
बंटी शेळकेच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस
देवरी टोल नाक्यावर भ्रष्टाचाराची कमाई दररोजची ४० लाख!
मंत्र्यापासून ग्रामपंचायत सरपंचापर्यंत सर्वांची ’टक्केवारी’ निश्चित:वाहनचालकांचा आरोप
नागपूर,ता.३० मे २०२२: राज्यातील टोल नाके हे कश्याप्रकारे लाखोंच्या कमाईचे कुरण बनले आहेत याच्या सुरस कथा या महाराष्ट्राच्या जनतेला मुखोद् गद झाल्या आहेत.सर्व कागदपत्रे योग्य असतानाही फक्त एका राज्यातून दुस-या राज्यात प्रवेशासाठी परिवहन विभागाच्या काही भ्रष्ट अधिका-यांच्या संगमताने चक्क गुंडांना हाताशी धरुन, राजरोसपणे महाराष्ट्रनामक पुरोगामी राज्यात जो ‘अघोरी’प्रकार सुरु आहे त्याची कल्पनाही सामान्य नागरिक करु शकत नाही मात्र टोलनाक्यांवर वाहनचालकांसोबत जो प्रकार राजरोसपणे अगदी दररोज घडत आहे ते धक्कादायकच नव्हे तर महाराष्ट्रसारख्या राज्याची प्रतिमा इतर राज्यात कलंकित करण्यासारखीच आहे.
काँग्रेसच्या युवा मोर्च्याचे राष्ट्रीय सचिव बंटी शेळके यांनी टोल नाक्यावरील भ्रष्टाचाराविरोधात गेल्या दंड थोपटले असून त्यांच्या या धरणे-आंदोलनाचा चांगलाच धसका काही राजकारणी व परिवहन विभागाच्या काही भ्रष्ट अधिका-यांसह त्यांनी पोसलेल्या गावगुंडांनी घेतला आहे.त्यामुळेच गेल्या पाच दिवसांपासून छत्तीसगढ-महाराष्ट्राच्या सीमावर्ती असणा-या देवरी टोलनाक्यावर ही अवैध वसूली पूर्णपणे थांबली असून या मार्गावरुन जाणा-या अनेक ट्रक चालक तसेच वाहनचालकांनी बंटी शेळके व त्यांच्या आंदोलनकर्ते युवा कार्यकर्त्यांचे शतश:आभार मानले आहे.याचे व्हिीडीयो देखील चांगलेच व्हायरल झाले आहेत.
राजस्थानवरुन गेल्या ९ वर्षांपासून याच मार्गावरुन येणा-या एका ट्रकचालकाने तर बंटी शेळके यांना अवैध वसूलीच्या रकमेत फक्त काही रक्कम कमी भरल्याने भ्रष्ट अधिका-यांच्या पोसलेल्या गुंडांनी ज्या पद्धतीने पायांवर खिळे लागलेल्या बॅटने मारहाण केल्याचा खूणा दाखवल्या ते बघता सभ्य समाजमनाला हे महाराष्ट्रातीलच दृष्य बघतो आहोत की बिहार,उत्तर प्रदेशचे?असा प्रश्न पडला.
टोल नाक्यांवरुन जाणा-या जवळपास ९५ टक्के वाहनचालकांकडे संपूर्ण कागदपत्रे वैध असताना देखील त्यांच्याकडून जबरीने प्रत्येकी हजार,दोन हजार,पंधराशे रुपये उकळण्याचे ‘राजकीय रॅकेटच’टोल नाक्यांवर राजकीय आर्शिवादाने सक्रीय आहेत.या देशात कायदे-कानून हे फक्त कायद्यांच्या पुस्तकात अक्षर रुपात बंदिस्त असून प्रत्यक्ष रस्त्यांवरील कायदे-कानून हे काही राजकीय मंत्री ते संत्री यांच्याच आदेशाने कश्याप्रकारे चालत असतात,याची ’पोलखोलच’या मार्गावरील ट्रकचालकांनी बंटी शेळके यांना आपली प्रतिक्रिया देताना केली.
