पत्राद्वारे याबाबत कळविले असल्याचे देखावा केला. मात्र प्रत्यक्षात सूत्रांकडून ही बाब आम्हाला २४ मे २०२४ रोजी कळाली. तसेच निवडणूक अधिकारी यांच्याकडून आजपर्यंतही अशाप्रकारचे कुठलेही पत्र आम्हाला प्राप्त झाले नाही. यासंदर्भात २४ मे रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असल्याचे आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले.

गंभीर बाब म्हणजे १५ मे २०२४ रोजीच्या पत्रानुसार ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत या केंद्रावरील मते मोजण्यातच येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केले आहे. तसेच व्हीव्हीपॅट स्लीपद्वारे अनिवार्य पडताळणीकरिता निवडता येणाऱ्या पाच केंद्रांमध्येही या केंद्राचा समावेश करता येणार नाही असेही निवडणूक निर्णय अधिकारी याने जाहीर केले आहे.

हे पत्र ठाकरे यांना प्राप्त झाला नसले तरी सूत्रांकडून याची माहिती काल २४ मे रोजी मिळाल्यावर तत्काळ यासंदर्भात तक्रार करीत या केंद्रावर फेरमतदानाची मागणी ठाकरे यांनी केली. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आधीच अनेकांची नावे मतदार यादीतून गहाळ होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली. दुसरीकडे लोकांनी मतदान केल्यावरही त्यांची मते मोजण्यात येणार नसल्याचे फर्मान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढले असल्याने मतदारांचा घोर अपमान निवडणूक अधिका-यांनी केला आहे. त्यामुळेच या केंद्रावर फेरमतदानाची आ.विकास ठाकरे यांनी मागणी केली आहे.
……………………………..

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या