
(रविवार विशेष)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. ५ जुलै: २०११ सालची घटना. मनीषा या ३५ वर्षीय महिलेचा मूळव्याधीचा त्रास अत्यधिक वाढल्याने तिचे पती हे तिला एका निष्णात सर्जनकडे घेऊन गेले.त्यांनी निदान केले मनीषा यांना मूळव्याधीचा कर्करोग आहे! दूस-या डॉक्टरचेही मत घेण्याच्या दृष्टिने मनीषा यांना त्यांचे पती पोलीस रुग्णालयातील डॉ.भूमकर यांच्याकडे घेऊन गेले आणि….येथेच त्यांच्या दूर्देवाचे फेरे नियतीने सुरु केले…!
डॉ.भूमकर यांनी रवी यांना सर्जन असणारे डॉ.गंटावार यांच्याकडे तपासण्याचा सल्ला दिल्ला.विशेष म्हणजे डॉ.गंटावार यांचे रुग्णालय हे शासन योजनेत समाविष्ट असल्याने रुग्णाला शासनाकडून उपचारावरील पैसा ही परत मिळणार होता.त्यामुळे हा पोलीस शिपाई पत्नीला धंतोली येथील डॉ.गंटावार यांच्या कोलंबिया रुग्णालयात घेऊन गेले. मनीषा यांना तपासल्यानंतर डॉ.गंटावार यांनी या शिपायाला आश्वस्त केले,की या शहरात मी एकमेव सर्जन आहे जो मूळव्याधीचे यशस्वीपणे पोट न फाडता शस्त्रक्रिया करुन देईल,रुग्णाला आयुष्यभर शौचासाठी पोटातून नळी लावण्याची गरज भासणार नाही. खर्च सांगितला दीड लाख रुपये आणि औषधांचा खर्च ५० हजार रुपये.
६ डिसेंबर २०११ रोजी मनीषा यांना कोलंबियामध्ये भरती करण्यात आले तर ८ डिसेंबर रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.यावेळी या पोलीस शिपायाने ५० हजार रु. काऊंटरवर जमा केले.शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारी स्टेपचरची किंमत डॉ.गंटावार यांनी ३० हजार सांगितली होती मात्र या शिपायाकडून ५१ हजार ९०० रु.वसूलण्यात आले!मनीषा यांना मधुमेहाचा त्रास होता मात्र शस्त्रक्रिया करताना मधुमेहाचे प्रमाण न सांगता शस्त्रक्रिया करण्यात आली. ९५ टक्के शस्त्रक्रिया ही यशस्वी झाली ५ टक्के ती जागा बरोबर झाली नसल्याचे डॉ.गंटावार यांनी या शिपायाला सांगितले.
महागाची औषणे देऊन ती जागा व्यवस्थित करुन देण्याचे डॉ. गंटावार यांनी या शिपायाला आश्वासन ही दिले. ९ डिसेंबर २०११ रोजी या शिपायाकडून पुन्हा १६ हजार रु.औषधींचे घेण्यात आले.८५० रु.चे जे इंजेक्शन बाहेर मिळतात त्यांची २२०० रु.प्रत्येक नग किंमत वसूलण्यात आली. आणि एकूण बिल काढले….३ लाख ५० हजार रुपयांचे!एवढे पैसे माझ्याकडे नसल्याचे या पोलीस शिपायाने सांगताच दोन को-या धनादेशांवर सही करुन द्या,असे डॉ.गंटावार यांनी फरमान सोडले. यावेळी त्यांनी त्यांच्या ड्रावरमधील अनेक रुग्णांनी कोरे धनादेश जमा केल्याचे दाखविले,परिणामी या शिपायाने देखील दोन काे-या धनादेशांवर सही करुन जमा केले.त्यावरील एका धनादेशावर डॉ.गंटावार यांनी १ लाख १ हजार ८०० रुपयांची तर दूस-या धनादेशावर औषधींचा खर्च म्हणून ४९ हजार रु.ची रक्कम भरली.
