

समलिंगी तरुणीच्या आत्महत्येनंतर समुदायामध्ये तीव्र संताप
‘लोग क्या बोलेंगे’या भीतीने घेतला आणखी एक बळी:मानसिकता बदलण्यासाठी ‘सभ्य’समाजाला आणखी किती हवेत बळी?समुदायाचा सवाल
आईच्या गर्भातच जैविकतेसाठी कारणीभूत ठरणा-या निष्पापांचा स्वीकार करण्यास पुढे या:एलजीटीबीटीक्यूंची पुन्हा एकदा आर्त साद
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.९ मे २०२३: ‘मी समलिंगी आहे.समाज मला जगू देणार नाही,लग्न केल्यास मी पतीलाही सुख देऊ शकणार नाही,त्यामुळे मी या जगाचा निरोप घेते’अशा आशयाची चिठ्ठी लिहून अवघ्या १८ वर्षाच्या तरुणीने आयुष्य संपवले.हे वृत्त प्रसिद्ध होताच तिच्या समुदायातील सदस्यांचे मन सुन्न झाले.समलिंगीच नव्हे तर लिंगपरिवर्तन करणारे,तृतीय पंथी अशा सर्वच समुदायांच्या मानवी व न्याय हक्कांसाठी अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देण्याच्या त्यांच्या मोहिमेला जणू ‘ती‘च्या या कृतीमुळे खोलवर धक्का बसला.इंग्रजांनी भारतावर राज्य करीत असताना त्यांच्या धर्मात मान्य नसणा-या समलैंगितेविरोधात १८६० मध्ये भारतीय दंड संहितेत कलम ३७७ अन्वये समलैंगिकतेला गुन्हा ठरवले व कायदेशीर शिक्षेची तरतूद केली.या अमानवीय कलमाच्या विरोधात २०१८ पर्यंत या समुदायाच्या सदस्यांनी शतकांची लढाई लढत, अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून ही कलम रद्द करुन घेतली.
आता समलिंगी असल्याच्या आरोपाखाली पोलिस अटक करीत नाहीत,न्यायालया समोर उभे करीत नाही,शिक्षा होऊन कारागृहातही डांबत नाही मात्र,तब्बल १६३ वर्ष या समुदायातील लाखो माणसांनी या गुन्हाखाली तुरुंगवास भोगला,सामाजिक अप्रतिष्ठेला सामोरे गेले,त्यांच्या या त्यागाला,समाजाच्या पारंपारिक मानसिकतेविरुद्ध लढण्याला या तरुणीने एका क्षणात मातीमोल केले आणि जगातून निघून गेली,याचे फार मोठे दुखं या समुदायातील सदस्यांना झाले.
‘ती’ने कुटुंबियांना ती समलिंगी असल्याचे वास्तव सांगितले असल्याचे बोलले जात आहे.अर्थातच कोणाचेही कुटुंबीय हे असे वास्तव सहसा स्वीकारतील असे घडत नाही.‘ती’चे वडील तर शासकीय सेवेत मोठ्या पदावरील अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.अशा वेळी समाजातील प्रतिष्ठा ही धुळीस मिळाली असती,परिणामी तिच्या लग्नाचे प्रयत्न सुरु करण्यात आल्याचे लक्षात येताच,पतीला मी सुख देऊ शकणार नाही,हे परखड सत्य कागदावर उमटून तीने आयुष्यच संपवले,ज्या आयुष्याची खरे तर आता कुठे सुरवात झाली होती.
समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेतून लग्न झाल्यावर ’ती’ने पतीचा दररोज बलात्कार सहन करण्या ऐवजी आपले उमलते जीवनच संपवले,तिचे पार्थिव घेऊन कुटुंबिय गावी गेल्याची देखील माहिती समोर आली आहे.मात्र,त्या पार्थिवाकडे तरी बघून तिला तिचे आयुष्य मनासारखे जगण्याचा अधिकार नव्हता का?जिवंत संवेदनशील मन असणारी ती एक सर्वसामान्य माणूस नव्हती का?ती बुद्धिहीन,कर्तृत्वहीन होती का? ती फक्त एक मुलगी होती,बहीण होती,मैत्रीण होती,परिचित होती,शेजारणी होती,हे तरी मान्य असलं तरी याही पेक्षा ती एक अशी व्यक्ती होती जिला निसर्गाने आईच्या गर्भातच स्वत:चं एक लैंगिक बंध घेऊन जन्माला घातलं होतं,हे सत्य नव्हतं का?तिच्या देहावर,मनावर,मोकळेपणाने जगण्याच्या अधिकारावर,तिच्या आत्मप्रतिष्ठेवर बंधने लादून मृत्यू पतकरण्याचा अधिकार समाज,कुटुंब,सरकार किवा नातेवाईकांना कोणी दिला?असा प्रश्न आता विचारला जात आहे.
