

जागृतेश्वराचे ४५ किलो चांदीचे मुकुट ‘मिसिंग!’
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित मंदिराचे संरक्षक महामहीम!
श्रावण तोंडावर: भक्तांसाठी सुविधांचा अभाव
नागपूर,ता.१४ जुलै २०२२: जागनाथ बुधवारी येथील श्री जागृतेश्वर मंदिर हे ५२० वर्षां पूर्वीचे प्रसिद्ध मंदिर असून, याला ‘नागपुरातील काशी’ देखील संबोधतात. येथील भक्तांनी अधिकमासात ४५ किलोचे चांदीचे कवच संपूर्ण शिवलिंग साठी तयार केले होते,याची किंमत जवळपास १५ लाख रुपये आहे मात्र काही कारणामुळे ते काढण्यात आले कारण ते थोडेफार चपकले होते असे येथील विश्वस्त सांगतात,पंरतू गेल्या अनेक महिन्यांपासून ते चांदीचे कवच दुरुस्त होऊन आलेच नाही व त्या ठिकाणी पितळीचे कवचच भगवान शिवाला ‘सुशोभित ’ करत आहे,त्यामुळेच भक्तांच्या मनात विश्वसतांविषयी अविश्वास निर्माण झाला असून सध्या त्यांच्या ओठी ‘उपकार’चित्रपटातील ’देते है भगवान को धोका इंसा को क्या छोडेंग,कसमे वादे प्यार वफा सब, बाते है बातो का क्या’हे मनुष्य स्वभावावर चपखल बसणारे गीत, रेंगाळत आहे.विशेष म्हणजे मंदिराच्या विश्वस्तांमध्ये, राज्यपाल महामहीम बनवारीलाल पुरोहित यांच्यासह नागपूरातील प्रतिष्ठित मंडलींचा समावेश आहे.
या स्वयंभू मंदिराच्या जिर्णोद्धार व सौंदर्यीकरण करण्यासाठी महामहीम तसेच प्रतिष्ठांनी कोणतेच प्रयत्न केले नाही.या देवस्थानाला तिर्थक्षेत्र दर्जा देण्यासाठी येथील भाविकांनी शासना सोबत सतत संघर्ष व पाठपुरावा करून लढा दिला होता अखेर १४ नोव्हेंबर २०११ रोजी या देवस्थानाला तिर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा प्राप्त झाला. नागपूरची काशी समजल्या जाणा-या जागृतेश्वर मंदिराला ’क’श्रेणीचे पर्यटन तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भूषण दडवे यांनी चार वर्ष पाठपुरावा केला. श्रावण महिन्यात काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शिवाची आराधना करुन जे फळ मिळतं तेच फळ श्रावण मासात जागृतेश्वर मंदिरात आराधना करुन मिळतं अशी भक्तांची धारणा आहे.
या मंदिरात स्वयंभू साढे-सात शिवलिंग असून हे मंदिर जवळपास ५१२ वर्ष प्राचीन आहे.शहरात एकूण साढे बारा शिवलिंग असून त्यातील साढे सात स्वयंभू शिवलिंग जागृतेश्वर मंदिरातील आहेत.या शिवाय पातालेश्वर शिव मंदिर महाल,कल्याणेश्वर मंदिर,तेलंगखेडी,भूतेश्वर शिव मंदिर,चिंतेश्वर मंदिर,पांचपावलेश्वर शिव मंदिरात स्वयंभू शिवलिंग आढळतात.

(छायाचित्र:पूर्वीचे चांदीचे छत्र गायब असून आता असे पितळीचे कवच शिवलिंगाची शोभा वाढवित आहे!)
या मंदिरात संत जागोबा महराज यांची समाधी असून,गुढीपाडवाच्या दिवशी त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.मागील ४२ वर्षांपासून या ठिकाणी अखंड ज्योत प्रज्वलित आहे. ‘‘क’दर्जा प्राप्त झाल्यावरही या देवस्थानाच्या विकासासाठी सरकारचे कोणतेही सहाय्य मिळाले नाही.एकीकडे कारोडी देवस्थानचे भव्य-दिव्य पुर्नबांधकाम होत असताना, बाबा ताजुद्दीन यांचीही दरगाह तीर्थक्षेत्र म्हणून झपाट्याने विकसित होत आहे मात्र जागृृतेश्वर मंदिराच्या विकासासाठी शहरातील खासदार,आमदार,पालकमंत्री,मुख्यमंत्रीयांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुन देखील या मंदिराचा विकास अद्याप तरी ‘भकासच’आहे.या मंदिराचे जीर्णोद्वार तसेच विकासावर शिवभक्त रवींद्र कापसे यांनी आतापर्यंत ५० ते ६० लाख रुपये खर्च केले आहे.
काय आहे इतिहास-
शिवभक्त जागोबा महाराज हे दररोज पाचपावली येथील पांचपावलेश्वर मंदिरात नियमित जप-तप,साधना करीत होते व नियमित भगवान शिवाच्या दर्शनासाठी जात होते.दर वर्षी महाशिवरात्रीला ते काशी विश्वनाथांच्या दर्शनासाठी जात असत.देव दर्शनाशिवाय ते अन्न पाणी ही ग्रहण करीत नसे.त्या काळी भगवान शिवाचे दर्शन हे आज इतके सहज सुलभ नव्हते.बुधवारी परिसरात घनदाट जंगल होते.जंगलात नागफनीच्या काटेरी झाडी होत्या,तलावामध्ये नागांचा झुंड राहत असे.याच रस्त्यांवरुन जागोबा महाराज नियमित पांचपावलेश्वरांच्या दर्शनाला मात्र अखंडीत जात राहीले.
