Advertisements

नागपूरात मनपात भाजपची चौथ्यांदा सत्ता
भाजप १०२,काँग्रेस ३४
अजित पवार गटाच्या आभा पांडेंनी राखली पक्षाची लाज
शिवसेना शिंदे गटाला एक जागा:उबाठाला दोन जागा
एमआयएम,मुस्लिम लीगने नागपूरात उघडले खाते:एमआयएम ६ मुस्लिम लीग चार जागेवर विजयी:बसपाला फक्त एक जागा
मनसे,आप,वंचित,रिपाई,अपक्षांना मतदारांनी नाकारले
अनेकांचा धक्कादायक पराभव: भाजपचा जल्लोष
गडकरींचा एकनिष्ठ ‘कार्यकर्ता’ जिंकला,अनेक वर्षांचा वनवास संपला:गडकरी वाड्याजवळ कार्यकर्त्यांच्या घोषणा
वाडा उजळला:भाजपच्या दोन आमदारांच्या घरासमोर शुकशुकाट!
या निकालाचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे ‘हिंदूत्व!’
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१६ जानेवारी २०२६: तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा ‘सिकंदर’ठरला असून चौथ्यांदा मनपात भाजपची एकहाती सत्ता आली आहे.भाजपने १५१ पैकी १०२ जागा जिंकल्या असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ३४ जागा जिंकल्या आहेत.२०१७ च्या निवडणूकीत काँग्रेसला २९ जागा मिळाल्या होत्या.यात फक्त ५ जागांची भर पडली असून यात उमेदवारांचा वैयक्तिक करिष्मा कामी पडला असल्याची चर्चा आहे.या निकालानंतर काँग्रेसचे दीड दशकांपासून शहराध्यक्ष असलेले आमदार विकास ठाकरे यांनी ही निवडणूक भाजपला ‘आंदण’म्हणून दिली असल्याचा आरोप केला जात आहे.संघटनात्मक पातळीवर भाजपची पकड ही अत्यंत मजबूत असताना काँग्रेसने जवळपास सर्वच प्रभागात कमकुवत उमेदवार दिल्याचे बोलले जात आहे.
प्रभाग क्र.८ या मुस्लिम बहूल भागात काँग्रेसच्या चारही मुस्लिम विजयी उमेदवारांपैकी दोघांनी १६ आणि ११ हजारांच्या मताधिक्याने नेत्रदिपक विजय मिळवला आहे.यात प्रभाग क्र.(अ)अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून सय्यद मुस्कान यांनी एकूण २७ हजार ७५१ मते मिळवली तर भाजपच्या कृतिका योगेश गोन्नाडे यांना ८,५२३ मते पडली.
प्रभाग क्र. १८(ब)मध्ये अंसारी सिराज अहमद(मागास वर्ग प्रवर्ग) यांना २०,८६८ मते मिळाली,तर प्रभाग क्र.१८(क)सर्वसाधारण महिला गटातून अंसारी सय्यदा बेगम यांनी १६ हजार ६३० मते मिळवली.याच प्रभागात ‘ड‘गटातून वसीम खान याने २०,०९८ मते मिळवत तीन टर्मचे मध्य नागपूरचे भाजपचे माजी आमदार विकास कंुभारे यांचे सुपुत्र श्रेयस कुंभारे यांचा ११ हजार मतांपेक्षा अधिक फरकाने दारुण पराभव केला.श्रेयस कुंभारे याला ९,९२१ मते मिळाली.याशिवाय काँग्रेसने पश्चिम नागपूरातून १२ जागांवर विजय मिळवला.२०१७ मध्ये पश्चिम नागपूरमधून काँग्रेसला केवळ ८ जागांवर विजय मिळवता आला होता.
