जुस्तजू जिसकी थी उसको तो ना पाया हमने….
(वेलेंटाइन डे स्पेशल(भाग-८)
नागपूर,ता.१४ फेब्रवरी २०२६: रेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ साली झाला.तिचे वडील जेमिनी गणेशन तमिळ चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते होते.रेखाची आई पुष्पावलीला जेमिनी गणेशनकडून दोन अपत्ये होती तर दुस-या पुरुषाकडून देखील दोन अपत्ये होती.अशीच अपत्ये जेमिनी गणेशनची देखील होती.रेखावर जन्मापासूनच ‘नाजायज’चा ठप्पा लागला होता.जेमिनी गणेशनने कधीही रेखाला स्वत:चं अपत्य मानलं नाही.मात्र,पुष्पावलीने आई या नात्याने रेखाचे संगोपन केले.शाळेत जायला रेखा फार घाबरत होती कारण सावळी आणि थोडी जाडी रेखा,हिला शाळेत सगळी मुले ‘नाजायज’म्हणून चिडवत होती.काली,मोटी,नाजायज,ही विशेषणे तिला कायम अभ्यासापासून दूर ठेवीत होती.अटेंडेस घेताना वर्ग शिक्षक तिचे ‘भानूरेखा जेमिनी गणेशन’हे नाव घेत असे त्यावेळी रेखाला जणू ‘गणेशन’या नावाप्रती घृणा उत्पन्न होत होती.याचा परिणाम असा झाला की रेखा परिक्षेत नापास झाली.
घरी आल्यावर रेखाने घरात ठेवलेल्या सगळ्या झाेपेच्या गोळ्या खाऊन टाकल्या.तिला वाटलं जिवनापासून तिची सुटका झाली.मात्र,नियतीच्या मनात आणखी काही होतं.डॉक्टरांनी रेखाचे प्राण वाचवले.आई तिच्याजवळ बसून रडत होती.रेखाला शुद्ध आल्यावर आईने तिला शाळेत जावेसे वाटत नाही तर नको जाऊ,पण चित्रपटाकडे आता तू लक्ष दे,असा प्रेमाचा सल्ला दिला.घराची आर्थिक स्थिती सावरायला लहानशी रेखा स्टूडियोपर्यंत चकरा मारु लागली.१९६६ साली एक तेलगू फिल्म ‘रंगूला रत्लम’मध्ये बाल कलाकार म्हणून तिने काम केलं.याच चित्रपटात तिची आई आणि बहीण देखील होती.यानंतर एक कन्नड चित्रपट ‘ऑपरेशन जॅकपॉट’मध्ये रेखाने काम केलं.हा चित्रपट सुपरहिट ठरला.
यानंतर आईने रेखाला हिंदी चित्रपटाकडे वळवले.१९६९ साली रेखाचा पहीला चित्रपट ‘अनजाना सफर’चे चित्रिकरण सुरु झाले.नायक होता विश्वजित,जागा होती मेहबूब स्टूडियो.दिग्दर्शक राजा नवाथे यांनी विश्वजित व रेखावर एक चुंबन सीन चित्रित केला.याचे चित्रिकरण करताना विश्वजीतने रेखाला इतक्या जोरात बाहूपाशात जखडले की रेखा स्वत:ला सोडवू शकली नव्हती.ती रडत होती व सगळे युनिटचे लोकं जोरजोरात हसत होते,शिट्या वाजवत होते. रडता रडताच अचानक रेखा बेशुद्ध झाली.रेखाला शुद्ध आल्यावर देखील ती मोठमोठ्याने ओरडून रडू लागली.यामुळे वाद निर्माण झाला.विश्वजितने हे सांगून पल्ला झाडला की, मी तर दिग्दर्शकाने जसे सांगितले तेच करीत होतो.मात्र,हा वाद इतका वाढला की अमेरिकेचे सुप्रसिद्ध पत्रकार जेम्स शेफर्ड यांनी भारतात येऊन रेखाची मुलाखत घेतली.रेखाने या मुलाखतीत सत्य सांगितलं.परिणामी,या घटनेची चर्चा इतकी झाली की सेन्सर बोर्डाने या चित्रपटच्या प्रदर्शनावरच फूली मारली.
त्यावेळी रेखा फक्त पंधरा वर्षांची होती आणि तिच्यासोबत सेटवर जे घडले होते ते कायदेशीररित्या चुकीचे होते त्यामुळे हा चित्रपट दहा वर्ष डब्बा बंद राहीला.यानंतर १९७९ साली या चित्रपटाला ‘दो शिकारी’नावाने प्रदर्शित करण्यात आला.रेखाला सगळेच निर्माता दिग्दर्शक घाबरु लागले होते.रेखाला काम मिळवण्यासाठी भटकावे लागत होते.
याच दरम्यान १९७० मध्ये निर्माता मोहन सहगल यांनी नवीन निश्चल सोबत ‘सावन भादो’चित्रपटात रेखाला साईन केले.नवीन निश्चल व रेखा दोघांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता.आपल्या कर्णप्रिय संगीतामुळे हा चित्रपट सुपरडूपर हिट झाला.या चित्रपटानंतर रेखाला एक साथ पंचवीस चित्रपटांची ऑफर मिळाली.या चित्रपटातील ‘कान में झुमका चाल मे ठूमका’यासोबतत आशा भोसलेंच्या आवाजातील ‘एक दर्द उठा’हे गाणे खूप लोकप्रिय झाले.हा चित्रपट रेखाच्या करिअरमध्ये मील चा पत्थर साबित झाला.हा चित्रपट रेखाला एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रस्थापित करुन गेला. रेखा या काळात दोन-दोन शिफ्टमध्ये काम करीत होती.याच काळात जितेंद्र,राजेंद्र कुमार,सुनील दत्त,धर्मेंद्र यांच्यासोबतच बॉलिवडूचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना देखील रेखासोबत चित्रपट करीत होते.
१९७१ मध्ये रेखाने जितेंद्रसोबत ‘एक बेचारा’मध्ये काम केलं त्यावेळी ती जितेंद्रकडे आकर्षित झाली.याच वेळी जितेंद्रची प्रेयसी शोभा कपूर ही आपल्या नोकरी मध्ये व्यस्त होती.जितेंद्र-रेखाचे अनेक चित्रपट हिट होत होते.एकदा चित्रपट ‘अनोखी अदा’च्या शुटींगच्या वेळी जितेंद्रने एका ज्यूनिअर आर्टिस्टला सांगितले ‘रेखा मेरा जस्ट टाईम पास है’हे ऐकून सगळे हसत सुटले.रेखाने हे ऐकले होते.ती सरळ मेकअप रुममध्ये गेली.तासनतास रडत राहिली.शुटिंग रद्द झाली.रेखाच्या तोंडी एक डायलॉग आहे..‘ये मत भूलो की वेश्या के कोठे पर भी एक कोना ऐसा होता है जो मंदिर से ज्यादा पवित्र होता है...’रेखा जितेंद्रच्या आयुष्यातून अलगद बाहेर पडली.मात्र,काळ पुढे सरकल्यावर व दोघेही मन आणि भावनेने परिपक्व झाल्यानंतर पुढील काळात याच जोडगोळीने एकाहून एक हिट चित्रपट दिले.यात ‘एक ही भूल’,‘जुदाई,अपने अपने’,मजाल,प्यासा सावन’,सौतन की बेटी,खून और पानी,लॉकेट,अनोखी अदा,जाल,दिल और दिवार,पलको की छांव मे इत्यादीचा समावेश आहे.