या पोलीस शिपायाने डॉ.गंटावार यांना विनंती केली,हे धनादेश मला न कळवता बँकेत टाकू नका,मला शासनाकडून पत्नीच्या उपचाराचे पैसे मिळाल्यानंतर मी स्वत:कळवतो.९ डिसेंबर २०११ रोजी मनीषा यांना रक्तदाब व ह्दयाचा त्रास वाढल्याचे डॉ.गंटावार यांनी सांगितले.मात्र मनीषा यांना तर ह्दय किवा रक्तदाबाचा त्रास नव्हताच,तो कसा झाला?या प्रश्नावर डॉ.गंटावार यांनी उत्तर दिले, शस्त्रक्रिया झाल्यानंतर असे त्रास हे उद् भवतातच.आयसीयूमध्ये पत्नीला भेटल्यानंतर तिने सांगितले,डॉ.गंटावार आयसीयूमधील प्रत्येकच रुग्णाला,तुम्हाला ह्दय व रक्तदाबाचा त्रास असल्याचे सांगत आहेत! एका ह्दयतज्ज्ञाला उभे करतात आणि त्यांच्याकडून रुग्णाला तपासून घेऊन त्या तज्ज्ञाचे पैसे देखील रुग्णाकडूनच घेत आहे.मनीषा यांनाही डॉ.गंटावार यांनी सांगितले,तुमचे पती पैसे जमा करीत नाही….पैसे देत नसल्यामुळे तुमच्यावरील उपचार बरोबर होत नाही आहेत! आजारी पत्नीला गंटावारांनी अश्या शब्दात जास्त घाबरुन दिले!
याच वेळी पोलीस शिपायाजवळीच पैसे संपले. मात्र डॉ.गंटावार यांनी पैसे जमा केल्याशिवाय पुढील उपचार करण्यास नकार दिला व तकादा लावला पैसे भरा नाही तर रुग्णाला दूसरीकडे घेऊन जा. मनीषा यांची अवस्था बघून शेवटी या पोलीस शिपायाने मनीषा यांना १७ डिसेंबर २०११ रोजी मेडीकलमध्ये भरती केले. २० डिसेंबर २०११ रोजी मनीषा यांची सायंकाळी प्राणज्योत मावळली!आपल्या मागे त्या सोडून गेल्या ७ वर्षाची एक चिमुरडी.
पत्नीच्या मृत्यूला अद्याप ९ दिवस ही उलटले नाहीत तर डॉ.गंटावार यांनी या पोलीस शिपायाला न कळवता दोन्ही धनादेश बँकेत टाकले व ते बाऊंस झाले! १४ जानेवारी २०१२ रोजी या शिपायाला डॉ.गंटावार यांनी रुग्णालयात बोलावले.नकदी द्या नाही तर दूसरे धनादेश द्या. १३८ प्रमाणे ४२० कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.तुमची सरकारी नोकरी आहे,गुन्हा दाखल झाला तर नोकरी ही गमावून बसाल,अश्या शब्दात धमकावले.न्यायालयीन खटल्यात याहून दुप्पट पैसे भरावे लागतील.यावर या शिपायाने वकीलाचा सल्ला घेतला.वकीलाने अजिबात दुसरा धनादेश देऊ नका,असा सल्ला दिला.
२९ जानेवारी २०१२ रोजी डॉ.गंटावार यांनी या पोलीस शिपायाला नोटीस पाठवली. मित्र महेंद्र मोरे यांना घेऊन डॉ.गंटावार यांच्या रुग्णालयात हा पोलीस शिपाई गेला. डॉ.गंटावार हे त्यावेळी रुग्णालयात उपस्थित नव्हते. मात्र मित्राला घेऊन हा पोलीस शिपाई खाली उतरताच खालील लॉबीमध्ये डॉ.गंटावार भेटले. माझ्या बिलांवर सह्या करुन द्या,तुमच्या सहीशिवाय शासनाकडून मला उपचारावरील खर्चाचे बिल मिळणार नसल्याची विनंती शिपायाने केली. तू पैसे दिल्याशिवाय मी सही करणार नाही,असे गंटावार यांचे उत्तर होते.अपमानित करुन लिफ्टने तिस-या मजल्यावर निघून गेले.
