


मुंबईचा कलाकार विजय काटकर यांच्या ताल वादनाने रसिकांना लावले वेड
नागपूर: मुंबईहून तो पहिल्यांदा नागपूरला आला. आजपर्यंत सगळे शो त्याने सोलो परफॉरमेन्सचे दिले, अगदी कलकत्यापर्यंत त्याच्या साढे तीन तासांच्या शोचे दर्दी रसिक आतुरतेने वाट पहातात. यू-ट्यूबवर त्याचे लाखो चाहते आहेत, आर.डी.बर्मनच्या संचामध्ये तब्बल चौदा वर्षे ताल वादन करणारा तो कलाकार म्हणजे विजय काटकर...भारत रंग कलातर्फे देशपांडे सभागृहात रविवार दि. ३० जून रोजी आयोजित ‘बर्मनिया-२०१९’ कार्यक्रमात तब्बल वीस विविध वाद्यांवर तूफान ताल वादन करुन या अवलिया कलाकाराने नागपूरकर रसिकांना अक्षरशह: वेड लावले. सभागृहाबाहेर पडताना श्रोत्यांच्या तोंडी एकच संवाद होता तो म्हणजे,तो आला…त्याने वाजवले…त्याने जिंकले!

अॅकॉस्टिक वाद्ये आणि परकेशनचा बादशाह म्हणजे आर.डी.बर्मन. हिंदी चित्रपटसृष्टिला हजारो अजरामर गाणी त्यांनी दिली. प्रत्येक गाण्यात काहीतरी वगेळे देण्याचा आर.डी.यांचा ध्यास होता.अगदी ‘चुरालिया है तुमने जो दिल को’ मधील रिकाम्या काचेच्या ग्लासचा ईफेक्ट असो किवा ‘सागर’ चित्रपटातील ‘जाने दो ना’ मधील तबल्याचा वेगळा ठेका असो लाकडीचा तुकडा असो,मिरॅकसचा वापर असो, परकेशन हा आर.डी.च्या गाण्यातील प्राण होता. एकाच गाण्यात कितीतरी वेरिअेशन देणारा आर.डी.एक क्रांतीकारी संगीतकार होता किंबहूना आधूनिक संगीताची एक विराट लहरच होता. आर.डी.म्हणजे नुसते एक ‘प्रयोगशील मन’ होते. वयाच्या १७ व्या वर्षी विजय काटकर यांना आर.डी.नावाच्या चंदनाचा परिसस्पर्श लाभला आणि आयुष्याचे जणू सोनेच झाले. विजय यांच्या श्वासांमध्ये संगीत भिनले आहे. त्यांच्या बोटांमधील तूफान लयीची जादू नागपूरकर रसिकांनी अडीच तास अनुभवली. कार्यक्रमात त्यांनी अनेक डेमो सादर केले. कॉड्स, ब्रासो, बांसूरी, तबला,ड्रम्स, कांगो, बोंगो, घूंघरु, मिरॅकस,कंपाश,रेशो, रॉक मॅटल, खंजिरी,मटका अश्या सगळयाच वाद्यांवर विजय यांनी रसिकांना खिळवून ठेवले. आर.डीं च्या अनेक गाण्यात छोट्या छोट्या वस्तूंचा त्यांनी अप्रतिम वापर केला आहे. दोनच हात….कला अफाट…असे दृष्य नागपूरकर रसिकांनी विविध गाण्यात अनुभवले. श्रोत्यांच्या ताळयांच्या कडकडाट त्यांच्या प्रत्येक सादरीकरणाला उर्स्फूत दाद देत होता. इतक्या मोठ्या कलाकाराचा साधेपणा हा देखील रसिकांना भावला. नागपूरकर रसिकांचे प्रेम बघून विजय काटकर यांनी मंचाला साष्टांग दंडवत केले.
कार्यक्रमाची सुरवात मतिमंद मुलांच्या पालकांची संस्था ‘स्वीकार’च्या मुलांनी ‘हे शारदे मां’ या प्रार्थना गीताने झाली. यानंतर ‘बर्मनिया’ हे शीर्षक रघूनंदन परसतवार यांनी सादर केले. महेंद्र मानके यांनी आर.डी.यांची एक अप्रतिम रचना ‘तुमने मुझे देखा’ हे गीत सादर केले. दादासाहेब फालके पुरस्काराने सन्मानित पापाराव परसतवार यांनी आर.डी.आणि विजय काटकर यांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उलगडा केला. ‘मेरे सामनेवाली खिडकी मे‘‘जिधर देखू तेरी तस्वीर नजर आती है’ या गीतांच्या ट्रॅकवर विजय यांनी अप्रतिम ताल वादन केले. यानंतर रसिका करमालेकर यांनी ‘बांहो मे चले आओ’ गीत सादर केले,यात ‘शू शू शू’चा आवाज आर.डी.यांनी कसा अप्रतिमरित्या वापरला याचा उलगडा विजय यांनी केला. आर.डी.आणि ‘कॅबरा’ हे समीकरण रसिकांनाही माहिती असल्यामुळे सभागृहातून वारंवार ‘कॅबरा’ गीतांची मागणी येऊ लागली. रचना खांडेकर-पाठक हिने ‘आअो ना गले लगाओ ना’ हे गीत सादर करुन रसिकांची दाद मिळवली. ‘हम दोनो दो प्रेमी’, गुलाबी चेहरा सभी ने देखा देखा नही मगर दिल मेरा’‘झूमना झूमना हम तूम गूमसूम रात मिलन की’ ही ऑफ बिट गीते रचना हिने रघूनंदन परसतवार, किशोर नायडू, नितीन झाडे, प्रणय पराते यांच्यासोबत सादर करुन रसिकांना खिळवून ठेवले. अरुंधती रंभाड यांनी ‘ओ मेरे सोना रे सोना’ गीत सादर केले. रसिका करमालेकर यांनी ‘पिया बावरी’ हे अार.डी.यांचे हटके जॉनर असलेले शास्त्रीय गीत तयारीने सादर केले. बाल कलाकार दिपांश डोंगरे याने ‘लकडी की काठी’ गीत सादर केले. निकीता पोलकोंडवार हिने ‘ वन छू छा छा छा’हे गीत समरसुन सादर केले.
संकल्पना रघूनंदन परसतवार यांची होती. की-बोर्डवर वेदांश जाधव, कोंगो आणि ढोलकवर रघूनंदन परसतवार, ड्रम्सवर अशोक ठवरे व संजय बारापात्रे, गिटारवर अजित जाधव, बेस गिटारवर निकिता पोलकोंडवार, अर्जुन ठाकुर व अर्जुन दिवाडकर यांनी साथसंगत केली. निवेदन शुभांगी रायलू यांचे होते. कार्यक्रमात ज्येष्ठ कलावंत भोला घोष, वेदांश जाधव तसेच मतिमंद बालक अजिंक्य तातावर यांना आर.डी. बर्मन पुरस्कारने, विजय काटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बाहेर पावसाची छमछम बरसात होत असताना सभागृहात विजय काटकर यांच्या ताल वादनाच्या पावसात रसिक मनही न्हाऊन निघालेत.




आमचे चॅनल subscribe करा
