फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमधक्कादायक!नाट्य परिषद निवडणूकीतही ‘बोगस’मतदार!

धक्कादायक!नाट्य परिषद निवडणूकीतही ‘बोगस’मतदार!

Advertisements

मोलकरीण,वाहन चालक,धोबी,भाजीवाले,दूधवाले,शेजारी,नातेवाईकांचा भरणा!

मुख्य निवडणूक अधिका-याकडे अनेक मतदारांनी नोंदवला आक्षेप

तक्रार नोंदविणा-या मतदारांवर ‘आंबेकर’स्टाईलने दमदाटी!

प्रकरण पोहोचले धर्मादाय आयुक्तांच्या रंगमंचावर

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.९ फेब्रुवरी २०२३: अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्तीची आमसभा नुकतीच मुंबई येथे पार पडली.या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची देखील उपस्थिती होती.अखिल भारतीय नाट्य परिषद मध्यवर्तीच्या निवडणूका लवकरच जाहीर होणार असून याच पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून गुरुनाथ दळवी यांची नियुक्ती करण्यात आली.याच अनुषंगाने १३ जानेवरी रोजी मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या मात्र,अनेकांना यात आपली नावे मतदार यादीत बघून आश्‍चर्यचा धक्का बसला!नागपूरच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे नाेंदविण्यात आलेल्या तब्बल ३३२ मतदारांच्या नावातील अनेकांनी तर अर्जच भरले नव्हते व अनेकांच्या अर्जावरील स्वाक्ष-या या खोट्या होत्या,अशी धक्कादायक बाब समोर आली आहे.

महाराष्ट्रात अ.भा.नाट्य परिषदेच्या जवळपास ५८ ते ६० शाखा आहेत.या सर्व शाखांमधील सभासदांच्या अनुषंगाने कमी-जास्त संख्येने मध्यवर्तीत सभासद निवडून पाठवले जातात.१३ जानेवरी रोजी दळवी यांनी जी मतदार यादी प्रसिद्ध केली त्यात नागपूरातील नाट्य परिषदेतर्फे नाेंदणी करण्यात आलेल्या मतदारांची यादी देखील प्रसिद्ध झाली.या यादीत नव्याने ३३२ मतदारांची नोंदणी झाल्याचे दिसून आले.

पूर्वी मतदारांची संख्या ही ९५० एवढी होती,त्यात नव्याने ३३२ मतदारांची भर पडली.अ.भा.नाट्य परिषद मध्यवर्तीचे उपाध्यक्ष पदी असताना ही नोंदणी झाली असल्याची बाब पुढे आली आहे.यातील अनेक सभासदांनाच ते सभासद झाले असल्याचे माहिती नव्हते.यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना हे वास्तव कळल्यावर त्यांना धक्काच बसला.

त्यांची नावे टाकली कोणी?पैसे भरले कोणी?अर्जावर स्वाक्ष-या तरी कोणी केल्या?हा गहन प्रश्‍न त्यांना पडला.
अनेकांनी दळवी यांच्याकडे एफिडेवीटवर आक्षेप नोंदवला हे विशेष! ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे अ.भा.नाट्य परिषद मध्यवर्तीचे अध्यक्ष पदी असताना त्यांनी २०१८ पासून नवीन घटना लागू केली.  या घटनेनुसार राज्यातील कोणत्याही शाखेतून सभासद होणा-याने स्वत:चा अर्ज स्वत: भरुन देणे बंधनकारक केले आहे.त्यावर अर्जदाराची स्वत:ची स्वाक्षरी असावी याशिवाय सूचक-अनुमोदकाची नावे असणे गरजेचे आहे.याशिवाय सभासद हा नाट्य चळवळीशी जुळलेला असावा व याचे प्रमाणपत्र देखील अर्जासोबत देणे बंधनकारक आहे.