एक सरकारी नोकर चांगलाच जाळ्यात फसल्याचा आनंद डॉ.गंटावार यांच्या चेह-यावरुन आेसंडून वाहत होता! आजही…चेक बाऊंची केस या पोलीस शिपायावर तशीच न्यायालयात सुरु आहे…!मात्र हा अपमान जिव्हारी लागल्यानंतर या पोलीस शिपायाने मनाशी गाठ बांधली…डॉ.गंटावार यांच्या चेहर-यामागे दडलेला असंवेदनशील चेहरा जगासमोर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही..!
अट्रासिटीच्या केससोबतच १५ जुलै २०१३ रोजी डॉ.गंटावार यांच्या विरोधात धंतोली पोलीस ठाण्यात या शिपायाने तक्रार दाखल केली.मात्र…पोलीस आणि डॉक्टर यांचे ‘गठबंधन’जिथे जिथे जुळलेत तिथे सामान्य नागरिकांना ‘न्याय’मिळत नसतो..!येथे तर एका पोलीस शिपायाच्या दू:खाचा लढा हाेता..न्यायाचा लढा होता..तरी देखील धंतोली पोलीस ठाण्यातील खाकी वर्दी खालील काळजांनी ‘व्यवहार’सोडला नाही!
डॉ.गंटावार यांच्या सुविद्य पत्नी डॉ.शीलू गंटावार यांनीच या पोलीस शिपायाविरोधात धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. रुग्णालयाची तोडफोड केली तसेच ड्रावरमधील अडीच लाख रुपये पोलीस शिपायाने चोरुन नेले…! आणि…डॉ. गंटावार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाच नाही!
रेणू वाडीभस्मेच्या जळालेल्या मृतदेहाचेही पैसे लाटले!
भंडारा साकोली येथील रेणू वाडीभस्मे यांचे नव-यासोबत कडाक्याचे भांडण झाले आणि…रागाच्या भरात रेणू यांनी अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. साकोलीचे डॉ.अजय तुमसरे यांनी मंगेश लालाजी वाडीभस्मे या त्यांच्या पतीला त्वरीत नागपूरातील सर्जन डॉ.गंटावार यांच्या रुग्णालयात रेणूला घेऊन जाण्याचा ’सल्ला’दिला. १८ एप्रिल २०१२ रोजी रेणू यांना डॉ.गंटावार यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे बिल निघाले १५ लाख ५० हजार रुपये! दोन दिवस रेणू कोलंबियामध्ये भरती होत्या. कोणालाही त्यांना भेटता येत नव्हते. मंगेश हे मित्र आशिष कापसे यांच्यासोबत रुग्णालयात गेले असता पत्नीला न भेटता त्यांना तेथील कर्मचारी सरळ डॉ.गंटावारांच्या ‘केबिन’मध्ये घेऊन गेला.
पैसे पूर्ण भरताच वीस मिनिटात मंगेश यांना सांगण्यात आले…रुग्ण दगावला..मृतदेह घेऊन जा…!याचा अर्थ…रेणू यांचा मृत्यू आधीच झाला होता मात्र फक्त पैसे उकळायचे असल्याने त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते….!हे मंगेश यांनाही कळले.आशिष कापसे यांनी या ‘अघोरी मनोवृत्ती’ला विरोध दर्शवला आणि…येथेही तेच घडले..डॉ.शीलू गंटावार यांनी धमकी दिली….रुग्णालयात तोडफोड केली…ड्रावरमधील अडीच लाख चोरले….! मंगेश हे आपल्या पत्नीचे पार्थिव घेऊन कोलंबियाच्या बाहरे पडले…!
