
वेध महापालिकेचे (भाग-२)

तीन असो किवा चारचा प्रभाग भाजप जिंकणार १२० जागा: अविनाश ठाकरे
तीन सदस्यीय प्रभाग म्हणजे लहान पक्षांची दावेदारी समाप्त:इतर पक्षांचा त्रागा
प्रभाग पद्धतीच्या विरोधात जनतेनी न्यायालयात जावे:मनसेची भूमिका
बसप,विदर्भवादी,डावे ही मैदानात
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. २३ सप्टेंबर २०२१: काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणूका या तीन सदस्यीय प्रभागानुसार लढल्या जातील यावर शिक्कामोर्तब झाले अन् राजकीय वर्तुळात विविध राजकीय पक्षांनी यावर वेगवेगळी मते व्यक्त केली.नागपूरच्या महानगरपालिकेचा विचार केल्यास काँग्रेस या निर्णयावर समाधानी आहे तर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने यावर सोयीस्कर भूमिका स्वीकारत गेल्या वर्षीपेक्षा ही अधिक जागा यावेळी भाजप जिंकणार असल्याचा दावा ठोकला.शिवसेनेने या निर्णयाचे स्वागत करीत ‘मागची कसर भरुन काढू‘असा आशावाद व्यक्त केला आहे तर बहूजन समाजवादी पक्षाने ‘मनपावर यंदा निळा झेंडा’असा दावा दाखल केला आहे.
यातच विदर्भवादी नेते ही मागे नसून केंद्रात व राज्यात सत्ता आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करु असे आश्वासन देऊन भाजपने वैदर्भीय जनतेला फसवले आहे,असा त्यांचा संताप आहे तसेच नागपूर महापालिकेतील सत्ता फक्त भाजपसाठी वापरण्यात येत असल्याने आगामी महापालिकेची निवडणूक लढण्याचाही विदर्भ राज्य आंदोलन समितीने निर्धार जून महिन्यातच व्यक्त केला व ही निवडणूक लढणार असल्यावर शिक्कामोर्तब ही केले.यामुळे चौरंगी लढतीत पाचवे कोण विदर्भवाद्यांचंही या निवडणूकीत असणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
राम नेवले यांनी तर मनसेने केलेल्या आव्हानावर लवकरच पुढील बैठकीत विचारमंथन करुन मंत्रीमंडळाच्या तीन सदस्यीय प्रभागाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागू असे खास ‘सत्ताधीश’ला सांगितले.
दूसरीकडे बहूजन समाजवादी पक्षाने, योग्य रचना व नियोजबद्ध काम केल्यास महापालिकेवर हत्ती चिन्ह असणारा निळा झेंडा निश्चित फडकेल,असा दावा केला.बसपचे प्रदेशाध्यक्ष ॲड.संदीप ताजने यांनी हा दावा केला आहे.पक्षाच्यावतीने अमरावती येथून ‘संवाद यात्रा’सुरु करुन वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया,भंडारा येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर नागपूरात त्यांनी संघटन बळकट करण्यावर भर दिला आहे. ॲड.ताजने यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कांशीराम यांचे सत्तेच भागीदारी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे भावनिक आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.त्यांच्या या प्रतिसादाला आगामी निवडणूकीत किती प्रतिसाद मिळतो याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.मागील निवडणूकीत बसपला भाजपच्या लाटेतही १० जागा मिळाल्या होत्या.
महापालिका निवडणूकीचे वेध लागलेल्या ‘डाव्यांनीही‘ तयारी सुरु केली असून सर्व डावे एकत्र आणल्यानंतर रिपब्लिकन पक्षासोबत जाण्याचा विचार निवडणूक काळात होण्याचे संकेत भाकपने दिले आहे. किमान १८ जागांची तयारी करुन चाचपणी सुरु केली आहे.एकेकाळी डाव्यांच्या चळवळीचे केंद्र राहीलेल्या उपराजधानीत बोटावर मोजण्याइतके नेतेच आता शिल्लक आहेत.विशाल सभा गाजवणा-या डाव्यांकडे आता नाममात्र कार्यकर्ते उरले असल्याची कबूलीच हे नेते देतात.तिस-या आघाडीसाठी डाव्यांसह समाजवादी,शेकाप व अन्य पक्षांची अलीकडेच मुंबईत बैठक पार पडली,ही आघाडी नागपूरातही राहण्याची शक्यता असून लोकसभा व विधानसभेपूर्वी मनपा निवडणूकीत याची चाचपणी करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.यामुळे स्थानिक पातळीवर प्रयत्न चालले आहेत.उपराजधानीत परत आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी महापालिका निवडणूकीची तयारी सुरु करण्यात आली असून भाकपचे जिल्हा सहसचिव अरुण वनकर,राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम काळे,राज्य परिषदेचे सदस्य युगल रायलू,सचिव मंडळाचे सदस्य सुकुमार दामले,माकपचे अरुण लाटकर आदी सक्रिय झाले आहेत.