नवीन घटनेत या सर्व सूचना असतानाही नागपूरातील परिषदेतून तब्बल ३३२ नवे मतदार झालेत त्यात मोलकरीण,दूधवाला,धोबी,भाजीवाला,गॅस सिलेंडरवाला,वाहन चालक,शेजारी,नातेवाईकांचा भरणा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे!महत्वाचे म्हणजे प्रत्येक सभासदाला अर्जासोबत ११०० रुपये भरावे लागत असतात.यातील ५५० रुपये प्रत्येकी मध्यवर्तीकडे जमा होत असतात तर उर्वरित ५५० रुपये नागपूर शाखेच्या बँकेत जमा केले जातात.

परिणामी,मतदार यादीत जर मोलकरीण,ड्रायव्हर,दूधवाला,भाजीवाला,गॅस सिलेंडर पोहोचविणारा,ईमारतीमधील शेजारी,नातेवाईकांचा भरणा केला गेला असल्यास, यांचे पैसे भरले कोणी?असा यक्ष प्रश्‍न आता नागपूरच्या रंगकर्मींना छळतोय.विशेष म्हणजे ३३२ मतदारांमधून ज्या अनेकांनी दळवी यांच्याकडे,त्यांच्या खोट्या सह्या करुन अर्ज भरण्यात आल्याचा आक्षेप नोंदवला त्यांचे पैसे मध्यवर्तीकडे पोहोचलेत का?किवा नागपूर शाखेत जमा आहेत का?हा घोळ देखील समोर आला असून याबाबत देखील रंगकर्मींमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

अनेकांनी नोटरी करुन एफिडेवीटवर दळवींना आक्षेप पाठवले हे समजताच नागपूरातील नाट्य परिषदेचे काही पदाधिकारी हे त्यांच्या घरी पोहोचले असल्याचा आरोप केला जात आहे.त्यातील काहींना दमदाटी करण्यात आली तर काहींना आमिषे दाखविण्यात आली.

आक्षेप घेणा-या एका मतदाराच्या तर घरी रात्रीच्या बारा वाजता पदाधिकारी पोहोचल्याचे बोलले जात आहे तर एका मतदाराने सांगितले की तो घरी नसताना त्याच्या बायकोकडून अर्ज भरुन घेण्यात आला होता!काहींना सभासद झाल्यास मध्यवर्तीकडून वर्षाला पाच हजार रुपये मानधन मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले तर एका पदाधिका-याने नागपूर महानगरपालिकेत मोठ्या पदावर असल्याने त्यांच्या घरावर मनपाची मालमत्ता विभागाची नोटीस पाठवणार असल्याची दमदाटी केली असल्याचा आरोप आहे.

पदाधिका-यांच्या अश्‍या ‘संतोष आंबेकर’स्टाईलच्या दडपणाखाली काहींनी दूसरे एफिडेवीट दळवींना पाठवून ‘आमची संमती होती!’अशी कोलांटीउडी घेतली असल्याची बाब देखील समोर आली आहे.३३२ मतदार बनविण्यासाठी पैसे भरल्याचा पावत्याही यातील अनेक मतदारांना मिळाल्या नसल्याची बाब समोर आली आहे.दळवींकडे आक्षेप नोंदवताच,रात्रभरातून पावत्या फाडण्यात आल्याचे बोलले जात आहे.गडचिरोली जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील बोर चांदणी या गावातील चक्क ४३ सभासद बनविण्यात आले.हे लोकं या गावात झाडीपट्टीतील नाटक बघण्यासाठी आले होते,त्यांच्याच नावाच्या पावत्या फाडण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

एकाच गावात एकाच वेळी, एकाच नाटकाच्या सादरीकरणात एकूण ४३ मतदार गवसल्याची किमया घडली असून, यांचा नाट्य चळवळीशी जवळचा संबंध हाच होता की ते नाटक बघायला आले होते! असे अर्ज भरणे,ते पाठवणे,अर्जावर खोट्या सह्या करने हा फौजदारी गुन्हा असताना नागपूरातील ज्या कोणी पदाधिका-यांनी हा ‘कारनामा’केला आहे त्यांच्यावर मध्यवर्तीच्या नव्या घटनेप्रमाणे काय कारवाई होईल?याकडे आता नागपूरातील नाट्य कलावंतांचे लक्ष लागले आहे.