प्रभाग क्र. १० मधून काँग्रेसचे संपूर्ण पॅनल म्हणजे चारही उमेदवार विजयी झाले यात सुनिता तभाने,सरस्वती सलामे,सीमा डवरे व प्रमोद सिंह यांचा समावेश आहे.प्रभाग क्र. ९ हा देखील ‘भाजपमुक्त’झाला असून या प्रभागात देखील काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी झाले यात विवेक निकोसे,प्रगती यादव,मारीस्टेला उसरे व गौतम अंबादे यांचा समावेश आहे.प्रभाग क्र.३८ मधून काँग्रेसचे शैलेश डोरले व ज्या लढतीकडे संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते त्या कुमुदिनी प्रफूल्ल गुडधे यांचा विजय झाला आहे.कुमुदिनी यांना १३,२७८ मते मिळाली तर भाजपच्या प्रतिभा राऊत यांचा पराभव केला.याच प्रभागातून जागा ‘अ’मधून काँग्रेसचे शैलेंद्र डोरले यांनी भाजपच्या आनंद नितनवरे यांचा पराभव केला.प्रभाग क्र. ३८ हा तीनच उमेदवारांचा प्रभाग असून त्यांना १२,२३८ मते मिळाली.एकूण ३८ प्रभाग असून सर्व प्रभाग हे अ,ब,क,ड प्रवर्गाचे असून शेवटचा प्रभाग क्र.३८ हा तीनच प्रवर्गाचा आहे.या प्रभागातील जागा (क)मधून भाजपचे माहेश्वरी पटले विजयी झाले.त्यांनी १२,४५२ मते घेऊन काँग्रेसचे अनिता लारोकर यांचा पराभव केला.
याशिवाय प्रभाग क्र. ३०(ब)मधून आ.विकास ठाकरे यांचे कट्टर समर्थक संजय महाकाळकर पुन्हा एकदा विजयी होऊन मनपात दाखल झाले आहेत,त्यांनी भाजपच्या चंदन आगरे यांचा अवघ्या ६४२ मतांनी पराभव केला. तर प्रभाग क्र.३३(ब)मधून मनोज गावंडे विजयी झाले असून त्यांनी भाजपचे आकाश भेदे यांचा पराभव केला.३३(क)मधून शीला तराले विजयी झाल्या असून भाजपच्या विशाखा बांते यांचा पराभव केला.प्रभाग क्र.१७(अ)मधून सुजाता कोंबाडे विजयी झाल्या असून त्यांनी भाजपच्या श्रद्धा चुटेले यांचा पराभव केला. तसेच १७( ब)मधून सुहास नानवटकर विजयी झाले असून त्यांनी भाजपचे प्रमोद चिखले यांचा पराभव केला तसेच १७(क)मधून कांचन चव्हाण यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून त्यांनी भाजपच्या सविता धरमारे यांचा पराभव केला.या प्रभागातून भाजपचे एकमेव उमदेवार मनोज साबळे विजयी झाले असून निवडणूकी पूर्वी त्यांनी काँग्रेसचा ‘हात’सोडून ’कमळ’हाती घेतले होते.
प्रभाग क्र. १९(ड) मध्ये काँग्रेसचे दिपक पटेल विजयी झाले असून७४८ मते मिळाली.त्यांनी भाजपचे कृष्णा कावळे यांचा पराभव केला.कृष्णा कावळे यांना १४,०५९ मते मिळाली.याच प्रभागात ‘अ’मधून भाजपच्या विद्या राजेश कन्हेरे यांनी १६,६१८ मते मिळवून विजयी झाल्या तर काँग्रेसच्या शालिनी ढोलके यांना १४,४१३ मते मिळाली.याच प्रभागात जागा ’ब’मधून भाजपच्या ॲड.संजय बालपांडे यांनी १५,३५५ मते मिळवून विजय मिळवला तर काँग्रसेचे रविंद्र पैगवार यांना १२,६०२ मते मिळाली व ते पराभूत झाले.याच प्रभाग क्र.१९ ‘क’मधून भाजपच्या प्रमिला गौर यांनी १५,९२९ मते मिळवून विजय मिळवला तर त्यांच्या प्रतिद्वंदी काँग्रेसच्या रश्मी इरफान काजी यांना १४,५३७ मते मिळाली.
प्रभाग क्र.२६(अ)मधून काँग्रेसचे शुभम मोटघरे यांनी भाजपच्या हमखास विजयाचा चेहरा असलेल्या मनपाच्या माजी विधी समिती सभापती व राज्याच्या अनुसूचित जाती-जमातीचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांचा धक्कादायक पराभव केला.७०० च्या वर मतांनी मेश्राम यांचा पराभव झाला.प्रभाग.क्र.५(ब)मधून काँग्रेसचे रामा उईके विजयी झाले असून त्यांनी शिंदे सेनेच्या योगेश गोन्नाडे यांचा पराभव केला.
