
पोलिसांचा ’कॉपी-पेस्ट’ कारभार पतीच्या जीवावर बेतला असता:झोया शेख यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप
पोलिस विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात न्यायालयात मागणार दाद:झोया शेख यांचा इशारा
न्यायालयाच्या आदेशाची पोलिसांतर्फे अवहेलना:पतीला सूट असतानाही आयुक्तालयात वारंवार पाचारण
‘वरुन’दबावाचे पोलिसच सांगतात कारण!हा ‘उपर से दबाववाला नेमका आहे तरी कोण?
नागपूर,ता.१६ जुलै २०२३: सोनेगांव पोलिस ठाण्यातील पोलिस यांनी माझ्या पतीला, सिराज शेख यांना फोन करुन तातडीने पोलिस आयुक्तालयात उपस्थित राहण्याचे फरमान सुनावले.ते ही अशा वेळी जेव्हा आम्ही आमच्या खासगी कामासाठी चिखलदरा जवळील एका गावापर्यंत पोहोचलो होतो.परत येण्यास किमान साढे सहा तासांचा वेळ लागला असता,त्यामुळे पोलिसांना कळवले परत आल्यावर उपस्थित होतो मात्र,त्यांनी तातडीने पतीला उपस्थित राहण्यास सांगितले.इतकंच नव्हे तर आमच्यावर ‘वरुन ’दबाव असल्याचे देखील त्यांनी कबूल केले.यावर मी, कोणतेही सूचना पत्र पतीला आधी दिलेच नसताना पोलिस आयुक्तालयात उपस्थित राहण्यास पतीला बंधनकारक नाही,आधी सूचना पत्र पाठवा नंतर पती उपस्थित राहतील,असे सोनगांव पोलिसांना सांगितले.यानंतर काही वेळातच पतीच्या व्हॉट्स ॲप वर पोलिसांनी असे सूचना पत्र पाठवले त्यात पतीविरुद्ध सुरु असलेली ४२० कलम सोडून लैंगिक शोषणासारख्या इतर अनेक गंभीर कलमांचा उल्लेख होता!
असा आरोप उद्योजिका झोया शेख यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.पोलिसांनी पाठवलेल्या सूचना पत्रातील कलमांची माहिती मी गुगलवर सर्च केली असता मला फार माेठा मानसिक धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांच्या या कृतीमुळे माझे पतीसोबत पराकोटीचे भांडण झाले.माझे पती कारमधून जीव देण्याचेच बाकी होते,इतका त्यांना या गोष्टीचा त्रास झाला.त्यांना मधूमेह,रक्तदाबसारखे आजार आहेत,त्यात त्यांना अश्या प्रकारचे गंभीर कलमा असणारे सूचना पत्र पाठविल्याने त्यांच्या जीवाचे बरे वाईट होऊ शकले असते,असा आरोप याप्रसंगी झोया शेख यांनी केला.पतीचे काही बरे वाईट झाले असते तर माझे,माझ्या दोन्ही लहान-लहान मुलांचे व माझ्या निराधार आईचे भरण-पोषण करण्याची जबावदारी पोलिस आयुक्तालयाने उचलली असती का?असा सवाल त्यांनी केला.माझ्या सात वर्षाच्या मुलालाही इतकी समझ आहे,तो नाही विचारणार का माझ्या वडीलांनी लैंगिक शोषण केले?इतके वाईट काम केले?
अखेर मी पोलिसांना याबाबत विचारणा केली असता,चूकून ‘कॉपी-पेस्ट’ झाले असल्याचे कारण त्यांनी सांगितले.पोलिस विभागासारखा, समाजाप्रति कर्तव्यदक्ष असण्याची अपेक्षा असणा-या विभागातील अतिशय जबावदार पदावरील पोलिसकर्मी इतकी मोठी चूक कशी करु शकतात?असा सवाल त्यांनी केला.पोलिसांनी सूचना पत्र द्यायचे होते तर जी ४२० गॅम्बलिंग एक्टची कलम माझ्या पतीवर लावण्यात आली आहे,ज्याचा खटला न्यायालयात सुरु आहे व ज्यामध्ये माझ्या पतीला जामिन देखील मिळाला आहे,मग पतीला पाठवलेल्या सूचनापत्रात नेमकी ४२० ची कलम गहाळ करुन लैंगिक शोषणाशी सबंधित कलमा लाऊन पोलिसांनी सूचना पत्र कसे पाठवले?त्यांच्या सूचना पत्रात कलम ३५४,२९४,३२३,३२४,५०९,५०६ आणि ३४ या कलमा लागल्या होत्या!