रेखा हिंदी चित्रपटसृष्टित नवी होती त्यावेळी १९७० च्या दशकात तिचे नाव एक्टर किरण कुमारसोबत देखील जोडल्या गेलं.मात्र,या प्रेम संबंधाविषयी कधीही जीवनात या दोघांनी स्पष्ट कबुली दिली नाही.अनेक जुन्या सिनेमासिकांमधून व जुन्या मुलाखतीमधून त्यांच्यात अभिनयाशिवाय काही वेगळं नातं होतं यावर शिक्कामोर्तब होतं.सिद्धार्थ काननच्या एका फार जुन्या मुलाखतीमध्ये किरण रेखाविषयी खूप प्रेमाने बोलला.तो म्हणाला,भले ही ते गेल्या अनेक वर्षात कधीही भेटले नाही तरी देखील तिच्या विषयी त्याच्या मनात खूप सन्मान आहे.रेखा खूप चांगली आहे,तिचं मन सोन्यासारखं आहे तर तिच्या चेह-यावर दिव्यासारखी चमक आहे.मला हेच कळत नाही इतक्या वर्षातही ती इतकी सुंदर कशी दिसते?आम्ही खूप काळ झाला एकमेकांना भेटलो नाही पण तिच्यासाठी माझ्या मनात नेहमीच एक जागा असते.तिचे आणि माझे जीवन वेगळे आहे.मी तिला कधीही कॉल करणार नाही ना म्हणनार मी तुला भेटू इच्छितो..आमच्या भाग्यात लिहले असेल तर आम्ही खूप चांगल्या मित्रांसारखे भेटू आणि बोलू…!
रेखा आणि किरणकुमार सोबतच्या नात्याविषयी रेखाने स्वत: १९७५ मध्ये स्टारडस्ट मॅग्जीनमधील मुलाखतीमध्ये सांगितले की या अभिनेत्याच्या एका सवयीमुळे मला त्याचा खूप राग येत असे.त्याच्या अनेक सवयी मला पटत नव्हत्या.तो वास्तवमध्ये ‘मम्मा बॉय’होता.त्याच्यासोबत उशिरा रात्री कुठे फिरण्याचा प्लान केला जाऊ शकत नव्हता.तो रात्री १० पर्यंत घरी पोहोचून जात असे.त्याचा रात्री घरी १० वाजता घरी पोहोचण्या मागे दूधाचा ग्लास असायचा.रात्री १० वाजता त्याला दूध पिण्याची सवय होती….!
किरण कुमार एक हँडसम व्यक्तिमत्व.घरंदाज व चांगला अभिनेता होता.अनेक हिट चित्रपटात त्याने विलेनची भूमिकाही खूप प्रशंसनीय साकारली आहे मात्र,रेखा सारख्या मुक्त आणि दिलखुलास विचारसरणीच्या तरुणीसाठी तो प्रियकर म्हणूनही फार-फार अयोग्य होता,त्यामुळे त्यांच्यातील हे नातं फार काळ टिकूच शकणार नव्हतं…!
याच काळात रेखाच्या जिवनात पुन्हा प्रेम फूलले.अभिनेता विनोद मेहरासोबत रेखाचा ‘ऐलान’हा चित्रपट आला.या दोघांच्याही‘घर’या चित्रपटात बलात्कार पिडीतेची भूमिका रेखाचा सर्वोकृष्ट अभिनय मानल्या जातो.आपल्या पत्नीवर गुदरलेला हा प्रसंग आणि शेजारी व जगाच्या बलात्कारपिडीतेप्रति असलेल्या असंवेदनशील वागणूकीतून,आतून कोसळलेल्या तरीही पत्नीला सावरत असलेल्या पतीची भूमिका विनोद मेहराने अतिशय संयतपणे निभावली. या चित्रपटातील ‘आज कल पांव जमीं पर नही पडते मेरे’’तेरे बिना जिया जाये ना’ ही कर्णप्रिय गाणी खूप लोकप्रिय झाली.,या चित्रपटातील प्रत्येक दृष्यात रेखा-विनोद मेहराचे ऑफ स्क्रीन प्रेम हे ऑन स्क्रीनमध्ये उमटताना तीव्रतेनं जाणवत होतं.या चित्रपटाच्या वेळी त्यांचे प्रेम पीक वर होते.
रेखा सुरवातीपासून बेबाक होती.पत्रकारांच्या प्रश्नांना ती बेधडक उत्तरे देत असे.एका प्रश्नाच्या उत्तरात रेखाने स्पष्टपणे सांगितले ‘आप उस मर्द के करीब तब तक नही जा सकते जब तक आप उसके साथ सेक्स नही करते!’दूसरं रेखाचं तथाकथित वादग्रस्त विधान होतं ‘लग्नाच्या पूर्वीच सेक्स करने हे स्वाभाविक आहे’,जे लोक म्हणतात लग्नानंतर सेक्स केला पाहिजे ते बकवास करतात’वयात परिपक्वता नसल्याने रेखाने ही विधाने केली होती,यात शंका नाही.रेखाच्या या खुल्या विचारांनी मात्र तिच्या जिवनात प्रचंड वादळ उठवले.
रेखाने नंतर एक मुलाखतीत सांगितलं की,त्या वयात तिला पत्रकार व गॉसिप मॅगझीनचे पत्रकार यात भेद कळत नव्हता.परिणामी,त्यामुळे मुंबईत माझी छवि ‘बिंदास’ अशी निर्माण झाली.मॅगझीन्समधील माझ्या मुलाखती वाचून मला अतिशय दु:खं होत असे कारण मूळात मी तशी ’बिंदास’नव्हते…मुलाखतीत उमटलेल्या शब्दांपेक्षा प्रत्यक्षात मी फार-फार वेगळी होते…!
रेखाच्या अश्या वादग्रस्त विधानांचा बचाव त्यावेळी विनोद मेहरा करीत असे.विनोद मेहरा रेखासोबत लग्नं करु इच्छित होते पण,विनोद मेहरांच्या आईला हे लग्न पसंद नव्हते.त्यांना एक घरगुती सून हवी होती.रेखावर नाजायज औलादीचा ठपका आणि रेखाचे बेबाक विचार,विनोद मेहराच्या आईला कदापि मंजूर नव्हते.विनोद मेहराचे सगळे प्रयत्न आपल्या आईला मनवण्याचे निष्फळ ठरले.अखेर एक दिवस कलकत्यामध्ये रेखा-विनोद यांनी लग्न केले.विनोद मेहराला वाटलं लग्नानंतर आईचा नकार,होकारमध्ये बदलेल मात्र,असे घडलं नाही.
रेखाला विनोद आपल्या घरी घेऊन गेले असता,आर्शिवाद देण्या ऐवजी विनोद मेहराच्या आईने जोरजाेरात रेखाला शिव्या श्राप देण्यास सुरवात केली.विनोद मेहराच्या आई कमला मेहरा या इतक्या पॅनिक झाल्या होत्या की त्यांनी रेखाला पायतली चप्पल काढून मारली!त्यांना नाजायज,बिन ब्याही मां की बेटी,असे अपशब्द म्हणून घरातून हाकलून लावले.विनोद मेहरा यांनी आईला कोणताही विरोध केला नाही.,हे रेखासाठी फार धक्कादायक होतं...रेखा अपमानित होऊन विनोद मेहराच्या घरातून बाहेर पडली.तिला हा मानसिक धक्का पोहोचला की विनोद याला साथ द्यायचाच नव्हता तर का या नात्यात तो इतका पुढे गेला!
