

देश आणि महाराष्ट्राच्या ‘शॉर्ट कट’च्या राजकारणापासून जनतेने सावध असावे:’आप’ सह विरोधी पक्षांनाही टोमणा
‘गोसीखूर्द’ धरणाचे दिले उदाहरण
संकष्टी चतुर्थीच्या पवित्र दिनी नागपूर,विदर्भाला अकरा नक्षत्रांप्रमाणे मिळाले प्रकल्प:अस्सलखित मराठीत केली भाषणाला सुरवात
मोदींचे येणे आणि श्रोत्यांचा ‘जयघोष’:नागपूर झाले ‘मोदीमय’
भाषणाच्या नामावलीत मंचावरील बावणकुळेंचा उल्लेख टाळला:गडकरींचा उल्लेख फक्त ‘नितीनजी’
क्षणचित्रे—-
नागपूर,ता.११ डिसेंबर २०२२: आज ११ डिसेंबर रोजी नागपूरात एकूण ११ नक्षत्ररुपी प्रकल्पांचे लोकापर्ण होत आहे.यात हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे,मेट्रो फेज १ चे लोकापर्ण व फेज २ चे उद् घाटन आहे,नागपूर-बिलासपूर मार्गावरील ‘वंदे मातरम ’ रेल्वेला हिरवी झेंडी दाखवणे असो,नागपूर व अजनी रेल्वे स्टेशनच्या पुर्नविकासाची योजना असो किवा नाग नदीच्या प्रदुषण निर्मुलनाचा प्रकल्प असो. या ११ लखलखत्या चांदण्यांचे हे महानक्षत्र महाराष्ट्रच्या विकासाला एक नवी दिशा व नवी उर्जा देणार आहे.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार कोटींच्या या सर्व विकासकार्यासाठी महाराष्ट्राचे व महाराष्ट्राच्या जनतेचे मी अभिवादन करतो.आजचे हे आयोजन याचेच प्रमाण आहे की, डबल इंजिनची सरकार महाराष्ट्रात किती वेगान काम करीत आहे,असे गौरवोद् गार देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काढले.ते टेंपल ग्राऊंड येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था(एम्स) येथे महाराष्ट्र राज्य सरकार निर्मित हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहील्या टप्प्याच्या लोकापर्ण सोहळ्यात बोलत होते.
भाषणाच्या सुरवातीलाच आता राज्यात डबल इंजिनचे सरकार असल्याने महाराष्ट्राच्या वेगाने होणा-या विकासाबाबत बोलतानाच, अप्रत्यक्षपणे त्यांनी गेली अडीच वर्षे राज्यात प्रस्थापित असणा-या महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर टोला हाणला.
मिहान (नागपूर) येथील एम्स संस्थेजवळील मंदीर मैदानावर आयोजित कार्यक्रमात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. चंद्रशेखर बावनकुळे आदी यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले,की समृद्धी महामार्गामुळे नागपूर व मुंबईचे अंतर तर कमी होईल मात्र हा महामार्ग महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांची आधुनिक आतंरजोडणी देखील करीत आहे.यामुळे महाराष्ट्राच्या शेतक-यांना,उद्योजकांना व धार्मिक स्थळी जाणा-या भाविकांना खूप फायदा होणार आहे.या महामार्गामुळे रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहे.
आजच्या दिवसाचे एक आणखी वैशिष्ठय म्हणजे आज ज्या ११ प्रकल्पांचे लोकापर्ण झाले आहे.त्या सर्व प्रकल्पांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधांचेच पुष्पगुच्छ गुंफण्यात आले आहे.हे सर्व विकासाचे प्रकल्प एका पुष्पगुच्छप्रमाणे असून या पुष्परुपी विकासाचा सुगंध लोकांपर्यंत पोहोचणार आहे.विकासाच्या या पुष्पगुच्छामध्ये मागील आठ वर्षांच्या परिश्रमाने तयार विशाल बगिचेचे प्रतिबिंब देखील आढळतो. मग हा बगिचा सामान्य लोकांसाठीच्या आरोग्य सुविधेचा असाे किवा वेल्थ क्रिएशनचा असो,हा बगिचा शेतक-यांना सशक्त करण्यासाठी असो किवा जल संधारणासाठी असो.

