

पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला तज्ज्ञांनी विशद केले पर्यावरणाचे महत्व
या पृथ्वीतळावरील एक ही वस्तू टाकाऊ नाही
इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सने हिरावले नैसर्गिक लहानपण
आधीची पिढी पर्यावरण रक्षणात हिरो,आताची विलेन
नागपूर,(Nagpur)ता.४ जून २०२२: अवघ्या सजीव सृष्टिच्या अस्तित्वासाठी संपूर्ण ब्रम्हांडामध्ये फक्त एकच पृथ्वी आहे,या पृथ्वीच्या अस्त्विात सभोवतालचे एकूण पाच घटक महत्वाचे असतात,वातावरण,भूगर्भातील नैसर्गिक संसाधने,पाणी,सजीव सृष्टि आणि वनस्पती.यांचा-हास म्हणजे निसर्ग चक्राचा -हास त्यामुळेच मानवाने निसर्गाचे रक्षण केल्यास निसर्गही सजीव सृष्टिचे रक्षण करेल,असा सूर आज जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला प्रेस क्लब येथे वनराई फाऊंडेशन व प्रेस क्लबतर्फे आयोजित चर्चासत्रात उमटला.‘पर्यावरण वास्तव व विपर्यास’या विषयावर हे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.
मंचावर प्रमुख वक्ते म्हणून नीरीचे माजी संचालक डॉ.सतीश वटे,माजी प्रधान मुख्य वन संरक्षक प्रकाश ठोसरे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका व नेचर क्लबच्या संस्थापिका डॉ.अर्चना मेश्राम उपस्थित होते.अध्यक्षस्थान प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी भूषवले.
१९७२ साली सर्वप्रथम संयुक्त राष्ट्र संघाने जगभरात ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात केली.स्टॉकहोम या देशात पहीली जागतिक पर्यावरण परिषद पार पडली होती.दर वर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन या परिषद पार पडत असतात.या वर्षी स्वीडन या यजमान देशात ही परिषद पार पडणार आहे.

याप्रसंगी बोलताना डॉ.अर्चना मेश्राम म्हणाल्या,की अवघ्या सजीव सृष्टिला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी एकच पृथ्वी उपलब्ध आहे.या पृथ्वीचा -हास होता कामा नये.आपले आई-वडील,आजोबा,पूवर्जांनी आपल्या पिढीला प्रदुषनमुक्त अशी पृथ्वीची धरोहर सोपवली होती.त्यांनी पृथ्वी किवा निसर्गाचे बेजवाबदारपणे दोहन केले नाही तरी ते समाधानी होते.आजची पिढी मात्र ‘सॅण्डवीच’पिढी झाली आहे.मोबाईलसारख्या गॅझेट्समुळे मानवी संवाद तर हरवलाच आहे मात्र घातक किरणांच्या दुष्परिणामांचीही आपण परवाह करीत नाही.एका वाळलेल्या झाडात ही वाळवींचे आश्रयस्थान असते हे आपण पार विसरलो आहोत,वाळलेले तर सोडा आपल्याला आपल्या अंगणात कचरा होतो म्हणून हिरवेगार झाड देखील नकोसे झाले आहेत.
