

धंतोलीस्थित स्वत:च्या ‘कोलंबिया’मध्ये सेवा देण्यात व्यस्त
मनपाचा दावा इतर रुग्णालयात मनपाची वैद्यकीय चमू सेवेसाठी पाठवली:डॉ.गंटावार यांची सेवा का नाही वर्ग केली?नागपूरकरांचा सवाल
नागपूर,ता. १६ मे: मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी मनपाचे बहूचर्चित व अनेक वसूली प्रकरणात गाजलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांना २९ एप्रिल २०२१ रोजी ताकीद पत्र जारी केले,या पत्रात नमूद केल्याप्रमाणे डॉ.गंटावार हे २८ डिसेंबर २०२० पासून सतत गैरहजर असून ते आपल्या कामाप्रति गैरजवाबदार असल्याचे दिसून पडतात परिणामी साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या अंतर्गत ताकीद देण्यात येते २४ तासांच्या आत कार्यालयात रुजू व्हावे,मात्र ताकीद पत्र देऊन आज १७ दिवस उलटले तरी डॉ.गंटावार हे अद्याप आपल्या कामावर रुजू झाले नसल्याची माहीती मनपाच्या आरोग्य विभागाकडून ‘सत्ताधीश’ला प्राप्त झाली.

विशेष म्हणजे डॉ.चिलकर यांनी डॉ.गंटावार हे २८ डिसेंबरपासून गैरहजर असल्याचे नमूद केले असले तरी वास्तवात डॉ.गंटावार हे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांची गच्छंती २७ ऑगस्ट रोजी झाली तेव्हापासूनच गैरहजर असल्याचे सांगण्यात येतं,तरी देखील डॉ.चिलकर यांनी डॉ.गंटावारांना सप्टेंबर ते डिसेंबर अश्या ४ महिन्यांच्या अवधीची सूट का दिली,याबाबत मात्र प्रशासनाकडे कोणतेही उत्तर नाही.
नुकतेच मनपातर्फे मनपा रुग्णालयातून ६९ टक्के बाधित करोनामुक्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे.गेल्या वर्षभरात एकूण २ हजार ९६५ रुग्णांवर मनपाच्या विविध दवाखान्यात उपचार करण्यात आले यापैकी २०३४ जण बरे झाले असे काल शुक्रवार दि. १४ मे रोजी मनपाच्या जनसंपर्क विभागातर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले.मनपाच्या विविध रुग्णालयात सद्य:स्थितीत २२३ रुग्णांवर उपचार सुरु असून गांधी नगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात कारोना रुग्णांसाठी ९६ पैकी ९० ऑक्सीजनयुक्त बेड असल्याचा दावा देखील करण्यात आला.
मात्र जमीनी वास्तव हे फार वेगळे असून या रुग्णालयात साधी एक्सरे मशीन देखील गरीब रुग्णांसाठी उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आजच्या स्थितीत मुंबई,ठाणेसारख्या महानगरपालिका या संपूर्णपणे स्वत:करोना महामारी त्या शहरात हाताळत आहे,मुंबई महानगरपालिकेने तर तेथील खासगी रुग्णालये देखील मुंबईरांच्या उपचारासाठी आपल्या अधीन घेतली,मात्र नागपूर मनपाच्या रुग्णायलात जाणा-या रुग्णांना तेथील कर्मचारी सरळ मेयो,मेडीकलचा रस्ता दाखविण्यातच धन्यता मानतात,हे अनेक घटनांवरुन सिद्ध झाले!
विशेष म्हणजे मुंबई, ठाणेच्या मनपा रुग्णालयात गेल्या अनेक दशकांपासून बायपास पासून तर विविध शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात मात्र नागपूरकर जनतेची ही फार मोठी शोकांतिका आहे की नागपूर मनपाच्या विविध रुग्णालयात अत्यंत उच्च विद्याभूषित डॉक्टरांची फळी असताना देखील साधे अपेन्डीक्सची ही शस्त्रक्रिया केली जात नाही!