आज पहील्यांदा देशात अशी सरकार आहे,ज्यांनी पायाभूत सुविधांना एक मानवी स्वरुप दिले असल्याचे ते म्हणाले.आपल्या सरकारकडून पायाभूत सुविधांना मानवी चेहरा दिला जात असून विविध क्षेत्रात मूलगामी परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून वंचित-उपेक्षितांच्या विकासास अग्रक्रमाने प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी ग्वाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिली. स्थायी विकासाचे धोरण हे देशासाठी सर्वाधिक गरजेचे असून त्यास सर्व घटकांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले.
हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग उदघाटन, नागपूर मेट्रो टप्पा-१ लोकार्पण, नागपूर मेट्रो टप्पा-२ भूमिपूजन, नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस शुभारंभ, नागपूर आणि अजनी रेल्वे पुनर्विकास शुभारंभ, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर राष्ट्राला समर्पित, नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प भूमिपूजन, सेंटर फॉर स्किलींग ॲड टेक्निकल सपोर्ट (सपेट), चंद्रपूर लोकार्पण असे विविध कार्यक्रम आज पार पडले.
नागपूर येथे आज ज्या विविध योजनांचे लोकार्पण झाले त्यातून सरकारचा विकासाचा सर्वसमावेशक दृष्टीकोन प्रतिबिंबित होतो. एम्स, समृद्धी महामार्ग, वंदे भारत गाडी, मेट्रो हे सारे विविध प्रकल्प विविध क्षेत्रातील जनतेच्या हिताचे आहेत. जीवनाच्या विविध अंगांना आम्ही त्यातून स्पर्श करीत आहोत असे सांगून मोदी म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विविध धर्मक्षेत्रांच्या विकासातून सांस्कृतिक पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. जनधन योजनेच्या माध्यमातून ३५ कोटी गरीबांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आले आहे. एम्स संस्थेच्या उभारणीसह प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये ही वैद्यकीय पायाभूत सुविधांची उदाहरणे आहेत. या साऱ्यांच्या माध्यमातून मानवी संवेदना जोपासल्या गेल्या आहेत. जेव्हा अशा सुविधा देताना मानवी चेहरा नसतो तेव्हा त्याचा जनतेला मोठा फटका बसतो.
३०-३५ वर्ष रखडलेल्या गोसीखुर्द प्रकल्पाचे दिले उदाहरण-
३५ वर्षांपूर्वी विदर्भाला सुजलाम सुफलाम करु शकणा-या गोसीखूर्द धरण प्रकल्पाचे उदाहरण याप्रसंगी मोदींनी दिले.३५ वर्षांपूर्वी या प्रकल्पाची एकूण किंमत ही ४०० कोटी रुपये होती मात्र संवेदनाहीन राजकारण व कार्यशैलीचे उत्तम उदाहरण ठरलेल्या या प्रकल्पाची किंमत आता १८ हजार कोटी रुपये झाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.२०१७ मध्ये महाराष्ट्रात जेव्हा डबल इंजिनची सरकार होती तेव्हा या धरणाच्या समस्यांचा शास्त्रशुद्ध आढावा घेण्यात आला व त्या सोडविण्यावर भर देण्यात आले.त्यामुळेच या वर्षी हे धरण पूर्णपणे भरु शकले आणि याचा लाभ शेतक-यांना होऊ शकला,तीन दशकांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रातील संवेदनाहीन राजकारण व कार्यशैलीमुळेच हे घडले.आज भारत अफाट संकल्पना घेऊन फार वेगाने विकसित होत असल्याचे माेदी हे म्हणाले.
सामुहिक भारताची ताकत हीच आहे ’राष्ट्र के विकास के लिये राज्य का विकास’मात्र काही राजकीय पक्ष हाच विकास मर्यादित ठेवतात व विकासाच्या संधी देखील मर्यादित ठेवतात,अश्या शब्दात त्यांनी विरोधकांवर चांगलीच टिका केली.