आपला समाज दिव्यांग,अंध, अगदी चाेर,डाकू,लुटेरे,खूनी,बलात्कारी यांना देखील स्वीकारतो मग समलिंगी,ट्रान्स जेंडर्स,तृतीय पंथियांचे जैविक,मानसिक,भावनिक,शारीरिक जगणे समजून घेण्यास का नकार देतो?ते या वर्गात मोडतात हे त्यांच्या तरुणपणी,कुटुंबियांना कळताच ते त्यांचा मोबाईल हिसकावूनन घेतात,खोलीत डांबून ठेवतात,जबरदस्ती लग्न लाऊन देतात,याची परिणीती असेच आयुष्यातून निघून जाण्यात होते,हे नग्न सत्य ते कधी स्वकारणार आहेत?
विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूचे तरी दूखं समाजाला होतं का?हा दाहक सवाल देखील या तरुणीच्या आत्महत्येमुळे विचारला जात आहे.की सुटकेचा सुस्कारा सोडून इतिकर्तव्यता मानली जाते?आयटीआयमध्ये शिकणा-या हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणा-या आणखी एका समलैंगिक तरुणीने ६ मार्च रोजी आत्महत्या केली होती.या प्रकरणात समलैंगिक मैत्रीणींच्या त्रासाने तिने हे पाऊल उचलले होते.याचा अर्थ आपापसातील नात्यात,समाजाने त्यांच्यावर लादलेल्या क्रोर्याचे परिमाण उमटताना दिसून पडतात का?हा प्रश्न देखील आता चर्चिला जात आहे.
असे असले तरी समाजात मोठ्या प्रमाणात तरुणांच्या आत्महत्या होतात,त्यात मुख्यत्वे करुन प्रेम भंग,परिक्षेतील अपयश,आर्थिक कारणे,आपापसातील भांडणे इत्यादी अशा सबबी एफआयआरमध्ये नोंदवले गेले असतात मात्र, अश्या आत्महत्येत समलैंगिक किवा एलजीटीबीटीक्यू समुदायातील असने,याचा पोलिस शोध घेतात का?किवा समाज तरी यावर बोलतो का?किवा कुटुंबिय तरी निदान ते जग सोडून गेल्यावर सत्य सांगतात का?
सर्वसामान्यांसारखेच त्यांची मानसिक,भावनिक जडणघडण झाली असते.प्रेम भंगाचे दुखं त्यांनाही पचवता येत नाही.भावना सर्वांच्या समान असतात.मात्र एलजीटीबीटीक्यूंच्या नशीबी राजकारणी,धर्मगुरु,सामाजिक कार्यकर्ते आदींचे दोषारोपण येतात आणि समाज शेवटी त्यांनाच मानणारा असतो.त्यांचे विचार बरोबर आहेत का चूक?हे देखील समाज,अनुयायी,भक्त तपासून बघण्याची तसदी घेत नसल्याचे शल्य देखील ते व्यक्त करतात.
३७७ कलम रद्द झाल्यावर निश्चितच समाजाच्या मानसिकतेत थोडा बदल झाला आहे मात्र इतका ही बदल झाला नाही की ’ती’चे प्राण वाचू शकतील,‘ती’च्या शरीरावर सर्वस्वी तिचा हक्क मान्य करेल….!
आता तर समलैंगिकतांना विवाहची परवानगी देणे म्हणजे भारतीय संस्कृतीवर कुठाराघात होऊन संपूर्ण कुटुंब व्यवस्थाच मोडकळीस येण्याची भीती दाखवली जात आहे.त्रेतायुग,सतयुग,द्वापरयुगापासून तर कलियुगात देखील समलैंगिंगतांची शेकडो उदाहरणे प्राचीन धर्मग्रंथात सापडतात,ती सपशेल नाकारुन दोन व्यस्कर व्यक्ति आपापसात जीवन व्यापन करु इच्छित असताना फक्त परंपरा,भारतीय संस्कृतीचा दाखला देत,कुटुंब व्यवस्था मोडकळीस येण्याची भीती आणखी किती दशके,किती शतके दाखवत रहाणार आहात?आणखी किती निष्पापांचा जीव संस्कृतीच्या नावावर घेणार आहात?असा आर्त प्रश्नही समलिंगी समुदाय आज ‘सभ्य‘समाजाला विचारत आहे.
त्यांनाही विवाहासारखे एक शाश्वत बंध हवे आहे.भारतात कोट्यावधी मुले ही अनाथ आहेत,निदान ५ टक्के तरी अनाथांना घर मिळेल,कुटुंब मिळेल,शिक्षण मिळेल,किमान अनाथ आश्रमांच्या तुलनेत सुखद आयुष्य मिळेल मात्र,भारतीय समाज हा समलैंगिकांच्या बाबतीत इतका निष्ठूर झाला आहे की त्यांना कोणताही बदल स्वीकारायच्याच नाही.लग्न काय फक्त मुले जन्माला घालण्यासाठीच केली जातात का?मग जी जोडपी लग्नानंतरही मुले जन्माला घालण्यास आधीच नकार देतात त्यांना कोणत्या श्रेणीत हा समाज ठेवेल?त्यांच्याही लग्नाला अनैसर्गिक ठरवणार का?का म्हणून त्यांचं लग्न आणि सहजीवन संस्कृतीच्या नावाने मान्य केलं जातं?