काँग्रेसने प्रभाग क्र.२ मधून (नारी,उप्पलवाडी,कामगारनगर,कपिलनगर)काँग्रसचे चारही उमेदवार विजयी झाले असून भावना लोणारे यांनी १४,४८९ मते मिळवून भाजपचे उत्तर नागपूरचे माजी आमदार डॉ.मिलिंद माने यांच्या सुविद्य पत्नी डॉ.सरिता माने यांचा पराभव केला.डॉ.सरिता माने यांना ९,३०६ मते मिळाली. काँग्रसेचे दिनेश यादव यांनी १७,०२९ मते मिळवून भाजपचे अनिकेत येरखेडे यांचा पराभव केला,येरखेडे यांना ८,१८५ मते मिळाली. काँग्रेसच्या संगीता पाटील यांनी भाजपच्या नेहा निकोसे यांचा पराभव केला .संगीता पाटील यांना १३,४९५ मते मिळाली तर तर भाजपच्या पराभूत उमेदवार नेहा निकोसे यांना १०,१५४ मते मिळाली. काँग्रेसच्या मनीष बनसोड यांनी भाजपच्या पंकज यादव यांचा पराभव करुन प्रभाग क्र.२ ‘भाजपमुक्त’करण्यात यश मिळवले.मनीष बनसोड यांना ११,५५२ मते मिळाली.याच प्रवर्गात काँग्रसेचे माजी नगरसेवक मनोज सांगोळे जे यंदा राष्ट्रवादी अजित पवार गटातून निवडणूक लढत होते त्यांचा ही पराभव झाला.त्यांना ७,९१९ मते मिळाली.
प्रभाग क्र.३(यशोधरा नगर,विटाभट्टी,वांजरा औद्योगिक क्षेत्र) एकमेव भाजपचे उमेदवार किरण मनपिया विजयी झाले असून त्यांना ११,२०१ मते मिळाली.त्यांनी काँग्रेसचे परसाराम मानवटकर यांचा पराभव केला.एमआयएमच्या रेश्मा नंदागवळी यांनी ९,८०६ मते खेचली व या ‘पंतगीने’काँग्रेसचा विजय मिळवणारा ‘पंजा’चांगलाच जखमी केला.याच प्रभागात जागा ‘ब’मधून एमआयएमचे पवये काये ९,६६६ मते घेऊन विजयी झाले तर भाजपचे गोपी कमरे यांना ८,६५६ मते मिळून पराभव पत्करावा लागला.जागा ’क’मधून एमआयएमच्या सोफिया शेख यांनी ९,८५७ मते मिळवली तर शिवसेनेच्या कोमल तळवेकर यांना ७,८४९ मते मिळाली.
प्रभाग.क्र.६ मध्ये ना भाजप ना काँग्रेस,मुस्लिम लीगने बाजी मारुन रेखा पाटील यांनी विजय मिळवला.या प्रभागात मुस्लिम लीग व बसपाच्या हत्तीमध्ये चांगलीच लढत रंगली.रेखा पाटील यांनी ९,१८५ मते मिळवली.बसपाच्या वैशाली नारनवरे यांना ८,००१ मते मिळाल्याने पराभव पत्कारावा लागला.याच प्रभागात अन्सारी मोहम्मद मुजतबा यांना ९,०२९ मते मिळाली तर बसपाच्या मोहम्मद इब्राहिम यांना ७,९१७ मते मिळून देखील पराभूत व्हावे लागले.मुस्लिम लीगच्या सायमा कुरेशी यांनी ९,२६९ मते मिळवून विजयाची माळ गळ्यात घातली तर बसपाच्या वंदना चांदेकर यांना ८,७३० मतांवार समाधान मानावे लागले.‘ड‘प्रवर्गातून असलम खान मुल्ला यांनी १०,०२४ मते मिळवून चार ही जागा मुस्लिम लीगच्या नावे केल्या तर बसपाचे जितेंद्र घोडस्वार यांना ६,८७३ मते घेऊन पराभूत व्हावे लागले.या प्रभागात भाजपने मोहिनी रामटेके,भोलानाथ सहारे,अश्विनी सदावर्ते व राजू बाबरा यांना उमेदवारी दिली होती तर काँग्रेसने रजनीगंधा वाघमारे,शोएब अंसारी,कुंदा खोब्रागडे व मोहम्मद शेख यांना उमेदवारी दिली होती.मात्र,हा प्रभागच ‘काँग्रेसमुक्त’करण्याची किमया पहिल्यांदा मुस्लिम लीगने साधली.