राजकीय पक्ष व राजकीय नेत्यांच्या ‘शॉर्ट कट’मनोवृत्तीवर माेदींचा प्रहार-
विकासाला जेव्हा मर्यादित ठेवले जाते तेव्हा निर्माण होणाऱ्या संधीही मर्यादित असतात असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, यापूर्वी शिक्षण मर्यादित होते तेव्हा येथील गुणवत्ताही पूर्ण क्षमतेने समोर आली नाही. यामुळे मोठा वर्ग विकासापासून वंचित राहिला, त्याचा परिणाम म्हणून देशाची खरी ताकद पुढे आली नाही. मात्र, गेल्या आठ वर्षात आम्ही दृष्टीकोन आणि विचारपद्धतीत बदल घडविला. ‘सबका साथ, सबका विकास’ या सूत्राच्या सार्थकतेसाठी ‘सबका प्रयास’ही गरजेचा आहे. त्यात देशातील प्रत्येक नागरिक सहभागी झाला तरच देश विकसित होवू शकेल. आजवर जे वंचित-उपेक्षित राहिले ते आता आमच्या प्राधान्यक्रमाच्या अग्रस्थानी आहेत, हे स्पष्ट करताना प्रधानमंत्र्यांनी ‘वंचित को वरियता’ हे या सरकारचे सूत्र असल्याचे आग्रहाने सांगितले. शेतकरी, पशुपालक, रस्त्यावरील विक्रेते अशा विविध वर्गांचा विचार करून योजना राबविल्या जात आहेत. देशातील आकांक्षित जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न होत आहे. हे जिल्हे प्रामुख्याने आदिवासीबहुल आहेत. गेल्या आठ वर्षात आम्ही विविध वंचित क्षेत्रांना विकासाचे केंद्रे बनवित आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटण्याचा शॉर्टकट अवलंबणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर टीका करून प्रधानमंत्री म्हणाले, केंद्र सरकार पुढील २५ वर्षांचे उद्दिष्ट्य आखून काम करीत आहे. मात्र, काही प्रवृत्ती देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करीत आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठयावर आपण आहोत अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही, ‘शॉर्टकट’ वृत्तीने देश चालू शकत नाही. दूरगामी दृष्टीकोन असल्याशिवाय देशाचा स्थायी विकास होवू शकत नाही. हा मुद्दा स्पष्ट करताना प्रधानमंत्र्यांनी सिंगापूरचे उदाहरण दिले.
यापूर्वी प्रामाणिक करदात्यांनी दिलेला पैसा चुकीच्या आणि अनिष्ट बाबींसाठी खर्ची पडला आता हा पैसा युवा पिढीच्या भविष्यासाठी खर्च झाला पाहिजे ही काळाची गरज आहे. ‘आमदनी अठ्ठणी खर्चा रुपया ‘ या प्रवृत्तीमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होवू शकते अशा प्रवृत्ती पासून देश वाचवला पाहिजे ‘शॉर्टकट’ ऐवजी स्थायी विकासाचे धोरणच आपली मोठी गरज आहे. देशहितासाठी सर्वांनी त्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले.
सिंगापूर सारख्या फक्त एक बेट असणा-या देशाने पुढील पंचवीस वर्षांच्या विकासाचा दूरगामी दृष्टिकोण ठेवला, त्यामुळेच आज सिंगापूर एक योग्य आर्थिक नीती राबवून प्रगत राष्ट्र झाले आहे.खाडीच्या देशांनी देखील याच दृष्टिकाेणातून आपला विकास साधला.अाज खाडीच्या देशात लोखो भारतीय हे राेजगार मिळवत अाहेत,याकडे त्यांनी लक्ष वेधले.मागच्या चार दशकांमध्ये या देशांनी स्वत:ला मजबूत केले,आधुनिक केले,भविष्याच्या लाभासाठी योजना राबविल्या. त्यांनी करदात्यांचे पैसे स्वत:च्या स्वार्थासाठी लृटले नाही,अशी परखड टिका यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केली.
ज्या देशात करदात्यांचा पैशा उधळला जातो तो देश प्रगतीपथावर पोहोचू शकत नाही.उशिरा का होईना भारताला ही संधी मिळाली आहे.मागच्या सरकारांनी देशातील करदात्यांचा पैसा भ्रष्टाचार तसेच आपापली ‘व्होट बँक’मजबूत करण्यासाठीच खर्ची केले,अशी जहाल टिका मोदी यांनी याप्रसंगी केली.
सरकारी खजिन्यातील पै आणि पै चा उपयोग देशातील तरुणाईच्या उज्वल भविष्यासाठी खर्च झाली पाहिजे.भारताच्या प्रत्येक युवाला माझे आवाहन आहे ,त्यांनी स्वार्थी राजकारण करणा-या राजकीय पक्षांपासून सावध राहावे,‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’अशा शब्दात मोदींनी अप्रत्यक्षपणे मतदारांवर सवलतींची भरमार करणा-या, आम आदमी पक्षावर निशाना साधला.