या घटनेनंतर रेखा सतत आजारी राहू लागली.एका मुलाखतील रेखा स्वत: म्हणाली,कमला मेहरासाठी मी फक्त एक अभिनेत्री नाही तर एक ‘बदनाम’ अभिनेत्री होते ,त्यांच्या दृष्टिने मी सेक्ससाठी वेडी आहे!‘या घटनेनंतर रेखाचं मन लग्न,प्रेम यासारख्या गोष्टीपासून फार विरक्त झालं.खरं प्रेम मिळवण्यासाठी आसुसलेल्या रेखाला दर वेळी प्रेमात धोकाच मिळत राहीला…!
याच काळात स्मिता पाटीलचा मृत्यू झाला व राज बब्बर आपल्या पत्नी व मुलांकडे परत आले.त्यावेळी त्यांना पत्नीकडून खूप ताणे ऐकावे लागत होते.१३ डिसेंबर १९८६ रोजी महान अभिनेत्री स्मिता पाटील राज बब्बरसोबत आपल्या जगरहाटीविरुद्ध सुरु केलेल्या प्रेमाचा संसार वयाच्या ३१ सा व्या वर्षी अर्ध्यावर टाकून जग सोडून निघून गेली होती.बाळंपणानंतर प्रतीक बब्बर हा फक्त १३ दिवसांचा होता,स्मिताच्या प्रेमात राज याने आपली पहिली पत्नी नादिरासोबत धोका केेला होता.पण,स्मिता जग सोडून गेल्याने त्याच्याकडे पहीली पत्नी व मुलांकडे परतण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
राज बब्बर हे सगळं आपली जुनी मैत्रीण रेखाला सांगत असत.याच काळात रेखा-राज बब्बरचे काही चित्रपट हिट झाले.त्यांच्या ही नात्याविषयी अनेक फिल्मी पत्रिकामध्ये गॉसिप्स झळकू लागले.रेखाने राज बब्बरसोबत लग्नासाठी विचारले असता,आता मी लग्नाच्या भानगडीत पडू इच्छित नसल्याचे राज याने सांगितले.राज बब्बरच्या घरातून रेखा या बिना चप्पल घालताच रडत-रडत निघून गेली,अश्या बात्म्या झळकल्या….!
यानंतर रेखाच्या जिवनात सदीचा महानायक अमिताभ बच्चन याची एन्ट्री झाली.त्यांची प्रेम कहाणी ही आज देखील सिने रसिकांसाठी तितकीच रोमांचक आणि रहस्यमय आहे.ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन रेखा-अमिताभची जोडी ही प्रत्येक सिनेरसिकांच्या काळजात आज देखील वसते.रेखा आणि अमिताभने एकूण दहा चित्रपटात सोबत काम केले.त्यांचा शेवटचा चित्रपट होता ‘सिलसिला’.या चित्रपटानंतर त्यांच्या नात्याचा ऑन स्क्रीन’ सिलसिला’ कायमचा थांबला.रेखाचं आयुष्य हे खासगी नसून एखाद्या चित्रपटासारखं भासतं.
१९७२ साली जया भादूरी व रेखा हे जूहू बीच येथील एका फ्लॅट स्कीममध्ये राहत होत्या.तेव्हा रेखा १८ वर्षांची होती.जया ही रेखापेक्षा ६ वर्षांनी मोठी आहे.जयावर आपल्या ‘गुड्डी’या पहील्याच चित्रपटापासून खूप चांगली अभिनेत्री असल्याचा टॅग लागून गेला होता.मात्र,रेखाला स्वत:च्या अभिनयाची काबिलियत सिद्ध करण्यासाठी खूप काळ जाऊ द्यावा लागला.रेखा सुरवातीपासून आपल्या अभिनयाप्रती ‘गंभीर’नव्हती.त्यांची चांगली ओळख झाली होती व चांगली मैत्री देखील झाली होती.रेखा प्रेमाने जयाला ’दिदी भाई’म्हणत होती.हा तोच काळ होता जेव्हा अमिताभ सिनेजगतात संघर्ष करीत होता व जया त्याच्यासाठी निर्मात्यांकडे शब्द टाकत होती.
अनेकदा जया रेखाला समजावत होती की स्वत:च्या करिअर आणि जीवनाप्रती आता तू गंभीर हो,जयाच्या घरातच रेखाची पहील्यांदा अमिताभ बच्चनसोबत ओळख झाली.अमिताभ जयाचे प्रियकर होते आणि एकमेव.. जया त्याच्या जीवनात होती जी त्याच्या संघर्ष काळात त्याची हिंमत बनून राहीली होती.
हास्य अभिनेता मेहबूबचे आत्मचरित्र लिहणारे लेखक हनिफ झवेरी सांगायचे की त्या काळात अमिताभ व मेहमूदचा भाऊ अनवर खूप चांगले मित्र होते.अनवर खूपदा त्या तिघांनाही लांब फिरायला कारमधून घेऊन जात होते.अनवर कार चालवित होते आणि जया त्याच्यासोबत पुढे बसत होती तर मागच्या सीटवर रेखा बसत होती.संपूर्ण रस्ताभर नुसत्या गप्पा होत होत्या.
मात्र,याच काळात जयाने एका मुलाखतीत रेखा विषयी सांगितले की,ती कधीही स्वत:ला गांर्भीयाने घेत नाही,ही गोष्ट जरी खरी असली तरी रेखाला खूप वाईट वाटलं.१९७३ साली अमिताभ व जयाची ’जंजीर’ प्रदर्शित झाली व या चित्रपटाने यशाचे झंडे गाडले.यानंतर या यशाचा डंका परदेसात गाजत असताना यातील नायक नायिकांनाही त्यात सहभागी होणे गरजेचे असताना,तिथं जाण्यापूर्वी अमिताभ-जयाने लग्नाशिवाय जाऊ नये,असे फर्मान सुसंस्कारी बच्चन माता-पिताने ,तेजी व हरिवंशराय यांनी काढले.परिणामी,अतिशय घाईत ३ जून १९७३ साली अमिताभ-जया विवाहबद्ध झालेत.
या लग्नात रेखाला निमंत्रण देण्यात आलं नाही,याचं रेखाल खूप दु:खं झालं.रेखा आपल्या मूळ स्वभावानुसार यावरही भरभरुन बोलली,ती म्हणाली,मी जयाला मोठी बहीण मानत होती,गांर्भीर्याने मी तिचं ऐकत ही होती पण आता मला असं वाटतं जया तर प्रेत्येक ऐरेगैरेला सल्ला देते,तिला लोकांना डोमिनेट करण्याची सवय आहे,ते ही तोपर्यंतच जोपर्यंत तिला सूट करेल,आम्ही मित्र होतो,किती तरी वेळ आम्ही सोबत घालवला ,आम्ही एकाच इमारतीत राहतो तरी पण जयाने मला तिच्या लग्नात आमंत्रित केलं नाही…!
