

मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वयच नाही:नागरिकांवर ‘करोना ’चे खापर भारी
नागपूर, ता. २७ : महानगरपालिकेतर्फे काल शुक्रवार दि. २६ फेब्रुवरी रोजी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. तसेच महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागरिकांना बंदचे आवाहन करताना काय सुरु असणार,काय बंद राहतील याची यादीच प्रसिद्ध केली होती,मनपाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील अत्यावश्यक सेवेत दारुची दूकाने येत नसलय्ाने ती बंदच राहणार असे गृहीत धरण्यात आले होते मात्र आज शहरात दारुची दूकाने सुरु असल्याची तक्रार महापौर यांना मिळाली असता त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दूरध्वनी लावला,जिल्हाधिकारी यांनी दारुला घरपोच परवानगी दिली असल्याचे सांगितले!यावरुन दारु ही जिल्हाधिकारी यांच्या लेखी ‘अत्यावश्यक सेवा’मध्ये मोडते का?अशी विचारणा मद्यपी व सर्वसामान्य दोघांमध्ये रंगली होती.
गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिले होते. या आदेशाचे पालन करीत नागपुरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. नागरिकांनीही घरीच राहणे पसंत केले. याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागरिकांचे आभारही मानले.
शनिवार आणि रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापौर दयाशंकर तिवारी यांनी इतवारी आणि गोकुळपेठ बाजारांचा दौरा केला. इतवारी बाजार दौऱ्याच्या वेळी गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक संजय महाजन, मनोज चापले उपस्थित होते. गोकुळपेठ बाजारातील दौऱ्यात धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, नगरसेवक संजय बंगाले उपस्थित होते. या दोन्ही दौऱ्यात अनेक भाजी, फळविक्रेते मास्क परिधान केलेले नव्हते. त्यांना महापौरांनी मास्क परिधान करण्याचे आवाहन केले. यानंतर पुन्हा मास्कविना आढळले तर दंड ठोठावण्याचे निर्देश सोबत असलेल्या उपद्रव शोध पथकाला त्यांनी दिले. जे मास्कविना आढळतात अशा विक्रेत्यांना प्रथम समज द्या, जनजागृती करा, त्यानंतरही ते ऐकत नसेल तर दंड आकारा, असे निर्देश त्यांनी दिले.
शनिवार आणि रविवारी बाजारात प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याचा संभव असतो. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा प्रशासनाने दोन दिवस बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची नागपुरातील बहुतांश सर्वच व्यापारी, नागरिकांनी अंमलबजावणी केली.
मात्र महापौर दयाशंकर तिवारी यांना कुठलेतरी वाईन शॉप सुरू असल्याचा दूरध्वनी आला. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता दारूच्या घरपोच सेवेला परवानगी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. जर मनपा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर दारूची दुकानेही बंद असावीत कारण ती अत्यावश्यक सेवेत येत नाहीत. यासाठी जिल्हाधिकारी यांनी मनपा प्रशासनाशी समन्वय ठेवून निर्णय घ्यावा, असे महापौर म्हणाले.
मागील वर्षी लॉक डाऊनच्या १० महीन्यांच्या प्रदीर्घ काळातही नागपूरकरांनी जिल्हाधिकारी कार्यालय,मनपा व पोलीस विभागाच्या पातळीवर हाच गोंधळ अनुभवला.प्रतिबंधित क्ष्ेत्रांबाबत हा गोंधळ ठलकपणे दिसून आला होता.
गेल्या संपूर्ण वर्ष उद्योग धंदे बंद ठेऊन प्रचंड आर्थिक नुकसान सोसणारे शहरातील लहान-मोठे उद्योजक तसेच सर्वसामान्यांनी आज प्रशासनाच्या आहवानाला प्रतिसाद देऊन संपूर्णपणे बंद पाळला व आर्थिक नुकसान ही सोसले मात्र शासनाच्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय निर्णयाच्या गोंधळामुळे आज या संस्थांची चांगलीच किरकीरी झाल्याचे आढळून आले.
उद्या रविवारी देखील हाच गोंधळ दिसणार का?अत्यावश्यक प्रतिष्ठानांच्या यादीत ‘दारु’ची दूकाने येत असतील तर किराणा ओळ तसेच किरकोळ व्यापारी यांनाही प्रतिष्ठाने उघडू द्यावीत अशी मागणी आता पुढे येत आहे.




आमचे चॅनल subscribe करा
