

(प्रतिनिधिक छायाचित्र
बजाज नगर रेस्टॉरेंट ब्लॅकमेलिंग प्रकरण
नागपूर,ता.१५ फेब्रुवारी २०२२: बजाज नगर येथील एका फॅमिली रेस्टॉरेंटमध्ये जाऊन फूकट खाण्या-पिण्याचे व वरुन रेस्टॉरेंट मालकांनाच मानबिंदूच्या पत्रकाराद्वारे धमकावण्याचे प्रकरण काल ‘सत्ताधीश’ने उघडकीस आणले होते.यावर ’ताे मी नव्हेच’ही भूमिका घेत मी त्या रात्री जेवणाच्या बिलाचे रितसर भूगतान केल्याचा दावा पत्रकार महोदयांनी केला.९५५ रुपयांचे ऑन लाईन बिलाच्या भूगतानीचा फोटोही व्हॉट्स ॲपवर पाठवला,एवढंच नव्हे तर रेस्टॉरेंट मालक माझा खूप चांगला मित्र असून त्याचा गैरसमज झाला असल्याची पुश्ती जोडत, मीच अनेकदा मित्रत्वाच्या नात्याने त्याला पोलिसांच्या ससेमि-यापासून सावध राहण्याचा सल्ला देत होतो,अशी पत्रकार महोदयांनी आपली बाजू मांडली.मी दूर्गा देवीचा परम भक्त असून माझ्या विरोधात षडयंत्र करणा-यांचा नक्कीच नायनाट होईल असा त्रागा देखील त्यांनी व्यक्त केला.फार संघर्षातून मी वर आलो असून माझ्या यशावर जळणारे असंख्य विरोधक व हितशत्रू असल्याचे व तेच कटकारस्थान करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
रेस्टोरेंट मालकाला पत्रकार महोदयांनी पाठविलेली स्लीप पाठवून याबाबत विचारले असता,११ फेब्रुवारी रोजी १० वाजताच्या जवळपास तो सगळा राडा झाला असल्याचे त्यांनी सांगितले.नेहमीप्रमाणे रेस्टॉरेंटमध्ये अनेकांना घेऊन येऊन, जेऊन जाताना मॅनेजरने बिल मागितले असता,त्यांच्या तोंडावर बिल फेकत ’हे बिल जाऊन तुझ्या बापाला दे’अश्या शब्दात त्या पत्रकाराने मॅनेजरचा पानउतारा केला,याबाबत मॅनेजरने माझ्याकडे येऊन आपबिती सांगितल्याने मी त्या पत्रकाराला समजावण्यासाठी आलो मात्र तो आपल्याच तो-यात किंबहूना दारु आणि यशाच्या नशेतच होता.बिल तर तुम्हाला भरावेच लागेल,अशी आग्रही मागणी मी रेटून धरली,पत्रकाराशी बोलत बोलत कारपर्यंत आलो,बिल भरण्यासाठी बरीच हुज्जत झाल्याने रात्री पावणे बाराच्या सुमारास त्या पत्रकाराने कोण्या रॉबिन नावाच्या सोबतच्या माणसाच्या मोबाईलवरुन ऑन लाईन ९५५ रुपयांचे बिल भरल्याचा रेकॉड आमच्या संगणकामध्ये देखील आहे मात्र ते बिल पत्रकार महोदयांनी स्वत:च्या खिशातून न भरता इतर कोणाकडून भरले असल्याची माहिती रेस्टोरेंट मालकानी दिली.

विशेष म्हणजे हे एकमेव बिलच पत्रकार महोदयांनी अश्या प्रकारे भरले नाहीत तर गेल्या दोन वर्षांपासून ते असेच ’मुर्गे’शोधून रेस्टॉरेंटमध्ये येत आहेत,बहूतांश वेळा तर हे आपलेच हॉटेल आहे,बिल देण्याची गरज नाही,असे सांगून बिल न देताच निघून जात होते,तर काही वेळा ते ज्या ‘गुर्गे आणि मुर्गे’ पकडून आणत असत त्यांच्या करवी बिल पेड करीत असे.महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या मानबिंदूमध्ये आपली बातमी छापून येऊ नये,आपली बदनामी होऊ नये यासाठी अनेकांनी भीती पोटी किवा गरजेपोटी या पत्रकाराच्या ‘अय्याशीची’ बिले फेडली आहेत मात्र अनेकांनी या पत्रकाराचा वृत्तपत्रातील ‘वचक’ बघता फूकट खाण्याचा आस्वाद लृटला जो कदापि समर्थनीय नाही,वरुन आमच्या रेस्टॉरेंटमध्ये एका फोनवर पोलिसांना बोलावणे,आमच्या हॉटेलची झाडाझडती घेणे,हे आमच्या प्रतिष्ठेला आणि आमच्या रोजीरोटीच्या व्यवसायाला अकारण धक्का पोहोचवणारेच त्याचे कृत्य होते,त्यामुळे त्यांच्या विरोधातील तक्रार काहीही झाले तरी मागे घेणार नसल्याचा निर्धार रेस्टारेंट मालक व्यक्त करतात.