भाकप,माकप,फॉरवर्ड ब्लॉक,सोशलिस्ट युनिटी सेंटर ऑफ कम्युनिस्ट,रिपब्लिकन सेक्युलर पार्टी एकत्र येण्याची शक्यता वर्तवित भाकपने शहरात सद्य:स्थितीत १८ जागांचे नियोजन केले आहे.गेल्या निवडणूकीत २२ जागांवर लढले मात्र प्रभाग पद्धतीचा फटका बसल्याने एखाद-दोन अपवाद वगळता अन्य उमेदवारांची दखल ही घेण्यात आली नव्हती.सद्य:स्थितीत डावे एकत्र आल्यानंतर रिपब्लिकन डावी आघाडीसाठी प्रयत्न केले जाण्याचे संकेत आहे.
चार सदस्यीय प्रभागाचा फटका मागच्या निवडणूकीत शिवसेनेलाही बसला.मागील निवडणूकीत शिवसेनेचे फक्त २ नगरसेवक निवडून आले.यंदा मात्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याकारणाने उपराजधानीत शिवसेना जोमात आहे.फक्त मुख्यमंत्रीच आहे म्हणून नव्हे तर ते सर्वांच्याच आवडीचे मुख्यमंत्री असल्याचे शिवसेनेच्या गटनेत्या मंगला गवरे सांगतात.याचा फायदा यंदाच्या निवडणूकीत शिवसेनेला होणार असून शिवसेनेचे संख्याबळ निश्चितच वाढणार असल्याचा आत्मविश्वास ही त्या व्यक्त करतात.प्रभागपद्धतीमुळे मोठे पक्ष यांनाच फायदा झाला,लहान पक्षांना फटका बसला.यंदा मात्र शहरात शिवसेना वाढणार आहे,कोणत्या पक्षांसोबत आघाडी होणार हे श्रेष्ठीच ठरवतील मात्र पक्षाचा जो काही आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे यंदा शिवसैनिक, ही निवडणूक आत्मप्रतिष्ठेची समजूनच लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
विशेष म्हणजे शिवसेनेच्या वर्धापन दिनी काँग्रेसला इशारा देत नाना पटोले यांच्या स्वबळाच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री यांनी ‘तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोकच तुम्हाला जोड्याने मारतील’असा सूचक इशाराच मुख्यमंत्र्यानी दिला आहे त्यामुळे उपराजधानीत ही आघाडीतील तिन्ही पक्षांमधील ‘आघाडी किवा बिघाडी’याकडेही नागपूरकरांचे चांगलेच लक्ष राहणार आहे.
दुसरीकडे महापालिकेसाठी एक सदस्यीय प्रभागच हवा अशी ठोस भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे.आज नाशिक येथे पत्र परिषदेत बोलताना,देशात कुठेही प्रभाग पद्धती नाही फक्त महाराष्ट्रात सत्ताधारी स्वत:ला सोयीची अशी प्रभाग पद्धती जनतेवर लादत असल्याची कठोर टिका त्यांनी केली. महापालिका क्षेत्रात एक सदस्यीय प्रभाग असेल तरच संबंधित लोकप्रतिनिधी हे जनतेची तसेच परिसराची व्यवस्थित देखभाल करु शकतात,एवढंच नव्हे तर लोकप्रतिनिधींवर जवाबदारीही निश्चित होऊ शकते असे सांगत मग विधानसभेसाठी किवा लोकसभेसाठी का नाही तीन-चार आमदार-खासदारांचा मतदारसंघ करत?असा परखड सवाल ही त्यांनी केला.कालच्या मंत्रीमंडळाच्या निर्णयाविरोधात मनसे न्यायालयात गेल्यास त्याला ’राजकीय वास’येईल,त्यापेक्षा जनतेनीच मंत्रीमंडळाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जावे,असा अनाहूत सल्ला ही त्यांनी दिला.
