

नाटकाच्या कॅन्वहासमध्ये फिल्मी डॉक्यूमेंट्री
अभिनय,संगीत,छायाचित्रणात ‘तेरवं’ ने मारली बाजी
तळमळीच्या सामाजिक कार्यकर्तीला महिला नेत्याच्या भूमिकेत दाखविण्याचा अट्टास न रुचणारा
कलावंतांच्या कठोर परिश्रमावर पाणी फेरणारे कमकुवत तंत्रज्ञ
डॉ.ममता खांडेकर
(Senior Jounalist)
नागपूर,ता.७ मार्च २०२४ : ‘तेरवं’हे शेतक-यांच्या विधवांच्या जीवनावर आधारित नाटक नागपूरच्या भट सभागृहात ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात सादर झालं होतं.त्यावेळी हे नाटक अक्षरश:अंगावर आलं होतं.काही प्रेक्षकांनी तर मधूनच सभागृहाबाहेर पडणं पसंद केलं होतं कारण त्यांच्या अंगावर शहारे आले होते,इतकी या नाटकाची कथा आणि व्यथा संवेदनशील मनाला बोचणारी होती.त्याच नाटकावर आधारित ‘तेरवं’हे चित्रपट बघताना मात्र,विस्कळीत होत गेलेली डॉक्यूमेंट्रीसारखी ती जाणवली.
व्हेरायटी चौकातील इटर्निटी चित्रपटगृहात याचा प्रिमियम शो पार पडला.भव्य अशा पडद्यावर श्याम पेठकर लिखित इतकी सशक्त व वास्तवादी कथा ही दिग्दर्शकाला नेमकी पेलल्या गेली की नाही?अशी शंका येते.विशेष म्हणजे ‘तेरवं’या नाटकाचे दिग्दर्शनही हरीश इथापे यांनीच केले होते.मात्र,नाटक़ाचा रंगमंच आणि चित्रपटगृहाचा स्क्रीन यात खूप अंतर असतं.रंगमंचावर जितक्या सशक्तपणे ‘तेरवं’ची सशक्त कथा अंगावर येते,भव्य पडद्यावर बघताना ती कुठेही अंगावर आलीच नाही.चित्रपटातील प्रत्येक कलावंतांनी जीव ओतून काम केलं आहे.मात्र,त्यांच्या ताकदीच्या अभिनयाला एकसूत्रात बांधणारे दिग्दर्शन भव्य पडद्यावर हरवलेले जाणवले.

एका दृष्यानंतर दूसरे दृष्य यांचं तारतम्य जुळत नव्हतं.ते तुटक आणि त्रोटक वाटत गेले.मूळात चित्रपट हे हौशी नाही राहू शकत,नाटक हौशी राहू शकतात.चित्रपटाला व्यवसायिकता जपलीच पाहीजे तेव्हाच ती मायबाप प्रेक्षकांच्या ह्दयाचा ठाव घेते.या चित्रपटात व्यवसायिकतेची कमतरता प्रकर्षाने जाणवली.चित्रपटाची एडिटिंग हा सर्वात महत्वाचा भाग असतो.मुंबईच्या एडिटरकडून एडिट करण्यात आले असले तरी ‘बजेट’ची छाप इतक्या चांगल्या कथेचाही बोजवारा वाजवून गेली.बज़ेटच्या हिशोबाने निर्माते यांनी तंत्रज्ञानाची पूर्तता करुन घेतल्यानेच ‘तेरवं’चा घात झाल्याचा सूर उमटत आहे.या चित्रपटासाठी कलर कॅमरा जबरदस्त वापरण्यात आल्याचे निर्माते सांगतात मात्र,नुसतं कॅमरा महागडा असून चालत नाही,रंगसंगतीची प्रिंट जी पडद्यावर उमटली,ते रंग मनाला भावणारे नक्कीच नव्हते.