पोलिसांची ही कृती अक्षम्य असून आमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी होती,असा आरोप त्यांनी केला.मी फक्त गृृहीणी किवा दोन अपत्यांची आई नसून एक उद्योजिका अाहे, जिला समाजात एक प्रतिष्ठेची ओळख आहे,असे असताना आमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी कृती पोलिस विभागाने केली आहे,त्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
याशिवाय वारंवार पोलिसकर्मींकडून पोलिस आयुक्तालयात भेटण्यास बोलवण्यात येतं.‘वरुन’ दबाव असल्याचे पतीला सांगितल्या जातं.माझे पती हे जेव्हा जेव्हा त्यांना बोलवल्या गेलं तेव्हा आयुक्तालयात भेटून आले.भेटीच्या रसिदा देखील त्यांनी सांभाळून ठेवल्या आहेत.मात्र,नागपूरात नसताना ते कोणत्याही सूचना पत्राशिवाय कशाप्रकारे तातडीने पाेलिसकर्मींच्या फोनवरील सूचनेनुसार पोलिस आयुक्तालयात येऊ शकतील?वरुन दबाव म्हणजे नेमका कोणाचा दबाव आहे?हे तर वरच्यालाच माहिती,असे त्या म्हणाल्या.
आम्ही सोमवारी श्रीलंकेला एका इव्हेंटसाठी जाणार असून, माझे पती जामिन मिळवताना सोनेगाव पोलिस ठाण्यात रितसर साेमवार व गुरुवारी हजेरी लावतील ही न्यायालयाची सूचना नेटाने पाळत आहेत.मात्र,दिनांक १७ ते २२ जुलै दरम्यान आम्ही देशात नसल्याने यासाठी माझ्या पतीने १७ ते २२ जुलै दरम्यान येणा-या सोमवार व गुरुवार या दोन दिवशी सोनेगाव पोलिस ठाण्यात हजेरी लाऊ शकणार नसल्याने हे दोन दिवस हजेरीपासून न्यायालयाला सूट मागितली व माननीय न्यायालयाने ती मान्य देखील केली.आमच्याकडे न्यायालयाचा आदेश देखील आहे.असे असताना वारंवार माझ्या पतीला पोलिस आयुक्तालयांत का बोलावले जात आहे?न्यायालयाला आमच्यावर विश्वास आहे पोलिसांना नाही,हा न्यायालयाचा अवमान नाही का?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पोलिस सांगतात,चूकून सूचना पत्र पाठवले , कशावरुन माझ्या पतीच्या विरोधात गॅम्बलिंग ॲक्टचाही खोटा गुन्हा चूकून पोलिसांनी दाखल केला नसावा? पोलिसांनी चूकून माझ्या पतीविरुद्ध लैंगिक शोषणासारख्या अतिशय गंभीर कलमांचे सूचना पत्र पाठवले आणि वरुन ‘गलती से कॉपी-पेस्ट’हो गया असे कारण ते सांगतात,त्यांच्या सर्व संभाषणाची व्हाईस रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध असल्याचे झोया म्हणाल्या.
झोया यांची नेमकी मागणी काय आहे?असा प्रश्न विचारला असता,माझ्या पतीविरुद्ध पोलिसांनी कोणतीही कारवाई करावी पण ती कायदेशीररित्या करावी.आम्ही कायदे पाळणारी माणसे आहोत.पतीविरोधात न्यायालयात खटला सुरु आहे,आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे,आमच्याकडे आमच्या निर्दोषत्वाचे पुरावे आहेत.पोलिसांकडे माझ्या पतीविरुद्ध पुरावे असतील तर त्यांनी ते न्यायालयात सादर करावे,आम्ही त्याचे उत्तर आमच्या वकीलांमार्फत देऊ मात्र,‘वरुन’ दबाव आहे असे सांगून वारंवार पतीला पोलिस आयुक्तालयात बोलावून नेमके पोलिसांना काय ‘साध्य‘करायचे आहे?असा गर्भित प्रश्न त्यांनी केला.
………………………………..




आमचे चॅनल subscribe करा
