फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजट्रक मालकांचा महाजनकोच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

ट्रक मालकांचा महाजनकोच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

Advertisements

महाजनकोने ताबडतोब ट्रक्स बाहेर काढून द्यावे

कोराडी पावर प्लांटच्या राखेच्या तालावात आठ ट्रक अद्यापही पाण्यातच!

नागपूर,१२ फेब्रुवारी २०२४ : महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखेचा बंधारा फुटून ६ फेब्रुवारी रोजी सकाळी झालेल्या अपघातात ८ ट्रक बुडाले मात्र, सहा दिवस उलटून देखील महाजनकोने, पाणी बाहेर काढून ट्रक मालकांना त्यांचे ट्रक सुखरूप परत देण्याची कोणतीही तसदी न घेतल्याने, ट्रक मालकांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली कैफियत मांडली.

राख काढताना जेसीबीमुळे बंधाऱ्याला धक्का लागून त्याला गळती लागल्याने बंधारा फुटला होता. यात राखेची वाहतूक करणारी वाहने बुडाली सुदैवाने ,यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी आठ टिप्पर वाहून गेले होते हे टिप्पर चिखलात अडकल्याने आधी तलावातील पाणी रिकामे

करावे लागणार आहे. त्यानंतरच यात अडकलेली वाहने काढणे शक्य होणार आहे मात्र, पाणी काढण्याची प्रक्रिया अद्यापही महाजनको तर्फे सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे हतबल होऊन टिप्पर मालकांनी पत्रकार परिषद घेऊन महाजनकोला त्यांच्या कार्यालयासमोर कुटुंबीयांसह आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

महत्त्वाचे म्हणजे कोराडी पोलीस ठाण्यातील पी आय जुमडे हे एफ आय आर कॉपी देण्यासाठी देखील टाळाटाळ करीत असल्याचा आरोप याप्रसंगी टिप्पर चालकांनी केला. ९ फेब्रुवारी रोजी एफ आय आरची कॉपी देण्याचे निवेदन पीआय यांना देण्यात आले होते. कोराडी पोलिसांनी ६ फेब्रुवारी रोजी पंचनामा केला होता. ९ फेब्रुवारीपासून निवेदन देऊन एफ आय आर ची कॉपी मागितली मात्र, आतापर्यंत एफ आय आर ची कॉपी सुद्धा देण्यात आली नाही असा आरोप त्यांनी केला.

ज्या ठेकेदारासाठी आम्ही आमचे टिप्पर राख काढण्यासाठी लावले होते तो ठेकेदार कंत्राटदाराशी बोलतो असे सांगतो, कंत्राटदार एजन्सी सोबत बोलतो असे सांगतो तर एजन्सी महाजनकोसोबत बोलते असे सांगते. राखेच्या बंधारात अंदाजे ३० फूट पाणी आहे आणि केमिकल युक्त पाण्यामुळे आमचे ट्रक हे खराब होत असल्याचे टिप्पर मालकांनी सांगितले. आम्हाला विमा कंपनी देखील विमा देण्यास टाळाटाळ करू शकते. हा अपघात नसल्याचे विमा कंपनी सांगू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

महाजनकोच्या तीन राखेच्या बंधाऱ्यातून दररोज ५०० ट्रक ७०० रुपये पर ट्रक प्रमाणे आम्ही देत असल्याचे वास्तव या प्रसंगी ट्रक चालकांनी सांगितले. महाजनकोने जरी राखेची ही उचल नि:शुल्क करीत असल्याचे सांगितले असले तरी बाकायदा ७०० रुपयांची पावती फाडूनच आम्हाला वरती राख उचलण्याची परवानगी मिळते असे ट्रक्स चालकांनी सांगितले. राख उचलण्याचा कंत्राट महाजनकोने एजन्सीला दिले आहे. राखेच्या तलावात कोणतीही मशीन बुडाली नसल्याचे ट्रक मालकांनी सांगितले. मशीन ही फार लांब होती, ट्रक पाण्यात बुडू लागल्याबरोबर मशीन ही वर चालली गेली. कंत्राटदाराची फक्त मशीन होती मात्र,आमच्या उपजीविकेचे एकमेव साधन असणारे आठ ट्रक राखेच्या बंधारात बुडाले अशी व्यथा त्यांनी मांडली.

आमच्या ट्रकला महाजनकोची सिक्युरिटी फॉलो करते. परिसर, जागा, राख, पाणी, तलाव हे सर्व महाजनकोचे असल्यामुळे आम्ही महाजनकोकडेच नुकसान भरपाईचा दावा केला असल्याचे ट्रक चालकांनी सांगितले. महाजनको आम्हाला कंत्राट दाराकडून वसूल करा असा उरफाटा सल्ला देत असल्याचे ते म्हणाले.

टिप्पर वर काम करणारे ड्रायव्हर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गेल्या आठ दिवसापासून उपाशी मरण्याची वेळ आलेली आहे मात्र, महाजनको आणि प्रशासन यांना कोणतीही संवेदना नसल्याचा संताप टिप्पर मालकांनी या प्रसंगी व्यक्त केला. पुढील चार दिवसात आमचे ट्रक प्रशासनाने बाहेर काढले नाही तर महाजनकोच्या कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करू आणि वेळप्रसंगी कुटुंबीयांसह आत्मदहन करण्याचा इशारा ट्रक चालकांनी दिला.

पत्रकार परिषदेमध्ये निखिल भुरकंडे बबलू,दयाराम जुमेले, असद मलिक, मंगेश जांगडे उपस्थित होते.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या