मागच्या निवडणूकीत मतदान हे नंदनवन येथील महिला महाविद्यालयात झाले होते.या मतदान केंद्रात फक्त ‘गांधी’आडनावाचेच ३० ते ३५ मतदार होते!याशिवाय अमरावती जिल्ह्यातून देखील गाड्या भरुन-भरुन मतदार आले होते.इंदोर येथील एका मतदाराला तर विमानाचे तिकीट पाठवण्यात आले होते! या निवडणूकील नागपूरातील ज्येष्ठ रंगकर्मी बापू चनाखेकर,दिलीप देवरणकर आणि सलीम शेख यांच्यासारखे रंगभूमीला समर्पित कलावंतांचा २५० मतांनी पराभव झाला होता,हे विशेष!

त्यामुळेच पूर्वीच्या ९५० मतदारांमध्ये नव्याने ३३२ मतदार कोणती ‘किमया’घडवू शकतात याचा अंदाज येतो.त्या निवडणूकीत नरेश गडेकर,प्रमोद भुसारी व शेखर बेंद्रे यांचा विजय झाला होता.यातील शेखर बेंद्रे हे पुण्याला राहत असून मतदार यादीत येथे नाव असल्याने नागपूरातून ते निवडणूक लढवितात व पुण्यातून नागपूरच्या रंगभूमीच्या विकासासाठी आपले मोलाचे योगदान देतात का?असा ही प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.नागपूरच्या रंगभूमीची चळवळ समृद्ध करण्यासाठी,सामायिक करण्यासाठी,सर्वसामान्यांशी जोडण्यासाठी समर्पित नाट्य कलावंतांची खरी गरज असल्याचे ज्येष्ठ रंगकर्मी सांगतात मात्र त्याच वेळी,निवडणूकीत सर्रास अमलात आणल्या जाणारे ,खालच्या पातळीवरचे ‘डावपेच’यापासून ते चार हात लांब राहणे पसंद करतात.

नागपूरातून एकूण तीन पदाधिका-यांना निवडून पाठविणा-या पूर्वीच्या ९५० मतदारांमध्ये देखील असाच मोलकरीण,ड्रायव्हर,लॉन्ड्रीवाला आदींचाच भरणा अधिक असल्याने बापू चनाखेकर यांच्यासारख्या समर्पित नाट्य कलावंतांना पराभव पचवावा लागला,याची खंत आज देखील नाट्य क्षेत्रात व्यक्त केली जाते,हे विशेष!

परिणामी,१३ जानेवरी रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार याद्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगिती देण्याची मागणी केली जात आहे.याशिवाय या ३३२ नव्याने मतदार झालेल्यांकडून जे १ लाख १० हजारांची रक्कम मध्यवर्ती व नागपूर शाखेला अर्धी-अर्धी प्राप्त होणे अपेक्षीत आहे,त्याची देखील चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.या रकमेचा भरणा कोणी केला?कधी केला?बँकेकडून संपूर्ण तपशील मागवण्यात यावा याशिवाय खोट्या सह्या झाल्या असल्याची एवढी गंभीर तक्रार दळवी यांना प्राप्त झाल्याने संपूर्ण ३३२ मतदारांकडूनच एफिडेवीट घेण्यात यावे,अशी देखील मागणी शहरातील ज्येष्ठ रंगकर्मी करीत आहे.यामुळे ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’होईल,एप्रिलच्या पहील्या किवा दुस-या आठवड्यात होणा-या निवडणूका या ख-या अर्थाने ‘पारदर्शी’व मध्यवर्तीच्या घटनेला धरुन होतील,असा आशावाद ही ते व्यक्त करतात.