अशा प्रकारचे राजकारण करणारे देशाला आतून पोखरत असतात.संपूर्ण अर्थव्यवस्थाच नष्ट करतात,अशी टिका त्यांनी केली.भारताला अश्या कुनीती पासून वाचवायचे आहे.देशाला अश्या दिशाहीन कुनीतीपासून ,स्वार्थी राजकारणापासून सावध असले पाहिजे व देशहितासाठी समर्पण भावाने कार्य करणे,स्थायी विकास व स्थायी समाधानासाठी प्रयत्नरत राहीले पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.
जगात पहीली क्रांती झाली तेव्हा आम्ही त्याचा फायदा नाही घेऊ शकलो,दूसरी व तिसरी क्रांती झाली त्यावेळी देखील भारताला त्याचा विशेष लाभ नाही उठवता आला मात्र आता जगात चौथी आैद्योगिक क्रांती आली असताना भारत ही संधी मुळीच गमावू शकणार नसल्याचे ते म्हणाले.अशी संधी कोणत्याही देशाला वारंवार मिळत नाही.शॉर्ट कट धोरणांतून देश नाही चालू शकत.स्थायी विकास व स्थायी समाधानासाठी काम करावे लागेल, ते ही पुढील पंचवीस वर्षांसाठीची धोरणे राबवूनच करने गरजेचे असल्याचे मोदी म्हणाले.तरुणांसाठी आज जी संधी निर्माण झाली आहे ती आम्ही अशीच गमावू शकत नसल्याचे सांगूूूून, सामान्यांचे देखील आम्हाला जबरदस्त समर्थन मिळत असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.
गुजरातचा विजय अश्या स्थायी विकास,स्थायी समाधान देणा-या आर्थिक नीतीचा विजय असल्याचे मोदी म्हणाले.गुजरातच्या निवडणूकीने हे सिद्ध केले,की स्थायी विकास करुन देखील निवडणूका या जिंकता येतात, देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन शॉर्ट कटच्या रस्त्याचा त्याग करण्याचा प्रण केला गेला पाहिजे अश्या शब्दात मोदी यांनी विरोधी पक्षांनाही टोला हाणला.
आज महाराष्ट्राच्या जनतेला जे नक्षत्ररुपी अकरा परियोजनांचा मार्ग गवसला आहे तो त्यांचे भविष्य निर्माण करणारा,अनेक संधींना जन्म देणारा एक योग्य रस्ता आहे.पूर्ण समर्पण भावाने एकच मंत्र लक्षात ठेवा ‘एथ पंथा:’येणा-या पंचवीस वर्षांच्या विकासाची संधी असणा-या या ‘एकाच मार्गाला’आम्ही गमावणार नाही,असे म्हणून त्यांनी आपले उस्फूर्त भाषण संपवले.
प्रत्येक प्रकल्पाच्या उद् घाटनाप्रसंगी मोदी यांच्याच, संबंधित शब्दांच्या भाषणांची चित्रफित दाखविण्यात आली,हे विशेष.मोदी यांनी देखील प्रत्येक परियोजनासंबधी ते पूर्वी काय म्हणाले होते?याचे काळजीपूर्वक एलईडी स्क्रीन वर बघत व ऐकत होते.
मराठीत केली भाषणाची सुरवात-
आज संकष्टी चतुर्थी आहे.कोणतेही शुभ काम करताना आपण गणपतीला वंदन करुन सुरवात करतो.टेकडीच्या गणपतीला त्यांनी मंचावरुनच वंदन केले.प्रथम गणेशपूजन करतो.आज नागपूरात आहोत तर टेकडीच्या गणपती बाप्पाला माझे वंदन.११ डिसेंबर आजचा दिवस संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस आहे,अाज महाराष्ट्राच्या विकासासाठी ११ चांण्यांचे महान नक्षत्रांचे उदय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी यांच्या मराठी बोलण्याला श्राेत्यांनी उस्फूर्त दाद दिली व ‘जय भवानी,जय शिवाजी’चा जयघोष लगेच पँडोलमध्ये दुमदुमला.