या पोलीस शिपायाने त्यांना न्यायाच्या लढाईसाठी विचारले असता..मंगेश म्हणाले..नको त्या आठवणी…नको ते नागपूर शहर…नको ते डॉक्टरांच्या चेह-यामागे दडलेला कसाईपणा…!माझा फळांचा व्यवसाय आहे…तुझ्यासारखा प्रदीर्घ लढा देण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही नाहीत रे…!
या पोलीस शिपायाचा एकच प्रश्न आहे…जळालेली केस रुग्णालयात आली असता...पोलीस ठाण्यात का नाही डॉ.गंटावारांनी कळवले?याशिवाय नागपूरसह,भंडारा,साकोली,चंद्रपूर,अमरावती इ. किती ठिकाणी डॉ.गंटावारने ‘कमिशन’चे जाळे विणलेले आहेत?
आरोग्य सेवा मुंबई महाराष्ट्र शासनाकडे तक्रार-
डॉ.गंटावार यांच्या कोलंबियासमोर शासकीय कर्मचा-यांना सवलतीचे दर याची माहिती असणारा मोठा फलक झळकतोय.मात्र या शासकीय मान्यतेचा डॉ.गंटावार हे कश्याप्रकारे दुरुपयोग करीत आहेत,याचे शेकडो पुरावे या शिपायाने आरोग्य सेवा मुंबई,महाराष्ट्र शासनाकडे जमा केले मात्र अद्याप कोलंबिया रुग्णालयाची मान्यता काढून घेण्याचे धाडस शासानाने दाखवले नाही.या आरोग्य सेवा संचालनायाच्या कायद्यातील चौथी अट आहे ’ शासकीय रुग्णालयाच्या दराने शुल्क आकारले जावे’डॉ.गंटावार मात्र आकारतात…खासगी दरच…!या पोलीस शिपायाने शासकीय दरांचे पत्रकच जमा केले मेयोमध्ये आयसीयूचे शुल्क आहे २०० रु,सुपरमध्ये २०० रु.मनपा रुग्णालयात ५० रु. आरोग्य सेवेत १०० मात्र कोलंबियाचे दर आहे २८०० रुपये!
मनीषा यांच्या चार दिवसांचे आयसीयूचे शुल्क फक्त ८०० रु. होत असताना डॉ.गंटावार यांनी या शिपायाकडून घेतले ११ हजार २०० रु.जनरल वॉड,नर्सिंग,रेसिडेंस मेडीकल चार्जेस,मॉनिटर,इंटेंसिव्ह, इमरजंसी,नेब्यूलायझर….इ. या सर्वांचे शासकीय व कोलंबियातील दर या पोलीस शिपायाने तक्ररीत नमूद केले आहेत!
औषधांचे गौडबंगाल-
२०१३ पासून राजीव गांधी जीवनदायी योजनेला सुरवात झाली आणि ९७१ आजारांवर मोफत उपचार व ३० आजारांवरील शस्त्रक्रियेची योजना दारिद्र रेषेखालील जनतेसाठी उपलब्ध झाली. एकूण २१ दवाखान्यांना परवानगी देण्यात आली त्यातील एक रुगणालय होते..कोलंबिया!यात ही डॉ.गंटावार यांनी खोटी बिले राज्य बिमा निगमला सादर केलीत! २ कोटींचे बिले पाठवले.हे बिल मंजूर करण्याआधी अन्न व प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नि.प.भांडारकर यांची चौकशी पार पडली. भांडारकर यांचा अहवाल होता…चौकशीत आढळले डॉ.गंटावार यांनी खोटी बिले पाठवली एवढेच नव्हे तर..जी महागडी औषधे रुग्णांना दिल्याचे नमूद करण्यात आले ती औषधे रुग्णांना न देता रेकॉर्डवर टाकण्यात आली..! मे. कोलंबिया यांनी क्रिमिनल प्रोसिडर कोड व इंडियन पॅनल कोडमधील कलमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलीसात तक्रार दाखल करुन पुढील चौकशी करणे आवश्यक आहे…!भांडारकर यांचा हा अहवाल आहे दि. १५ मे २०१५ रोजी चा!
