फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारण‘देवा भाऊ’ फक्त तोंडानेच....कृतीचे काय?

‘देवा भाऊ’ फक्त तोंडानेच….कृतीचे काय?

Advertisements


फडणवीस यांच्यावर रश्‍मी बर्वे यांचा घणाघात

आज माझी ‘जात’मला परत मिळाली:रश्‍मी बर्वे यांचे भावनिक विधान

लोकसभेत पंतप्रधान प्रचार करुन गेलेल्या गावातच महायुतीचा उमदेवार पराभूत

जातवैधता प्रमाणपत्र देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे मानले आभार

नागपूर,ता.२५ सप्टेंबर २०२४: भारतीय जनता पक्षाचा एक मोठा नेता स्वत:ला संपूर्ण महाराष्ट्रात ‘देवा भाऊ’म्हणून घेतात.त्या भावाची मोठमोठी फलके सर्वदूर लागली आहे.त्यांना मला हेच सांगायचे आहे भाऊ फक्त तोंडाने म्हणून चालत नाही तर प्रत्यक्ष कृतीतून देखील भाऊ म्हणून सिद्ध व्हावं लागतं,जो त्यांनी निलाजरेपणा माझ्याविषयी केला त्याची कुठेतरी त्यांच्या मनात लज्जा यायला हवी,फक्त माझा उमेदवारी अर्ज रद्द व्हावा यासाठी त्या तातडीने निर्णय घेण्यात आले,त्या तातडीवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देखील काल कठोर ताशेरे ओढले आहे,ते निर्णय न्यायालयाला देखील मान्य झाले नाही आणि जात वैद्यता समितीच्या सदस्यांवर न्यायालयाने एक लाख रुपयांचा दंड ठोठावला,अशी घणाघाती टिका काँग्रेसच्या लोकसभेच्या माजी उमेदवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्‍मी बर्वे यांनी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत केली.