मागील निवडणूकीत नागपूरात मनसेला भोपळा ही फोडता आला नाही मात्र २००७ व २०१२ च्या मनपा निवडणूकीत या पक्षाला आपले २-२ नगरसेवक निवडून आणण्यात यश मिळाले होते.यंदा पक्षाचे उर्जास्थान राज ठाकरे यांचा लवकरच मनपा निवडणूकीच्या अनुषंगाने नागपूर दौरा होणार असल्याने सत्ताधारी भाजप तसेच तत्पूर्वीच्या काँग्रेसच्या कार्यकाळाच्या विरोधात मनसे सैनिक संपूर्ण जोमाने रणसिंग फूंकणार असल्याचा इशारा शहरातील पक्षाचे सर्वेसर्वा हेमंत गडकरी यांनी दिला आहे.
[हे पण वाचा…..
[नागपूरात सर्वच राजकीय पक्षांचा विजयाचा दावा https://sattadheesh.com/?p=13294]]
थोडक्यात मनपा निवडणूकीचे बिगूल वाजले असून सर्वच राजकीय पक्ष आपापल्यापरिने तयारीला लागले अाहेत. मतदार राजाच्या मनातला कानोसा घेत व्यूहरचना आखण्यात गर्क आहेत.भाजप विरोधात इतर सर्वच राजकीय पक्ष हा सामना रंगणार हे मात्र निश्चित.
महतप्रयासाने मनपा निवडणूकीचा एकदाचा बिगूल वाजला हे ही नसे थोडके.इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी मविआ सरकारने या निवडणूका आधी पुढे ढकलल्या होत्या मात्र इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी निवडणूका पुढे ढकलण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही.तो अधिकार निवडणूक आयोगाला आहे,राज्य सरकार निवडणूक आयोगाच्या कामात हस्तक्षेप करीत आहे’,असा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले होते.
यानंतर ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारी आकडेवारी गोळा करण्याची तयारी सुरु असली तरी अशी आकडेवारी गोळा करण्यात राज्य मागासवर्गीय आयोगाला कितपत यश मिळतं हे येणारा काळच ठरवेल.याच आकडेवारीसाठी केंद्र व राज्य सरकारमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
याशिवाय महानगरपालिकेच्या निवडणूकीला यंदा ‘करोना’महामारीची देखील पार्श्वभूमी आहे.या भंयकर व अतिशय विदारक जैविक आपदेपासून अद्याप नागपूकर पुरता सावरला नाही वरुन पुढ्यात पुन्हा करोनाच्या तिस-या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे.पुन्हा लॉकडाऊन,पुन्हा जनजीवन विसकळीत होणे,पुन्हा अार्थिक अडचणीच्या दृष्टचक्रात अडकणे सामान्य नागपूरकराला क्रमप्राप्त असल्याने गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने करोनामुळे बेजार व उधवस्त झालेला नागपूरकर मतदार हा येत्या फेब्रुवारीत पार पडणा-या मनपाच्या निवडणूकीला कश्या मनस्थितीत किंबहूना कोणत्या ध्येयाने सामाेरे जातो?हे पाहणे उस्तुक्तेचे ठरेल.
काय म्हणताज नागपूरकर दिग्गज?-

२००२ च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार:आ.विकास ठाकरे(शहराध्यक्ष,काँग्रेस पक्ष)
२००२ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच होती,त्या निवडणूकीत काँग्रेसला प्रचंड यश मिळाले व काँग्रेसचा महापाैर झाला.यंदा देखील आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूका होणार असल्याचे घोषित केले,याचा पक्षाला खूप फायदा होई,एवढंच नव्हे तर २००२ च्या इतिहासाची नगापूरात पुनरावृत्ती होईल.३ सदस्यीय प्रभाग असल्याने काँग्रेसची संख्या वाढते तेच एक सदस्यीय वॉड रचना असल्यास अपक्ष व बंडखोरांची डोकेदुखी वाढते.घोडेबाजारीलाही वाव मिळतो.मूळात वॉर्ड पद्धतीतून निवडून जाणारा उमेदवार याला जनतेच्या समस्यांची सखोल जाणीव हवी,सभागृहात प्रश्ने विचारता यायला हवे,समस्या मांडता यायला हवे,वॉर्ड पद्धतीमुळे हे शक्य होत नव्हते.अश्या समस्या मांडणारा योग्य उमेदवार हा वॉर्ड पद्धतीमध्ये कटून जात होता.