प्रभाग क्र ७ (लष्करी बाग,नवानकाशा,अशोकनगर,पाचपावली)मध्ये दोन काँग्रेस व दोन बसपाचे उमेदवार विजयी झाले.काँग्रेसच्या कल्पना द्रोणकर यांनी भाजपच्या राखी मानवटकर यांचा पराभव केला.तसेच काँग्रेसच्या आसिफ शेख यांनी यांच्याकडून भाजपचे ओमप्रकाश इंगळे पराभूत झाले.बसपाच्या हर्षला जयस्वाल व योगेश लांजेवार हे दोनच उमेदवार या निवडणूकीत विजयी झाले असून २०१७ मध्ये बसपाचे १० नगरसेवक निवडून आले होते.
या निवडणूकीत भाजपचे संपूर्ण पॅनल म्हणजे चारही उमेदवार प्रभाग क्र.१,,४,९,१२,१३,१५,१६,१८,२०,२२,२३,२४,२५,२७,२९,३१,३२,३४,३५,३६ व ३७ मधून निवडून आले असून भाजपचे १०२ उमेदवार विजयी झाले आहेत.
यात प्रभाग क्र. १ मधून(जरीपटका,नारा,अशोकनगर)महेंद्र धनविजय,सुषमा चौधरी,प्रमिला मथरानी व विकी कुकरेजा यांचा समावेश असून,प्रभाग क्र. ४(कळमना,भारत नगर,जुना कामठी रोड)मधून निरंजना पाटील,शेषराव गोतमारे,मनीषा अतकरे व रामदास शाहू यांचा समावेश आहे.प्रभाग क्र. ९ मधून (मोहननगर,इंदोरा,बेझनबाग,नईवस्ती,कडबी चौक)सुनील तांबे,मनोरमा जैस्वाल,प्रतीक्षा चवरे(शिव सेना शिंदे गट)व दिपक अरोरा यांचा समावेश आहे.प्रभाग क्र.१२(दाभा,सुरेंद्रगड,मकरधोकडा,वाडीटेकडी)मधून दर्शनी धवड,माजी महापौर माया इवनाते,साधना बेर्डे व विक्रम ग्वालबंशी यांचा समावेश आहे.प्रभाग क्र.१३(पांढराबोडी,गांधीनगर,भिवसनखोरी,माधवनगर)मधून योगेश पाचपोर,ऋतिका मसराम,वर्षा चौधरी व विजय होले यांचा समावेश आहे.प्रभाग क्र.१५ (धरमपेठ,रामदासपेठ,शंकरनगर,शिवाजीनगर,सीताबर्डी)मधून पूजा पाठक,सुनील हिरणवार,धनश्री देशपांडे व विनय दाणी यांचा समावेश आहे.प्रभाग क्र.१६(दीक्षाभूमी,बजाजनगर,पंचदीप नगर,विवेकानंद नगर)मधून लखन येरावार,तारा यादव,वर्षा चौधरी व सुनील दांडेकर यांचा समावेश आहे.
प्रभाग क्र.१८(महाल,चिटणीसपुरा,रहातेकरवाडी,शिवाजीनगर,किल्ला)मधून सुधीर(बंडू)राऊत,सारिका नांदूरकर,वैशाली उदापूरकर व सचिन नाईक यांचा समावेश आहे.प्रभाग क्र.२० (तांडापेठ,मस्कासाथ,जागनाथ बुधवारी,बारसेनगर)मधून तुषार लारोकर,स्विटी भिसीकर,रेखा निमजे व हेमंत बर्डे यांचा विजय झाला आहे.प्रभाग क्र.२१(आयचित मंदिर,सतरंजीपुरा,नेहरु पुतळा,शांतिनगर,परवारपुरा)मधून चेतना निमजे,संतोष आंबुलकर,निशा भोयर व पूर्व नागपूरचे तीन टर्मचे आमदार कृष्णा खोपडे यांचे जवळचे नातेवाईक संजय अवचट विजयी झाले आहेत.प्रभाग क्र.२२(आयचित मंदिर,संघ कार्यालय,जुनी मंगळवारी,नबाबपुरा)मधून कल्पक भानारकर,उमा देशमुख,कल्पना शर्मा व श्रीकांम आगलावे विजयी झाले आहेत.