याच कोलंबियामध्ये अनाधिकृतपणे औषधांची दूकान चालत होती. मात्र एक्सपायरी झालेली औषधेही रुग्णांना दुपट किमतीत विकल्याने अन्न व औषधी प्रशासनाने २०१५ साली डॉ.गंटावारचे हे औषधी दूकान बंद केले…!या विरोधात तक्रार करण्यास हा शिपाई गेला असता त्याला पोलीस ठाण्यात उत्तर मिळाले….बिले मंजूर झाली नाही म्हणून..गुन्हा दाखल होऊ शकत नाही…!
तक्रार अडीच नव्हे चौदा कोटींच्या अपसंपदेची!
या पोलीस शिपायाने संपूर्ण पुरावे जमा करुन डॉ.गंटावार दाम्पत्यांच्या विरोधात १४ कोटींच्या अपसंपदेची तक्रार दाखल केली आहे..!घबाडात आतापर्यंत अडीच कोटीच नमूद होऊ शकले.धाडीत लाचलूचपत प्रतिबंध विभागाला दोन्ही बँकेतील लॉकर ही रिकामे सापडले. विशेष म्हणजे कोलंबिया रुग्णालयात फ्लॅट आणि जमिनींची कागदपत्रे सापडण्यामागील कारण म्हणजे हे डॉ.दाम्पत्य रुग्णांच्या जमीनी,मालमत्तांचे कागदपत्रे हमी म्हणून जमा करुन घेत होती!एखाद्या रुग्णालयाच्या कार्यालयात अन्यथा अश्या मालमत्तांचे कागदपत्रे कशी राहू शकतात?असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.
१०० एकर नवेगाव बांध येथील जमीन, रामदासपेठच्या आलिशान फॉरच्यून इमारतीत फ्लॅट, चार लक्झरी कार, ऑडी, मरसीडीज, कोरिया कंपनीची‘किया’ व फिएट…विशेष म्हणजे या चारही गाड्यांवर एकच ए एम ६३८४ हाच एकच क्रमांक आहे..! लाचलूचपत प्रतिबंधक विभागात आज अधिकारी रश्मी नांदेडकर नसत्या तर डॉ.गंटावार दाम्पत्याविरोधातील लढाईला आणखी उशिर लागला असता,असे मर्म हा पोलीस शिपाई उलगडतो…! या दाम्पत्याला अटक पूर्व जामिन मिळाला कारण घटना २०१२ सालीची असून तक्रार मात्र २०२० मध्ये दाखल झाली….!माझा लढा तर पत्नीच्या मृत्यू नंतरच सुरु झाला होता मात्र….‘भ्रष्ट व्यवस्थेच्या’ विरोधात लढता लढता….आठ वर्षे उशिर झाला आणि गंटावार दाम्पत्याला अटक पूर्व जामिन मिळाला…!
तरी देखील हिंमत दांडगी आहे. या दाम्पत्याला एक दिवस मी कारागृहात सलाखींमागे नक्कीच बघणार..माझा अद्याप न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे…..! असे हा शूर शिपाई सांगतो.
२००७ पासून डॉ.गंटावार यांच्या संपूर्ण ‘काळ्या’ कृतींना आतापर्यंत मनपातील काही सत्ताधारी…सेवानिवृत्त इंदिरा गांधी रुग्णालयाचे अधिक्ष् क व आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. अनिल चिवाने…यांनी पाठीशी घातले…आता शिस्तप्रिय,नियमप्रिय…प्रामाणिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे बळ या भ्रष्ट,माणूसकी नसलेल्या,लोभी डॉक्टर दाम्पत्याला मिळाले असल्याचे पुरावेही या पोलीस शिपायाने जमा केले आहेत…!
या पोलीस शिपायाच्या जिद्दीला ‘सत्ताधीश’चा सलाम!




आमचे चॅनल subscribe करा