गडकरींचा उल्लेख फक्त ‘नितीनजी!’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरवात करण्यापूर्वी मंचावरील महनीय व्यक्तींसाठी उद् बोधन करताना, महाराष्ट्रा के राज्यपाल श्रीमान भगतसिंहजी,यहा के लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदेजी,इसी धरती के संतान और महाराष्ट्रा के उज्जवल भविष्य के लिये प्रयत्नरत श्री देवेंद्रजी ,नितीनजी,रावसाहेब दानवे,डॉ.भारती ताई और विशाल संख्या मे पधारे हूये नागपूर के मेरे प्यारे भाईयो और बहनो…..’अश्या शब्दात सुरवात केली.यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी गौरवोद् गार काढले असताना नागपूरातील खासदार व त्यांच्या मंत्रीमंडळातील केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी मात्र त्यांनी कोणतेही कौतूकास्पद विशेषणे न वापरल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचा तर त्यांनी उल्लेख देखील केला नाही,त्यामुळे देखील अनेकांना आश्चर्य वाटले.सहसा मंचावर उपस्थित सर्वच महनीय व्यक्तींचे नाव घेणे हा प्रोटोकॉल किवा संस्काराचा,आदर देण्याचाच एक भाग असतो मात्र मोदींनी नागपूरात आपल्या भाषणाची सुरवात काहीशी अशीच ‘धक्कादायक’पद्धतीने केली,याची चर्चा आज सभास्थळी चांगलीच रंगली होती.
महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणार – मुख्यमंत्री
आपण सुरुवात केलेल्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचा आनंद आणि समाधान आहे. त्यातही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हे लोकार्पण होत असल्याचा आपणास आनंद आणि अभिमान आहे. अशा भावना व्यक्त करुन मुख्यमंत्री म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नाची ही पूर्ती आहे. या प्रकल्पात विक्रमी वेळेमध्ये भूमी अधिग्रहण करण्यात आले. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात आली. शेतकऱ्यांना थेट आरटीजीएस करून पैसे देण्यात आले. हा इकॉनॉमिक कॅारिडॉर आहे त्यासोबतच ग्रीन कॅारिडॉर सुद्धा आहे. या ठिकाणी वन्यजीवांचीही विशेष काळजी घेतली आहे. खऱ्या अर्थाने समृद्धी महामार्ग ही महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे. लक्षावधी लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. सर्व घटकांच्या हिताचे आपले सरकार असून प्रगतीच्या दिशेने महाराष्ट्राला नेण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
विदर्भ – मराठवाड्याच्या विकासाला चालना : गडकरी
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी आवश्यक होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील विकासाला चालना मिळेल, असा अशावाद व्यक्त करुन गडकरी म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अत्यंत दर्जेदार काम केले आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई-पुणे हा महामार्ग तसेच वांद्रे वरळी सी-लिंक या प्रकल्पाचे काम केले आहे. आता हा आणखी एक महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी पूर्णत्वास नेला आहे. याशिवाय विविध रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात लवकरच औरंगाबाद ते पुणे या महामार्गाचे काम पूर्णत्वास येत आहे. महाराष्ट्रात ७५ हजार कोटी रुपयांचे ग्रीन हायवे लवकरच पूर्णत्वास येईल, असे ते म्हणाले.
नागपूर विमानतळाचे लवकरच भूमिपूजन – फडणवीस
समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या खंबीर पाठबळाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या महामार्गाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या पुढील दोन वर्षात ५० हजार कोटी प्राप्त होतील. त्यातून इतर पायाभूत सुविधांची कामे होऊ शकतील. केंद्र सरकार राबवत असलेल्या गतिशक्ती योजनेचे उत्तम उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्ग होय. या महामार्गाच्या मल्टीयुटीलिटी कॉरिडॉरच्या माध्यमातून गॅस पाईपलाईन, पेट्रोलियम प्रॉडक्ट पाईप लाईन, अंडर सी केबल सोबतच दृतगती रेल्वे मार्गाची तरतूद अशा विविध बाबी जोडल्या जात आहेत. त्याचा डेटा सेंटर निर्मितीसाठी उपयोग होऊ शकेल. सौरऊर्जा निर्माण होणार आहे. अशा अनेक बाबींतून हा प्रकल्प अधिक समृद्ध केला जाणार आहे. शहरातील रेल्वे स्थानक सुसज्ज करण्यात येत आहेत. रेल्वे, रस्ते, हायस्पीड ट्रेन अशा अनेक प्रकल्पांची कामे होत आहेत. नागपूर-गोवा महामार्गाची लवकरच उभारणी करण्यात येणार आहे. मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न पूर्णत्वाकडे जात आहे. राज्यातील जिल्हे प्रमुख बंदराशी जोडतांना महाराष्ट्राचा ‘पोर्टलेड’ विकासासह विविधांगी दृष्टीकोनातून विकास करण्यात येत आहे असे सांगताना नागपूर येथील नव्या विमानतळाच्या भुमिपूजनाच्या उद्घाटनाचे निमंत्रणही लवकरच प्रधानमंत्री श्री. मोदी यांना देण्यात येईल, अशी घोषणाही श्री. फडणवीस यांनी केली. नागपूर शहरातील मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदूषण निर्मूलन हे दोन्ही प्रकल्प मधल्या काही काळात रखडले होते मात्र, प्रधानमंत्री कार्यालयाच्या पुढाकाराने केवळ 35 दिवसात मंजुरी देण्यात आल्याने सांगून त्यांनी विशेष आभार मानले.
