

जनमानसात खळबळ:संवेदनशील मन हळहळलं:दोषींवर कठोर कारवाईची मागणी
नागपूर,ता. ९ मार्च २०२२: बिड जिल्ह्यातील शेकडो भ्रूण हत्यांचे पाप पुरोगामी महाराष्ट्राच्या कपाळावरुन पुसले ही गेले नसताना नुकताच तोच प्रकार विदर्भातही उघडकीस आला होता.आज बुधवार दि.९ मार्च रोजी उपराजधानी नागपूर शहरामध्ये देखील पाच अर्भके सापडल्याची धक्कादायक बातमी समोर आली. लकडगंज परिसरातील क्वेटा कॉलनीतील के.टी.वाईन शॉप समोरील मोकळ्या मैदानाच्या सुरक्षा भिंतीच्या बाजूला ५ मृत अर्भक पोलिसांना सापडली.यातील एक अर्भक हे पाच महिन्यांचं असल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले.या घटनेमुळे संवेदनशील मन हळहळलं असून हजारो दाम्प्त्यांच्या नशीबी लाखो रुपये खर्च करुन देखील जन्मदाते होण्याचं सुखं येत नाही तर दूसरीकडे रस्त्यालगतच्या कचराकुंडीत एक नव्हे तर चक्क पाच अर्भक हे मृतावस्थेत सापडतात,याला नियती तरी कसे म्हणावे? हा प्रश्न संवेदनशील मनाला पडला असून या पाच अर्भकांच्या नशीबात आयुष्या ऐवजी कचराकुंडी लिहली असेल तर विधात्याने त्यांना हे असे नशीब तरी का द्यावे?अशीच मार्मिक प्रतिक्रिया आज घटनास्थळी उमटली.

परिसरातील दुकानाती दोन नोकर हे या ठिकाणी मूत्रविसर्जनसाठी आल्यानंतर त्यांना या ठिकाणी पाच मृत अर्भके दिसली. त्यांनी तात्काळ मालकाकडे धाव घेऊन ही बाब सांगितली.मालकाने त्यांना लकडगंज पोलिसांकडे पिटाळले.दूकान मालकानेच चादर अाणून त्या अर्भकांना झाकले. पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पाच अर्भके बेवारीस पडली असल्याची माहिती कळताच या परिसरात बघ्यांची गर्दी जमा झाली.
या अर्भकांशेजारी काही औषधांचे बॉक्सही पोलिसांना सापडले. नागपूर पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी बायो मेडीकल वेस्टही सापडलं आहे. सापडलेल्या अर्भकांपैकी काही अर्भक ही विकसित झालेली होती. त्या भागात पोलिसांना किडनी, हाडही सापडली आहेत. त्यामुळे वैद्यकीय चमूने या भागात तपासणी केली. आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा सर्व प्रकार कोणी केला याचा तपास करणार असल्याचे राजमाने यांनी सांगितले.पाच अर्भकांचे कलेवर बघून महिला पोलिस देखील हळहळल्या.
मिळालेल्या माहितीनुसार सापडलेल्या अर्भकांपैकी बहुतांश अर्भक ही मुलींची आहेत. बेवारस पद्धतीने सापडलेली अर्भक आणि त्याशेजारी असलेले औषधांचे बॉक्स यामुळे जवळपासच कुठेतरी अवैधरित्या गर्भपात केंद्र किंवा सोनोग्राफी केंद्र चालवले जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागपूर फॉरेन्सिक विभागाच्या एका पथकाने घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सुरुवात केली. आहे. परंतू या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