प्रभाग क्र.२३(वर्धमान नगर,हिवरीनगर,कुंभारटोली,केडीके कॉलेज)मधून भाजपचे हरेश्वर रारोकर,अर्चना पडोळे,संतोष लढ्ढा व बाल्या बोरकर विजयी झाले आहेत.प्रभाग क्र.२४(डिप्टी सिग्नल,मिनीमाता नगर,चिखली,एचबी टाउन)मधून दुर्गेश्वरी कोसरे(भाजप समर्थित शिवसेना शिंदे गट)प्रदीप पाहोणे,सरिता कावरे व अरुण हारोडे यांचे संपूर्ण पॅनल निवडून आले आहेत.प्रभाग क्र.२५(पार्डी,पुनापूर,भांडेवाडी,श्यामनगर,भवानीनगर)मधून शीतल रारोकर,राजेश्वर दिवटे,माहेश्वरी बिसेन व दीपक वाडीभस्मे विजयी झाले आहेत.प्रभाग क्र.२७(नेहरुनगर,नंदनवन,भांडेप्लाॅट,हसनबाग,ओमनगर)मधून भापचे प्रवीण गिरे,रजनी वानखेडे,दिव्या धुरडे व निलेश गायधने विजयी झाले आहेत.
प्रभाग क्र.२९(म्हाळगीनगर,नरसाळा,हुडकेश्वर,बेसा पावर स्टेशन)मधून लीला हातीबेड,योगश मडावी,ज्योती देवघरे व अजय बोडारे विजयी झाले आहेत.प्रभाग क्र.३१(रेशीमबाग) मधून भाजप समर्थित शिंदे गट उमेदवार गणेश चर्लेवार,चंद्रकांत खंगार,मंगला मस्के व अंबिका महाडिक विजयी झाले आहेत.
प्रभाग क्र.३२(भगवान नगर,कुंजीलाल पेठ,रामेश्वरी,कुकडे लेआऊट)मधून अंकित चौधरी,आकाश भेदे,विशाखा बांते व भारती बुंडे या विजयी झाल्या आहेत.प्रभाग क्र.३४(मानेवाडा ,ओंकार नगर,विद्यानगर,विणकर कॉलनी)मधून भाजपचे नागेश मानकर,मनीषा नगरधनकर,मंगला खेकरे व बाबाराव तायडे यांचा विजय झाला आहे.प्रभाग क्र.३५ (मनीष नगर,जोगी नगर,बोरकुटे लेआऊट,चिचभवन)मधून भाजपचे संदीप गवई,पूला भूगावकर,विशाखा मोहोड व रमेश भंडारी विजयी झाले आहेत.प्रभाग क्र.३६ (त्रिमूर्ती नगर,गजानन धाम,खामला,भामटी,जयप्रकाश नगर)मधून भाजपचे अशोक शामकुळे,माया हाडे,शिवाणी दाणी व ईश्वर ढेंगळे यांचा विजय झाला आहे.प्रभाग क्र.३७(गोपाल नगर,सुभाष नगर,दीनदयाल नगर,श्रद्धानंदपेठ)मधून भाजपचे निधी तेलगोटे,संजय उगले,अश्विनी जिचकार व मनपाचे माजी शिक्षण सभापती दिलीप दिवे हे विजयी झाले आहेत.
थोडक्यात,निवडणूकीच्या या निकालाने अनेकांना पराभवाचे धक्के दिले असून अनेक नवख्या चेह-यांना मनपाची दारे उघडली आहेत.या निवडणूकीत मध्य नागपूर प्रभाग क्र.१८ मधील लढतीकडे संपूर्ण भाजपचेच लक्ष लागले होते.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मर्जीतले व निष्ठावंत नगरसेवक सुधीर(बंडू)राऊत यांचा तब्बल ८ वर्षांचा वनवास संपला.त्यांना प्रभाग क्र.१८(अ)मधून उमेदवारी देण्यात आली होती मात्र,या जागेसाठी शेवटपर्यंत तोडगा न निघाल्याने बंडू राऊत यांच्यासोबतच धीरज चव्हाण यांना देखील एबी फॉर्म देण्यात आले.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत भाजपामध्ये ‘सस्पेंस’कायम होता.अपेक्षेप्रमाणे गडकरी यांनी चव्हाण यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना केली मात्र,त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली.