याच काळात निर्देशक दुलाल गुहाने ‘दो अंजाने’चित्रपट सुरु करण्याचा निर्णय केला आणि रेखा व अमिताभ यांना यात साईन केलं.या चित्रपटापूर्वी रेखाने कोणतेही उम्दा चित्रपट केले नव्हते.आतापर्यंतच्या चित्रपटात तिच्या अभिनयाचा कस लागला नव्हता.इतकंच होतं की रेखाला अमिताभसोबत काम करण्याची संधी मिळत होती जो ‘जंजीर’आणि ‘दिवार’नंतर ‘ एंग्री यंग मॅन’ म्हणून तरुणाईच्या गळ्यातल ताईत बनला होता.याशिवाय अमिताभ रेखाच्या ‘दिदी भाई’चा नवरा पण होता.या पूर्वीच अमिताभची चित्रपटांविषयीची बांधिलकी संपूर्ण सिनेजगतात चर्चित होती.वेळेवर सेटवर यायचं,दिग्दर्शकासोबत सीन समजून घेणं,चर्चा करणं आणि पॅकअपनंतर वेळ न दडवता घरी निघून जाणं. सिनेजगतात जसं अमिताभची बांधिलकी आणि अनुशासन प्रसिद्ध होतं तितकंच रेखाची अनुशासनहिनता देखील कुप्रसिद्ध होती.रेखा कुुप्रसिद्ध होती की ती सेट सोडून कधीही,कुठेही फिरायला निघून जात होती.रेखाने स्वत:सांगितले की निर्मात्यांच्या पैशांवर मी खूप फिरले आहे…!
दलाल गुहा समोर एक यक्ष प्रश्न हाच होता की रेखा-अमिताभ हे एकमेकांपेक्षा फार वेगळे व्यक्तिमत्व होते.रेखाचा स्वभाव बेबाक होता तर अमिताभ खूप संयत होता.रेखा नेहमीच शुटींगवर उशिरा पोहोचत होती तर अमिताभ वेळेचा पाबंद होता.अमिताभचे कामाप्रति समर्पण बघून रेखालाही आश्चर्य वाटले.जी रेखा नेहमीच शुटींगवर उशिरा पोहोचत होती ती आता वेळेत येऊ लागली.अमिताभच्या सानिध्यात रेखा हळूहळू ‘सहज’ होत चालली होती.
‘दो अंजाने’च्या शुटिंगच्या वेळी सर्वांना ही भीती होती की चित्रपट बनायला अनेक विघ्नं येतील पण युनिटचे लोकं हे बघून थक्क झाले की रेखा या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी खूप वक्तशीर व अनुशासित झाली होती.हा तो काळ होता जेव्हा रेखा अमिताभला काम करताना बघत होती,त्याच्या कामाची पद्धत पाहत होती,त्याचं निरीक्षण करत होती.रेखाने आतापर्यंत सिनेजगतात असा अभिनेता बघितला नव्हता ज्याने रेखाला कामाप्रति इतकं प्रभावित केलं असेल.अमिताभच्या व्यक्तिमत्वाचा असा प्रभाव रेखावर पडला की रेखा सकाळी ६ वा.सेट वर पोहोचू लागली.
‘दो अंजाने’ची शुटिंग कलकत्तामध्ये झाली होती.अमिताभ या शहरात आधीच १९६२ ते १९६९ पर्यंत राहून चुकले होते.रेखाला कलकत्ताविषयी काहीच माहती नव्हतं.ग्रॅण्ड हॉटेलमध्ये ते थांबले होते.शुटिंग संपल्यानंतर सगळे खूप वेळ गप्पांमध्ये घालवित होते.अमिताभ कलकत्ताच्या आठवणी त्यांना सांगत होते,याशिवाय तो रेखा व प्रेम चोपडासोबत दर्शनीय स्थळांवर देखील जात होता. १९७६ मध्ये ‘दो अंजाने’प्रदर्शित झाली.हा चित्रपट सुपरहिट झाला नाही पण लोकांच्या पसंदीस उतरला.रेखाच्या अभिनयाची पहील्यांदा दखल घेण्यात आली.तिचे कौतूक झाले,तिने संपूर्ण श्रेय अमिताभला दिले.अमिताभच्या परफेक्शनमुळे रेखा खूप जास्त प्रभावित झाली होती.याचाच दूसरा अर्थ रेखा अमिताभच्या व्यक्तिमत्वाप्रति आकर्षित झाली होती.
या चित्रपटाची आणखी एक मजेशीर बाब म्हणजे,सुरवातीला रेखाने हा चित्रपट कथानक ऐकून नाकारला होता.त्या काळातील कोणतीही टॉपची अभिनेत्री या चित्रपटात काम करण्यास तयार नव्हती कारण चित्रपटाच्या कथानकामध्ये एक पत्नी आपल्या महत्वाकांक्षेसाठी आपल्या पतीलाच मृत्यूच्या दारात ढकलत असते. रेखाने देखील सुरवातीला हा चित्रपट करण्यास नकार दिला होता मात्र,दुलाल गुहाने रेखाला समजावले की,या चित्रपटात रेखाचीच मुख्य भूमिका आहे,येणा-या काळात रेखाला या भूमिकेसाठी लक्षात ठेवले जाईल.खूप समजावल्या नंतर रेखा हा चित्रपट करण्यास तयार झाली.
या चित्रपटाचा कमाल हा होता की, या चित्रपटात रेखाच्या ग्लॅमर ऐवजी तिच्या अभिनयाचे कौतूक होऊ लागले होते.रेखाने या कौतूकाचे संपूर्ण श्रेय अमिताभला दिले.अमिताभ आधीपासूनच विवाहित होता.त्याने १९७३ मध्ये जया भादुरीसोबत प्रेमविवाह केला होता.१९७६ मध्ये रेखा-अमिताभच्या जोडीला ‘दो अंजाने’हिट झाल्यानंतर एकानंतर एक चित्रपट मिळत होते.
यानंतर त्या काळात फिल्मी पत्रिकांमध्ये यांच्या प्रेम संबधांविषयी गॉसिप्स उमटू लागले.या गॉसिप्सवर सत्याची मोहर तेव्हा उमटली जेव्हा १९७८ मध्ये ‘गंगा की सौगंध’चित्रपटाचे चित्रिकरण होत होते.या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान एका सह कलाकार अभिनेत्रीने रेखासोबत अवमानकारक व्यवहार केला,हे बघून रेखा आपला राग व्यक्त करेल त्या आधीच अमिताभ चिडून उठला.हे बघून मिडीयाने रेखा-अमिताभच्या प्रेम संबंधावर सत्याची मोहोर उमटवली.
मिडीया ही जेव्हा पण रेखा-अमिताभला त्यांच्या प्रेम संबंधांविषयी विचारत होती त्यावेळी दोघेही नकार देत होते.त्यावेळी मिडीयामध्ये ही बातमी पसरली की रेखा-अमिताभने लपून लग्न केले!त्याकाळी सगळ्या फिल्मी पत्रिकेच्या मुख्य पृष्ठावर रेखा-अमिताभचेच चित्र उमटत होते.
२२ जानेवरी १९८० रोजी ऋषि कपूर आणि नीतू सिंग यांचं लग्न झालं.नीतू सिंग ही रेखाची पण चांगली मैत्रीण होती.आर.के.स्टूडियोमध्ये नीतू सिंग व ऋषी कपूरचा लग्न सोहळा सुरु होता.एका कोप-यात बसून अमिताभ बच्चन निर्माता दिग्दर्शक मनमोहन देसाईसोबत बोलत बसले होते आणि जया ही आपली सासू तेजी बच्चनसोबत बसली होती.याच वेळी रेखाची सेंसेशनल एण्ट्री झाली.सगळ्यांच्या नजरातरेखावर खिळल्या.रेखाच्या भांगेत सिंदूर भरले होते,ती वधूसारख्या गेटअपमध्ये आली होती,त्यामुळे सर्वत्र तिने लग्न केल्याची चर्चा सुरु झाली.कोणाच्या नावाचा सिंदूर रेखाने आपल्या भांगेत भरले होते,याची चर्चा सुरु झाली.रेखाची नजर सारखीसारखी अमिताभकडेच जात होती.अमिताभच्या हाताला जखम झाली होती,त्याच्या हातावर पट्टी बांधली होती.