विशेष म्हणजे जनतेच्या जिव्हाळ्यांच्या प्रश्नांवर वारंवार आंदोलन करणा-या या युवा पदाधिका-याला आपल्याच पक्षाच्या नेत्यांचे पाठबळ नाही.महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा सत्ताधारी असताना देखील या युवा पदाधिका-याच्या विरोधातच टोल नाक्यावरील आंदोलनाच्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले!
महाराष्ट्र सरकारमध्ये सत्ताधारी असताना देखील बंटी शेळकेंना टोल नाक्यांविरुद्ध आंदोलन करण्याची परवानगी सरकारकडून प्राप्त झाली नाही,मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात त्यांना धरणे-आंदोलनासाठी तंबू देखील ठोकू दिल्या गेले नाहीत.या उलट हा टोल नाका ओलांडताच छत्तीसगढ राज्याची सीमा सुरु होते,छत्तीगढ येथील काँग्रेसच्या सरकारने मात्र बंटी शेळके यांना आपल्या राज्यातील सीमेत आंदोलनाची परवानगी प्रदान केली आहे!
शेळके यांच्या मताप्रमाणे देवरी टोलनाका या एकाच टोलनाक्यावर दररोजची अवैध वसूली ही ४० लाख रुपयांच्या जवळपास असून यात काही भ्रष्ट मंत्र्याच्या आर्शिवादातून आणि सहमतीतून परिवहन विभागाचे काही महाभ्रष्ट अधिकारीही सहभागी असून आपापली ’टक्केवारी’वाटून घेतली जात असते.जनतेच्या विकासासाठी महसूल मिळावा यासाठी सातत्याने गळे काढणा-या सरकारच्या खजिन्यात मात्र दररोज एक लाख चाळीस हजारच महसूल जमा होत असतो.
एकीकडे पेट्रोल,डिजेल व गॅस सिलेंडरवरील कोणताही ’उपकर’राज्य सरकार महसूल बुडेल या सबबीखाली यत्किंचितही कमी करण्यास धजत नाही,दूसरीकडे सरकारी महसूल हा काही भ्रष्ट मंत्री,परिवहन विभागाचे आधिकारी व अगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचाच्या मिलीभगतातून कश्याप्रकारे ओरबडला जातो आहे याचे किळस आणनारे उदाहरणच बंटी शेळकेंच्या आंदोलनातून समोर आले आहे.
एका ट्रक चालकाने तर महाराष्ट्रात माल वाहतूक करने आमची मजबूरी आहे अन्यथा देशात इतक्या प्रदेशात आम्ही प्रवास करतो,महाराष्ट्रासारखा महाभ्रष्ट राज्य आम्ही इतर कुठेही बघितला नाही,अनुभवला नाही,अश्या शब्दात आपली प्रतिक्रिया नोंदवली.संपूर्ण कागदपत्रे योग्य असतनाही टोल नाक्यावर फक्त अवैध वसूलीसाठी पोसलेले गुंड हे फक्त वसूलीच करीत नाही तर वसूली दिली नाही किवा रक्कम कमी पडली तर बेदम मारहाणही करतात,असा, महाराष्ट्राची मान खाली घालणारा अनुभव ही अधोरेखित करतात.
एका ट्रक चालकाने तर गेल्या ९ वर्षांपासून या टोल नाक्यावरुन मी राजस्थान येथून सातत्याने माल घेऊन प्रवास करतोय मात्र ९ वर्षात हे पहिल्यांदा घडले की मला देवरी टोलनाक्यावर हजार रुपये अवैध वसूलीचे द्यावे लागले नाही असे सांगत बंटी शेळके याचे आभार मानले.शेळके यांचा मोबाईल क्रमांकही त्याने फेसबूकवरुन सेव्ह करुन ठेवला होता,हे विशेष!