मोदींच्या भाषणातील विकासाच्या नभांगणातील अकरा तारे –
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात विकासाच्या नभांगणातील अकरा तारे असा नागपुरातील विविध लोकार्पण व उदघाटन कार्यक्रमांचा उल्लेख केला. हे तारे असे…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग – महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेखा ठरणा-या ५५ हजार कोटींच्या सहापदरी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करण्यात आले.
• नागपूर मेट्रो फेज १ – नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करणा-या ४० किलोमीटर अंतराच्या ९ हजार ३०० कोटी खर्चाच्या प्रकल्पाचे लोकार्पण
• नागपूर मेट्रो फेज २ – नागपुरातील मेट्रो जाळे हिंगणा, कन्हाण बुटीबोरीपर्यंत विस्तारित करणा-या ४४ किलोमीट अंतराच्या आणि ६७ हजार कोटी खर्चाच्या प्रकल्पाची पायाभरणी
• वंदे भारत एक्सप्रेस – नागपूर ते बिलासपूर या दोन शहरामधील प्रवासी वाहतुकीला गतिमानतेचा आयाम देणा-या आणि ताशी १३० कि.मी. वेगाने धावणा-या रेल्वे गाडीला प्रारंभ
• नाग नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प – नागपूर शहरातील नाग नदीला नवे जीवन देणा-या ४१ कि.मी. लांबीचा आणि १९२७ कोटी खर्चाच्या प्रकल्पाची पायाभरणी
• अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर – राज्या वैद्यकीय क्षेत्रात नवे पर्व असणा-या आणि १५० एकर क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज संस्था राष्ट्राला समर्पित
• नागपूर आणि अजनी रेल्वे स्टेशन पुनर्विकास प्रकल्प – नागपूर रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्पासाठी ५८९ कोटी आणि अजनी रेल्वेस्थानक पुनर्विकास प्रकल्पासाठी ३६० कोटी खर्चाच्या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ
• चंद्रपूर येथील सिपेट – सेंटर फॅार स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (सीएसटीएस) चंद्रपूरचे लोकार्पण करण्यात आले. राज्य शासनाने या संस्थेला १५ एकर जागा उपलब्ध करून दिली आहे.
• नागपूर इटारसी तिसरी मार्गिका कोहळी-नरखेड खंड राष्ट्राला समर्पित.
• अजनी येथे लोकोमोटिव्ह डेपो – अजनी येथील अत्यंत महत्वाकांक्षी अशा १२ हजार हॅार्सपॅावरच्या लोकोमोटिव्ह डेपोचे लोकार्पण
• नॅशनल इंस्टिट्यूट फॅार हेल्थ – नागपुरातील नॅशनल इंस्टिट्यूट आफ हेल्थ या संस्थेची पायाभरणी करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक दूर्धर आजारांवरील संशोधन होणार आहे.
• चंद्रपूर येथील सेंटर फॉर रिसर्च मॅनेजमेंट ॲन्ड कंट्रोल ऑफ हिमोग्लोबिनो पॅथीस या संस्थेचे लोकार्पण करण्यात आले.
क्षणचित्रे—-
-‘मोदी है तो मुमकीन है’सकाळी सव्वा दहा वाजेपर्यंत भव्य व विशाल अश्या डोममधील अर्ध्याअधिक खुर्च्या या रिकाम्या होत्या मात्र सव्वा अकरा वाजता मोदी यांच्या आगमनापूर्वी केवळ एका तासात संपूर्ण डोम भरगच्च गर्दीने फूलून गेला.त्यामुळे सुरवातीला आयोजकांच्या चेह-यांवर असणारा तनावही निववळा.
