
१३ वर्षीय बेपत्ता मुलीच्या बापाची व्यथा: पोलीसांचेही असंवेदनशील बोल
अजब पालकमंत्र्यांचाही गजब व्यवहार!पोलीसच खरे फिर्यादी खोटे!
प्रदेश भाजप उपाध्यक्ष् चित्रा वाघ यांची तळमळीची सूचना भाजप महिला सेलकडून केराच्या टोपलीत!
नागपूर,ता. १० ऑगस्ट: २८ जुलैचा तो कर्मदरिद्री दिवस त्या बापाच्या जीवनात उजाडला,त्याच्या काळजाचा तुकडा असणारी एकुलती एक लेक खरबीतील आत्याच्या घरुन अचानक बेपत्ता झाली आणि या बापाच्या मनावर दु:खाचा डोंगर कोसळला.वाठोडा पोलीस ठाण्यात २९ जुलै रोजी ते फिर्याद दाखल करण्यासाठी गेले असता तेथील पोलीसांनी अतिशय असंवेदनशील वृत्ती दाखवत त्यांनाच ’मुलगी सांभाळून ठेवता येत नाही का?अश्या शब्दात त्यांच्या दू:खावर मीठ चोळण्याचे काम केले.मुलीला आई नाही ,मुलगी वयात आली,मी दिवसभर कामावर असतो त्यामुळेच मूलबाळ नसलेल्या आत्याकडे तिला ५-६ महिन्यांपूर्वीच राहण्यासाठी पाठवले मात्र विचार काय केला झालं काय?अश्या शब्दात नियतीसमोर हतबल झालेल्या या बापाने खास ‘सत्ताधीश’जवळ आपली व्यथा मांडली.
मुलगी फक्त अडीच वर्षांची होती जेव्हा तिच्या आईचा आजारपणामुळे मृत्यू झाला.गेल्या १० वर्षांपासून मुलांना काळजाशी लाऊन जगलो.मुलांना सावत्र आईचा जांच नको म्हणून दूसरे लग्न ही केले नाही.मोठा मुलगा १५ वर्षांचा तर मुलीला नुकतेच १३ वे वर्ष लागले होते.इमामवाड्यात स्वत:चे घर आहे.पण बघता बघता मुलगी न्हातीधूती झाली,वयात आली त्यामुळे ऐन लॉकडाऊनमध्ये ६ महिन्यांपूर्वीच खरबीत राहणा-या आत्याकडे पाठवले.१० वी झाल्यानंतर बघू पुढे असा विचार त्यांनी केला.बेपत्ता मुलगी ही नुकतीच ९ व्या वर्गात गेली होती.
त्या सायंकाळी तिने स्वयंपाक केला,भात बनवला,आत्याशी चांगले बोलणेही झाले,त्या सायंकाळी पाऊस ही येत होता आणि अचानक ती घराजवळून बेपत्ता झाली.मुलगी बेपत्ता झाल्याचे कळले तेव्हापासून डोळ्यांना ज्या धारा लागल्या आहेत त्या अजून ही थांबल्या नाहीत…..!जेवण धकत नाही,जेवणाकडे बघण्याचीसुद्धा ईच्छा होत नाही,रात्रीची झोप लागत नाही,खरं सांगू तर एकदाचे मुलीचे मरण परवडले असते!देवाघरी ती गेली पुन्हा जन्माला येईल या आशेने ते दू:खं पचवता आलं असतं पण जिला काळजाशी लाऊन ठेवलं,त्यांचे डबे बनवले,स्वत:शाळेत नेऊन घातलं त्या मुलीच्या काळजीने जगणे नकोसे झाले….!
कुठे असेल माझी मुलगी,कोणत्या परिस्थितीत असेल ही चिंता,ही काळजी काळीज पोखरत आहे….!काय घडलं आत्याकडे तिच्या जीवनात गेल्या ६ महिन्यात?थोडा जरी अंदाज आला असता तर…….?पोलीस म्हणतात ’मुलीला सांभाळून ठेवता येत नाही का?’पण आईच्या माघारी मुलीला मी सांभाळूनच ठेवलं होतं ना?सांभाळता आलं नसतं तर कशाला लहानाचं मोठं केलं असतं?