समलैंगिक जोडपे मिळून एखाद्या अनाथाचे जीवन समृद्ध करु शकतो कारण दोघेही कमावते असतात,चांगल्या पदावर असतात,त्यांनी त्यांच्या पैशांचा कोणता उपयोग करावा?यात कोणाचं नुकसान होतंय?पर्यायायने देशाचं नुकसान होत नाही का?अनेक जीवन फक्त परंपरा किवा संस्कृतीच्या नावाखाली माणूस म्हणून घडण्यापासून संस्कृतीच्या नावाखाली आणखी किती दशके वंचित ठेवली जाणार?याच संस्कृतीत सतीप्रथा,बाल विवाह,विधवांचे केशवापन यासारख्या कुप्रथा नव्हत्या का?मग तो बदल स्वीकारलाच ना?झाला का संस्कृतीचा बट्ट्याबोळ?उलट समाज आणखी सुधाराला गेला,माणसाला माणूस म्हणून पत मिळाली,मग समलिंगी हा देखील याच समाजाचा एक भाग आहे हे का म्हणून स्वीकारल्या जात नाही?
सर्वोच्च न्यायालयात समलिंगींचा विवाह व दत्तक विधानावर सुनावणी पूर्ण झाली असून उन्हाळी सुटीनंतर जुलैमध्ये निकाल लागणार आहे.कलम ३७७ प्रमाणेच न्यायालय सकारात्मक निर्णय देईल,ही आशा आहे. आम्ही देखील या भारतीय समाजाचे प्रतिष्ठित नागरिक असून आम्हाला देखील समलैंगिक असलो तरी, प्रतिष्ठेने जगण्याचा कायदेशीर अधिकार बहाल होईल,विवाहाची अनुमती मिळेल,अनाथ बालकांना दत्तक घेण्याची मुभा मिळेल,अशी आशा देखील हा समुदाय ’ती’च्या घटनेनंतर व्यक्त करतोय.’ती’च्या जगण्याला प्रतिष्ठा नव्हतीच मात्र निदान तिच्या मृत्यूला तरी प्रतिष्ठा मिळेल आणि तेव्हाच समाज,कुटूंब आणि जगाच्या दडपणाखाली हजारो समलिंगींचे देह असेच पंख्याला लटकण्यापासून थांबतील,असे मार्मिक बोल ते सुनावतात.
ज्या जन्मदात्रीने ९ महिने गर्भात घडवले,प्रसव वेदना सहन करुन जगात आणले,भूक,झोप यासारख्या सर्व सुखांचा त्याग करुन पाल्यांच संगोपण केलं,वयात आल्यानंतर ते समलिंगी असल्याचे,तृतीय पंथी असल्याचे किवा भिन्न लिंग घेऊन जन्माला आलेले व्यक्तिमत्व असल्याचे] निदान जन्मदात्यांनी समजून घेऊ नये?एक्स,वाय गुणसूत्रांच्या अनैसर्गिक बदललेल्या किमयेतून समलिंगी म्हणून जन्माला आले ,यात त्यांचा काय दोष असतो?हे सभ्य व संस्कृतीप्रिय समाजाने तरी सांगावे…!गुणसूत्रांच्या दोषामुळे जे जीवन त्यांना मिळाले,ते प्रतिष्ठेतेने जगण्याचा हक्क हा समुदाय आता सभ्य समाजाला मागतो आहे.
जगप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ अल्बर्ट एलिस ‘लैंगिक स्वातंत्र्य उपभोगणं हा स्वैचार नसून स्वेच्छाचार असतो,,लैंगिक संबंध नैतिक किवा अनैतिक नसतात,स्वत:च्या लैंगिकतेचा शोध घेणं म्हणजे स्वत:चा विकास करणं होय,मात्र,समाजाचे लैंगिकतेबाबत र्निंबंध एवढे तीव्र असतात ,की ते मेंदूलाही वेसण घालतात.लैंगितेबद्दल मोकळेपणाने बाेलणं आपण वर्ज्य समजतो.पारंपारिक वातावरणाचा पगडा इतका जोरदार असतो की जणू आपल्याला काही लैंगिक भावनाच नाहीत,असं दाखविण्यात स्त्री-पुरुषांना एक प्रकारचा अभिमान वाटतो!असे अल्बर्ट एलिस सांगतो.‘ती‘च्या अश्या अकस्मात जाण्या मागे हाच पगडा कारणीभूत ठरला असावा….!
त्यामुळेच,भारतीय समाजाची मानसिकता समलिंगींच्या लैंगिक जीवनाकडे स्वैराचार म्हणून नव्हे तर स्वेच्छाचार म्हणून बघण्याची अत्यधिक निकड,‘ती‘च्या आत्महत्येनंतर आणखी तीव्र झाली आहे,असेच आता म्हणावे लागेल.




आमचे चॅनल subscribe करा