आपण जास्त उत्पन्नाच्या लोभापायी पृथ्वीवरील अन्नधान्याच्या उत्पादनात जो रसायनाचा मारा करीत आहोत त्यांनी पृथ्वीचा पोत तर बिघडतोच मात्र त्या रसायनातील सुक्ष्म कण आपल्या शरीरात देखील सहज प्रवेश करतात व कर्करोगासारख्या असाध्य रोगांना निमंत्रण देताना आढळतात.आपण एकीकडे गायीला मातेचा दर्जा देतो दूसरीकडे तिचे नैसर्गिक खाद्य सोडून तिला श्रीखंड-पुरी,भजे-वड्यांचे पान खाऊ घालतो त्यामुळेच तिला पोटाचे विकार सहन करावे लागतात,अधिक पैश्यांच्या हव्यासापोटी व अधिक लिटर दूध मिळवण्यासाठी गायी-म्हशींना हानिकारक औषधीयुक्त इंजेक्शन्स टोचले जातात आहेत,यामुळे लहान मुलांच्या नैसर्गिक जनुकीय गुणसूत्रांत देखील बदल घडत आहेत.फक्त एक-दोन झाडे कापली तर काय होतं?ही मानसिकताच अतिशय घातक असून अशीच प्रत्येकाची एक-दोन झाडेच नष्ट होत राहील्यास पर्यावरणाचा समतोल तर बिघडतोच मात्र देशातील पर्यटन व पर्यायाने अर्थव्यवस्थेलाही फटका बसतो.
आज आपल्या अंगणात एखादी चिमणी येते तेव्हा आपण तिचा लगेच व्हिडीयो घेण्यासाठी सरसावतो,पुढील पिढीला तर चिमण्या व इतर अनेक पशु-पक्षी फक्त छायाचित्रातच बघायला मिळणार आहेत.अंबाझरी येथील ज्या वनाला नुकतीच आग लागल्याची घटना घडली तेथील दुर्मिळ अश्या पक्ष्यांचा अधिवास कायमचा नामशेष झाला मात्र आम्हाला फक्त ती इतर ठिकाणच्या आगीसारखीच एक घटना वाटते.अजूनही वेळ गेलेली नाही,आपल्या पिढीने जे नष्ट केले ते पुन्हा कसे पुर्नजिवित करता येईल यासाठी आता प्रयत्न केले पाहिजे.आम्हाला आमच्या अंगणात एवढीशी देखील माती नको,प्रत्येक कानाकोप-यातही आम्हला टाईल्स हव्या असतात,पावसाचे पाणी भू-गर्भात जाणार कसे?याचा विचार किवा चिंतनही आपल्याला शिवत नाही.तहान घोटभर पाण्याची असते घेतो मात्र ग्लासभरुन,उर्वरित पाणी सर्रास फेकून देतो.फूटाळा,सोनेगाव तलावात गणेश विसर्जनानंतर नेचर क्लबच्या विद्यार्थ्यांनी जो तलाव स्वच्छतेचा ध्यास घेतला त्यातील अनेक व्हिीडयोज हे भाविकांना विचारप्रवण करणारे आहेत,अनेक भग्न मूर्तींवर दुस-या दिवशी डूकरांचे विचरण होत असतात!वस्तीतील गरीब मुले माळा-मोत्यांसाठी घाणेरड्या पाण्यात तुंबत असतात,अनेक प्रकारच्या मासोळ्या या मरण पावलेल्या असतात.‘आस्था आणि पर्यावरण’ यांचा मेळ साधला गेला पाहिजे.
पर्यावरण संबंधी आपल्या देशात अनेक कायदे आहेत.शासन-प्रशासन आहे मात्र पर्यावरण संरक्षणासाठी शाश्वत उपाय हे फक्त जागरुक नागरिक म्हणून प्रत्येकालाच योजावे लागणार आहेत.आपल्या पाल्यांमध्ये पर्यावरणासंबंधीची जागरुकता अगदी विद्यार्थी दशेपासूनच निर्माण करा.तुम्ही अर्धा तास पुस्तक वाचाल तर तुमचे पाल्य ही पुस्तक हातात घेण्यास प्रवृत्त होतील,पालक म्हणून तुम्ही पाल्यांसमोर फक्त मोबाईलच स्क्रोल करीत राहाल तर तुमची मुले ही वयाच्या चौथ्याच वर्षी मोबाईलमधील इन्सटाग्राम,व्हॉट्स ॲप,ट्वीटर आणि फेसबुकच्याच जगात वावरायला शिकतील.अनावश्यक हॉर्न वाजवणे टाळा,ध्वनि प्रदुषणाने मानवाच्या मेंदू पेशींनाही हानि पोहोचत असते,एवढा साधा विचारही आपण प्रदुषणाच्या बाबतीत करीत नाही असे विश्लेषण डॉ.अर्चना यांनी मांडले.