छायाचित्रकाराने कमाल केली आहे.या चित्रपटातील छायाचित्रण डोळ्याचे पारणे फेडणारे आहेत.वर्धे जवळ घाटंजी तसेच यवतमाळ जिल्ह्यात चित्रपटांचं शुटिंग झालं आहे.छायाचित्रकाराने अतिशय कल्पकतेने आपल्या कॅम-यात गावातील जिवंतपणा कॅमराबद्ध केला. कलावंतांचा अभिनय हा उत्तमच नव्हे तर जिवंत असा अभिनय आहे.कुठेही,कोणतीही,अगदी छोटीसीही उणिव अभिनयाच्या बाबतीत काढायला वाव नाही.लहानतल्या लहान पात्रांनीही आपापल्या भूमिकेत जान ओतली आहे.कलावंतांचे काम सोपे असते,तंत्रज्ञाचे काम हे फार महत्वाचे असते.हिंदी सिनेमा त्यामुळेच तंत्रज्ञानाच्या बाबतीत तसेच तंत्रज्ञांच्या बाबतीत फार पुढे दिसतो.
हा चित्रपट आणखी चांगला झाला असता मात्र चित्रपटाचा क्लायमेक्स नाटकासारखा झाला.आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या विधवांचा मानसिक,भावनिक,शारिरीक,आर्थिक संघर्ष आणि कुचंबना दाखवताना त्यांना त्याच परिस्थितीतून गेलेली जनाबाई ही सावरते,मानसिक आधार देते,लढण्याचे बळ देते,त्यांचा न्याय हक्क कुटूंबात मिळवून देते.तिच्या ‘तेरवं‘मंडळात सहभागी करुन या विधवांना रंगीत साडी नेसायला लावते,अंगावर अंलकार घालायला लावते,या मागे माणूस म्हणून त्यांच जगणं जनाबाईला महत्वाचं वाटतं मात्र,शेवटच्या दृष्यात महिलांच्या गर्दीतून हात उंचावत तिच्या प्रस्थानाला नेत्याचे रुप आले आणि इथंच कथेचा मूळ गाभा हरवल्या सारखा जाणवतो!जनाबाई ही पराकोटीची पुरुषप्रधान मानसिकता असणा-या समाजाच्या विरोधात, समाजातील महिलांसाठी,त्यांच्या सामाजिक न्यायासाठी,आत्मसन्मानासाठी,अस्तित्वासाठी, सामाजिक कार्यकर्ती म्हणून लढली,लढत राहीली,,तिचं नेत्याच्या भूमिकेतील दृष्य हे मनाला न पटणारे होते.वर्धेच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात जनाबाईचं लहानसं भाषण प्रभावी असलं आणि आत्मविश्वासाने भारलेलं असलं ,तरी त्याच तो-यात संमेलनातून निघून जाणं हे देखील प्रगल्भ बुद्धिमत्तेला न पटणारं होतं.यवतमाळच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात वैशाली येडे यांना उद् घाटक म्हणून बोलविण्यात आले होते.लेखकाची जनाबाई हे तिचं प्रतिनिधत्व करताना दिसून पडते.त्या संमेलनात पं.नेहरु यांच्या भगिनी यांना उद् घाटक म्हणून निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र,याचे ही पराकोटीचे राजकारण महाराष्ट्रात रंगले ,त्यांनी आपले उद् घाटनपर भाषण देखील तयार करुन पाठवले होते,पुरोगामी महाराष्ट्रात मात्र मनाचा एवढाही दिलदारपणा त्यावेळी महाराष्ट्रातले राजकारणी दाखवू शकले नाहीत आणि शेवटी नेहरु यांच्या भगिनीनेच वादळाचे हे रुप पाहून न येण्याचे आयोजकांना कळवले.शेतक-यांच्या विधवांना बळ देणा-या वैशाली येडे यांना त्यानंतर आयोजकांनी उद् घाटक म्हणून बोलवले आणि अख्खा महाराष्ट्र सुखावला.लेखकाने तो प्रेरणादायी प्रसंग नेमका आपल्या कथेत उस्फूर्तपणे गुंफला आहे.
लेखक श्याम पेठकर यांनी आपल्या कथेत आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या विधवांचं धगधगतं जगणं अधोरेखित केलं आहे.या विषयाला हात घालणं सोपं काम नाही.अश्या विधवांचं जगणं गांव पातळीपासून तर सरकारीस्तरा पर्यंत दखलपात्र नसतं..उलट ती आणखी नागवली जाते,गांव पटवारी, आत्महत्या करणा-या नव-याच्या प्रमाणपत्रीरुपी चार कागदांसाठी देखील त्यांना वेठीस धरतो.प्रसंगी शरीरसुखाची मागणी करतो.चित्रपटात जरी सुरवातीलाच चित्रपटातील प्रसंग काल्पनिक असल्याचा खुलासा करण्यात आला असला तरी,आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या विधवा पत्नीला शरीरसुखाची मागणी करणा-या पटवा-याची बातमी ही अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली होती.हे धगधगते व तितकेच चिड आणनारे वास्तव लेखकाने समर्पक शब्दात शब्दबद्ध केले .