आघाडी करुन लढायचे किवा एकल लढायचे हा निर्णय पक्ष श्रेष्ठीच घेतील मात्र काँग्रेसची दोन्ही परिस्थितीत निवडणूक लढण्याची संपूर्ण तयारी आहे.गेल्या निवडणूकी प्रमाणेच आमच्या पक्षाच्या तिकीटासाठी उमेदवारांची रांग लागली असून जिंकून येण्याची क्षमता असणा-या योग्य उमेदवारांना तिकीट दिले जाईल तसेच यंदा पुन्हा एकदा काँग्रेसचा ‘महापौर’मनपा मुख्यालयात असणार आहे.

यंदा १२० नगरसेवक भाजपचे: अविनाश ठाकरे(मनपा सत्ता पक्ष नेते)
मूळात हे जे महाविकास आघाडीचे जे सरकार आले आहे ते ‘अस्थिरतेच्या’लाटेवर स्वार होऊन आले आहे त्यामुळे यांचे निर्णयसुद्धा अस्थिर असतात.पहील्यांदा यांनी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला होता त्यानुसार निवडणूक आयोगाचे नोटीफिकेशन देखील निघाले आहे परंतु आता परत त्यांनी तीन सदस्यीय प्रभागाची घोषणा केली,हे महाविकास आघाडीचं सरकार तीन पक्षांचं सरकार असल्याकारणाने यांना भीती वाटत आहे की तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना आपण एडजस्ट केलं नाही तर एका पक्षाचे कार्यकर्ते दुसरा पक्षाचा ‘कार्यक्रम’करुन टाकतील,म्हणून यांनी हा निर्णय घेतला असं आमचं स्पष्ट मत आहे.भारतीय जनता पक्षावर तीन सदस्यीय प्रभागाच्या निर्णयाचा कुठलाही परिणाम होणार नाही कारण भारतीय जनता पक्ष हा संघटनेवर आधारीत पक्ष असल्यामुळे सर्वदूर आमचे कार्यकर्ते आहेत.
गेल्या वेळी नागपूर महानगरपालिकेत आमचे १०८ नगरसेवक होते या वेळी निश्चितपणे १२० च्या वर नगरसेवक राहतील कारण भारतीय जनता पक्ष ही संघटनेच्या आधारावर निवडणूक लढत असते त्यामुळे भारतीय जनता पक्षाला कितीही सदस्यीय प्रभाग पद्धती असली तरी काहीही फरक पडत नाही.

आघाडीचा निर्णय योग्यच:दुनेश्वर पेठे(शहराध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस)
चुकांची दुरुस्ती आवश्यकच होती.एका वॉर्डाचा प्रभाग हा आघाडीतील पक्षांसाठी डोकेदुखी ठरला असता,आघाडी सरकारचा निर्णय हा योग्यच असून शेवटी आम्ही देखील सरकारचा एक भाग आहोत.आता तीन सदस्यीय प्रभागाचा काय फायदा पक्षाला होणार हे वेळेवरच सांगू.आमची सरकार महाराष्ट्रात आहे याचा फायदा निश्चितच मनपाच्या निवडणूकीत पक्षाला होईल.आता ख-या अर्थाने जनतेच्या समस्या सुटतील.भाजपने चारचा प्रभाग केला त्यामुळे जनतेला ही न्याय मिळाला नाही.फडणवीस भाषणात सांगतात आम्ही चार चा प्रभाग केल्यामुळे जनतेला न्याय मिळाला मात्र न्याय देण्याचे काम राष्ट्रवादी करेल आणि तीनच्या प्रभागात जनतेचा विकास करुन दाखवू.

भाजप सत्तेत येणार नाही:आभा पांडे(राष्ट्रवादी नेत्या व ज्येष्ठ नगरसेविका)
तीन सदस्यीय प्रभाग असो किवा चार आता भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही.नागपूरकर जनतेनीच हे ठरवलं आहे.गेल्या पंधरा वर्षांपासून जी त्यांची कामकाजाची पद्धत राहीली आहे ती जनतेला रुचली नाही,सर्वात महत्वाचे म्हणजे करोना काळात सत्ताधारी भाजपने कश्याप्रकारे आरोग्य यंत्रणा राबवली आणि एवढ्या महामारीच्या काळातही कसा प्रचंड भ्रष्टाचार केला हे जनतेनी बघितले आहे,भोगले आहे.प्रत्येकाचा रिपोर्ट कार्ड जनतेने तयार करुन ठेवला आहे.
