Homeनागपूर न्यूजतुझमे रब दिखता है यारा मैं क्या करु.....

तुझमे रब दिखता है यारा मैं क्या करु…..

(रमझान ईद विशेष)

मध्यरात्री रहाटे कॉलनीत ऑक्सीजन सिलेंडर पोहोचवून वाचवले आजोबांचे प्राण

बुटीबोरी ते रहाटे कॉलनीपर्यंत वेगाने घेतली धाव:शेवटचे १० मिनिटांचे उरले होते ऑक्सीजन

ताजुलवारा कमेटी सदस्यांचा ‘पारलौकिक’ उपक्रम

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १३ मे: १५ दिवसांपूर्वी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा नागपूर शहरात करोनाचा प्रकोप उच्चांकावर होता,रात्रीच्या अडीच वाजता मोहम्मद शाहनवाझ यांचा फोन खणानला तेव्हा ते बुटीबोरीच्या इंडोरामा कंपनीत गरजूंसाठी सिलेंडर भरुन घेत होते,रोहन भागवत याचा तो फोन होता,त्याचे अाजोबा हे जीवन-मृत्यूच्या दारात उभे असून शेवटच्या दोन तासांचेच ऑक्सीजन त्यांच्याजवळ उरले होते, वेळेवर त्यांना ऑक्सीजन सिलेंडर मिळाले नाही तर….!

मोहम्मद भाई म्हणाले मी तर बुटीबोरीला आहे,मला किमान ६०-७० सिलेंडर भरुन आणायचे आहेत वेळ लागू शकतो मला कितीही वेगाने यायचे म्हटले तरी दोन तास लागू शकतात.. मात्र रोहन म्हणाला,मला एका व्हाट्स ॲप ग्रूपवर तुमच्या ताजुलवारा कमेटीच्या सदस्यांचे मोबाईल क्रमांक मिळाले आणि पहीला फोन तुम्हाला लावला,काहीही करा माझ्या आजोबांचे प्राण वाचवा…..!

मोहम्मद भाईंनी कोणताही मागचा-पुढचा विचार न करता एक सिलेंडर कारमध्ये टाकले आणि…..बुटीबोरी ते रहाटे कॉलनीपर्यंत वा-याच्या वेगाने धाव घेतली….घरी पोहोचले तेव्हा….रात्रीचे ४ वाजले होते आणि….शेवटच्या १० मिनिटांचेच ऑक्सीजन आजोबांना लावलेल्या सिलेंडरमध्ये उरले होते!

भागवत कुटुंब मोहम्मद भाई यांचे आभार फक्त ओघळणा-या अश्रूंनीच व्यक्त करु शकले..!मोहम्मद भाई म्हणाले माझ्यासाठी काय हिंदू,काय मुसलमान,काय शिख,काय ईसाई सगळ्यांमध्येच ‘माझा रब वसतो ’ आणि बुटीबोरीसाठी पुन्हा निघून गेले कारण दिवस-रात्र खणानणा-या फोननुसार त्यांना अनेकांचे प्राण वाचवायचे होते…बुटीबोरीतून मग ते सकाळी ९ वाजताच उरलेले सर्व सिलेंडर भरुन घरी पोहोचले…..!

ताजुलवारा कमेटीच्या एका सदस्याकडे फोन खणानला,माझ्या घरचे तीन सदस्य करोनामुळे आधीच जग सोडून गेलेत आता…हा शेवटचा चौथा सदस्य उरला आहे,याचे प्राण वाचवा……!

नागपूर शहरातील ताजुलवारा कमेटी शेख बारी चौक ही दर वर्षी उर्सच्या वेळी अजमेर शरीफ दर्ग्यावर चादर चढवित असते,यासाठीच या कमेटीची स्थापना झाली.अजमेर शरीफ यांच्या उर्सच्याच वेळी गरीब मुलींचे लग्न, सामुहिक लग्न सोहळ्यात ही कमेटी पार पाडते.
करोना महामारीच्या काळात ही कमेटी अाता घरोघरी गरजू रुग्णांना ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुन देण्याचे सेवाकार्य करतेय.यासाठी त्यांनी अनेक व्हाट्स ॲप ग्रूप्सवर सदस्यांचे मोबाईल क्रमांकच फॉरवर्ड केलेत.सुरवातीला कमेटीच्या सदस्यांनी स्वखर्चातून ६ सिलेंडरची व्यवस्था केली मात्र एप्रिल महिन्यात करोनाचा प्रकोप एवढा वाढला व शासकीय व खासगी रुग्णालयात बेड्स मिळणे हजारो रुग्णांना दुरापस्त झाले ,ऑक्सीजन अभावी लोकं भर रस्त्यावर मरु लागलेत…त्यावेळी या कमेटीने घरोघरी उपचार घेणा-या गरजूंसाठी स्वखर्चाने तब्बल ६० ते ७० सिलेंडरची व्यवस्था केली.

एप्रिल महीन्यात १४ तारखेपासून मुस्लिम बांधवांचे रोजे सुरु झाले.रमजानच्या पवित्र महिन्यात अल्लाहतालाच्या सूचनेप्रमाणे गरजूंची सेवा करणे हीच त्याची खरी ईबादत मानत कमेटीचे हे सदस्य राेजे सुरु असताना रात्री ११ वाजता बुटीबोरी येथे दररोज ऑक्सीजन सिलेंडर भरायला निघतात.

सकाळी ७ ते ९ दरम्यान गरजूंच्या घरी पोहोचवून देण्याचे पुण्यकर्मही करतात.यात हिंदू,मुस्लिम असा कोणताही भेद ते पाळत नाही.प्रत्येक माणसात ‘रब’बघणारे हे अल्लहातालाने पाठवलेले खरे ‘देवदूतच’आहेत.

रमजानच्या पवित्र महिन्यात अनेकांच्या दूवा त्यांनी आपल्या पुण्यकर्मात कायमच्या संचित केल्या.यापेक्ष्ा दुसरी सेवा त्या अल्लाहतालाची काय असणार?

या कमेटीचे अध्यक्ष् आहेत मोहम्मद शाहनवाझ,सचिव आहेत महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे सचिव अफजल शहा,अनिस शेख,कमेटीत आहेत अनीश भाई चादरवाले,कमेटी सदस्य आहेत सामाजिक कार्यकर्ता वाजिद भाई.

अफजल भाईंना फोन केल्यास त्यांची कॉलर ट्यून कानावर पडते ‘भारत हमको जां से प्यारा है..सबसे प्यारा गुलिस्तां हमारा है…..!

अनिस भाईंच्या डीपीवर शब्द आहेत ‘तेरा नाम है या कोई दवा…जब भी लेता हूँ दर्द से आराम मिलता है…!

ही भूमी राष्ट्रीय स्वयंसेवकांची आहे..ही भूमी सरसंघचालक मोहन भागवतांची आहे…ही भूमी एखाद्या रोहन भागवतच्या आजाेबांचे प्राण वाचवण्यासाठी धाव घेणा-या मोहम्मद शहानवाज यांची देखील आहे,याचा सार्थ अभिमान नागपूकरांना वाटतो.

करोनाच्या जीवघेण्या व भीतीदायक काळात ताजुलवारा कमेटीच्या जांबाज सदस्यांच्या या सेवाकार्याला ‘सत्ताधीश’चा सलाम.

येथे साधा ऑक्सीजन सिलेंडरसाठी संपर्क-
मोहम्मद शहानवाज- 9326060786
अफजल शहा-९८२३४५५१८८
अनिस भाई- 8329266503

Latest बातम्या