याप्रसंगी बोलताना प्रकाश ठोसरे यांनी पृथ्वीची निर्मिती ४५० कोटी वर्षांपूर्वी झाली असल्याची सांगितले.३५० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर सर्वात आधी वनस्पतींच्या रुपात सजीव सृष्टि निर्माण झाली.५० हजार वर्षांपूर्वी वन्य प्राणी सृष्टिवर अवतरले.गणितीयरित्या मानवाचा विचार करायचा झाल्यास ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीला चार मिनिटे शिल्लक असताना तो या पृथ्वीवर आला आणि याच चारच मिनिटात तो या पृथ्वीच्या विध्वंसासाठी कारणीभूतही ठरला,हे एकवेळा लक्षात घेतले तर पुढील गोष्टी सोप्या होतात असे ते म्हणाले..याप्रसंगी त्यांनी मेळघात येथील जंगलात त्यांच्या सात वर्षांच्या नोकरीनिमित्त आलेले वन्यजीवांसंबधींची माहिती व अनुभव स्लाईड शोच्या माध्यमातून दिली.
दीडशे वर्षांपूर्वी मेळघात हे या पृथ्वीवरील सर्वात सुंदर व घनदाट जंगल होतं.इंग्रजांनी मात्र सागवानातून पैसे कमविण्यासाठी या ठिकाणी अधिकाधिक लेबर आणलेत,त्यांचे कॅम्प मग वस्त्या वसवल्या.यानंतर हळूहळू वन्य प्राण्यांच्या हक्काच्या अधिवासावर मानवाने कश्याप्रकारे हस्तक्षेप व अतिक्रमण केले याचे विस्तृत विवेचन त्यांनी केले.पर्यावरणाचे रक्षण करणारे,पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखणारे आधीच्या पिढीची माणसे ही हिरो ठरली आताची पिढी मात्र विलेन झाली आहेत,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.आज पर्यावरणातून बरेचशे प्राणी कायमचे नष्ट झाले.भारतात तर १९५० सालीच ‘चिता’सारख्या प्राण्यावर नामशेष होण्याची वेळ आली.हा चिता चिंकारा,काळवीटसारख्या प्राण्यांचे भक्षण करुन पर्यावरणाचे संतुलन अबाधित राखत होता.देशात एकेकाळी ४० हजार सिंह होते आज २०२२ मध्ये त्यांची संख्या १९०० वर आली आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या दूरदृष्टितून सिंहांचे रक्षण करण्यासाठी १९७२ सालीच ‘प्रोजेक्ट टायगर‘ही संकल्पना भारतात प्रभावीपणे राबवली.यासाठी स्टाफ आणि व्हीकल्स उपलब्ध करुन दिलेत.काश्मीरचे राजे हरीसिंह यांचे पूत्र कर्णसिंह यांनी देखील केंद्रिय मंत्री असताना या चळवळीला मोलाचे सहकार्य केले.१९७२ साली एका आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये जागतिक दर्जाचे पर्यावरण तज्ज्ञांनी भारतात १९८२ ते १९९२ पर्यंत वाघ हे नामशेष होतील असे भाकीतच मांडले होते मात्र इंदिरा गांधी यांच्या ‘प्रोजेक्ट टायगर’चळवळीने त्यांचे हे भाकीत खोटे ठरवले.आज २०२२ मध्येही भारतात वाघ आणि सिंहांचे अस्तित्व दिसून पडत आहेत.एकेकाळी राजस्थानच्या रणभंभाेर आणि मध्यप्रदेशच्या पन्ना या जंगलात वाघांची संख्या ही शून्य झाली होती. या जंगलांमध्ये विमानाने वाघ-वाधिणींना सोडण्यात आले होते,आज त्या जंगलांमध्येही ६४ च्या वर वाघ आणि सिंह आढळतात.