रेखाला एरोबिक्स आणि आहाराचे धडे शिकवणारी डॉ.स्नेहलता पांडे पण तिथंच होती.रेखाने हिंमत करुन स्नेहलताला सोबत घेतले व अमिताभकडे गेली.दोघांमध्ये सहज वार्तालाप झाला,सगळ्यांची नजर मात्र त्या दोघांवरच खिळली होती.जया बच्चनच्या चेह-यावर दु:खं आणि डोळ्यातील अश्रू पण मिडीयाने बघितले.थोड्या वेळाने रेखा त्या सोहळ्यातून निघून गेली पण मिडीयाला खूप मोठा मसाला या सोहळ्यातून मिळाला होता…रेखाच्या सिंदूरचा प्रोपोगंडा खूप काळ गाजत राहीला….!
नंतर रेखाने यावर खुलासा केला की ती एका चित्रपटाच्या शुटिंगमधून सरळ नीतू-ऋषिच्या लग्न सोहळ्यात पोहोचली होती.शुटिंगसाठी केलेला मेकअप आणि सिंदूर काढण्यास ती विसरली होती….!
२ मे १९८० रोजी हेमा आणि धर्मेंद्रचं लग्न झालं.धर्मेंद्र आधीपासून विवाहित होते व चार अपत्यांचे पिता होते.तरी देखील त्यांनी धर्म बदलून आणि जगाची परवाह न करता हेमासोबत प्रेमविवाह केला.यासाठी धर्मेंद्रने आपल्या पहील्या पत्नीला सोडचिठ्ठीही दिली नव्हती.या लग्नामुळे रेखाला तिचं प्रेम मिळवण्याचा मार्ग गवसला होता.असं म्हटलं जातं की या संदर्भात तिने आपली मित्र स्नेहलता पांडेला सांगितलं की…अब मेरा भी रास्ता निकलेगा…!
मात्र,जया आपल्या लग्नाच्या नात्याविषयी खूप आत्मविश्वासी होती.अमिताभ-रेखाच्या नात्याविषयी जया बच्चनने स्पष्ट सांगितलं की,जग जे बोलतं ते बाेलू द्या,अमिताभने मला आमच्या वैवाहिक नात्याविषयी शब्द दिला आहे.जर माझ्या पाठी मागे ते काही चुकीचं करत असतील तर हा त्याचा प्रॉब्लेम आहे,त्याला त्यासोबतच जगावं लागेल….!
मात्र, रेखाला घेऊन घरातील तनाव खूप वाढल्यानंतर अमिताभने एकदा स्पष्ट सांगितलं होतं की ‘हमारे केस मे डिर्व्होस कभी नही होगा,मैं हिन्दूस्तानी हूँ,मेरी फर्स्ट क्लास चॉईज थी जब मैने जया को जीवनसाथी चुना था’हा एकमेव खुलासा आहे जो अमिताभने आपल्या नात्याविषयी दिला होता.यानंतर अमिताभकडून या नात्यावर कधीही बोलल्या गेलं नाही…!
रेखाने सांगितलं की एकदा जयाने मला रात्रीच्या भोजनासाठी घरी बोलावले होते.तिला रेखा-अमिताभच्या नात्याविषयी कोणतीही चिंता नव्हती.जयाच्या नजरेत तिचं नातं फक्त एक मौजमस्तीचं नातं होतं पण,आता तिला जाणीव झाली की आमच्या नात्याने गंभीर वळण घेतलं आहे,जेवणा नंतर रेखा जेव्हा जयाच्या घरातून निघू लागली तेव्हा जयाने रेखाला सांगितलं...‘मै अमित को नही छोडूंगी चाहे कुछ भी हो जाये’यानंतर जयाने अमिताभला रेखासोबत चित्रपट न करण्यास स्पष्टपणे सांगितले.
रेखा-अमिताभचे तोपर्यंत दहा चित्रपट सुपरहीट झाले होते. ज्यात ‘दो अंजाने’नमक हराम‘,गंगा की सौगंध’,मिस्टर नटवरलाल,’खून पसीना ,’मुकद्दर का सिंकदर’,सुहाग’’हे चित्रपट आहेत.इतकी सुपरहिट जोडी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली असताना,जयाने अमिताभला रेखासोबत चित्रपट न करण्याची तंबी दिली आणि प्रेमासारख्या नात्यात असूनही… अमिताभने निर्मात्यांना रेखा सोबत काम न करण्याचे सांगणे सुरु केले.याविषयी रेखाने अमिताभशी बोलण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा अमिताभ म्हणाला,मी या विषयी एक शब्द ही बोलणार नाही,मला तू विचारु पण नकोस’रेखासाठी ही खूप वेदनादायी गोष्ट होती की अमिताभने माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता…!अमिताभच्या अश्या अति व्यवहारिकपणामुळे रेखाला खूप दु:खं झालं होतं…!यानंतरच्या काळात अमिताभची जोडी परवीन बाबी,स्मिता पाटील,झीनत अमान आदी नायिकांसोबत हिट होताना दिसून पडली.
एका मुलाखतीत रेखाच म्हणाली,‘मला काय हवं आहे याची कोणाला काही काळजी नव्हती,कारण मी तर बाहेरची महिला होती…’.जयाचं नाव न घेता ‘दुसरी व्यक्ति ही कायम सर्वांच्या नजरेत बिचारी असते...!’
अमिताभच्या व्यक्तिमत्वाचा इतका गहरा असर रेखावर झाला की आता तिने सुंदर दिसण्यासाठी आपल्या खानपान आणि फिटनेसवर लक्ष देणं सुरु केलं,आपल्या भाषेत बदल करण्यास सुरवात केली.,ती पूर्ण शाकाहारी बनली,तिने योगा करण्यास सुरु केले.मीना कुमारीचे मेकअपमॅन राम दादांना तिने मेकअपसाठी हायर केलं.राम दादा जाेपर्यंत जिवंत होते तेच रेखाचे मेकअप मॅन राहीले.
रेखा-अमिताभची ‘खून पसीना’,‘आलाप’इमान धरम’हे या जाेडीचे तिन्ही चित्रपट १०७० साली रिलिज झाली.मिडीया आता या दोघांच्याही संबंधाविषयी बोलू लागत होती.प्रकाश मेहरा यांनी देखील सांगितलं आहे की रेखाला कसं बोलायचं,कसं चालायचं आहे,स्वत:ला कसं सादर करायचं आहे,हे अमिताभने रेखाला शिकवलं आहे.‘अमिताभने रेखा को कल्चर दिया’असं ते सांगतात.रेखाने हे जगापासून कधीही लपवलं नाही माझ्यात जो काही सकारात्मक बदल झाला आहे तो अमिताभमुळे झाला आहे.अमिताभ माझी प्रेरणा आहेत…!
रेखाला पण याची जाणीव झाली की जर मला या उत्तुंग व्यक्तिमत्वासोबत चालायचं असेल,राहायचं असेल तर मला माझं व्यक्तिमत्वही उच्चांकावर न्यावे लागेल.अमिताभमुळेच रेखा एक अभिनेत्री आणि स्त्री म्हणूनही खूप शानदार होत गेली…!रेखा अमिताभच्या प्रेमात आकंठ बुडाली होती,ती हे विसरली की तिच्या आईने देखील विवाहित पुरुषाच्या प्रेमात हेच सर्व भोगलं आहे….!
