

डॉ.ममता खांडेकर
[Senior Journalist]
नागपूर,ता. ३० जानेवारी २०२२ : नुकतेच मनपातील सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी आपल्या फेसबूकवर एक पोस्ट व्हायरल केली होती.त्यात त्यांनी ‘महात्मा फूलेंचा संघर्ष हा कोणत्या व्यक्तीविरुद्ध नव्हता तर प्रवृत्तीविरुद्ध होता.आज ही समाजामध्ये अश्या प्रवृत्ती आहेत ज्यांना आमच्यासारख्या बहूजनांनी मेहनतीने कमावलेले यश ज्यांना पचवता येत नाही म्हणून कट कारस्थान करुन आमच्या सारख्याला गुलाम बनवण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.गुलामी स्वीकारली नाही म्हणून स्वाभिमानाला ठेच पोहोचवून प्रताडीत करण्याचं षडयंत्र रचल्या जात आहे,अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध आमचा संषर्घ मरेपर्यंत सुरुच राहील’अश्या खरमरीत शब्दाता कोणाला तरी सुनावले होते.या पोस्टची भाजपच्या कार्यकर्त्यांपासून तर विरोधी पक्षाच्या नेत्यापर्यंत,पत्रकारांपासून तर भाजपच्या नेत्यांपर्यंतही चांगलीच चर्चा रंगली होती.या मार्मिक पण तेवढाच कडक इशारा देणा-या शब्दांचा रोख नेमका कोणावर आहे?याचा शोध देखील मग लावण्यात आला.यानंतर ठाकरे यांच्याच प्रभागात होणा-या भाजपच्या एका उपक्रमातून ठाकरे यांचाच पत्ता कट केल्याचे समोर आले.परिणामी ही व्यथा व ही कथा त्यातून अाली असा समज देखील अनेकांचा झाला.अर्थात तो उपक्रम माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात पार पडला होता व ठाकरे-जोशी यांच्यात सर्वच काही ‘आलबेल’नाही याची चर्चा तर मनपातही नेहमीच देखील चांगलीच घडत असते.
काल शनिवार दि.२९ जानेवरी रोजी नागपूर शहरात कचरा संकलन करणा-या दोन्ही एजेंसींवरील ठाकरे समितीच्या चौकशी अहवालावर चर्चा करण्यासाठी आभासी पद्धतीने विशेष सभा मनपाची पार पडली.ही चौकशी समिती सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती हे विशेष!या समितीने दिलेल्या अहवालावर माजी महापौर संदीप जोशी हे देखील चर्चेत सहभागी झाले.मात्र आपले मुद्दे मांडत असताना त्यांनी या एजेंसीसोबत करारनामा झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत स्टेरिंग कमेटी(सूकाणू समिती)गठीत झालीच नसल्याकडे व एवढ्या महत्वपूर्ण बाबीकडे समितीचे लक्षच गेले नसल्याची शाब्दिक कोटी केली.अर्थात त्यांचा रोख हा सरळ-सरळ समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्या कार्यपद्धतीतील चूक सभागृहाच्या लक्षात आणून देणे हाच असल्याचा समज अनेकांचा झाला.समितीच्या एवढ्या बैठका पार पडल्या मात्र एजेंसींजने डीपीआर सादरच केला नसल्याची बाब का लक्षात आली नाही?झोन मधील स्वच्छता अधिका-यांनी खोटे प्रतिज्ञापत्र समितीसमाेर सादर केले,एमएलपी बाबत देखील संदीप जोशी यांनी बरेच खुलासे काल सभागृहात केले.
जोशी यांनी या एजेंसीसोबतच्या करारनाम्यांबाबत करण्यात आलेल्या अनेक प्रशासकीय चूकांकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते.ठाकरे यांचे प्रशासनासोबत बैठकी घेताना अनेक बाबींकडे दुर्लक्ष झाले असल्याचे जोशी यांच्या विधानातून जाणवत होते.

शेवटी आपला अभिप्राय नोंदवताना अविनाश ठाकरे यांनी देखील आपल्या खुलाश्यात जोशी यांनी संपूर्ण अहवाल वाचलाच नाही,अशी कोटी केली.प्रशासनातर्फे सभागृहात अहवालातील फक्त प्रमुख बाबींचेच वाचन झाले.संपूर्ण अहवाल वाचला गेला असता तर जोशी यांना २० ऑक्टोबर २०२१ च्या बैठकीत एमएलपी व स्टेअरिंग कमेटीच्या संदर्भात चर्चा झाली होती,हे लक्षात आले असते,असे ठाकरे म्हणाले.अहवालातील क्रमांक ५ व ७ मध्ये हा उल्लेख आला असून प्रशासनातर्फे नवीन एमएलपी तीन महिन्यात करता येईल असे प्रशासनाचे मत देखील नोंदवल्याचे ठाकरे यांनी ‘आवर्जून’ निर्दशनास आणून दिले.
प्रशासनासाठी ठाकरे यांनी ‘झोपेचे सोंग’हा देखील शब्दप्रयोग केला,अर्थात संदीप जोशी यांच्या आक्षेपांना उत्तर देताना ही शब्द कोटी नेमकी कोणासाठी होती,याची देखील चांगलीच चर्चा रंगली.
आपल्या अभिप्राय नोंदवताना अविनाश ठाकरे यांनी संदीप जोशी यांचे अभिनंदन देखील केले की त्यांनी प्रशासनाचा गलथान कारभार समोर आणला मात्र त्यांनी प्रत्येक बैठकीचं वाचन केलं असतं तर त्यांच्या हे निर्दशनास आलं असतं समितीच्या नजरेतून एमएलपी(मायक्रो लेवल प्लानिंग) व स्टेरिंग समितीच्या संदर्भात चर्चा झाली असल्याचे व अहवालात ती नमूद असल्याचे लक्षात आले असते,असे प्रत्यूत्तर ठाकरे यांनी दिले.
काल सभागृहात भाजपच्या या दोन्ही अभ्यासू व कद्दावर नेत्यांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणारी ही अशी शाब्दिक कोटी अनेकांच्या नजरेतूनही सूटली नाही,हे विशेष!




आमचे चॅनल subscribe करा