या पत्रकाराने गेल्या दोन वर्षात दर बुधवारी आपल्या कूटूंबिंयांना फूकट खाऊ-पिऊ घातले,त्यात कुटूंबाचा काहीच दोष नाही,मी देखील त्यांच्या कुटुंबियांना दोष देत नाही मात्र फक्त एका मोठ्या आणि नामांकित वृत्तपत्रात काम करीत असल्याचा रुबाब दाखवत मला ज्या पद्धतीने ’तू असा कस धंदा करतो,दाखवतो तुला’अश्या धमक्या देण्यात आल्या,माझ्या रेस्टॉरेंटमध्ये पोलिसांना कारवाईसाठी पाठवण्यात आले,त्याला माफी नाहीच.गेल्या अनेक महिन्यांपासून बजाज नगर येथील हॉटेल्समध्ये दारु विक्री किवा दारुचा पुरवठा होत नाही हे पोलिसांना देखील माहिती आहे.मी स्वत:माझे हॉटेल हे फॅमिलीसाठी परिवर्तित केले आहे.सभ्य लोकं माझ्याकडे जेवायला येतात,मात्र या पत्रकाराने शहरातील गुंड,गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना,अडचणीत सापडलेल्या व्यापा-यांना या ठिकाणी आणून ’तोडपाणी’चे ठिकाण बनवले याला मी त्रस्त झालो आहे.
वरुन त्याच्याच एका हमप्याला,हमनिवाल्याने आमच्याशी कोणतीही चर्चा न करता व खरेखोटे जाणून न घेता १२ फेब्रुवारी रोजी स्वत:च्या हिंदी दैनिकात आमच्या रेस्टोरेंटविषयी नाव न छापता भली मोठी बातमी प्रसिद्ध केली,ती देखील खोटी बातमी!फक्त या पत्रकाराच्या तोंडी सांगण्यावरुन! ११ फेब्रुवारी रोजी रात्री या पत्रकाराने नशेत धुत होऊन आमच्या रेस्टॉरेंटमध्ये राडा केला आणि १२ तारखेच्या वृत्तपत्रात आमच्या विरोधात बातमी ही प्रसिद्ध झाली?हा आमच्या पोटापाण्यावर पाय देण्यासारखा प्रकार नाही का?माझी बायको एका शाळेत टिचर आहे,तिच्या नावाने कर्ज घेऊन आम्ही हा व्यवसाय संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन उभारला,का?तर शहरातील काही ब्लॅकमेलर पत्रकारांनी येऊन येथे धुडगूस घालावा!वर्षानू वर्ष फूकट जेवावे?इतर गुंड,मवाली,व्यापारी,मुलीबाळींना जेऊ घालावे वरुन आमचाच बाप काढावा?‘युगायुगाने’’धर्माचे’पालन करणा-या त्या हिंदी दैनिकाने तर आपल्या त्या खोट्या बातमीत पोलिसांनाही नाही सोडले.माझे रेस्टॉरेंट हे फॅमिली रेस्टॉरेंट आहे,पोलिस विभागातील अनेक अधिकारी हे देखील माझे ग्राहक आहेत.ते परिवारासह या ठिकाणी येतात,जेवतात,बिलामधील रक्कम शे-पाचशे कमी करायला लावतात मात्र उर्वरित बिल देऊनच जातात.आजपर्यंत कोणत्याही पोलिसवाल्यांनी वर्दीचा रुबाब दाखवत फूकट जेऊन गेले नाहीत.मग फक्त एक पत्रकार असल्याने आणि पोलिसांचा धाक दाखवित,बदनामी करण्याची धमकी देत,रसूख आणि ओळखीचा फायदा घेत एका सामान्य रेस्टॉरेंट मालकांना लृटायचे तरी किती,याला काही तर मर्यादा आहे की नाही?