लोकसभेच्या निवडणूकीत विरोधकांनी माझ्यावर जो आघात केला आणि काल न्यायदेवतेकडून मला जो न्याय मिळाला त्यासाठी न्यायदेवतेचे आभार मानते,माझ्यावर झालेला अन्याय हा लोकसभेच्या निवडणूकीत फक्त नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजला होता.एका अनुसूचित जातीतील महिलेचा हा विजय नसून काल ‘सत्याचा’ विजय झाला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विजय झाला.माझ्या विरोधात लोकसभेच्या निवडणूकी पूर्वी जे कट-कारस्थान रचण्यात आले,त्यांच्या सूडबुद्धीच्या आघाताने माझी हिंमत खचवण्याचा जाे प्रयत्न झाला,षडयंत्र रचून माझे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले ते बघता मला भारतीय जनता पक्षाला हेच विचारायचे आहे की अनुसूचित समाज,ओबीसी समाजाबद्द त्यांना इतकी पराकोटीची चीड का आहे? असा सवाल करीत, भाजपला स्वत:च्या पक्षावर,नेत्यांवर विश्‍वास नव्हता का?त्यांना माझ्या उमेदवारीमुळे का भीती वाटत होती?माझ्या उमेदवारीमुळे त्यांचा पराभव हा निश्‍चित होता,हे त्यांना माहिती होतं,त्यातूनच षडयंत्र रचून माझा उमेदवारी अर्ज रद्द करुन घेतला मात्र,काल न्यायदेवतेने जो निकाल दिला,त्यामुळे पुन्हा एकदा लोकशाही बळकट झाली व लोकांचा विश्‍वास लोकशाहीवर बसल्याचे रश्‍मी बर्वे म्हणाल्या.
इतक्या मोठ्या षडयंत्रानंतर देखील आम्ही,आमचे नेते सुनील केदार व आमचा पक्ष लोकसभेच्या निवडणूकीला सामोरे गेलो,विरोधकांना माहिती नाही भारतीय संस्कृतीमध्ये महिलेला देवीचा दर्जा दिला जातो आणि त्यांनी एका महिलेच्याच विरोधात कटकारस्थान रचले होेते.मात्र,जिल्हा परिषदेच्या रणरागिणींनी,आमचे नेते सुनील केदार यांनी,ग्रामीण भागातील जनतेने माझा लढा हा जणू त्यांचाच लढा असल्याचे समजून लढा दिला आणि विरोधकांचा उमेदवार हा फक्त काही हजारांनी नव्हे तर ७८ हजारच्या वर मतांनी सपशेल पराभूत झाला.जनतेचा विश्‍वास हेच माझ्या लढण्याचं बळ होतं,काल न्यायदेवतेने देखील माझा तो विश्‍वास सार्थक केला,असे त्या म्हणाल्या.
विरोधकांच्या सूडबुद्धीची जाणीव ठेवूनच माझ्या पतीला पक्षाने तिकीट दिले आणि आज माझ्या ऐवजी ते खासदार म्हणून देशाच्या संसदेेत पोहोचले,याचा मलाही जास्त आनंद आहे,असे रश्‍मी बर्वे यांनी सांगितले.आता महायुतीची सरकार‘लाडकी बहीण’योजना राज्यात राबवत आहे,यासाठी मी शासनाचं अभिनंदनच करते,१५०० रुपये आमच्या बहीणींना मिळत असले तरी आज भस्मासूर झालेल्या महागाईचे काय?असा सवाल त्यांनी केला.तेलाचा डबा देखील दोन हजारच्या वर मिळतो,वीज बिल तर सर्वसामान्यांना देखील अडीच ते तीन हजारांच्या खाली येत नाही,महत्वाचे म्हणजे राज्यात लाडक्या बहीणी किती सुरक्षीत आहेत?हा लाख मोलाचा प्रश्‍न आहे.महाविकासआघाडीच्या सरकारच्या काळात महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी केदार यांच्या मार्गदर्शनात मानकापूरमध्ये मेळावा घेण्यात आला होता.त्यांचा उद्देश्‍य महिलांना आत्मनिर्भर करने हा होता.मात्र,या सरकारचा उद्देश्‍य हा महिलांना मदत देण्या मागे वेगळा आहे.त्यांचेच नेते उघडपणे म्हणतात,पंधराशे रुपये दिलेत आता आम्हालाच मतदान करा!पण महाराष्ट्रात हे पुरोगामी राज्य आहे,विचारांनी समृद्ध राज्य असून ,अश्‍या कोणत्याही योजनांना या राज्याचा मतदार बळी पडणार नाही,असा दावा बर्वे यांनी केला.
पण, सध्या महाराष्ट्रात भाजपचे मोठमोठे केंद्रिय नेते यांचे सलग दौरे सुरु आहे,वर्धा येथे पंतप्रधान येऊन गेले,काल अमित शहा नागपूरात भाजप पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा मेळाव्यासाठी आले, ,पुन्हा मोदी येणार आहेत,याकडे कसे बघता?असा प्रश्‍न केला असता,माझ्या स्वत:च्या गावात रामटेक कन्हान येथे लोकसभे पूर्वी पंतप्रधान यांनी सभा घेतली.पण त्याच गावातून साढे चारशे मतांची लीड माझे पती श्‍याम बर्वे यांना मिळाली.इतकंच नव्हे तर पंतप्रधानांनी रात्री नागपूरात मुक्काम देखील केला,मुख्यमंत्री शिंदे यांनी तर आठ दिवस मुक्काम ठोकला होता रामटेकमध्ये पण,याचा त्यांना काही फायदा झाला का?असा सवाल त्यांनी केला.जनता ही सुज्ञ आहे,अन्यायाच्या विरोधात त्यांनी मतदान केलं,या पुढे देखील हेच घडणार,असा दावा त्यांनी केला.
गेल्या पाच महिन्यांपासून माझ्या मनात एकच सल होती की माझा उमेदवारी अर्ज का रद्द केला?याचं उत्तर मला हवं होतं.माझी ‘जात‘विरोधकांनी का हरवली?ही सल मला बोचत होती पण,काल न्यायालयाने मला माझी ‘जात’परत केली,याचं फार मोठं समाधान मला मिळालं असल्याचे रश्‍म बर्वे यांनी सांगितले.माझ्या ग्रामीण भागातील जनतेचा विश्‍वास खरा ठरला की रश्‍मी बर्वे या खोट्या बोलत नव्हत्या,तिची जात ही खरीच होती.मी खोटी कागदपत्रे लावली नव्हती पण असा आरोप माझ्यावर करण्यात आला.मला माझी ‘जात‘विधान सभेच्या निवडणूकी पूर्वी परत मिळाली,ज्या जात वैद्यता समितीच्या सदस्यांनी दबावामध्ये येऊन माझे प्रमाणपत्र रद्द केले ,न्यायदेवतेने त्यांना धडा शिकवण्यासाठी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला,याचा अर्थ पुढील काळात त्यांना असा अन्याय कोणावरही करता येणार नाही,हा धडा त्यांना मिळाला असल्याचे रश्‍मी बर्वे म्हणाल्या.