चारित्र्यहीन पटवा-याच्या श्रीमुखात भडकवारी स्वाभिमानी विधवा जनाबाई ही जणू गांवखेड्यातील अशाच असंख्य अन्याग्रस्त महिलांचा आत्मसन्मान जपताना दिसून पडते.समाज जागं करण्याचं काम लेखकाची कलम करते.समाजाच्या जाणीवेत शेतकरी विधवांचं जगणं आणून देण्याचे काम त्या लेखणीचं आहे.समाज हा चालाक असतो.सरळ बोट सरकारकडे दाखवतो.त्यांच्याप्रति सरकार सोबतच समाजाची देखील जवाबदारी लेखकाची कलम निश्चित करते.
मुंबई,दिल्लीत बसून गांवपातळीवरील पाण्याच्या वाटणीचे निर्णय गाव जीवनाशी कोणताही संबंध नसणारे राजकारणी घेतात.यावर लेखकाने चपखळ बोट ठेवलं आहे.ग्राम स्वराज्याची संकल्पना लेखकाने आपल्या कथेत अलगद पेरली.नदी आमची मग आम्ही ठरवू,आम्ही किती पाणी शेतीसाठी घेऊ आणि किती सरकारला देऊ,आमची वीज आम्ही वापरु,उरलेली सरकारला देऊ,हा गांधीजींचा ग्राम स्वराज्याचा विचार प्रेक्षकांना वेगळा विचार करण्यास प्रवृत्त करतो.हाच विचार अंत्योदयमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी मांडला.अमेरिकेची विचारवंत हेजलने मांडला.जर्मनीच्या शुमांकरने मांडला. दिल्ली मुंबईत ‘आमचं’सरकार मात्र आमच्या गावात ‘आम्हीच’सरकार.ही संकल्पना प्रज्ञावंतांनाही भावते.
गांधीजींनीच म्हटलं आहे,आमचे पैसे बँकेत असतात,एक माणूस काऊंटर पलीकडे असतो एक अलीकडे असतो,अलीकडच्या माणसाला पलीकडचा पैसे देत नाही,त्याचा सर्व्हर नेहमीच डाऊन असतो.प्रत्येक गावाने आपली बॅंक स्वत: तयार करावी,जर्मनीच्या शुमांकरने हा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे.भारतात मात्र…..तो यशस्वी होऊ दिला जात नाही!
विदर्भात सर्वात जास्त वीज निर्मिती होते.सर्वाधिक प्रदुषण चंद्रपूर,नागपूर,काेराडीतील जनता सहन करते,मुंबई,पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील वीजेतून अधिकाधिक समृद्ध झाले मात्र, विदर्भाच्या वाट्याला आल्या त्या सर्वाधिक….शेतक-यांच्या आत्महत्या!यवतमाळ,वर्धा,नागपूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांची संख्या ही सतत वाढणारीच आहे.परिणामी,त्यांच्या मागे जगण्यासाठी संघर्ष करणा-या विधवांची देखील संख्या सभ्य समाजाला अस्वस्थ करीत नाही!
छायाचित्रकार सुरेश देशमाने याने खरोखरंच हा सिनेमा जिवंत केला.दिग्दर्शकाच्या बाबतीत असे म्हणने थोडे धाडसाचेच ठरेल.दिग्दशर्क हरीश इथापे यांचा हा पहीलाच चित्रपट आहे.त्यामुळे अनुभवाची पोकळी चित्रपटातही दिसून पडली.अश्यावेळी आठवतात ते जब्बार पटेल.लेखन जरी कितीही सशक्त असलं तरी चित्रपट हा दिग्दर्शकाचा चित्रपट असतो.त्याला नेमके काय दाखवायचे आहे प्रेक्षकांना,हे दिग्दर्शक ठरवित असतो.जब्बार पटेल यांनी समर नखाते यांच्याकडून स्क्रीन शिकून घेतली,मगच चित्रपट दिग्दर्शनात उतरले.समर नखाते यांनी ज्या क्षणी जब्बार पटेल यांना आता इथून पुढे जा,असे प्रमाणपत्र दिले,त्यावेळी जब्बार हे दिग्दर्शनात उतरले.नाटक,रंगमंच,कलेच्या शाखेतून चित्रपट या भव्य कॅन्व्हाससाठी त्यांची दृष्टि बदलली त्या क्षणी ते पुढे गेले.मला हे नाही समजत,हे मान्य करणं ही देखील फार मोठी कलाच असते.या चित्रपटात लेखकाने आपला आत्मा ओतला आहे,चित्रपट बघताना प्रेक्षकांच्या टाळ्या देखील ऐकू पडल्या मात्र,त्या दिग्दर्शनासाठी नसून संवादासाठी होत्या,हे मानावे लागेल.