गेल्या ९ महिन्यांपासून स्वत:डॉ.गंटावार हे आरोग्य विभागाला कोणतीही सूचना न देता रजेवर आहेत,स्वत:च्या खासगी ‘कोलंबिया’रुग्यालयात बेड्स उपलब्धतेची माहिती रुग्णांना देतानाचे त्यांचे व्हिडीयो ही व्हायरल झाले तरी देखील मनपा आयुक्त,अति.आयुक्त व सत्ताधारी यांची त्यांच्यावरील ‘कृपादृष्टि’ कायम असून एका नोटीसी पलीकडे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही,याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कोविड १९ या भंयकर महामारीच्या काळात मनपाचा आरोग्य विभागाच अशी सेवा नागपूरकरांना देत असेल तर दहन घाटांवर मृतकांची रांग लागणारच होती!
सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या १४ महिन्यात केंद्राकडून जो ३० ते ४० कोटी मनपाला कोविडच्या नियंत्रणासाठी निधी मिळाला,त्याचा मनपा प्रशासन व सत्ताधा-यांनी जो काही ‘सदुपयोग’केला तो जनतेला प्रत्यक्ष्ात अनुभवताच आला नाही.एक एक बेडसाठी शहरात एप्रिल महिन्यात व मे च्या दुस-याही आठवड्यात त्राही-त्राही माजली असताना केंद्राच्या त्या ४० कोटींचे मनपाने फक्त मास्क,सेनिटायझर व पीपीई किट्सच घेतले का?रुग्णालये,वेंटिलेटर्स,बेड्स,रेमडिस्विहर,औषधे यांच्यावर खर्च केला असता तर नागपूरकर जनतेला या सर्व सोयींसाठी वणवण भटकावे लागले असते का?असा प्रश्न आता विचारला जात आहे.
नागपूर मनपा ही फक्त सिव्हिल लाईन्स मधील मुख्यालयात पैसे खाण्यापुरती अस्वित्वात असलेली स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचा संताप समाज माध्यमात उमटला आहे.
६९ टक्के रुग्ण गेल्या एका वर्षात बरे केल्याचा दावा करणारा मनपाचा आरोग्य विभाग हे मनपाच्या किती रुग्णालयात सीटी स्कॅन,सोनाग्राफी,एक्सरे होतात हे सांगू शकतील?ज्या रुग्णांची ऑक्सीजन लेवल ८० पर्यंत खाली येते त्यांना खासगी रुग्णवाहीकेतून खासगी रुग्णालयात दाखल करा म्हणून आपली जवाबदारी झटकताना दिसते त्यांनी खरंच मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेची रुग्णालये,तेथील सोयी,अद्यावत यंत्रे,जटील शस्त्रक्रिया यांचा अभ्यास दौरा करुन यावा,असा सल्ला समाज माध्यमांवर दिला जात आहे.
साधे महाल येथील मनपाचे स्व.प्रभाकरराव दटके रोग निदान केंद्र’हे एखाद्या पॅथोलॉजी लॅबसारखे असून कोणत्याही रोगाचे निदान या ठिकाणी होत नसून साधी रक्त तपासणी होते त्यात ही या केंद्रावर रक्त तपासणीची देखील साधने पुरेशी नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मनपातर्फे १४२ आरोग्य कर्मचारी मेडीकलला,१७६ मेयोमध्ये तर ७८ कर्मचारी शालिनीताई मेघे रुग्णालयात रुग्णसेवेसाठी पाठविण्यात आल्याचा दावा करुन नुकतेच महापौर दयाशंकर तिवारी यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली मात्र करोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी व कोविड-१९च्या उपचारासाठी मनपातर्फे जी खासगी इमारते ताब्यात घेण्यात आली ती आजच्या घटकेला ‘ओस’पडली आहेत कारण….मनपाकडे वैद्यकीय कर्मचा-यांची कमतरता असल्याचे मनपाचेच अतिरिक्त आयुक्त सांगतात तेव्हा नागपूरकर जनतेला प्रश्न पडतो,तुमच्याचकडे आरोग्य चमूची कमतरता आहे तर इतर शासकीय रुग्णालयात आपले कर्मचारी पाठवलेच कशाला?
आणि पाठवायचेच होते तर डॉ.प्रवीण गंटावार यांच्यासारखे सुज्ञ व तज्ज्ञ आरोग्य अधिकारी यांना का नाही पाठवले?९ महिन्यांपासून
करोना महामारीच्या काळात त्यांची कोणतीही सेवा जर नागपूरकर जनतेला उपलब्ध होत नसेल तर त्यांचा लाखोंचा पगार तरी बिनचूक मनपाच्या वित्त विभागातून कसा निघतो?आणखी किती वर्ष जनतेच्या घामाचा व कष्टाचा पैसा अश्या आरोग्य अधिका-याच्या सुट्यांवर मनपा आयुक्त व सत्ताधारी खर्च करणार आहेत?




आमचे चॅनल subscribe करा
