फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजडब्यात गेलेल्या चित्रपटांचं दुःख वाटणंही आता बंद झालंय!

डब्यात गेलेल्या चित्रपटांचं दुःख वाटणंही आता बंद झालंय!

Advertisements

 

कवी सौमित्र यांची खदखद

वि. सा. संघ ग्रंथालय वाचक मेळाव्यात मनमोकळा संवाद

नागपूर,२० ऑगस्ट २०२२: जगणे समृद्ध करणारा प्रत्येक चित्रपट हा कलावंतासाठी जीव की प्राण असतो. त्यासाठी तो सर्वस्व पणाला लावत जीव ओतून आपले पात्र वठवित असतो. मात्र समर, ध्यासपर्व, कल का आदमी सारखे चित्रपट जेंव्हा चित्रपटगृहाचा पडदा देखील पाहू शकत नाहीत, तेंव्हा काळजाला प्रचंड वेदना होतात. असे चित्रपट डब्यामध्ये कायमचे कैद होताना मी पाहिले आहेत. हल्लीचा काळच असा आलाय, की आता हे दुःख वाटणेही बंद झालंय, अशी खदखद संवेदनशील कवी, सिनेनाट्य कलावंत सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.

विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालयातर्फे आयोजित वार्षिक वाचक मेळाव्यात अनुभूती अंतर्गत सौमित्र अर्थात किशोर कदम यांच्या प्रकट मुलाखतीचा अनोखा योग जुळवून आणण्यात आला होता. वि. सा. संघाच्या अमेय दालनात हा मुक्तसंवाद कार्यक्रम झाला. वि. सा. संघाच्यावतीने सोमवारी गीत सौरभ काव्यनाद अभिवाचनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सौमित्र यांच्या संवादाचा योग जुळवून आणण्यात आला होता. वि. सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. पराग घोंगे प्रामुख्याने उपस्थित होते. मुलाखतकार प्रफुल्ल शिलेदार आणि विवेक आलोणी यांनी सौमित्र यांना बोलते करीत त्यांच्या वाटचालीतील प्रसंगांना उजाळा दिला.

कवी, गीतकार, नट, अभिनेता, दिग्दर्शक, वाचक, श्रोता अशा भूमिकांमध्ये वावरत असताना कधीकधी मला स्वतःचाच थांग लागत नाही, असे सुरुवातीलाच नमूद करीत सौमित्र यांनी श्रोत्यांच्या काळजाचा वेध घेतला.

सौमित्र म्हणाले, स्वतःलाच स्वतःची ओळख पटविण्यात आयुष्य निघून जाते. माझ्यातल्या अस्तित्वाचा शोध अजूनही सुरूच आहे. जगण्याने जे शिकविले तेच मी लिहीत गेलो आणि तेच अभिनयातही उतरविण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यातल्या नटाला सावरण्यासाठी कधी कवी पुढे येतो, तर कधी कवीला भानावर आणण्यासाठी नट मदत करतो. त्यामुळे माझे प्रयत्न परस्परांना पुरक आहेत. खारदांडातल्या झोपडपट्टीच्या अंगाखांद्यावर वाढलो असल्याने माझ्यात प्रचंड न्यूनगंड होता. या एकटेपणावर मात करण्यासाठी आणि लोकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी मी पुस्तकांच्या सानिध्यात रमत गेलो.

सत्यदेव दुबे सारखा गुरू माझ्या आयुष्यात आला आणि त्यामुळे माझे जीवनच बदलून गेले. दुबेंनी माझ्यातल्या संवेदनेला धार दिली. पेचात पाडणारे अनेक प्रसंग दुबेंनी माझ्यासमोर निर्माण केले. पण त्यांच्या तालमीत घडल्याने मला आजवर दुकान थाटून बसण्याची गरजच पडली नाही. दुबेंच्या शाळेमुळे माझी शिकण्याची भूक अजूनही कायम आहे.

नाटक आणि सिनेमाच्या अनुभवांवर प्रकाश टाकताना सौमित्र म्हणाले, नाटकामुळे तुम्ही खूप काही गोष्टी शिकता आणि या शिकलेल्या गोष्टी सिनेमाच्या पडद्यावर दाखवू शकता. मात्र ध्यासपर्व, समर सारखे चित्रपट जेंव्हा डब्यामुध्ये कायमचे बंद होतात, तेव्हा होणाऱ्या वेदना शब्दांत मांडता येत नाहीत. विशेष म्हणजे या वेळी सौमित्र यांनी आपल्या खास शैलीतील तुमच्या कवितेत, आपण सगळेच विंगेत थांबलेले आहोत सारख्या मोजक्या रचना सादर करीत श्रोत्यांना वेगळ्या विश्वाची सफर घडवून आणत त्यांच्या काळजाचा ठाव घेतला. वृषाली देशपांडे यांनी नेटके सूत्रसंचालन केले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या