‘तेरवं’नाटक अंगावर आलं होतं मात्र चित्रपट अंगावर शहारे नाही आणू शकला हे अपयश कदाचित चित्रपटातले अनेक सीन्सला लांबीच्या कारणावरुन लावण्यात आलेली कात्री,हे देखील असू शकतं.त्यामुळेच दृष्यांची संगती लागताना दिसून पडत नाही.एडिटिंग,स्क्रीपटिंग अश्या प्रत्येक टप्प्यावर निर्माताने ‘बजेट’चा विचार केल्याचा जाणवंत.परिणामी कलावंतांचा जिवंत अभिनय देखील ‘थ्रेटीकल’वाटत होता.हे अपयश कोणाचं?
स्त्री ही माता आहे,माती आहे,सीता ही जमीनीतून आली जमीनीतच परत गेली,बाबा आमटे सांगत असत,कालपुरुष वनवासात असताना क्रांती करतो,राजसिंहासनावर बसताच क्रांतीला जमीनीत गडप व्हावे लागले.स्त्री ही मूलं जन्माला घालते म्हणून ती माता होत नाही ती जन्मत:च माता असते,स्त्री ही माती आणि पुरुष हा आभाळ असतो.आभाळाला अस्तित्व नसतं.आभाळाला कोणाचेही हात टेकू शकत नाही कारण त्याचं अस्तित्वच नगण्य आहे.स्त्री हिचं अस्तित्व मान्य केल तरंच समस्येवर उपाय ‘माती‘ होऊ शकते,लेखकाच्या प्रगल्भ लेखणीतून उतरलेला हा विचार,दिग्दर्शक चित्रपटात दाखवण्यात सपशेल अपयशी ठरले,यात शंका नाही.
निर्माता नरेंद्र जिचकार यांचा ‘कोमार्य’चित्रपटा नंतर ‘तेरवं’हा दुसरा चित्रपट आहे.याच कथानकावर चित्रपट का करावासा वाटला?चित्रपटातील उणिवा बजेट आणि वैशिष्ठांविषयी चित्रपटाची स्क्रीनिंग झाल्यावर ‘सत्ताधीश’ने विचारले असता,उद्या सांगतो असे उत्तर त्यांनी दिले.दूस-या दिवशी पुन्हा त्यांना कॉल केल्यावर नंतर बोलतो असे सांगितले व नंतर ते बोललेच नाही!
सगळ्यात शेवटी चित्रपटाला उत्कृष्ट दर्जापर्यंत पोहोचवणारा नायिका किरण खोजे व नायक संदीप पाठक यांच्या अभिनयाला मानाचा मुजरा.‘बिथरली बाई आता वणवा झाली बाई’हिंडोळ पेंडसे याच्या आवाजातील हे गाणे अप्रतिम झाले आहे.तेरवं मंडल बाई.तेरवं माय आसवांची दान बाई खलबत्त्यात खांडका वो माय’हे गाणं देखील श्रवणीय आहे.संगीतकार वीरेंद्र लाटणकर याने सुरेल चाली गाण्याला लावल्या आहेत.आकांक्षा नगरकर,श्रृती जैन,यामिनी पौगम,सायली डहालकर यांची गाणी देखील श्रवणीय आहे.
थोडक्यात,अस्सल मराठमोळ्या वैदर्भियांचे वैभव असणारा हा चित्रपट निदान वैदर्भियांनी तरी एकवेळा नक्की बघावा.
…………………………….




आमचे चॅनल subscribe करा