आपल्या घरावर तुळशीपत्र ठेऊन बंटी शेळके,त्यांचा भाऊ सौरभ शेळके व दीडशे कार्यकर्ते हे रणरणत्या उन्हात देवरी येथील टोलनाक्यावर शड्डू ठोकून वाहनचालकांच्या न्यायाची एकाकी लढाई लढत आहेत.
बंटी शेळके हे २०१९ मध्ये मध्य नागपूरातून काँग्रेस पक्षाचे विधान सभेचे उमेदवार होते,पहील्यांदा विधान सभेची निवडणूक लढवली असतानाही त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या दुस-या टर्मचे आमदार विकास कुंभारे यांना ही जागा जिंकण्यासाठी चांगलाच घाम फोडला होता. अवघ्या चार हजार आठ मतांनी विकास कुंभारे यांचा निसटता विजय झाला होता,हे विशेष!
उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी कुंभारे यांनी २५ हजारांच्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकणार असा दावा केला होता मात्र मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत कुंभारे व शेळके यांच्यात अटीतटीची लढाई रंगली होती.या निवडणूकीत एआयएमआयएमच्या अब्दुल शारिक यांच्या निवडणूक चिन्ह ‘पंतगने’८,५६५ मते घेऊन या युवा,तडफदार उमेदवाराची विधान सभेत जाण्याची डोर कापली,याची बरीच चर्चा देखील निवडणूकीनंतर रंगली. २२ साव्या फेरीनंतर विकास कुंभारे यांना ७५,६९२ तर बंटी शेळके यांना ७१,६८४ मते मिळाली होती.पहील्या फेरीतच बंटी शेळकेंनी १५२८ मतांची आघाडी घेत कुंभारे यांना धक्का दिला होता.
मतदानाच्या अगदी चार दिवसांपूर्वीपर्यंत हलबा समाजाचे असणारे विकास कंुभारे यांच्याप्रति समाजात तीव्र नाराजी होती मात्र ‘जाती नावावर माती’खाणा-या प्रवृत्तीमुळे कुंभारे यांची ऐनवेळी जातीतील मतदारांनी नैय्या पार लावली होती.२०१४ च्या निवडणूकीत याच कुंभारेंनी ३८ हजार ७१ मतांच्या मताधिक्याने विजयश्री मिळवली होती.त्या निवडणूकीत कुंभारे यांना ८७ हजार ५२३ मते मिळाली होती तर काँग्रेसचे अनिस अहमद यांना ४९ हजार ४५२ मिळाली होती.शेळके यांनी मात्र २०१९ च्या निवडणूकीत कुंभारे यांच्या ३३ हजार ८७१ मते काँग्रेससाठी खेचून आणली होती.
एआयएमआयएमला भाजपची ’बी’टीम यासाठीच बोलले जाते कारण अनेक ठिकाणी जिंकून येण्याची क्षमता नसतानाही ते काँग्रेसची मते खाऊन अपरोक्षपणे भाजपला फायदा पोहोचवताना दिसतात.मध्य नागपूरात देखील हेच घडले होते.
बंटी शेलके व भाजपचे निष्क्रिय आमदार म्हणून प्रसिद्ध असणारे विकास कुंभारे यांच्यातील ती लढत बघून १९६०-१९६१ साली रंगलेली पूर्व नागपूरातील राजा प्रतापसिंह भोसले व धोंडोबा हेडाऊ यांच्यातील निवडणूकीचीही आठवण झाली होती.धोंडोबा हे निरक्षर होते व त्यांना फक्त त्यांचे नाव लिहता येत होते तरी देखील हलबा समाजाच्या पाठींब्याने ते हमखास निवडून आले व भाेसले घराण्यातील वंशज व तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणारे प्रतापसिंह भोसले यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.आज प्रतापसिंग भोसले यांच्यासारखे लोकप्रतिनिधी पूर्व नागपूरला मिळाले असते तर नागपूर शहराचे प्राक्तन वेगळे राहीले असते,असे देखील जुने जाणकार सांगतात.कोल्हापूरच्या गादीचे वंशज शाहू महाराज ज्यांचे नुकतेच विधान परिषदेतील उमेदवारीतून युवा राजे संभाजी महाराज यांच्याबाबतचे विधान राज्यात गाजत आहेत ते या प्रतापसिंह भोसले यांचे धाकटे बंधून राजारामसिंह भोसले यांचेच चिरंजीव आहेत,हे विशेष!