मात्र,त्याच वेळी जगभर गाजत असलेल्या या प्रेम त्रिकोणाला घेऊन यश चोप्राने ‘सिलसिला’करण्याचा निर्णय घेतला,यात त्याने वास्तविक जीवनातलेच जया,अमिताभ आणि रेखा हे तीन पात्र चित्रपटात घेतले.‘सिलसिला’चित्रपटाचे दिग्दर्शक यश चोप्रानेही रेखा-अमिताभच्या नात्याचा खुलासा केला होता.या चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळी ते स्वीझरलॅण्डच्या लोकेशनवर रेखा-अमिताभला रोमांस करण्यासाठी खुले सोडून देत होते.’तेरी बांहो में है जानम मेरे जिस्माे जां पिघलते…ये कहां आ गये हम यूं ही साथ-साथ चलते’..लताचा हा तरल स्वर जणू रेखाच्याच पारलौकिक प्रेमाची अभिव्यक्ती बनला होता…!दोन प्रेमवेडे जगापासून लांब… एकमेकासोबत भरपूर जगणं जगत होते..ही संधी यश चोप्रामुळे रेखा-अमिताभला मिळाली होती.या चित्रपटाच्या स्वीझरलॅण्ड लोकेशनवरील सगळ्या दृष्यांमधील त्यांच्या प्रेमभावनेत, सिनेप्रेमीही खोलात बुडून गेला होता.डोळ्यात दाटून येणारे एकमेकांविषयीचे प्रेम… सिनेदर्शक हा चित्रपटगृहात बसूनही अनुभवत होता.या अजोड जोडीचं अविट प्रेम याची अनुभूती घेत होता.मात्र,सशक्त कथनकाच्या अभावी हा चित्रपट फ्लॉप झाला.

जया या मधून मधून शुटिंगसाठी येत होत्या कारण तिच्या मागे दोन मुले व सासूची कौटूंबिक जबादारी होती मात्र,त्या दोघांनाही एकमेकांसोबत खुले सोडून दिल्यानंतरही ती निश्चित होती….काहीही झालं तरी..अमिताभ फक्त माझा आहे…!तो खूप संस्कारी आई-वडीलांचा मुलगा आहे,एक चांगला आणि विचारी पती व जगात सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलांवरच करणारा दोन मुलांचा पिता आहे,हा आत्मविश्वास जयाला रेखावर त्रागा करण्यापासून रोखत राहीला.
दूर्देवाने १९८२ मध्ये ’कुली’चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी अमिताभ बच्चनला पुनित इस्सरचा मुक्का इतक्या जोरात पोटात लागला की ते जखमी झाले.ही दुर्घटना इतकी मोठी होती की अमिताभ एका महिन्यापर्यंत कोमातच होते.रेखा अमिताभला बघायला रुग्णालयात पोहोचली मात्र,जया बच्चनने रेखाला अमिताभला बघू दिले नाही.रेखासाठी हा काळ खूप वेदनादायी होता.प्रेम….कायम वेदनांच्या सहनशीलतेची परिक्षा घेत असतो…!
१९८४ साली रेखाने फिल्म फेअरला मुलाखत देताना सांगितले की,‘मुझे मौत मंजूर थी लेकीन बेबसी का वो लम्हा मंजूर नही था!’
‘कुली‘च्या दूर्घटनेनंतर रेखा-अमिताभचे संबंध पूर्णपणे तुटल्याचं मानलं जातं.या पूर्वीच त्यांनी सोबत काम करणं बंद केलं होतं.रेखा यांनी अनेक मुलाखतीत जयाच्या व्यवहारामुळे तिच्या ‘अगतिकतेचा ’उल्लेख केला आहे.हा असा काळ होता जेव्हा संपूर्ण भारतात अमिताभसाठी सहानुभूती आणि काळजीची लाट उसळली होती.अमिताभ एक महिना कोमामध्ये होते.तिने खूप प्रयत्न केले पण तिला जयाने अमिताभला बघू देखील दिलं नाही.रेखाने अमिताभसाठी विना पादत्राणे आंध्र प्रदेशातील बालाजीचे दर्शन घेतले होत. उज्जैनच्या महाकाळेश्वर मंदिरात विशेष पूजा ठेवली.देशभरातील मंदिरं तिने पालथी घातली….!
त्यामुळेच आपल्या मुलाखतीत रेखानी सांगितलं की,मी जग सोडू शकते मात्र माझी अगतिकता नाही,अमिताभ पासून वेगळं होणं माझ्यासाठी खूप वेदनादायी काळ होता,मी आज ही तो काळ आठवते तर रडून देते….!
सीमी गरेवालच्या शो मध्ये रेखाने सांगितले.अमिताभचं लग्न झालं होतं यामुळे काहीही फरक पडत नव्हतं, ‘मै उस इंसान के साथ जुडना चाहती थी,मै उसका घर नही तोडना चाहती थी,पर मै उस इंसान के एहसास के साथ जीना चाहती हूँ’….!
अभिनेत्री सिमी गरेवालच्या गाजलेल्या शो मध्ये वेळोवेळी रेखा,अमिताभ व जया देखील आले होते.याच शो च्या आठवणी रेडिफला सांगताना अमिताभने १९९८ साली ती मुलाखत दिली होती,त्याचा उल्लेख केला.तो काळ बच्चनचे चित्रपट चालण्याचा नव्हता शिवाय त्याची एबीसीएल कंपनी दिवाळखोरीत निघाली होती.अमिताभ नव्याने सिनेजगतमध्ये संघर्ष करत होता.त्यावेळी बिग बी चा आत्मविश्वास डगमगला होता,असं सिमी म्हणाली होती.
आम्ही खूप गोष्टींबद्दल बोललो,त्याचं बालपण,आई-वडील,एबीसीएल कंपनी,त्याचे फ्लॉप चित्रपट,त्याचे पुनरागमन,त्याचं कुटूंब,मुले,त्याला आवडणा-या नायिका,त्याचे व्यवसायिक निर्णय,त्याने अतिशय प्रामाणिकपणे सगळ्यांची उत्तरं दिली मात्र,बरेच लोकांनी त्या मुलाखतीनंतर म्हटलं की,अमिताभ रेखा विषयीच्या नात्याबद्दल खरं नाही बोलला…!सिमी म्हणाली मला विश्वास आहे त्या मुलाखतीत तो जे बोलला ते खंर होतं पण लोकं त्याच गोष्टींवर विश्वास ठेवतात ज्यावर त्यांना ठेवायचा आहे…!
अमिताभ रेखा विषयी या मुलाखतीत म्हणाला की,ती माझी सहकलाकार आणि सहकारी आहे आणि जेव्हा आम्ही एकत्र काम करत होतो,तेव्हा साहजिकच आम्ही एकमेकांना भेटलो होतो.आमच्यात काहीच साम्य नाही.काहीवेळा आपण एखाद्या कार्यक्रमात,म्हणजे एखाद्या पुरस्कार सोहळ्यात वगैरे भेटतो तेवढंच…..!अमिताभच्या या अतिशय दुटप्पी,स्वार्थी व भेकड स्वभावावर त्यावेळी सडकून टिका झाली होती.
अमेरिकेमधून लांब दौरा करुन भारतात आल्यानंतर बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत रेखाने एंकरच्या फरमाईशवर मेंदी हसनची सुंदर गजल गुणगुणली..‘मुझे तूम नजर से गिरा तो रहे हो..मुझे तूम कभी भी भूला ना सकोगे…ना जाने मुझे क्यो यकीं हो चला है,मेरे प्यार को मिटा ना सकोगे….मुझे तू नजर से’यातून तिच्या मनात काय आहे,हे जगालाही कळलं…!
