

नागपूरचे पोलिस आयुक्त पोलिस ठाण्याच्या आत लाचेची रक्कम स्वीकारणा-यांसाठी ही ‘दिशानिर्देश’ तयार करणार का?
नागपूरकर जनतेचा सवाल:अजनी पोलिस ठाण्यात हवालदाराने स्वीकारली चाळीस हजारांची लाच!
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली हवालदाराला रंगेहात अटक
नागपूर,ता.२७ मार्च २०२३: अजनी पोलिस ठाण्यात आज रात्री उशिरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत,पोलिस हवालदार निलेश रामदास इंगळे व यासोबतच प्रकाश हरिशचंद्र चिकाटे नामक एका खासगी इसमाला चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडल्याची धक्कादायक घटना घडली.
तक्रारदाराकडे, खासगी काम करणारा ४५ वर्षीय आरोपी प्रकाश चिकाटे(राहणार, जुना बाभूलखेडा वसंत नगर प्लाट क्रमांक ६)याने २४ मार्च २०२३ रोजी ४०,००० रुपयांची मागणी केली.ही रक्कम तक्रारदाराकडून, चिकाटे याच्यासह आज २७ मार्च २०२३ रोजी अजनी पोलिस ठाण्यातील हवालदार निलेश इंगळे याने अजनी पोलिस ठाण्याच्या आत स्वीकारली.
याच वेळी सापळा रचून असलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील अधिका-यांनी या दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले.
तक्ररदार याच्या मुलाविरुद्ध अजनी पोलिस ठाण्यात दाेन वर्षांपूर्वी एक तक्रार दाखल झाली होती.सदर तक्रारीवर कोणतीही कारवाई न करण्याकरिता व ही तक्रार तशीच निकाली काढण्याकरिता आरोपींनी तक्रारदारास ४०,००० रुपयांची लाच मागितली होती,हे विशेष.
लाचेची रक्कम हवालदार निलेश इंगळे यांनी अजनी पोलीस ठाण्याच्या ड्युटी रुममध्येच स्वीकारली व दोन्ही आरोपी रंगेहात पकडल्या गेले.
सुत्राने दिलेल्या माहितीनुसार सुरवातीला एका महिला हवालदाराला ही रक्कम देण्याचा प्रयत्न झाला मात्र या महिला हवालदाराने ठामपणे ही रक्कम स्वीकारण्यास नकार दिल्याने, तक्रारदात्याने इंगळे याच्याकडे ही रक्कम ‘सुपुर्द‘ केली,इंगळे याने ही रक्कम स्वीकारताच दबा धरुन बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने या दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले.
यातील खासगी काम करणा-या आरोपीची, याच पोलिस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिका-यांसोबत चांगलीच व नेहमीची ‘उठबस’होती त्यामुळेच इंगळे हे त्या आरोपीला चांगल्याने ओळखत होते.त्यांनी तक्रारदात्याकडून रक्कम स्वीकारण्यास सांगितल्यामुळे इंगळे याने ती रक्कम स्वीकारली मात्र ‘करे कोई भरे कोई’ही उक्ती त्यांच्या बाबतीत सार्थक ठरल्याची चर्चा आता रंगली आहे.
पोलिस आयुक्तांनी, अगदी एखाद्या पोलिस ठाण्याच्या ड्युटी रुमपर्यंत बेधडक लाचेची रक्कम स्वीकारण्यापर्यंत काही पोलिसांची मजल गेली असल्यानेच, या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक राहूल माकणीकर व अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात, अभय आष्टेकर पोलीस उप अधीक्षक,युनूस शेख पोलिस निरीक्षक,पोलिस हवालदार शिरसाट,महेश सेलोकर,भागवत वानखेडे,चालक सदानंद यांनी पार पाडली.
वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री व स्वत: राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या शहराची प्रतिमा मलीन होत असल्याने, नुकतेच पोलिस विभाग अलर्ट मोडवर आला असून, नागपूर शहराचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहराच्या कायदा सुव्यवस्थेसाठी ‘दिशानिर्देश’तयार केल्याची माहिती समोर आली आहे मात्र, त्यांच्याच अखत्यारितीत असणा-या चारही परिमंडळाच्या पोलिस ठाण्यातील काही अधिकारी व कर्मचा-यांचे कायदेशीर वर्तन,याबाबत ही अमितेश कुमार काही दिशानिर्देश तयार करणार आहेत का?असा सवाल आता विचारला जात आहे.
‘दूर्जनांचे निर्दालन व सज्जनांचे संरक्षण’ करण्याचे ब्रीद मिरविणा-या शहरातील अनेक पोलिस ठाण्यातच ‘आतला’व्यवहार कसा चालतो,याची दररोज विविध माध्यमांमध्ये माहिती उघड होतेच मात्र, एखाद्या पोलिस ठाण्याच्या आतच लाचेची रक्कम स्वीकारण्याचे धाडस,हा प्रकार पोलिस विभागाची प्रतिमा मलीन करणाराच ठरतो.
संपूर्ण पोलिस यंत्रणाच भ्रष्ट आहे असे म्हणता येत नाही.अनेक पोलिस ठाण्यातील अधिकारी हे अतिशय कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक आहेत.मात्र,काही भ्रष्ट पोलिस अधिकारी व कर्मचा-यांमुळे संपूर्ण पोलिस विभागच संशयाच्या भोव-यात सापडतो.प्रत्येकच खाकी वर्दीधा-याकडे जनतेचा बघण्याचा दृष्टिकाेण हा अश्या घटनांमुळेच पूर्वग्रह दूषित होतो, त्यामुळेच किमान कोणत्याही पोलिस ठाण्याच्या आतमध्ये, कायदेबार्ह्य वर्तन होऊ नये यासाठी आता पोलिस आयुक्त,खाकी वर्दी व कायद्यांची खुलेआम थट्टा करणा-या, आपल्याच काही अधिका-यांवर व कर्मचा-यांवर कठोर कारवाई करणार का?याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.
……………………………………….




आमचे चॅनल subscribe करा