याप्रसंगी बोलताना,रश्‍मी बर्वे यांचे वकील ॲड.शैलेश नारनवरे यांनी सांगितले की,काल २४ सप्टेंबर रोजी न्यायालयाने दिलेल्या १६२ पानी निकालात,न्यायदेवतेने हा प्रश्‍न उपस्थित केला, की जातपडताळणी समिती ही एक स्वायत्त संस्था आहे.त्याला राज्य शासनाच्या अवर सचिवांनी (अंडर सेक्रेटरी)आदेश कसा दिला?महत्वाचे म्हणजे रश्‍मी बर्वे यांच्या जात वैद्यता प्रमाणपत्रावरील आक्षेप घेणारे सुनील साळवे यांची याचिका जात पडताळणी समितीने मार्च २०२४ मध्येच रद्द केली होती.त्याच याचिकेवर फेरतपासणी करण्याचे निर्देश कोणत्या अदृष्य शक्तीच्या आदेशावर देण्यात आले?उच्च न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्त केले की, गेल्या चार-पाच वर्षांपासून अनेक जातपडळाणीची प्रकरणे समिती पुढे प्रलंबित आहेत,काही प्रकरणात तर न्यायालयाने आदेश दिल्यानंतर देखील आजपर्यंत त्यावर कारवाई रेंगाळलेली आहेत,अशा परिस्थितील सुनील साळवेच्या अर्जावर आठच दिवसात व्हीजीलंस रिपोर्ट तयार करुन एका दिवसात सुनावणी न घेता जात प्रमाणपत्रच रद्द करण्यात येते!यावर न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्त केलं आहे.
रश्‍मी बर्वे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच्या अादल्या रात्री ११.३० वाजता ईमेलवर सूचना देण्यात येते की दुस-या दिवशी सकाळी ९.४५ वा.सुनावणी साठी या.परंतू त्यांचे म्हणने न ऐकता ११.१५ मिनिटांवर सुनील साळवे यांना तेरा पानांचा ऑर्डर, सर्टीफाईड कॉपीद्वारे देण्यात येतो!एका तासात सुनावणी कशी झाली?ऑर्डरचे डिक्टेशन कसे झाले?ऑर्डर टाईप कसा झाला?हा चमत्कार कसा घडला,यावर देखील न्यायालयाने आश्‍चर्य व्यक्त केले.
उच्च न्यायालयाने अवर सचिवाला जात पडताळणी समितीला निर्देश देण्याचे अधिकार नाही त्यामुळे रश्‍मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडे पाठवून रिन्यू करण्याचे निर्देश न देता ,आम्ही स्वत: रश्‍मी बर्वे यांचे जात वैद्यता प्रमाणपत्र रिन्यू करण्याचे आदेश देत आहोत,असे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले असल्याचे ॲड.नारनवरे यांनी सांगितले.न्यायालयाने स्पष्ट केले की,जात पडताळणीद्वारे पाठवलेल्या व्हिजीलंस अधिकारी यांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की,रश्‍मी बर्वे यांचे वडील सोमराज गणपत सोनेकर यांचे व त्यांच्या कुटूंबाचे कागदपत्र तपासणी करताना त्यांची जात ‘चांभार’आहे हे स्पष्ट आहे.तेव्हा रश्‍मी बर्वे यांच्या जातीवर प्रश्‍न उपस्थित होत नाही,तेव्हा याच मुद्दावर समितीच्या सदस्यांनी आक्षेप कसा घेतला,यावर न्यायालयाने शंका उपस्थित केली.