परिणामी,शेवटपर्यंत या प्रभागात बंडू राऊत विरुद्ध धीरज चव्हाण यांची लढत रंगतदार झाली.चव्हाण यांना भाजपच्या दोन विद्यमान आमदरांचा ‘छूपा’पाठींबा असल्याचे श्रेष्ठींच्याही लक्षात आले होते.याच पाठींब्यातून धीरज चव्हाण यांना अपक्ष असताना देखील तब्बल ८,२७७ मते मिळवता आली.बंडू राऊत यांना १३,०५९ मते मिळाली.बंडू राऊतांचा विजय अनेक भाजप कार्यकर्त्याना सुखावून गेला.विजयाचा जल्लोष आज महाल येथील गडकरी वाड्यावर साजरा होत असताना गडकरींचा एकनिष्ठ ‘कार्यकर्ता‘ जिंकला,अनेक वर्षांचा वनवास संपला’चे नारे गुंजले.याच वेळी दोन्ही आमदारांच्या घरासमोर ‘शुकशुकाट’होता.भाजपचा मध्य नागपूरात इतका भव्य विजय झाला असताना आमदारांच्या घरा समोर शुकशुकाट अनेकांना खटकला.पण शेवटी ‘जो जिता वो सिंकदर’हेच खरे.
या निकालाने अनेकांना पराभवाचा धक्का दिला,यात भाजपचा हमखास जिंकणार चेहरा म्हणजे ॲड.धर्मपाल मेश्राम यांचा समावेश आहे.काँग्रेसचे विजयी उमेदवार शुभम मोटघरे यांनी गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघात जनतेसाठी धावून-धावून कामे केली होती.कोणाच्याही अडी-अडचणींमध्ये धावने,अगदी कोणाच्याही अंत्यसंस्कारासाठी देखील शुभम तत्पर राहात असे.या भागातील गोरगरीब जनतेच्या सुखा-दु:खात शुभम हे नाव सदैव लोकांच्या ओठी होते.२०१७ मध्ये काँग्रेसच्या या कट्टर व हाडाच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळाली नाही मात्र,निराश न होता शुभम यांनी आपले सेवाकार्य अविरत सुरुच ठेवले.याचे फळ तेथील जनतेने त्यांना विजयी करुन फेडले.काँग्रेसचे सुशिक्ष्त उमेदवार जे शहराच्या विविध प्रश्नांसाठी व पर्यावरण रक्षणासाठी न्यायालयापर्यंत गेले ते प्रभाग क्र. १५ मधून निवडणूक लढणारे संदेश सिंगलकर यांचा पराभव मात्र अनेकांच्या मनाला चटका लावून गेले.
याशिवाय प्रभाग क्र. १८ मधून शहरासाठी नवकल्पनांसोबत तरुणाईला साद घालणा-या फॉरवर्ड ब्लॉकच्या निनाद दीक्षीत याला देखील पराभवाचा सामना करावा लागला.निनाद याला १६२३ मते मिळाली असली तरी त्याला आणखी काही वेळ प्रचारासाठी मिळाला असता तर चित्र वेगळे असते,असे त्याचे समर्थक सांगतात.हे शहर गेल्या १८ वर्षांपासून एकाच पक्षाच्या एकाच मळवाटेवर पुढे जात आहे.परिणामी,या शहराच्या पर्यावरण आणि विकासासाठी वेगळ्या काही संकल्पना असणे देखील गरजेचे असल्याचे निनाद सांगतो मात्र,त्याचा सारगर्भित आवाज मतदारांपर्यंत पोहोचलाच नाही.
या निकालाचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे ‘हिंदूत्व!’संघभूमीत विविध बैठकांमध्ये भाजपला मत नसेल तर हिंदूत्वावर गदा येईल,ही भूमिका धक्कादायक ठरली.मनपासारख्या स्थानिक निवडणूकीत जिथे गटर,पाणी,रस्ते,शिक्षण,आरोग्य,वाहतूक इत्यादी सारख्या मूलभूत गरजांची पूर्तता,याचे चिंतन,समीक्षण,अवलोकन व निरीक्षण न करता सरसकट ‘हिंदूत्वाची’साद घातल्या गेल्याने देखील नागपूरात सत्ता परिवर्तन होऊ शकले नाही.
याशिवाय काँग्रेस पक्षाचे स्वत:चे अपयश असून काँग्रेसचे आमदार,शहराध्यक्ष व श्रेष्ठींनी ही निवडणूक आत्मसन्मानाची केलेली कुठेही आढळून आली नाही. परिणामी,काँग्रेसला खरंच मनपात परिवर्तन हवे होते का?असा प्रश्न आता काँग्रेसचेच कार्यकर्ते खासगीत करीत असून,जे उमेदवार निवडून आलेत त्यात शहरातील आमदारांचा किंवा पदाधिका-यांचा कोणताही करिष्मा नसून उमेदवारांचा वैयक्तिक चेहरा व काम विजयासाठी कारणीभूत ठरले,असे आता बोलले जात आहे.
………………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
