

धम्मगाथा पठणाच्या गजरात धम्मक्रांतीला अभिवादन
धम्मदीक्षेचा ६४ वा वर्धापन दिन: दीक्षाभूमी, संविधान चौकासह वस्त्यांमध्ये रोषनाई
नागपूर, ता. २६: कविवर्य सुरेश भटांचे सुंदर शब्द आहेत ‘तुझेच धम्मचक्र… तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी…तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी….’कोरोनाचे संकट असल्यामुळे दीक्षाभूमीवर साजरा होणारा ६४ वा धम्मक्रांती दिन अतिशय साधपणाने साजरा झाला. ज्या दीक्षाभूमीचा परिसर निळ्या पाखरांचे थवे दिसत होते, मात्र यंदा प्रथमच दीक्षाभूमीवर भीमसागराला उधाण आले नाही. निळ्या पाखरांचे थवे दिसलेच नाही. चोहीकडे केवळ खाकी वर्दीतील तैनात पोलिस दिसत होते. मात्र हजारो अनुयायी दीक्षाभूमीपर्यंत येत होते. दीक्षाभूमी परिरसरात क्रांतीसूर्याला अभिवादन करता येत नसल्याने दूरूनच अभिवादन करण्यात आले. उपस्थितांच्या ओठावर एकच गाणे होते, ‘एवढेच आहे खरे, दीक्षाभूमी तूच आमची सावली, तूच आमची माऊली’, ही भावना व्यक्त करीत आल्या पावली परत जात होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला समितीतर्फ अभिवादन करण्यात आले. बुद्धवंदना ग्रहण करण्यात आली. यावेळी २२ प्रतिज्ञांचे प्रथमच वाचन झाले. यानंतर जगात शांतता नांदावी या हेतूने भिख्खू संघातर्फे धम्म गाथा पठनाचा अनोखा गजर बुद्धमुर्तीसमोर झाला. रविवारी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे निमित्त साधून शहरभरात साधेपणाने बुद्ध विहारात बुद्ध, धम्म आणि संघ वंदना घेण्यात आली. तर दीक्षाभूमीवर लाखोंच्या संख्येने येणारा अनुयायी दिसला नाही. जगात शांतता, कल्याण व बंधुभाव वाढीसाठी तथागत गौतम बुध्दांचा विचार प्रवर्तीत होईल अशी कामना दीक्षाभूमीतील गाधा पठनातून देण्यात आली. संविधान चौकात बुद्ध वंदना घेण्यात आली. बौद्ध अनुयायांनी घरीच बुध्दवंदना घेतली. बुध्द विहारातही बुध्दवंदनेसह २२ प्रतिज्ञांचे वाचन करण्यात आल्या.
दीक्षाभूमीवरील बुद्ध वंदना धम्मगुरू तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडक स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जून सुरई ससाई यांनी दिली. स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, सदस्य विलास गजघाटे, एन.आर.सुटे तसेच बौद्ध भिख्खू यांच्या उपस्थितीत दीक्षाभूमी परिसरातील तथागत गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर स्तुपाच्या आत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीला अभिवादन करण्यात आले. भिक्खूगणांनी गाथांचे पठण सुरू केल्यानंतर या परिसरात शांतता होती. ६३ वर्षाच्या इतिहासत १४ ऑक्टोबर, १९५६ नंतर एवढया साधेपणाने धम्मचक्रप्रवर्तनदिन साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
समता सैनिक दलातर्फे मानवंदना
दीक्षाभूमी परिसरात समता सैनिक दलाच्या सैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला मानवंदना दिली. येथील परिसरात असलेला तथागत बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यानंतर कवायत करण्यता आली. पोलिसांची गर्दी असल्यामुळे समता सैनिक दलाचा जत्था बाहेर न येता, येथेच विसर्जित करण्यात आला. विशेष असे की, एकाही अनुयायाला पोलिसांनी दीक्षाभूमीची सीमा पार करू दिली नाही. चोहीकडे बॅरीकेट्स लावले होते. अनेक अनुयायांनी बाहेरूनच अभिवादन केले.
संविधान चौकात गर्दी
कोरोनाचे सावट असताना अनुयायांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळयाला माल्यार्पण करण्यासाठी अंतर राखून आले. शहरातील साडेचारशे बुद्ध विहारांमध्ये बुद्धवंदना घेण्यात आली. विशेष असे की, पुर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये सामुहीक वंदना घेण्यात आली. २२ प्रतिज्ञांचे वाचन करण्यात आले. इंदोरा चौकातील नामांतर शहीद स्मारक परिसरात अन्याय अत्याचार परिषदेचे आयोजन करण्यात आले. ऑनलाईन पध्दतीने वाहिन्यांवर धम्मचक्रप्रवर्तनदिनानिमीत्त परिषद व व्याख्याने झाली. शहरातील वस्त्या यावेळी पंचशील झेंड्यांनी सजविण्यात आल्या.




आमचे चॅनल subscribe करा