रश्‍मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रा विरुद्ध समितीसमोर दाद मागणारे वैशाली ईश्‍वरदास देविया व सुनील उत्तमराव साळवे यांना रश्‍मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही व त्यांचे या प्रकरणामध्ये सरळ संबंध प्रमाणित होत नाही तरी सुद्धा अवर सचिव,महाराष्ट्र राज्य व जात पडताळणी समिती यांनी इतक्या गांर्भीयाने रश्‍मी बर्वे यांचे प्रकरण का घेतले?
उच्च न्यायालयाने ताकीद दिली की,२ मे २०२४ रोजी न्यायालया समोर एक वकील उभा करण्यात आला,जेणे करुन ‘नॉट बिफोर’च्या आधारावर हे प्रकरण दुस-या खंडपीठासमोर जावे,अशाप्रकारे कोर्टाला ‘हंट’करण्याचा प्रयत्न झाला.
जात पडताळणी समितीच्या सदस्यांना २५ लाखांच्या दंडाची मागणी आम्ही केली होती मात्र,त्यांच्यावर एक लाख रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला,इतकंच नव्हे तर सरकारची ,या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी मुदतीची विनंती देखील न्यायालयाने फेटाळली.सरकारी पक्षाने या निर्णयाविरुद्ध १५ दिवसांचा अवधी मागितला होता.त्या दरम्यान हा निकाल लागू करु नये,अशी मागणी केली होती.मात्र,न्यायमूर्तीद्वय अविनाश घरोटे व मुकूलिका जवळकर यांच्या खंडपीठाने ही मागणीसुद्धा फेटाळून लावली असल्याचे ॲड.नारनवरे यांनी सांगितले.
लोकसभेच्या निवडणूकी पूर्वी देखील तुम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती,त्यावेळी दिलासा का मिळू शकला नाही?असा प्रश्‍न केला असता,लोकसभेच्या निवडणूकीची प्रक्रिया संपूर्ण देशात सुरु झाली होती तसेच उमेदवारी अर्ज देखील भरण्याची मुदत उलटली असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता,असे उत्तर नारनवरे यांनी दिले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की,जात पडताळणी समितीच्या सदस्यांवर कारवाईची मागणी करुन,त्यांच्यावर नुकसान भरपाई दावा करुन किवा त्यांना निलंबित करुन झालेले नुकसान भरुन निघू शकत नाही,एका अनुसूचित जातीच्या महिलेला कट कारस्थान करुन देशाच्या संसदेत जाण्यापासून रोखण्यात आले,ही गंभीर बाब आहे.
एका प्रश्‍नाच्या उत्तरात रश्‍मी बर्वे म्हणाल्या की उमरेड मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा निर्णय पक्ष घेईल मात्र,नागपूर जिल्ह्याच्या सहा ही विधानसभा मतदारसंघात विरोधकांच्या नाकावर टिच्चून विजय खेचून आणनार,असा दावा त्यांनी केला.
…………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या