पत्रकारिता ही कोणाचीही बदनामी करण्यासाठी किवा सूड घेण्यासाठी असते का?
त्या पत्रकारासोबत माझे कोणतेही वैयक्तिक भांडण नाही,मात्र गेल्या दोन वर्षांपासून आम्ही जो मानसिक छळ सोसला आहे त्याचा आता कडेलोट झाला आहे.तक्रार मागे घेण्यासाठी त्या पत्रकाराच्या तीन-चार हितचिंतकांचा मला फोन देखील आला.खोटे बोलणार नाही अतिशय प्रेमाने ते पत्रकार मित्र माझ्यासोबत बोलले,एक संधी मागितली आहे मात्र आम्ही या पत्रकाराच्या ‘रगेल’ स्वभावाचा जो मानसिक त्रास भोगला आहे तो विसरणे कदापि शक्य नाही.माझ्याचसारखा मानसिक छळ भोगणारे काही व्यापारी देखील आहेत,मी असे ऐकले आहे लवकच या पत्रकाराविषयी ते देखील गंभीर बाबीवर तक्रार नोंदवणार आहेत.
पत्रकार महोदय सांगतात तसे त्यांना त्यांच्या कामगिरीवर जळणा-यांनी फसवले असे मला तरी वाटत नाही,पत्रकारितेत गुटबाजी असते यात दूमत नाही मात्र माझा त्या गुटबाजीसोबत काडीचाही संबंध नाही.या पत्रकाराची वर्तवणूक आमच्याप्रति जी होती ती माफी लायक तर मुळीच नाही.सीसीटीव्ही कॅम-यांनी टेबलवरचेही छायाचित्रण टिपले असते तर या महान पत्रकाराच्या गुणांची उधळण संपूर्ण शहरासमोर आली असती मात्र आम्ही आमच्या ग्राहकांचे खासगीपण जपतो,ते त्यांच्या कुटूंबासोबत येथे येत असतात त्यामुळे ते फार मोठे पत्रकार असले तरी आम्ही शोषित आहोत,फक्त त्यांच्या पत्रकारितेमुळे आम्हाला खूप काही सोसावं लागलं आहे,या पत्रकाराची अरेरावी,मगरुरी ब-याच काळापासून सहन केली,पत्रकार असण्याचा अर्थ तुम्ही सामान्यांच्या अंगावर चढून जाल,कसेही वर्तन कराल,धमक्या द्याल,पोलिसांकडून तपासणी करवून घ्याल,रोजीरोटीवर आघात कराल,हिंदी दैनिकामध्ये खोट्या बातम्या छापून अाणाल,असा होत नाही.
पत्रकार महोदयांनी केलेले दावे सपशेल चुकीचे आहेत,खोटे आहेत.त्यांनी पुरावा म्हणून पाठवलेले बिल हे त्यांनी स्वत:च्या खिशातून न देता इतरांच्या मोबाईलवरुन सेंड केले आहेत,ते ही मी, बिल भरल्याशिवाय जाऊ देणार नाही हा अट्टहास धरल्यामुळे रात्री बारा वाजताच्या जवळपास बिले ऑन लाईन सेंड केले,लगेच पोलिसांना बोलवाले आणि दुस-याच दिवशी युगायुगाशी धर्माचे नाते सांगणा-या हिंदी दैनिकात बदनामी करणारी बातमी देखील छापून आणली.
त्यामुळे तक्रार मागे घेण्याचा प्रश्नच उद् भवत नाही.एकच समाधानाची बाब सांगू इच्छितो पत्रकारितेच्या क्षेत्रात आजही ९० टक्के पत्रकार हे आपल्या कामाशी खूप प्रामाणिक आहेत.सगळेच पत्रकार उन्मादी,खंडणीखोर,ब्लॅकमेलर किवा स्त्रीलंपट नाहीत मात्र अश्या दहा टक्के पत्रकारांची घाण जी या पवित्र क्षेत्रात घूसली आहे त्यामुळे संपूर्ण क्षेत्रच बदनाम होतंय,पत्रकारितेची विश्वासहर्ता लयाला जातेय,अकारण सूड घेणा-या अश्याच बातम्या जर पेरत रहाल,छापत रहाल तर एक दिवस लोकांचा वृत्तपत्रातील बातम्यांवरुन विश्वासच उडून जाईल आणि तो दिवस दूर नसणार……!




आमचे चॅनल subscribe करा