पत्नीच्या आजारपणामुळे नोकरी सोडली,आता पेंटिंगचे काम करतो,मुलांसाठी जगत होतो आता जगण्यातलं ध्येयच हरवलं आहे….!
पोलिसांनी मुलगी बेपत्ता झाल्यावरही ३-४ दिवस टाळाटाळच केली मग एका ओळखीच्या पत्रकार मित्राला फोन लाऊन रडलो…!तो वाठोडा पोलीस ठाण्यात सोबत आला,त्याच्या प्रयत्नाने एफआयआर नोंदवली गेली पण एफआयअारची काॅपी दिली गेली नाही.शिवसेना पक्ष्ातील एक मानलेली बहीण आहे प्रेरणा इंदूरकर नावाची ती सुद्धा पोलीस ठाण्यात आली.आता कुठे जाऊन काल पोलीसांनी माझ्या मुलीचे पोस्टर चिपकवले हरवली म्हणून!
प्रत्येक क्ष ण मुलीच्या काळजीमुळे मी कसा जगतो आहे हे मलाही सांगता येणार नाही,पोलीसांनी काहीही करुन माझा काळजाचा तुकडा शोधून परत आणावा बस मला इतकंच हवं आहे.आणखी मला काही नको…..!
काय आहे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश?
अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यास पोलीसांनी सरळ ३६३ दाखल करावे.एफआयआरची वाट न बघता तिचा शोध घ्यावा व तिला पालकांच्या स्वाधीन करावे मात्र कायद्याचा राज्यात कायदा पाळला जातोच असे कधी घडत नाही,या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ही हेच घडले.वाठोडा पोलीसांना १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचे कळताच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन का नाही केले?हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो,उलट आधीच कोलमडून पडलेल्या बापालाच ’आपली मुलगी सांभाळून ठेवता येत नाही का?’असे असंवेदनशील बोल सुनावले!
चित्रा वाघ यांचे आदेश हवेतच विरले!
नुकतेच ६ ऑगस्ट रोजी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष् चित्रा वाघ यांनी प्रेस क्लब येथे एका अल्पवयीन मुलीवर दोनवेळा झालेल्या बलात्काराबाबत तसेच महेश राऊत या लेखापालाच्या आत्महत्येच्या संदर्भात पत्र परिषद घेतली.पत्र परिषद संपताच बेपत्ता मुलीच्या वडीलांच्या पत्रकार मित्राने मोबाईल क्रमांकासहीत चित्रा वाघ यांना चिठ्ठी दिली.ती चिठ्ठी वाचताच चित्रा वाघ यांना धक्काच बसला!गेल्या ११ दिवसांपासून नागपूरातील खरबी भागातून एक १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता होते आणि पोलीसांना १३ दिवसांपासून गुन्हेगारांचा सुगावा ही लागत नाही!
त्यांनी तातडीने भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष्ांना ती चिठ्ठी हातात देत या मुलीच्या घरी जा,तिच्या वडीलांना भेटा,वाठोडा पोलीस ठाण्यात जाऊन पोलीसांना जाब विचारण्याचे आदेश देत मला येत्या २ दिवसात या घटनेच्या बाबतीत पुढील तपशील कळवा,असे निर्देश दिलेत मात्र ५ दिवस उलटले तरी भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष्ांचा ना मुलीच्या वडीलांना फोन गेला ना त्यांनी वाठोडा पोलीस ठाणे गाठले!परिणामी चित्रा वाघ यांचा नापगूर दौरा हा त्या ५ ऑटोचालक व २ कुलींनी बलात्कार केलेल्या अल्पवयीन बलात्कारित मुलीच्या कुटुंबियांची तसेच पोलीसांच्या मारहाणीनंतर अपमान सहन न झाल्यामुळे आत्महत्या करणा-या लेखापाल महेश राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेणे या सर्व घडामोडी पीडीतांना न्याय देण्यासाठी नसून भाजपच्या महिला आघाडी सेलच्या पदाधिका-यांसाठी ‘इव्हेंट’होता अशी टिका आता केली जात आहे.
आणि पालकमंत्र्यांनीच प्रश्नाला दिली बगल!
पालकमंत्री या शब्दातच पालकत्वाची भावना समावलेली आहे मात्र विद्यमान पालकमंत्री नितीन राऊत यांचे पालकत्व सर्वसामान्य नागरिकांसाठी नसून पोलीसांची पाठराखण करण्यासाठी असल्याची खरमरीत टिका सध्या ऐकू येत आहे.