याचे श्रेय अर्थातच वनक्षेत्रातील फ्रंट लाईन स्टाफलाही देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी बोलताना डॉ.सतीश वटे यांनी पृथ्वीच्या सभोवतालच्या पाच घटकांचे विस्तृत वर्णन केले.बायोस्पीअर,हायड्रोस्पीअर,जियोस्पीअर,लिथोस्पीअर आदी घटकांचे गुणविशेष उलगडून दाखवताना हे सर्व घटक एकमेकांशी जुळलेले असल्याचे सांगितले.एकाही घटकाचा समतोल बिघडल्यास इतरही घटकांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात,असे ते म्हणाले.आज पर्यावरणाचा जो -हास झाला आहेत त्यात वन्य प्राण्यांना तर हक्काचे २५ किलोमीटरचे जंगलातील नैसर्गिक अधिवासही,त्याच्यासाठी मानवाने सोडले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.तमिळनाडूसारख्या राज्यात पाण्याची पातळी जवळपास संपुष्टात आली आहे कारण पावसाचे पाणीच जमिनीत जिरवलं गेलं नाही.आज सुखलेले तलाव,सुखलेल्या नद्या ही भविष्यकाळातील धोक्याची घंटाच अधोरेखित करीत आहेत.‘नमामि गंगे’सारख्या प्रकल्पात तत्कालीन केंद्रिय मंत्री उमा भारती यांनी माझा सल्ला मागितला तेव्हा मी हाच सल्ला दिला,ती गंगा आहे अर्थात वाहता खळखळता झरा आहे,निसर्गत:तीच स्वत:ला शुद्ध करीत वाहत राहील फक्त मानवाने गंगेत जे उद्योगांचे व सांडपाण्यांचे गावोगावीचे दूषित व रसायनयुक्त पाणी सोडले आहेत त्यांचा प्रवाह बंद करा,गंगा आपोआप स्वच्छ होईल.नद्या सारंख्या जीवनदायिनी स्त्रोत्रांना आधी आम्हीच दूषित करतो नंतर आधूनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ते स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतो!नद्या या दूषित होणार नाहीत या प्रयत्नांची सुरवात आपल्यापासूनच करावी लागणार आहे.
शहरातील ४०० टन कच-यापासून बायोगॅस तयार होऊ शकते.कच-यापासूनच उत्तम दर्जाचे खतही तयार होऊ शकतात.या पृथ्वीवर एकही वस्तू टाकाऊ नाही,असे ते म्हणाले.तुम्ही निसर्गाचं रक्षण करा,निसर्ग तुमचं रक्षण करेल.सुरवात फक्त स्वत:पासून करा.घरातच ओला आणि सुखा कचरा वेगवेगळा काढून दिल्यास भांडेवाडीसारखे कच-याचे पहाड कोणत्याही शहरात रचले जाणार नाहीत.पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्यास रेन वॉटर हार्वेस्टिंगसारखी उपाययोजना राबवा.अंगणात जागा असेल तर झाडे लावा.एकेकाळी १०० फूटांवर बोअरवेलला पाणी लागत होते आज ६०० ते १२०० फूट खोल खोदले तरी पाणी लागत नाही,ही निसर्गाने मानवाला दिलेली धोक्याचीच पूर्वसूचना आहे.आम्ही समस्यांवर भरभरुन बोलतो मात्र समाधान काढत नाही.सांडपाण्यांवर प्रक्रिया केल्यास शहरातील बगिचे व खेळाची मैदाने यांना पाणी सहज उपलब्ध होईल.एका झाडापासून माणसाला फायबर,फर्टीलायझर,फ्यूल आणि फळ मिळतात,त्यामुळे वडाचं,पिंपळाचं आणि कडू लिंबांची झाडे अधिकाधिक लावा.पुढच्या पिढीसाठी तरी लोकांनी मनावर ही बाब घ्यावी व अधिकाधिक झाडे लावावी.