‘सत्ताधीश’कडे पुरावा म्हणून काही ऑडियो क्लिप्स तसेच आक्षेप नोंदविणारे एफिडेवीट प्राप्त झाले असून दळवी यांच्याकडे या बाबीचा पाठपुरावा केला असता,एकूण ७० मतदारांच्या बाबतीत आक्षेप नोंदवला गेला असल्याचे त्यांनी मान्य केले.यातील काहींनी आक्षेप मागे घेतले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.प्रत्येक मतदाराची विश्‍वासहर्ता तपासण्यासाठीची संसाधने ही अपुरी असल्याने व माझे वय हे ७० च्या जवळपास असल्याने फक्त काहीं जणांशी मी फोनवर बोललो असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र, एवढ्या गंभीर आरोपांविषयी फोन वर बोलणे हा सत्य असल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकतो का?याचे उत्तर मात्र त्यांच्या जवळही नाही.

मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत ‘सत्ताधीश’ने संवाद साधला असता,नागपूरातील ही बाब आमच्या देखील लक्षात आणून देण्यात आली असल्याचे ते म्हणाले.मात्र,ही सर्वस्वी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकारात येणारी बाब असून, तेच याची चौकशी करु शकतात व निर्णय घेऊ शकतात किंवा एप्रिल नंतर जी कोणती नवीन कार्यकारीणी निवडून येईल,ती कार्यकारणी या मतदार याद्यांविषयीचा निर्णय घेण्यास अधिकृत असेल,असे ते म्हणाले.

थोडक्यात लोकशाहीमध्ये जिथे प्रत्येक मत हे मोलाचं असतं, तिथे नाट्य परिषदेच्या शाखाच जर मतांचा असा ‘काळा बाजार’करणार असेल व येनकेन प्रकरणे निवडणूक जिंकण्यासाठी लोकशाही मूल्यांनाच हरताळ फासणार असतील तर किमान नागपूरची रंगभूमी ही कधीही समृद्ध होऊ शकणार नाही,ज्याप्रमाणे विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्ष पदी स्वत:च्या मृत्यूपर्यंत मनोहर म्हैसाळकर हे अनेक दशके कायम राहीले होते,अनेक दशकांच्या कार्यकाळानंतर देखील नव्या दमाच्या,नव्या विचारांच्या साहित्यिकांना,लेखकांना,बुद्धीजीवींना ते सर्वोच्च पद प्राप्त करणं दुष्कर ठरलं होतं,तोच कित्ता आता नागपूरचे काही रंगभूमीकार गिरवित असल्याचे बोल ऐकू येत आहे

निवडणूकीद्वारे दशकांनुदशके फक्त काहींचाच मध्यवर्तीमध्ये पोहोचण्याचा पराकोटीचा हव्यास,इतरांची संधी हिरावून घेत राहणे,खोटेपणाकरुन बोगस मतदार करत राहणे,यातून त्यांना फक्त ‘पदे’ साध्य होऊ शकेल… रंगभूमी मात्र आपल्या अवस्थेवर अशीच विलाप करीत राहणार,मायबाप प्रेक्षकांपर्यंत देखील हा विलाप पोहोचू शकत नाही,पोहोचविल्या जाऊ दिल्या जात नाही,यात काही सांस्कृतिक बिट पाहणा-या पत्रकारांना देखील ‘मॅनेज’करण्याची वाखाण्याजोगीच हातोटी ही, काही पदाधिका-यांनी साध्य केल्याची बाब उघडपणे बोलली जात आहे.

आता हा वाद चक्क धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोहोचला असल्याची देखील माहिती समोर आली आहे,समस्त नागपूरकर रंगभूमीकारांची नजर आता या घटनेकडे लागली आहे.

…………………………………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या