एकीकडे बंटी शेळकेसारख्या युवा,धडाडीचा कार्यकर्ता राज्यातील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढतोय दुसरीकडे कुंभारे यांचे चिरंजीव ऐन करोनाच्या काळात मित्रमंडळीसोबत शेकडो लीटर शॅम्पेन मित्र मंडळींसोबत उडवताना व्हिडीयोमध्ये दिसून पडतो.एकीकडे राष्ट्रीय युवा काँग्रेसचा सचिव बंटी शेळके याला टोल नाक्यावरील अवैध कमाई बंद पडल्याने ३० ते ४० गुंडांकरवी धमक्या मिळत आहेत दूसरीकडे महाराष्ट्रातील प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत हे मकोकाच्या आरोपीसोबत विश्व भ्रमंतीचा आनंद लृटतानाचे प्रकरण नागपूरकरांसमोर येतं!
बंटी शेळके यांचे नेतृत्व नागपूरात पुढे यावे हे काँग्रेसच्याच विद्यमान आमदारांना तसेच प्रदेशाध्यक्षांना पचनी पडणार नाही त्यामुळेच बंटी शेळकेंच्या आंदोलनाविषयी काँग्रेसचे आमदार,पदाधिकारी व नेतेमंडळी ’ब्र’अक्षर ही बोलतना दिसत नाहीत.प्रत्येकाला ‘फासावर चढण्यासाठी भगतसिंग हा शेजारच्याच घरी जन्माला यावा ’अश्याच प्रकारची ही मनोवृत्ती असून काँग्रेसजनांना सत्ता ही फक्त भोगण्यासाठी व माया जमविण्यासाठी हवी आहे,असे काँग्रेसचेच शहरातील जुने जाणकार सांगतात.
बंटी शेळकेंचा ‘अण्णा हजारे’होऊ देणार नाही असा देखील ते निर्धार व्यक्त करतात.भ्रष्ट मार्गाने ९-१० कोटी खर्च करुन अध्यक्ष,सरचिटणीस पदे मिळवता येतात,मंबईच्या सभागृहात ३-४ कोटी खर्चून अध्यक्ष पद ग्रहणाचा भव्य सोहळा देखील साजरा केला जाऊ शकतो मात्र राहूल गांधींच्या कल्पनेतला पक्ष घडविण्यासाठी बंटी शेळकेंसारखाच समर्पित कार्यकर्ता लागतो,हे नागपूरकर जनतेने निदान पुढील निवडणूकीत तरी लक्षात ठेवावे,अशी अपेक्षाही ते व्यक्त करतात.
करोनाच्या काळात सलग १३० दिवस बंटी शेळकेंनी आपल्या युवा कार्यकर्त्यांच्या सहकार्याने शासकीय रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सामुहिक भोजनदानाचा उपक्रम राबवला,ज्या काळी मेयो,मेडीकलसारख्या शासकीय रुग्णालयात स्वत:चे आप्त स्वकीयांचेही करोनामुळे कलेवर घेण्यास नागपूरकर धजत नव्हते त्याकाळी या रुग्णालयांसमोर आपल्या करोनाबाधित रुग्णांच्या काळजीत हताश,निराश,उधवस्त होऊन बसणा-यांच्या खांद्यावर धीराचा ‘हात’ देणारा ’हात’बंटी शेळकेंचाच होता,हे ही विसरता येत नाही….!
(बंटी शेळके यांचा संपर्क क्रमांक- ८६९८९७७५५५)




आमचे चॅनल subscribe करा
