फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजतुकाराम मुंढे यांचं भूत पुन्हा तरुणाईच्या मानगुटीवर! उद्या निरोप दिवशी ठेवणार डीपी

तुकाराम मुंढे यांचं भूत पुन्हा तरुणाईच्या मानगुटीवर! उद्या निरोप दिवशी ठेवणार डीपी

Advertisements

११ सप्टेंबरला गेले होते नागपूर सोडून

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १० सप्टेंबर: माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नागपूरातील कार्यकाळ अवघ्या ७ महिन्यांचा होता.२७ फेब्रुवारी २०२० मध्ये मनपा आयुक्त पदी त्यांची नागपूरात आघाडी सरकारने बदली केली होती तर ११ सप्टेंबर २०२० रोजी त्यांनी नागपूरला ‘बाय-बाय नागपूर’म्हणत निरोप घेतला होता.अख्ख्या महाराष्ट्रात तुकाराम मुंढे यांची जबरदस्त फॅन फोलोइंग बघता, राज्याच्या उपराजधानीतही याची वाणवा कशी असणार,म्हणूनच मुंढे यांचा नागपूरचा निरोप घेणारा ११ सप्टेंबर हा दिवस नागपूरातील तरुणाई त्यांचा डीपी ठेऊन निरोप दिवस म्हणून साजरा करण्याचा मॅसेज आज व्हॉट्स ॲप ग्रूपवर चांगलाच व्हायरल झाला.

मुंढे यांची नागपूरातील नियुक्ती सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्यासाठीच करण्यात आली होती असा समज सत्ताधा-यांसोबतच आजही अनेकांना आहे.रुजू होताच मुंढे यांनी सर्वात आधी कोणते कार्य केले असेल तर मनपाच्या गंभीर आर्थिक स्थितीचे कारण सांगून सर्व प्रकारची विकास कामे थांबवून सत्ताधा-यांना चांगलेच अडचणीत आणले.

यानंतर मार्च मध्ये नागपूरात करोनाने हळूहळू हातपाय पसरायला सुरवात केली यातच राज्य शासनाचा साथरोग व आपत्ती व्यवस्थापन कायदा राज्यात लागू झाला,यामुळे सत्ताधा-यां ऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाच्या हातात अमर्याद अधिकार एकवटले.याचा पुरेपूर फायदा मुंढे यांनी घेतला.

त्यांच्याच धडाडीच्या कार्यकाळात सतरंजीपूरा व मोमिमपुरासारख्या सर्वाधिक करोना बाधित भागात पोलिस विभागाच्या सहकार्याने त्यांनी अतिशय संवेदनशील समजल्या जाणा-या क्ष्ेत्राला प्रतिबंधित केले.शेकडोच्या संख्येने बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण केले.यासाठी ते अनेकांच्या टिकेचे धनी ही ठरलेत मात्र कोणाचीही व कोणतीही तमा न बाळगता त्यांनी त्यांचे कर्तव्य चोख बजावले.अर्थात याची समाज माध्यमात भरपूर प्रसिद्धी करण्यास ही ते नेहमीप्रमाणे विसरले नाहीत.

त्यांच्याच कार्यकाळात दूचाकीवर पती-पत्नीही एकत्रित प्रवास करु शकणार नाही असे ‘चमत्कारिक’नियम ही ‘मुक्या-बेचा-या’नागपूरकर जनतेने पाळले,एवढंच नव्हे तर मनपाच्या उपद्रव शोध पथकाला लाखो रुपयांचा दंड देखील भरुन दिला!नशीब घरातही पती-पत्नी किवा दोघे जण एकत्रित राहू शकत नसल्याचा तुघलकी ‘आदेश’त्यांनी काढला नाही.

महापौर संदीप जोशी यांच्या कार्यकाळात २० जून २०२० रोजी भट सभागृहात पार पडलेल्या सभेतून ते ‘ताडकन‘ उठून निघून गेलेत. ‘न भूतो ना भविष्यती‘ अशी ही मनपाच्या इतिहासातील घटना होती.सत्ताधा-यांकडून त्यांच्यावर होणारे व्यक्तीगत शाब्दिक बाण त्यांना ‘असहनीय’झाले होते.सत्ताधारी तर सोडाच पण एकमेव बंटी शेळके सोडलेत तर विरोधकांनीही त्यांच्या विकास कामांची फाईल्स मुंढे यांच्या आडमुठे धोरणात अडकल्याने त्यांच्यावर या सभेत हल्ला चढवला याने देखील ते चांगलेच ‘आहत’ झाले होते.शेवटी कोणाच्याही ‘बापजाद्यांचं’ऐकून न घेण्याची ‘पारंपारिक’सवय त्यांना इथे ही नडली.

