फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजदटके-मुंढे यांच्यातील ‘शीतयुद्धाचे’पडसाद उमटले बैठकीत!

दटके-मुंढे यांच्यातील ‘शीतयुद्धाचे’पडसाद उमटले बैठकीत!

Advertisements

मुंढेंनी दटके सोडून सर्व नगरसेवकांच्या प्रश्‍नाला दिले उत्तर!

नागपूर,ता. ६ जून: गुरुवार ४ जून रोजी नुकतीच महापौर,मनपातील गट नेते व पदाधिकारी यांच्यासोबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची बैठक पार पडली. आयुक्त पदी रुजू झाल्यांनतर काही अपवाद सोडता ‘प्रदीर्घ’ काळानंतर आयुक्त व पदाधिका-यांच्या बैठकीचा हा ‘दुग्ध शर्करा‘योग जुळून आला. बैठकीत गट नेते व पदाधिकारी यांनी मुंढे यांना चांगलेच धारेवर धरले व विविध प्रश्‍नांची सरबत्ती केली. यात आमदार व माजी महापौर प्रवीण दटके यांचा देखील समावेश आहे,मात्र दटके यांनी विचारलेल्या दोन्ही प्रश्‍नांना आयुक्त मुंढे यांनी कोणतेच उत्तरच दिले नसल्याचे सांगितले जात आहे.

काेव्हिड-१९ च्या संदर्भातील कोणतीही माहिती किवा उपाययोजना मनपा प्रशासनाच्यावतीने नगरसेवकांना गेल्या तीन महिन्यांपासून मिळालीच नाही.नागरिकांना सामोरे जाताना नगरसेवकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये या पुढे तरी समन्वय कायम राहवा यासाठी महापौर संदीप जोशी यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. यासाठी बाकायदा आयुक्तांकडून वेळ मागूण घेण्यात आली होती. गुरुवारी सुरवातीला १२ वाजता,यानंतर १ वा.ची वेळ ठरली असताना प्रत्यक्ष् बैठक १.२२ मिनिटांवर सुरु झाली.सुमारे दोन तास पार पडलेल्या या बैठकीत लोकप्रतिनिधींकडून आयुक्तांना विविध प्रश्‍न विचारण्यात आली.

यात आ.प्रवीण दटके यांनी मनपाच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णलयाच्या पुर्नबांधणीसाठी एकच टेंडर न काढता २४-२४ लाखांचे दोन टेंडर का काढण्यात आले?असा प्रश्‍न आयुक्तांना विचारला.याशिवाय शहरातील विविध विलगीकरण केंद्रात नागरिकांना जेवण पुरविण्यासाठी विविध ५० स्वयंसेवी संस्थांना काम देण्याऐवजी या केंद्रात जेवण पुरविण्यासाठी टेंडर का काढण्यात आले नाही?अश्‍या प्रश्‍नांची विचारणा केली.मात्र आयुक्तांनी दटके यांच्या प्रश्‍नांना कोणतेही उत्तर दिले नाही. दटके यांना आयुक्तांनी इतर लोकप्रतिनिधींच्या तुलनेत काेणताच प्रतिसाद दिला नसल्याची चांगलीच चर्चा बैठकीनंतर रंगली.यावरुन दटके-मुंढे यांच्यातील ‘शीतयुद्ध’अद्याप शमले नसल्याचे दृष्य उमटले.दुसरीकडे दटके यांना दरवेळी ‘टेंडर’या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावरच का प्रश्‍न विचारावेसे वाटले?याबाबत देखील दबकी चर्चा मनपात ऐकू  आली.आयुक्त पदी रुजू झाल्यानंतर मुंढे यांनी सत्तापक्षाची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही यामुळे दटके यांचा ‘विशेष राग’आयुक्तांवर असून फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या नेर्तृत्वात आयुक्तांच्या कार्यालयात भाजप नगरसेवकांचा ‘विशाल मोर्चा’ही धडकला होता.

ज्येष्ठ भाजप नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी एका विशिष्ट भागातील नागरिकांनी विलगीकरणासाठी तीव्र विरोध केला तेव्हा मुंढे यांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही?दूसरीकडे मात्र काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांच्याविरोधात लकडगंज पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार नोंदवण्यात आयुक्तांना काय रस होता? असा प्रश्‍न उपस्थित केला.यावर आयुक्तांनी त्यांना सविस्तर उत्तर दिल्याचे सांगितले जात आहे.

विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांनी देखील मुंढे यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली,यावर देखील मुंढे यांनी सविस्तर खुलासा केला.काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफूल्ल गुडधे पाटील,शिवसेना गट नेते किशोर कुमेरिया,राकाँचे गटनेते दुनेश्‍वर पेठे यांनी देखील आयुक्तांना प्रश्‍ने विचारुन खुलासा मागितला. ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी शासनाकडून मिळालेल्या ‘डिजास्टर रिलीफ फंड’या विषयी प्रश्‍न विचारला. शहरात कोव्हिड-१९ च्या संदर्भात संपूर्ण प्रभावी उपाययोजना राबविताना शासनाकडून मिळालेल्या या फंडाचा योग्य तो उपयोग केला जात असल्याचे उत्तर मुंढे यांनी दिले. मात्र वाहनांसाठी लागणारा पेट्रोल व डिजलचा खर्च हा मनपा वहन करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

जनप्रतिनिधींच्या प्रश्‍नांना उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, की जे काही निर्णय झाले ते जनतेच्या हितासाठी आणि शासनाच्या वेळोवेळी आलेल्या दिशानिर्देशानुसारच घेण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राचे निर्णय हे शासनाच्या दिशानिर्देशानुसारच घेण्यात आले आहेत. यामध्ये ज्यांनी अडथळा आणला त्यांना वेळोवेळी समजाविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना हॉटस्पॉट मधून विलगीकरण केल्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करता आली. त्यांनी विलगीकरण करण्याची पध्दती विस्ताराने सांगितली. सध्या नागपूरचा रिकव्हरी रेट चांगला आहे. विलगीकरण केंद्रात भोजन पुरविण्यासाठी राधास्वामी सत्संग ब्यासच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली. हे भोजन चांगल्या प्रतीचे असून याबाबत नागरिकांची कुठलीही तक्रार नाही. शासनाकडून जो निधी यासाठी आला त्याचा वापर दिशानिर्देशानुसारच करण्यात आला. इतर जो निधी खर्च करणे आवश्यक होते तो मनपाच्या लेखाशीर्षातून आवश्यकतेनुसार खर्च करण्यात आला. यापुढे प्रत्येक निर्णयांची माहिती देण्यात येईल, असे आश्वासन ही त्यांनी दिले. त्यांनी सांगितले की कोविड-१९ ला हददपार करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, आशा वर्कर, सफाई कामगार व इतर सर्वांचे मोलाचे योगदान आहे.

विशेष म्हणजे ही बैठक कोव्हिड-१९ व पाणी या समस्येवरील चर्चेसाठी बोलाविण्यात आली होती.मात्र दोन तास बैठकीत फक्त कोव्हिड-१९ वरच चर्चा घडल्याने पाण्यासारखा मूलभूत प्रश्‍न हा मागेच पडला.

महापौरांची संयमी भूमिका-

बैठकीत जो-तो आयुक्तांना धारेवर धरत असताना महापौर संदीप जोशी यांनी मात्र संयमाची भूमिका सोडली नसल्याची चर्चा आहे.आपल्या सर्व जनप्रतिनिधींच्या प्रश्‍नांवर आयुक्त योग्य उत्तर देतील असे आदेश देताना त्यांनी एकीकडे मुंढे यांचा पदाचा आदरही कायम राखला तर दूसरीकडे जनप्रतिनिधींचेही समाधान केले. महापौर संदीप जोशी यांनी सांगितले की नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी असून त्यांना सोबत घ्यायला पाहीजे. त्यामुळे प्रशासन जे काही करते, त्याची माहिती नगरसेवकांना व्हायलाच हवी. गेल्या दोन महिन्याच्या काळात महापौरांसह कुणालाही मनपा प्रशासनानी माहिती दिली नाही. त्यामुळे यापुढे प्रत्येक नगरसेवकांना विश्वासात घेऊन कामे करावी. पदाधिकारी आणि प्रशासन मिळून कोरोना ला हददपार करु, असेही ते म्हणाले. आतापर्यंत प्रशासनाने घेतलेल्या सर्व निर्णयांची प्रत महापौर कार्यालयाला पाठवावी. दटके यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर महापौरांनी गांधीनगर रुग्णालयाची माहिती तीन दिवसांत सादर करावी, असेही निर्देश  दिले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या