सिंगापूरमध्ये प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची नदी शहराच्या मधून वाहते तेच भारतात का शक्य होऊ शकत नाही?आज अद्यावत तंत्रज्ञान मानवाला उपलब्ध झाले आहेत त्याचा उपयोग कधी करणार?पर्यावरणाला सुधारण्याची गरज नाही,स्वत:ला सुधरवा.पर्यावरण स्वत:ला आपोआप रिकवर करीत असताे.एकेकाळी टेकडी गणपतीच्या पलीकडे फक्त झाडेच दिसत होती,महाल सारख्या भागातील हिरवळही आज नामशेष झाली आहे. रेल्वे स्टेशनवर प्रवाशी नळांना सरळ तोंड लाऊन पाणी पित असे कारण त्याकाळी माणसाची इम्यूनिटी पॉवर खूप स्ट्रांग होती.विश्वास होता,आम्हाला काहीच होणार नाही,आज असं घडतं का?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रदीप मैत्र यांनी आजच्या पर्यावरणीय चर्चेत उपस्थित तज्ज्ञांनी शास्त्रीय उद् बोधन करुन समाधान सांगितले असल्याचे उद्त केले.जागरुक नागरिक म्हणून आपले दायित्व काय आहे?याची जाणीव करुन दिली.डॉ.अर्चना मेश्राम यांनी तर ‘नेचर क्लब’ नावाने विद्यार्थ्यांची एक चमूच तयार केली जी पर्यावरणासाठी उल्लेखनीय काम करीत आहे,असे गौरवोद्गार त्यांनी काढले.ठोसरे यांनी वन्य प्राण्यांच्या बाबतीत उपयुक्त माहिती दिली तर डॉ.वटे यांचे उद् बोधन व विचार करण्यास बाध्य करतात,असे ते म्हणाले.आम्ही आमच्या पारंपारिक जीवनशैलीपासूनच दूर जात आहोत,हे वास्तव आहे.वडाची पूजा,नागाची पूजा,निसर्गाची पूजा,सुर्याला अर्ध्य देणे,गंगा,गाय हे सगळे हिंदू धर्मियांसाठी आस्थेचे विषय राहीले आहेत.अलीकडे या सर्व बाबींकडे आपले दुर्लक्ष होत असून यावर चिंतनाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादीत केले.१९७३ साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरण रक्षणासाठी जे केले ते अतिशय स्तुत्यच होते,अशी पुश्ती त्यांनी जोडली.१९ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस देशात पर्यावरण दिन म्हणून साजरा झाला पाहिजे,अशी मागणी करत केंद्र असो किवा राज्य त्यांनी प्रदुषण विभागाच स्थापिले यातून त्यांची दूरदृष्टि ठलकपणे अधोरेखित होते,असे मैत्र यांनी सांगितले.
प्रास्ताविकेत वनराईचे उपाध्यक्ष अजय पाटील यांनी ई-कचरा,प्लास्टिक यांचे धोके विशद करीत लोखंड,सिमेंटचे कारखाने कश्याप्रकारे पर्यावरणाचा -हास करीत आहेत याचा उल्लेख केला.वनराईच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला.
सूत्र संचालन वनराईचे नितीन जवकर यांनी केले तर आभार वनराईचे सचिव निलेश खांडेकर यांनी मानले.
कार्यक्रमाला शहरातील ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी ज्यांनी सोनेगाव तलावाच्या संरक्षणासाठी प्रदीर्घ अशी न्यायालयीन लढाई लढली ते गोपालराव ठोसर यांची विशेष उपस्थिती होती.




आमचे चॅनल subscribe करा