नुकतेच पोलीस जिमखाना येथे पालकमंत्री यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्यासोबत पत्र परिषद घेतली.या पत्र परिषदेत नागरिकांनी पोलीसांच्या बाबतीत सोहाद्राची भावना ठेवावी,अल्पवयीन मुलीसोबत झालेला दोन वेळा बलात्कार तसेच महेश राऊत आत्महत्या प्रकरणात पोलीसांची कोणतीही चूक नाही,बलात्कार पीडीता ही मंदबुद्धी होती,आधी देखील ती घर सोडून बाहेर पडली होती,आधी देखील तिच्यावर बलात्कार झाला होता,महेश राऊत हे तर दारु पिऊन पोलीसांना त्रास देण्यासाठी १०० क्रमांकावर फोन करायचे,त्यांना मारहाण झाली नाही,सत्य समोर येईलच इ.अनेक ’तर्क’त्यांनी या पत्र परिषदेत मांडले.
मात्र त्यांच्या या सर्व तर्काना पुराव्याचा आधार होता का?महेश राऊत यांचे शेजारी जे बोलले ते खरे की पोलसांची बाजू?याबाबत मात्र पालकमंत्र्यांनी सपशेल मौन बाळगणे पसंद केले.एवढंच नव्हे तर त्यांच्या या ’तर्कशास्त्रानी’दिवंगत महेश राऊत यांचे कुटुंबिय कमालीचे दुखावले गेले आहेत त्याचे काय?या प्रश्नावर तर त्यांनी चक्क पळच काढल्याचे माध्यमकर्मींनी अनुभवले…..!
पोलीसांना हे प्रकरण आपल्या अंगावर नाही घ्यायचे म्हणूनच ही सर्व लीपापोती सुरु असल्याचे महेश राऊत यांचे कुटुंबिय सांगतात.पालकमंत्र्यांनी स्टेटमेंट देण्यात घाई केली का?या विषयी नाही सांगता येणार मात्र किमान शवविच्छेदन अहवाल तर येऊ द्यायला हवा होता!त्यात महेश हे खरंच दाऊ पिऊन होते की नाही हे कळले असते,असे त्यांचे म्हणने आहे.
ज्या मतिमंद ५० वर्षीय माणसाला मारहाण होत आहे हे समजून महेश यांनी १०० क्रमांकावर फोन केला त्याच्याशी आमच्या कुटुंबाचे लहानपणापासून जिव्हाळ्याचे संबध आहेत.दौरा पडला की ते फक्त मोठ्याने ओरडतात बाकी त्यांना इतर कोणताही त्रास नाही.त्या दिवशी मात्र त्यांना कोणीतरी मारहाण करीत असल्याचे समजून महेश यांनी १०० क्रमांकावर फोन केला होता…..!
दोन पोलीसवाले आले त्यांनी त्या घरी जाऊन साधी चौकशी ही नाही केली मात्र महेशला झापडा मारत मारत घराबाहेर आणले!पालकमंत्र्यांच्या बोलण्यातून आम्हाला दू:खं तर झालं आहे मात्र आम्हाला पोलीसांकडूनच न्यायाची अपेक्ष्ा आहे.आम्ही आधीच सगळंच गमावून बसलो आहे.महेश यांची मुले तर फक्त ५ आणि २ वर्षांची आहेत.
सरकारमधले मंत्रीच जर असे बोल लावत असतील तर आम्ही कोणाकडे बघावं?पोलीसांना सरकारच पाठीशी घालतेय मात्र आमच्याकडे पोलीस चौकशीवर आस लावून बसण्याशिवाय दूसरा मार्ग शिल्लक आहे का?
हे वास्तव आहे पोलीसांनी महेश यांना मारत मारत घराबाहेर आणलं,याचा त्यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांनी आत्महत्या केली.महेश खूप हळव्या मनाचे होते.कोणाच्याही मदतीला ते धावत होते.सर्वांना मदत करणारे होते,शेजा-यांनाही सत्य माहिती आहे.मात्र पालकमंत्र्यांनाच सत्य समजून घ्यायचे नसेल तर….!




आमचे चॅनल subscribe करा