सुपर स्टार रेखा,लेडी अमिताभ रेखा...हिने या मुलाखतीत सांगितले की मी स्वत:ला सुपरस्टार समजत नाही,जग मला सुपरस्टार समजंत,मी फक्त एक अभिनेत्री आहे.वयाच्या अनेक वर्षांपर्यंत मी अभिनय केलाच नाही फक्त चित्रपटांमध्ये काम केलं.मला कधीही चित्रपटात यायचं नव्हतं,पण आईमुळे जबरदस्तीने या क्षेत्रात आले.अनेक चित्रपटांनंतर मला कळलं की स्टार होणे पुरेसे नाही कलाकार होणे गरजे आहे,मग अभिनयासाठी मी गंभीर झाले.अर्थातच अभिनयाप्रति आणि जीवनाप्रतिचे हे गांर्भीर्य रेखामध्ये अमिताभमुळेच येऊ शकले.
मात्र,१९९० मध्ये अचानक रेखाने दिल्लीतील उद्योगपती मुकेश अगरवालसोबत लग्नाचा धक्कादायक निर्णय घेतला.या लग्नातही रेखाला तिला हवं असलेलं प्रेम गवसलंच नाही आणि काही दिवसातंच त्यांच्यात खटके उडू लागले.रेखासोबत लग्न झाल्यानंतर काहीच दिवसात मुकेश अगरवाल डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगितलं जातं.लग्नानंतर ७ महिन्यातच मुकेशनी रेखाच्या ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली…!

मृत्यू पूर्वी मुकेशनी चिठ्ठीत लिहलं की, त्यांच्या मृत्यूसाठी रेखाला जबाबदार धरु नये ’असे सांगत ’मी माझ्या संपत्तीतून रेखाला काहीही देऊ इच्छित नाही,ती हे सर्व स्वत: उभं करु शकते.’मुकेश यांच्या आत्महत्यानंतर मुकेशच्या कुटूंबियांनी रेखावर अनेक गंभीर आरोप केले.
या घटनेमुळे रेखावर तिचे सिनेचाहते ही खूप नाराज झाले.अमिताभवर प्रेम होतं,त्याच्या शिवाय ती जगू शकत नव्हती तर लग्नाचा डाव टाकून एका निष्पाप उद्योगपतीचा जीव तरी तिने कशाला घेतला?असा सरळ सवाल तिला केला जाऊ लागला.चित्रपटसृष्टीही ही रेखाच्या विरोधात गली.या काळात सुनील दत्तसोबतच्या चित्रपटावर प्रेक्षकांनी बंदी घालण्याची देखील मागणी केली जाऊ लागली.मुकेश यांनी आत्महत्या केली त्यावेळी रेखा,सुनील दत्त यांच्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी परदेशात होती.
मुकेश आणि रेखाची भेट कशी झाली याविषयी रेखाची मैत्रीण बीना रमानी ‘एएनआय’ शी बोलताना सांगतात की,त्यांनीच या दोघांची ओळख करुन दिली होती.बीना ही रेखाची फॅशन डिझायनर देखील आहे.बीना रमानींच्या न्यूयार्कमधील घरी रेखा भेटायला गेली होती.त्यावेळी एखाद्या महत्वाच्या व्यक्तिशी लग्न करण्याची ईच्छा रेखाने व्यक्त केली.त्यानंतर बीना हिने मुकेशसोबत रेखाची ओळख करुन दिली.बीना यांनाही मुकेश बद्दल एका मित्राकडून कळलं व एका पार्टीत ते भेटले. या मित्राने बीनाला सांगिलं की मुकेश रेखाचा खूप चाहता आहे आणि त्याला रेखाचे सगळे संवाद पाठ आहे.त्याला तिच्या आयुष्याविषयीही सगळं माहीती आहे.
मुकेश दिसायला खास नव्हता.तो बुटका आणि सावळा होता,पण तो खुप छान बोलायचा.मुकेशच्या डोळ्यात खूप प्रामाणिकपणा होता.त्याने मला विचारलं तो रेखाला भेटू शकतो का?मी रेखा व मुकेशची फोनवर ओळख करुन दिली.तो कसा दिसतो हे रेखालाही माहीती नव्हतं.ती त्याच्याशी २-३ मिनिटे बोलली.तिने स्वत:चा नंबर देण्यास मला मनाई केली मात्र,त्याचा नंबर रेखाने माझ्याकडून घेतला.यानंतर मुकेश व रेखा फाेनवर बोलायचे.पण रेखाला त्याच्या दिसण्याविषयी शंका होती.
ते दोघेही वेगवेगळया शहरात राहत होते.मुकेश दिल्लीत तर रेखाचं संपूर्ण जग हे मुंबईत वसलं होतं.मुकेश प्रचंड आनंदी होता,त्याला हा विश्वास बसत नव्हता रेखा त्याच्यासेबत बोलते…!मग दोघांनी एकमेकांना फोटो पाठवले.त्यानंतर रेखा म्हणाली,‘तो माझ्या शेजारी उभा असलेला तुला बघवतोय का?’कारण तिच्या डोक्यात अमिताभ बच्चन होता…!
मी तिला म्हटलं ’नाही’.पण तो चांगला माणूस आहे.तुला काय निर्णय घ्यायचा आहे तो तू घे,मी तुझ्यावतीने कोणताही निर्णय घेणार नाही’असं बीना रेखाला म्हणाल्या.
रेखा-मुकेश यांची पहीली भेट मुंबईत बीनाचा मित्र याच्या घरी झाली..ते आनंदी वाटत होते कारण दोघेही एकमेकांशी ब-याच काळापासून बोलत होते.त्यांना एकमेकांबद्दल खूप गोष्टी माहिती होत्या.या भेटीतून त्यांच्या नात्याची सुरवात झाली.या पहील्या भेटीनंतर थेट त्यांच्या लग्नाची बातमी समजली!टी.वी.,वर्तमान पत्रात त्यांच्या लग्नाची वार्ता होती.सगळं इतक्या लवकर होईल याची कोणालाही कल्पना नव्हती.लग्नानंतर अवघ्या ७ महिन्यात मुकेशने आत्महत्या केली.त्यांचे लग्न हे ‘फँटसी’होतं,असं बीना म्हणाल्या.ते दोघे वेगवेगळ्या शहरात खूप वेगवेगळं आयुष्य जगत होते.रेखांच आयुष्य मुंबई होतं त्यामुळे ते लग्न काहीसं काल्पनिक होतं.मात्र,भविष्यात सगळं काही चांगलं होईल,याची मला आशा होती पण…. !
यानंतर रेखाने फिल्मफेअरला एक मुलाखत दिली,त्या मुलाखतीचं शीर्षक होतं,‘मी मुकेशला मारलं नाही,’मुकेशच्या मृत्यूनंतर १४ वर्षांनी सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीतही मुकेश बरोबर काही महिन्यांच्या या लग्नाच्या नात्याविषयी रेखानं भाष्य केलं,’माणूस अनेक भावनिक अवस्थांमधून जातो,सुरवातीला धक्का आणि मग ’नाही,हे माझ्यासोबत घडूच शकत नाही’ही भावना,त्यानंतर प्रचंड राग आणि मग स्वत:चीच कीव येणं की ‘मी काय चूक केली?’मला कोणालाही दुखवायंच नव्हतं….’असं रेखा म्हणाली.