– मोदी यांच्या कार्यक्रमस्थळी आगमनापूर्वी निवेदिकेने वारंवार एलईडी स्क्रीनवर सर्व संबंधित प्रकल्पांच्या ई-पट्टीकांच्या अनावरणाची योग्य चित्रफित तपासून बघितली.त्यात चूका ही आढळून आल्याने निवेदिकेने ध्वनि व्यवस्थापन व संगणक सांभाळणा-याला योग्य सूचना केल्या.यानंतर सूचीबद्धरित्या एकानंतर एक योग्य लघू चित्रफिते एलईडी स्क्रीनवर झळकली,यामुळे निवेदिकेने या दोघांनाही शाबासकीची मंचावरुनच उस्फूर्त दाद दिली.
-पारंपरिक साडी या वेषभूषेत मंचावर वावरणा-या निवेदिकेने अतिशय सुंदर व नेटके निवेदन केले.अनावश्यक निवेदन लाबंविण्याचा मोह टाळल्याने त्यांचे निवेदन प्रभावी ठरले.
-मंचावर मोदींचे आगमन होताच भरगच्च भरलेल्या डोममधील श्रोत्यांनी ‘मोदी मोदी’चा जयघोष केला.अनेक पालकांनी आपल्या लहानग्या पाल्यांना खांद्यावर उचलून मंचावरील ‘मोदी’ दाखविण्याची उठाठेव देखील केली.
-मोदी यांनी मराठीत भाषणाला सुरवात करताच ’जय भवानी जय शिवाजी’वंदे मातरम’’भारत माता की जय’,’जय श्रीराम’चे नारे गुंजले.मोदी यांच्या चेह-यावर देखील हास्य फूलले.

-मोदी यांनी मंचावर येताच श्रोत्यांना हात उंचावून अभिवादन केले
-पंतप्रधान मोदी यांच्या डोक्यावर मराठी लाल रंगाचा फेटा मुख्यमंत्र्यांनी स्वागतपर बांधला.सन्मानचिन्ह,समृद्धि महामार्गाचे कॉफि टेबल बूकही प्रदान केले.

-लाल रंगाचा मराठमोला फेटा मोदींनी बराच वेळ आपल्या डोक्यावर परिधान केला होता.भाषणा पूर्वी मात्र त्यांनी तो काढून ठेवला.
कार्यक्रमस्थळी संपूर्ण रस्त्यावर पंतप्रधान मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठमोठे कटआऊट्स लक्ष वेधून घेत होते.गडकरी यांचे मात्र एकाच ठिकाणी कटआऊट लागलेले दिसले,हे विशेष.
-मोदी यांच्या सर्व मार्गावर भाजपच्या निवडणूक चिन्हाच्या शेंदरी व हिरव्या रंगाचे फूगे सजविण्यात आले होते व शेंदरी पताका व झेंडे लहरत होत्या.
-भाजपचे माजी आमदार गिरीश व्यास हे भाजपचे निवडणूक चिन्ह ’कमळ’चेच जॅकेट परिधान करुन कार्यक्रमस्थळी पोहोचले.

-शहराचे प्रथम नागरिक असलेले माजी महापौर दयाशंकर तिवारी हे श्रोत्यांमध्ये मागच्या बाजूला खूर्चीवर बसले मात्र यानंतर त्यांना समोर सोफ्यावर जागा करुन देण्यात आली.
-मंचाच्या बाजूला असलेल्या व्हीआयपी जागेवर राणा दाम्पत्य यांच्यासह इतर आमदार व भाजपचे नेते विराजमान होते व त्यांनी मोदींचे संपूर्ण भाषण काळजीपूर्वक ऐकले.
–मोदी यांच्या भारदस्त आवाजाने,मंचावरील सहज वास्तव्याने, विकासाची साद देणा-या भाषणाने कार्यक्रम स्थळी, एक वेगळेच अभिमानाने भारावलेले वातावरण उपस्थितांनी अनुभवले.देशाचे पंतप्रधान हे साक्षात रुपात नागपूरात ‘याची देही याची डोळा’बघत असल्याचा भाव अनेकांच्या चेह-यावर उमटला.
–




आमचे चॅनल subscribe करा
