

तीन दिवसात स्वच्छ पाणी पुरवठा करा अन्यथा उग्र आंदोलन
नागपूर,ता.६ मे २०२२:महालातील नबाबपुरा भागातील शेकडो घरांना जवळपास गेल्या १५ दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे.येथील नागरिकांनी महापालिकेतर्फे आमच्यासाठी ‘काळ्या पाण्याची ‘शिक्षाच असल्याचे मार्मिक कथन केले असतानाच शहरातील उत्तर,पूर्व नागपूरातील अनेक भागात दूषित तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे.ऐन उन्हाळ्यात डोक्यावरील सूर्य कोपला असताना महाराष्ट्राच्या उपराजधानीत, नागपूर महानगरपालिकेच्या सुज्ञ व तत्ज्ञ अधिका-यांच्या ‘कृपेने’या शहरातील अनेक भागात दूषित,अतिशय घाणेरडे,दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ पाणी नागपूरकरातील नागरिक पिण्यास मजबूर होत आहेत त्यातही महानगरपालिकेचा जलप्रदाय विभाग सर्रास या नागरिकांना या अश्या अस्वच्छ,दूषित पाण्याचेही दामदुप्पट बिले पाठवित असल्याने माजी नगरसेविका व राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी मनपा आयुक्तांच्या कक्षात, आयुक्तांसह जलप्रदाय विभागाच्या अधिका-यांची चांगलीच कानउघाडणी केली.
कळमना परिसरात टँकरने ६ दिवसातून एकदाच पाणी मिळत असल्याने पाण्यासारख्या जिवनावश्यक बाबीसाठी नागरिकांना ऐन उन्हाळात तहानलेले ठेवणे हे योग्य आहे का?असा सवाल आभा पांडे यांनी केला.शहरातील प्रभाग २१ मध्ये गोळीबार चौक ते मारवाडी चौकापर्यंत तर झाडे चौक,बिडी कारखाना,श्रीकृष्ण मंदिर,साहेबलाल वाडी,भारतीवाडी,पोलिस क्वार्टर,गोंडपुरा,बस्तरवारी,स्वीपर कॉलनी या भागात केवळ दीड तास कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.
येथील नागरिकांना पुरेसे पिण्याचे देखील पाणी उपलब्ध होत नाही तर प्रेमनगर,करतार महाराज लाईन,साईनगर,गुरुद्वारा लाईन भागात सुरवातीला दहा ते पंधरा मिनिटे अतिशय दुर्गंधीयुक्त,घाणेरडे काळ्या रंगाचे पाणी येेत आहे.तेलीपुरा पेवठा,आंबेडकर पुतळा,दलालपुरा,राऊत चौक,रेल्वे पुल मस्कासाथ,कुंभारपुरा,गुजरी,या भागात केवळ तासभर पाणी मिळत आहे.रेल्वे स्टेशन भारती अाखाडा,नागराज मंदिर,गोंडपुरा,बस्तरवारी,बैरागीपुरा,माता मंदिर परिसर,नॉर्थ पाँईंट शाळेच्या परिसरातील नागरिकांना फक्त अर्धा तास पाणी मिळत आहे.अनेकदा येथील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.प्रभाग २१ मधील अनेक भागांना नियमित पाणी पुरवठा केला जात नाही.
गेल्या तीन महिन्यांपासून याबाबत अनेकदा माहिती देऊनही अधिकारी,कर्मचारी लक्ष देत नसल्याचे आभा पांडे यांनी आयुक्तांना सांगितले.याशिवाय पूर्व नागपूरातील कळमना प्रभागातील नागराजनगर,वाजपेयीनगर,नर्मदानगर,बेलेनगर,कामनानगर भागात नळाद्वारे पाणी पुरवठा गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे.या भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.परंतु या ही भागात टँकर ६ दिवसांतून एक वेळाच येतो.परिणामी या सर्व भागात ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
नागरिकांची व्यथा येथेच थांबत नाही तर अनेक ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांना ३०० ते ५०० रुपये खर्च करावे लागत आहे.नागपूरकर नागरिकांना पाण्यासारखी मूलभूत सुविधा पुरवणे ही सर्वस्वी महानगरपालिकेची जबाबदारी आहे.मनपा व ओसीडब्ल्यूच्या ढिसाळ कारभारामुळे गोर गरिब नागरिकांवर भुर्दंड बसत असल्याची नाराजी आभा पांडे यांनी व्यक्त केली.दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना अारोग्याच्या तीव्र समस्या उदभवल्या आहेत.उत्तर व पूर्व नागपूरात पाणी समस्येने भीषण रुप धारण केले असून या भागातील नागरिक महापालिकेच्या कारभारावर चांगलेच संतप्त असल्याचे आभा पांडे यांनी आयुक्त व अधिका-यांना सुनावले.येत्या ३ दिवसात प्रभाग २१ मधील वस्त्यांचा पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.नागरिकांचा मुलभूत हक्क असणारे पाणी न मिळाल्यास महापालिके पुढे धरणे देण्यात येईल असा ही इशारा आभा पांडे यांनी दिला.




आमचे चॅनल subscribe करा