पहील्या लाटेच्या वेळी तर शहराचे प्रथम नागरिकच दोन महिने फिल्डवर नव्हते!जनता ही शेवटी सर्वप्रथम आपल्या समस्या आणि दू:खं घेऊन नगरसेवकांकडे धाव घेत असते,सरळ आमदारांकडे किवा खासदाराकडे धाव घेत नाही.जर नगरसेवक जनतेचे समाधान करीत नसेल तर निवडणूकीच्या वेळेस जनता ते विसरत नाही.
जे नगरसेवक काम करतात त्यांना आपल्या कामाचा प्रचार करण्याची गरज पडत नाही,जनताच त्यांचा प्रचार स्वत: करते.निवडणूकीला अद्याप सहा महिन्यांचा अवधी असला तरी जनतेने सर्व नगरसेवकांचा रिपोर्ट कार्ड बनवून ठेवला आहे त्याच दृष्टिने ते त्यांना पास-नापास करणार आहेत.

प्रभाग पद्धतीत जनतेचे अंतर्गत प्रश्नच सुटत नाही:हेमंत गडकरी(अध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
यावेळी नागपूरात मनसेला नक्कीच यश मिळेल.आमचा तसा त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोधच आहे कारण अश्या बहूसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे जनतेचे अंतर्गत प्रश्न किवा समस्या सुटत नाहीत.नागपूरातच बघितले असता शहराचे बाह्य रस्ते चांगले झाले मात्र अंतर्गत रस्त्यांची अवस्था काय आहे?मतदारांनी यासाठी कोणाला जवाबदार धरावे?
भाजपवर जनतेने प्रचंड विश्वास दाखवत गेल्यावेळी १०८ नगरसेवक निवडून दिले,जनतेच्या किती समस्या त्यांनी सोडवल्या?कारण बहूसदस्यीय प्रभाग पद्धतीत नगरसेवकांचे अस्तित्वच दिसत नाही.मी गेल्या ३१ वर्षांपासून राजकारणात आहे.महालसारख्या भागात राहतो.एकेकाळी नगरसेवक म्हटलं की किती गर्दी राहायची नगरसेवकांच्या घरी!आता प्रभाग पद्धतीमध्ये जनतेलाच आपल्या समस्या घेऊन कोणत्या नगरसेवकांकडे जावे हा प्रश्न पडतो.नगरसेवक हे देखील आपल्या जवाबदारीची चालढकल करतात.यामुळे मतदार राजा वेठीस धरला जातो.
नागपूरात एक किवा जास्तीत जास्त दोनचा प्रभाग हवा होता.याचा फायदा नागपूर शहराच्या अंतर्गत विकासासाठी झाला असता मात्र पक्षांना स्वत:चा विकास हवा आहे,मतदारांचा नाही.माझ्याच प्रभाग क्र.३६ मध्ये भाजपचे चार नगरसेवक आहेत.स्वत: स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात,लहूकूमार बहेते,पल्लवी शामकुळे आणि निधी तेलगोटे या चारही भाजपच्या नगरसेवकांनी गेल्या ५ वर्षात प्रभागाच्या किती समस्या सोडवल्या?
मोकाट कूत्रे यांच्यापासून तर सांडपाणी,रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्या ’जैसे थे‘स्थितीत आहे.प्रभागात नजर टाकली तिथे समस्याच समस्या आहेत.त्यामुळेच यावेळी मनपा निवडणूकीत १०० टक्के तयारीने उतरणार आहोत.आम्हाला जनतेवर विश्वास आहे त्यांना आता परिवर्तन हवे आहे.‘करोनाचा काळ’जनता विसरली नाही.विसरु शकणार ही नाही.मनसे ही नेहमी सिव्हिल लाईन्स येथील शासकीय कार्यालयात जाऊन स्थानिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन करण्यात अग्रेसर असते.मनसेचे प्राधान्य जनहिताच्या कामांना आहे.नागपूरकर जनतेने भारतीय जनता पक्षाचे व त्या अगोदर काँग्रेसचे काम बघितले आहे.आता नागपूरकर जनता त्यांना स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाही.लवकरच पक्षाचे उर्जास्त्रोत राज ठाकरे नागपूरात येत आहेत,त्यांच्या येण्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उर्जा निर्माण होणार असून त्याचे परिणाम येत्या निवडणूकीत दिसतील.
(समाप्त)




आमचे चॅनल subscribe करा