थोडक्यात,जिनं स्वत: अगदी लहानपणापासून अपार दु:खं भोगली.आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर खरं प्रेम शोधलं मात्र,कायम तीची फसगत झाली,जी अपार सौंदर्याची खाण असली तरी मूळात जिचं मन खूप कोमल आणि संवेदनशील आहे,जिने कायम अपमान,धोका,स्वप्नांची उधवस्तता आणि दु:खं पदोपदी भोगलं,असे ह्दय कोणाचाही घात करु शकत नाही,.हे जगाला फार उशिरा उमगलं.
हा काळ…रेखासाठी खुप कठीण होता…प्रेम आणि लग्नं दोन्ही नात्यांमध्ये तिची फसगत झाली होती.अशा वेळी अमिताभनेच तिला जगाच्या लपून साथ दिली,सहारा दिला,असं बोललं जातं.जगात अमिताभ एकमेव असा होता जो रेखाला नखशिखात ओळखत होता,ती..जशी आहे..तशी त्याला माहिती होतं…अमिताभमुळेच रेखा जीवनातील या इतक्या मोठ्या धक्क्यापासून सावरु शकली…यानंतरही भारता बाहेर त्यांच्या गाठीभेटी होत होत्या,असा ही कयास लावल्या जातो.
देशातील अनेक ज्योतिष हे रेखाच्या कुंडलीचा अभ्यास ‘विषकन्या’म्हणून करताना आढळतात तेव्हा त्यांच्या विद्वतेची कीव करावीशी वाटते.विनोद मेहरा यांचा मृत्यू,अमिताभचे कुलीच्या शुटिंगपासून बचावणे हे तिच्यासोबत संबंध तोडल्यानेच शक्य झाल्याचा ज्योतिषांचा दावा,मुकेश अगरवाल यांची आत्महत्या,..या सगळ्या कडी ते जोडत जातात मात्र,आयुष्य हे कुंडलीमधील ग्रह तारकांचा प्रभाव नसून,जिवंत मनाच्या वेदनेत होरपळून निघाणा-या प्रेमाचा अंर्तभाव असतो,हे रेखाच्या जिवनाने दाखवून दिले आहे.
अमिताभ हा धर्मेंद्र नव्हता…चार मुलांचा बाप असतानाही धर्मेदने हेमा सोबत विवाह करण्याचं आणि त्यांच्या नात्याला’ न्याय ‘देण्याचं धाडस दाखवलं .जगानेही त्यांचं हे उदात्त प्रेमाचं नातं सहज स्वीकारलं..पण सदीच्या महानायकाला हे जमलंच नाही.त्याने ना जयासोबत न्याय केला ना रेखासोबत.या महानायकाने रेखाच्या प्रेमात पडून लग्नासारख्या नात्यासोबत विश्वासघात तर केलाच होता पण,रेखाचे शरिर,मन,भावना,विश्वास आणि संपूर्ण आयुष्याशीच खेळूनही रेखासोबत त्याला न्याय करता आला नाही..उलट संपूर्ण जगाला तो कसा ‘एक पत्नीव्रत’आहे हेच भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहीला…!तो कायम सेफ गेम खेळत राहीला आणि हे त्याच्या धूर्ततेचे लक्षण मानल्या जातं.
रेखानेही मुकेशसोबत लग्नाचा निर्णय घेऊन एक आयुष्यं संपवण्याचं पातक केलं तर मुकेशनेही जीवनाचा इतका मोठा आणि महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी यातील धोके लक्षात घेणे गरजेचे होते.शेवटी आयुष्य हा चित्रपटत नसतोच,सरतेशेवटी ’हॅप्पी एंडिंग’व्हायला.
रेखा आज तीन दशकांपासून तिची महिला स्वीय सहायक आणि मॅनेजर फरजानासोबत आयुष्य कंठत आहे.फरजाना १९८६ पासून रेखासोबत बांद्रा येथील बंगल्यात राहत आहे.रेखासोबत फरजानाची ओळख ‘सिलसिला’च्या सेटवर झाली होती,ती रेखाच्या मेकअप चमूची एक भाग होती आणि रेखाची या चित्रपटात केशभूषा सांभाळायची.फरजाना प्रत्येक इव्हेंट,पार्टी आणि सार्वजनिक ठिकाणी रेखासोबत सावलीसारखी वावरताना दिसते.मात्र,मीडीयामध्ये त्यांच्या या संबंधाला ‘लेस्बियन’सारख्या संबधांची फाेडणी देण्यात आली.७१ वर्षांची रेखा हिला शरीरापेक्षाही मानसिक,भावनिक गरज जास्त आहे,या मानवी संवेदना व गरजेचेकडे गॉसिप्स करणारे सोयीस्करपणे दूर्लक्ष करतात….!
ती हिंदी चित्रपटसृष्टितील एक सर्वश्रेष्ठ आणि महान अभिनेत्री असून १९८१ मध्ये आलेल्या ‘उमराव जान’चित्रपटात आपल्या शानदार अभिनयासाठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.आपल्या उतरत्या काळातही रेखाने अनेक चित्रपटात दमदार चरित्र भूमिकाही साकारल्या जे कायम सिनेरसिकांच्या लक्षात राहील्या.
तर अमिताभचे वय ८४ वर्ष असून त्यांचा ११ ऑक्टोबर १९४२ साली झाला आहे.या ही वयात ‘कौन बनेगा करोडपती’सारख्या लोकप्रिय शो मध्ये अमिताभ आपल्या त्याच शिस्तीत दिसून पडतो.तर रेखा जेव्हा जेव्हा कोण्या पार्टीसाठी किंवा फिल्मी पुरस्कार साेहळ्यांसाठी बाहेर पडते तेव्हा आजही तिच्या गालावरच्या गुलाबी हास्यात आणि डोळ्यांच्या चमचमणा-या तेजात अमिताभच दडलेला असल्याचा भास होतो.
जरी या दोन महान तारकांचे नाते लग्नापर्यंत पाहोचू शकले नाही तरीही सिनेरसिकांच्या मनात या दोघांची जोडी कायमची अजरामर झाली आहे.अमिताभचे नाव येताच रेखा डोळ्यासमाेर आपसूक तरळते व रेखाचे नाव घेताच डोळ्या समोर येतो तो अमिताभ बच्चनच…!
रेखा …ही एक अशी कीवंदती आहे जी काही हजार शब्दात बंदिस्त होऊ शकत नाही.तिचे प्रत्येक यश एका चित्रपटाचे कथानक आहे,तिची प्रत्येक वेदना एका आयुष्याची कथा आहे.तिचं प्रेम जगातील सर्वात सुंदर परिकथा आहे.म्हणूनच जागतिक प्रेम दिवस रेखा-अमिताभच्या यशस्वी-अयशस्वी प्रेमाची चर्चा न करता साजरा होऊच शकत नाही….!
ही जोडी या जन्मी एक होऊ शकली नाही मात्र,कोट्यावधी चाहते पुढील जन्मी अमिताभ-रेखाला एकत्रित संसार करताना बघण्याची ईच्छा व्यक्त करतात आणि हिच या प्रेमाची यशस्वी सांगता आहे….!पुढील जन्मी तरी रेखाच्या नशीबात ’जुस्तजू जिसकी थी उसको तो ना पाया हमने..इस बहाने से मगर देख ली दूनिया हमने’असे आयुष्य येऊ नये व तिचा प्रेमाचा शोध संपावा असे तिच्या चाहत्यांची मनोभावना आहे.
(वेलेंटाईन डे स्पेशल मालिका समाप्त)
………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
