फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपामहापौरांच्या प्रभागात कोट्यावधींच्या कामांना मंजुरी!

महापौरांच्या प्रभागात कोट्यावधींच्या कामांना मंजुरी!

Advertisements

दूधाने पोळले…..स्थायीने प्रशासनाचा प्रस्ताव बाजार भावासाठी पाठवला परत

प्रशासन मुद्दामून कामांना करतोय उशिर:प्रकाश भोयर यांचा प्रशासनावर रोष

गांधी बाग उद्यानात दोन कोटींचे म्यूरल्स!

नागपूर,ता. ४ जानेवारी २०२२:दुधाने पोळल्यानंतर ताक ही फूंकर मारुन पिणे’अशी मराठीतील एक म्हण आहे,नागपूर महानगरपालिकेतील महा-घोटाळेबाज कारभार चव्हाट्यावर आल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी आज मनपाच्या आरोग्य विभागाने मंजुरीसाठी पाठवलेल्या एका प्रस्तावाला मंजुरी देण्या पूर्वी, आधी प्रस्तावामधील साहित्याचे, बाजार भाव तपासून मग प्रस्ताव सादर करण्याची सूचना केल्यामुळे मराठीतील उपरोक्त म्हण, मनपाच्या कारभारावर चपखळ बसली असेच आता म्हणावे लागेल.

आज मनपा मुख्यालयात स्थायी समितीची ऑन लाईन बैठक पार पडली.बैठकीत अनेक प्रस्तावांना मंजूरी प्रदान करण्यात आली मात्र आरोग्य विभागाने सादार केलेला हिवताप व हत्तीरोग विभागासाठी किटनाशक औषधी(जंतुनाशक साहित्य) खरेदीबाबत ची निविदा दोन वर्षांकरिता मान्य असल्याने पुन्हा ‘त्याच मंजूर दरावर’, निविदा मंजूर करण्यासाठी स्थायी समिती समोर आली.

यातील एक निविदा रमेश ॲग्रो केनिकल्स तर दूसरी निविदा डॉल्फिन सेल्स कॉरपोरेशनची असून १,४२,४२,५०० कोटींच्या या निविदा, पुन्हा दोन वर्षांपूर्वीचा व आताचा बाजार भाव यात तफावत असू शकते,या शंकेला वाव असल्याने ‘दूधाने पोळणे नको’ म्हणून स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी हा प्रस्ताव, बाजार भाव आधी तपासून बघण्यासाठी परत पाठवला असल्याचे मनपा मुख्यालयात आज पार पडलेल्या पत्र परिषदेत भोयर यांनी सांगितले.

नुकतेच मनपात स्टेशनरी घोटाळ्याचे प्रकरण बाहेर आल्याने व साकाेरे ॲण्ड फॅमिलीलाच गेल्या ४० वर्षांपासून मनपाच्या अनेक विभागात स्टेशनरी पुरवठ्याचे कंत्राट मिळल असल्याने, साकोरे कंपनीने अधिका-यांचे लॉगिंग पासवर्ड चोरुन कोणत्याही स्टेशनरी साहित्याचा पुरवठा न करता ६७ लाखांच्या रक्कमेची उचल वित्त विभागातून केल्याने पुढे हा ‘महा’घोटाळा उघडकीस आला होता.या विरोधात मनपाच्या चार कर्मचा-यांना तसेच साकाेरे कुटंबातील दोघांना अटक देखील झाली आहे.

काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी नुकतेच पार पडलेल्या मनपाच्या सभेत मनपाने खरेदी केलेल्या अनेक वस्तूंच्या भावात आणि बाजार भावात, जवळपास वीस पटींची तफावत कशी आहे, याचा पाढाच सभेत वाचून दाखवला होता.तीच गोष्ट पुन्हा अंगलगट येऊ नये यासाठी प्रकाश भोयर यांनी प्रशासनाला हा प्रस्ताव बाजार भाव माहिती करुन घेण्यासाठी परत पाठवल्याने ’देर आये दुरुस्त आये’ची प्रतिक्रिया मनपात उमटली.

विशेष म्हणजे ज्याप्रमाणे ‘साकोरे ॲण्ड फॅमिली ’ही गेल्या ४० वर्षांपासून मनपाच्या विविध विभागात स्टेशनरी पुरवठ्याचे कंत्राट सातत्याने मिळवत आली आहे,त्याच धर्तीवर आरोग्य विभागाला आता किटनाशक औषधी पुरवठा करणा-या रमेश ॲग्रो केमिकल्स तसेच डॉल्फिन सेल्स कॉरर्पोरेशन या देखील कंपन्या किती ‘दशके’जुनी आहेत?पत्रकारांच्या या प्रश्‍नाचे उत्तर ना प्रशासनाकडून मिळाले ना भोयर यांच्याकडून.माहिती घेऊन सांगतो,कळवतो म्हणून हा प्रश्‍न टाळण्यात आला.

सर्वाधिक मंजुरी महापौरांच्या प्रभागातील प्रस्तावांना-
परंपरेप्रमाणे ‘ज्याच्या हाती सत्तेरी दोरी तो म्हणे सर्व काही माझ्याच दारी’या उक्तीप्रमाणे आज स्थायीने मंजूर केलेल्या एकूण प्रस्तावांपैकी महापौरांच्या प्रभाग क्र.१९ मधील सर्वाधिक कामांना मंजुरी प्रदान करण्यात आल्यामुळे विरोधकांसोबतच सत्ताधारी नगरसेवकांचे देखील चांगलेच ‘मन’दुखावले गेले आहे.

पूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महापौर पदी असताना त्यांनी देखील त्यांच्या पश्‍चिम प्रभागात निधी खेचून आणायचा पायंडा मनपात खोलवर रुजवला होता,यानंतर देक्ष्ण-पश्‍चिम प्रभाग झाल्याने ७० जे ८० कोटींची विकास कामे हे फडणवीस यांच्या प्रभागात झालेली दिसून पडते.तोच पायंडा त्यांच्याच पक्षाची सत्ता असणा-या नागपूर महानगरपालिकेत महापौरांनी देखील अंगिकारल्याचे दिसून आले.

महापौरांच्या प्रभाग क्र.१९ मध्ये एम्प्रेस मॉल जवळ वंदे मातरम उद्यान येथे एफआरपी म्यूरल्स व ग्राल्स टाईल्स लावण्यासाठीची ८४ लाख ९८ हजार ३२५ रुपये,याच प्रभागातील गांधीबाग बगिचा येथील स्मारकाजवळ एक कोटी ७४ लाख ४८ हजार ०६२ रुपयांचे म्यूरल्स लावण्यासाठीची,याच प्रभागातील हॉटेल पॉल पॅलेस ते सरस्वती तिवारी शाळेपर्यंतच्या सिमेंट रोडच्या कामासाठी ७५ लाख,८५ हजार ६७७ रुपयांचे,याच प्रभागात लाल शाळा,गीतांजली चौक येथील ई-लायब्ररीच्या आंतरिक कामांसाठी २ कोटी ८५ लाख ७० हजार ४५१ रुपयांचे,याच प्रभागातील जुना जेलखाना येथील हॉटेल वुडलॅण्ड ते रामकृष्ण इलेक्ट्रीकलपर्यंत सिमेंट रस्त्याच्या बांधकामासाठी ३८ लाख,९६ हजार ४७७ रुपयांच्या कामांना स्थायी समितीने आज मंजूरी प्रदान केली आहे.

परिणामी ‘महापौरांच्या प्रभागाचा विकास म्हणजे संपूर्ण उपराजधानीचा विकास’ हे आता नागपूरकरांनी गृहीत धरण्याची वेळ आली असल्याची चर्चा मनपात रंगली होती.

भोयर यांना महापौरांच्या या मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावाबाबत विचारले असता, ही सर्व ते पद स्वीकारण्यापूर्वीची व आधीच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळातच मंजूर झालेले प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.मला फक्त जुने प्रस्तावच अंमलबजावणीत आणण्याचे कार्य उरले असल्याचे ते म्हणाले.मी स्थायी समितीचा अध्यक्ष झालो असलो तरी मी कोणताही नवा प्रस्ताव यात समाहित केला नसल्याची पुष्टिही त्यांनी जोडली.

मात्र असे असले तरी कोणते प्रस्ताव योग्य व कोणते अयोग्य हे तपासून बघण्याचे निश्‍चितच अधिकार भोयर यांना आहेत.असे असताना इतर नगरसेवकांच्या प्रस्तावांना केराची टोपली दाखवून संपूर्ण ‘विकास’महापौरांच्या प्रभागात घडवून आणण्यासाठीचा तो ही कोट्यावधींच्या म्यूरल्ससाठीचा,भोयर यांचा हा खटाटोपही अनेकांना रुचला नाही.

प्रशासनाचा वेळकाढूपणा:भोयर यांचा संताप
मनपाच्या निवडणूका या तोंडावर आल्या आहेत,नियोजित वेळेत म्हणजे फेब्रुवारीमध्ये निवडणूका घोषित झाल्यास येत्या १५ दिवसात पुन्हा नागपूरात आचारसंहिता लागू होईल,अश्‍या वेळी प्रशासनाने नगरसेवकांच्या कामांना त्वरित मंजूरी प्रदान करुन निविदा काढण्याची सूचना प्रकाश भोयर यांनी केली.

अनेक प्रस्ताव प्रशासनाकडे धूळ खात पडले आहे.प्रशासन वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप भोयर यांनी केला.विशेष म्हणजे रस्त्यांचा कामांसाठी २५ कोटी तसेच रिआेप्रिएट केलेल्या १६ कोटींच्या कामांचे प्रस्ताव स्थायीकडे येणे सुरु झाले अाहे मात्र त्याची गती कासव गती असून, प्रशासनाचे धोरण नगरसेवकांच्या कामांना जेवढा उशिर करता येईल तेवढा उशिर करण्याचेच असल्याचे दिसून पडंतय,असा आरोप भोयर यांनी आज पत्र परिषदेत केला.

विशेष म्हणजे लेखा अधिकारी विजय कोल्हे हे ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले मात्र आज त्यांच्या जागी आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी इतर कोणाच्याही नियुक्तीचा प्रस्ताव शासनाला पाठवला नसल्याचे भोयर म्हणाले. आयुक्तांनी त्वरित हे पद भरण्याकडे लक्ष देऊन आर्थिक प्रस्तावांना, आचारसंहिता लागण्या पूर्वी प्रशासकीय मान्यता देण्याकडे लक्ष पुरवावे,अशी सूचना त्यांनी केली.

………………………..

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या