

कलावंतांच्या एकजिन्सी कलाविष्काराला संगीतप्रेमींची उस्फूर्त दाद
कडाक्याच्या थंडीत नागपूरकरांनी घेतला गायन, वादन व नृत्याचा आनंद
खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा चौथा दिवस शास्त्रीय संगीताने बहरला
नागपूर, २० डिसेंबर:‘जोहार मायबाप,जोहार तुमच्या महाराचा मी महार,बहू भुकेला झालो, तुमच्या उष्टयासाठी आलो,बहू केली अास तुमच्या दासाचा मी दास,चोखा म्हणे पाटी आणिली तुुुमच्या उष्टयासाठी’.संत चोखामेळा रचित हा अभंग बालगंधर्वांनी १९३१ साली ‘संत कान्होपात्रा’या संगीत नाटकात गाऊन अजरामर केला होता,आज खासदार सांस्कृतिक महोत्सवात या अभंगाची खास फरमाईश केली ती केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या सुविद्य पत्नी कांचन गडकरी यांनी.सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील यांनी तेवढ्याच समरसतेने त्यांची ही फरमाईश पूर्ण केली आणि संगीतप्रेमी सूरांच्या या आनंदात न्हाऊन निघाले.एवढंच नव्हे तर स्वत:उत्तम गायिका असणा-या आणि शास्त्रीय संगीतावर मनापासून प्रेम असणा-या कांचन गडकरी यांनी बसल्या जागेवरुनच त्यांच्यासोबत हा अभंग गुणगुणला.हे सुखद दृष्य हजारो रसिकांनी स्क्रीनवर बघितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या चौथ्या दिवशी संगीताचार्य पं. द. वी. काणेबुवा प्रतिष्ठानच्यावतीने भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून ‘व्होकल क्लासिकल अँड लाईट क्लासिकल’ या शास्त्रीय गीत-संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मंजुषा पाटील व त्यांच्या चमूने सुगम शास्त्रीय संगीत सादर केले.
मंजुषा पाटील यांनी झपताल मध्य लयीमध्ये राग सोहनीमधील बंदिश जियरा रे… ने कार्यक्रमाची सुरुवात केली. द्रुत लयीत तराना सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली. शोभा गुर्टू यांची ‘होरी रंगी सारी गुलाबी चुनरियां रे’ सादर करून श्रोत्यांना होळीच्या रंगात रंगवले. त्यानंतर त्यांनी ‘अवघे गरजे पंढरपूर’, ‘अबीर गुलाल’ इत्यादी अभंगांची मेडले सादर केली. कांचन गडकरी यांच्या फर्माईश वर त्यांनी जोहार मायबाप ही संत चोखामेळा यांची रचना सादर करून आपल्या कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर, तबल्यावर पद्मश्री पं. विजय घाटे, तालवाद्यावर गजानन रानडे यांनी साथसंगत केली.

या नंतर पं. विजय घाटे यांनी अप्रतिम असे मेलोडिक रिदम सादर करून रसिकांची मने जिंकली. यात सुरंजन खंडाळकर यांनी गायन, शीतल कोलवलकर यांनी कथ्थक सादर केले. ड्रम्सवर जिनो बॅंक्स, घटमवर गिरीधर उडुपा, तबल्यावर स्वत: पं. विजय घाटे, संवादिनीवर मिलिंद कुलकर्णी होते.
गिरिधर उडूपा यांचे घटम, जिनो बँक यांचे ड्रम्स, मिलिंद कुळकर्णी यांची संवादिनी आणि पं. विजय घाटे यांची जुगलबंदी हा या कार्यक्रमाचा शिखर बिंदू ठरला.
संगीतसप्रेमींनी कलावतांच्या या एकजिन्सी कलाविष्काराला उर्स्फूत दाद दिली.कडाक्याची थंडीतही मोठ्या संख्येने उपस्थित शास्त्रीय संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांच्यासह महापौर दयाशंकर तिवारी, माजी खासदार अजय संचेती, वनराईचे गिरीश गांधी, उद्योजक सत्यनारायण नुवाल, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर, बी. सी. भारतीया, सुरेश राठी, अश्विन मेहाडिया, कैलाश जोगानी, श्याम देशपांडे, स्नेहल पाळधीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. नितीन गडकरी यांच्या हस्ते कलाकरांचा सत्कार करण्यात आला.
खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, संजय गुलकरी, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
आज महोत्सवात –
संगीताचार्य पं. द. वी. काणेबुवा प्रतिष्ठानच्यावतीने भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून ‘नॉर्थ – साऊथ’ जुगलबंदी. सहभाग – पं. राकेश चौरसिया (हिंदुस्थानी), पं. शशांक सुब्रमण्यम (कर्नाटक), ओजस आडिया, मंजुषा पाटील, सौरभ नाईक, नागेश अडगांवकर व प्रकाश एदलाबादकर.




आमचे चॅनल subscribe करा