एकदा वृद्धापकाळामुळे ते आजारी पडलेत.यामुळे ते भगवान शिवाच्या दर्शनासाठी जाऊ शकले नाहीत.पाच दिवसांपासून अन्न पाण्यावाचून राहील्याने भगवान शिवाने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला.तु जिथे आहेस त्याच ठिकाणी मी देखील आहे.खोदकाम केल्यास माझे तुला येथेच दर्शन होतील असा दृष्टांत भगवान शिवाने जागोबा महाराजांना दिला.
जागोबा महाराजांनी गवळी समाजातील मजुरांकडून जंगलातील वृक्षांची कापणी केल्यावर जमीनीवर खोदकाम सुरु केले.खोदकाम करताना एका ठिकाणी कु-हाड लागल्याने रक्ताची चिरकांडी निघाली.यानंतर अतिशय सावधपणे या ठिकाणचे खोदकाम केल्यानंतर भव्य असे स्वयंभू शिवलिंग प्रकट झाले.ज्या ठिकाणी कु-हाड लागली ते ठिकाण आज देखील मंदिरात आहे,याशिवाय हळूहळू याच ठिकाणी स्वयंभू असे एक-एक शिवलिंग प्रकट झालेत.
अर्धे शिवलिंग देशात कुठेही नाही-
या ठिकाणी एकूण साढे सात स्वयंभू शिवलिंग आहेत मात्र अर्धे शिवलिंग भारत देशात इतर कुठेही नाही.या मंदिर परिसराच्या मधूनच रस्ता गेल्याने अडीच शिवलिंग हे रस्त्याच्या पलीकडील भागात गेलेत.नागा बाबा,गोंड राजा,भोसले राजाद्वारे पंचकमेटी बनवून या मंदिराची देखरेख केली जात होती.भोसले राजांनी या मंदिरात सभामंडप बांधला.सरदार मेघेंनी परकोट बांधला.गोंड राजांच्या कार्यकाळात मंदिराचे जीर्णोद्वार करण्यात आले.जसा जसा नागपूरचा विकास होत गेला,जागृतेश्वर येथील ‘नगर देवता’म्हणून प्रसिद्ध झालेत.
१९८८ साली मंदिराची व्यवस्था जागृतेश्वर देवस्थान ट्रस्टच्या हातात सोपविण्यात आली.देवस्थान समितीतर्फे या ठिकाणी दररोज अन्नदान छत्र चालत असतं.
श्रावणात भक्तांची होते अलोट गर्दी-
जवळपास २५ ते ३० हजार वर्ग फूट परिसरात असणा-या या मंदिरात स्वयंभू शिवलिंग याशिवाय गणेश मंदिर,कार्तिक स्वामींचे नवनिर्मित मंदिर,मारोती मंदिर,दत्तात्रेय मंदिर,अन्नपूर्णा मंदिर,गौरीशंकर मंदिर प्रस्थापित आहेत. पाताळेश्वर मंदिरात शिव-पार्वतीच्या प्रतिमांची प्रतिष्ठाना करण्यात आली आहे.पुरातन भिल-भिल्लणीच्या प्रतिमेजवळच काला मारोती मंदिर,बटूक भैरव मंदिर,माता मंदिर,राम मंदिर,शनि मंदिर यासारखे प्राचिन देवस्थान देखील आहेत.श्रावणात या ठिकाणी भक्तांचा महापूर ओसंडतो.महाशिवरात्रीला हजारो भाविकांची दरवर्षी तूफान गर्दी होत असते.श्रावणात तर दररोज हजारो भाविक या ठिकाणी अभिषेकसाठी गर्दी करतात.वर्षभरात १० ते १५ लाख भाविक या ठिकाणचे दर्शन घेऊन काशी विश्वनाथ दर्शनाचे पुण्य प्राप्त करत असतात मात्र शहरातील एवढ्या जागृत देवस्थानाचा विकास करण्यासाठी,या ठिकाणी भक्तांच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी एवढ्या दशकांनंतरही कोणत्याही प्रतिष्ठितांनी पुढाकार घेतला नसल्याचा संताप, नागपूर विकास आघाडीचे अध्यक्ष व भाजप शहरचे उपाध्यक्ष भूषण दडवे व्यक्त करतात.
या संबधी त्यांनी शहरातील खासदार,आमदार,मंत्री,जिल्हाधिकारी,महापौर,मनपा आयुक्त,पोलिस आयुक्त,विभागीय आयुक्त,मुख्यमंत्री आदींपर्यंत या देवस्थानाला ’ब‘ पर्यटन तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे.निदान राज्यपाल व या मंदिराचे संरक्षक महामहीम बनवारीलाल पुरोहित यांनी तरी पुढाकार घ्यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.लवकरच हिंदी भाषिकांचा व त्यानंतर मराठी भाषिकांच्या श्रावण मासाला आरंभ होत आहे,या अनुषंगाने पुन्हा एकदा श्री जागृतेश्र्वर मंदिरातील शिवलिंगावरील चांदीचे मुकुट व पूर्वी होते ते चांदीचे कवच लावण्यात यावे,अशी मागणी देखील भूषण दडवे यांनी केली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