काँग्रेसचे नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी तर ’महाराष्ट्रात ते एक संत तुकाराम होऊन गेले आणि हे एक तुकाराम आहेत’असं नामात ‘साधर्म्य’साधताच मुंढे ताडकन उठले,आपल्या टेबरवरील फाईल्स उचलल्या आणि भर सभेतून चालते झाले!महापौरांसह संपूर्ण सभागृह या आयएएस सनदी अधिका-यांचा हा हेकेकोरपणा बघून स्तंभित झाले हाते!

महापौरांनी नमती भूमिका घेत त्यांना पुन्हा सभेत बोलावण्यासाठी फोन देखील लावला मात्र ते ‘मुंढे‘होते,महापौर संदीप जोशी यांच्या फोनने ते परत येणारच नव्हते,हे प्रकरण मुंबईपर्यंत पोहोचलं अन्‌ तिथून आदेश झाला,सनदी अधिका-याचे कर्तव्य आणि अधिकार हे संवैधानिक कायद्याशी जुळलेले असतात,काहीही ‘घडले’असले तरी..त्यांना कायदा मोडता येणार नाही…!

२१ जून रोजी मुंढे सभेत पुन्हा हजर झाले मात्र यावेळी त्यांनी तोंडावरची मुखपट्टी एकदाही हटवली नाही…!६ दिवस चालणा-या या सभेत त्यांनी आत्मसन्मानावर सत्ताधारी भाजप व विराेधकांचे अनेक वार झेललेत,ही बाब सत्य आहे,२६ जून रोजी सभेच्या शेवटच्या दिवशी, त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली पण?सत्ताधारी भाजपच्या ’कद्दावर’नेत्यांनी त्यांचा प्रत्येकच मुद्दा खोडून काढायला सुरवात केली आणि यातच त्यांचा वेळ ही संपला,६ दिवस सत्ताधा-यांचं मुकाट्याने ऐकून घेणा-या मुंढेंना आपली बाजू मांडण्यासाठी ‘न्याय दृष्टिने योग्य एवढा वेळ’हेतूपुरस्सर दिलाच गेला नाही,ही वस्तूस्थिती ही संपूर्ण नागपूरकरांनी अनुभवली.अर्थात एवढ्या तनावाच्या परिस्थितीतही एकमेव तत्कालीन महापौर संदीप जोशी हे विनम्रतेने मुंढे यांची बाजू सभागृहात घेत राहीले तर विद्यमान महापौर दयाशंकर तिवारी यांनी त्या ६ दिवसांच्या सभेत सर्वात जास्त मुंढे यांच्या कार्यपद्धतीचं ‘चीरहरण’केलं.

‘आपणच तेवढे शहाणे इतर हे मुर्खाचे शिरोमणी’या थाटात मुंढे यांचा कार्यकाळ सुरु असतानाच व्यापारी वर्गाला मुंढे यांनी कायद्याच्या कचाट्यात पकडले,त्यांना व्यवसायासाठी नोंदणीची अट लागू केली आणि इथेच सगळं बिनसलं.सनदी अधिकारी या नात्याने मुंढे यांचा निर्णय अतिशय योग्य असताना नागपूरातील एकसंघ असणा-या व्यापारी वर्गाची नाराजी म्हणजे मतदारांची नाराजी असा संदेश ‘मुंबईत‘गेला त्यात मुंढे यांनी राष्ट्रवादीच्या एक तगड्या नेत्यांचा ‘वरदहस्त’त्यांच्या डोक्यावर ‘कायम’ असण्याचा‘ भ्रमात’ नागपूरातील एका मंत्र्यांची देखील नाराजी चांगलीच ओढवून घेतली होती.

या मंत्र्यांचा फोन मुंबईत गेला अन्… मुंढे यांच्या हातात बदलीचे आदेश धडकले!अशी अद्याप ही चर्चा घडत आहे.आपल्या ‘एककल्ली’कारभारामुळेच मुंढे यांची ११ वर्षाच्या कार्यकाळात १३ बदलल्या झाल्यात आणि त्यात एक नागपूरातून झालेल्या बदलीची नोंद आहे.

नागपूरकर युवा व मुंढेंचे फॅन म्हणूनच मुंढे यांचा निरोप दिवस उद्या शनिवार दि. ११ सप्टेंबर आपापल्या मोबाईलवर मुंढेंचा‘डीपी’ठेऊन साजरा करणार आहे,मुंढेंसाठी हे ही नसे थोडके.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या